अध्ययन आणि अध्यापनाच्या व्यवस्थेचे लोकशाहीकरण हे भगवान श्रीकृष्ण, महर्षी वेदव्यास, निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, नामदेवराय आणि नाथ या सहा विभूतींना एकत्र गुंफणारे मूळसूत्र होय. आपण जगतो त्या जगापेक्षा श्रेष्ठ दुसरे विश्व नाही, हे शांभवाद्वयाचे आदिसूत्र स्वीकारले की, या जगातील लोकव्यवहाराच्या प्रत्येक घटकाचे सक्षमीकरण हेच लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाच्या कार्यकर्तृत्वाचे आद्य ध्येय बनते. ज्ञानाची निर्मिती, व्यवस्थापन आणि आदान-प्रदान यांची व्यवस्था उदार, सुलभ आणि सर्वसमावेशक बनविणे, ही मग होतात त्या ध्येयाची तीन अंगे. त्या काळात सर्वोच्च ज्ञाननिधी गणल्या जाणाऱ्या परंतु वर्जनवादी ज्ञानव्यवहार पोसणाऱ्या वेदराशीचे मूळसूत्र गीतेच्या माध्यमातून सेव्य बनवून पहिली कोंडी फोडली ती भगवान श्रीकृष्णांनी. एवं वेदाचें मूळसूत्र। सर्वाधिकारैकपवित्र। श्रीकृष्णें गीताशास्त्र। प्रगट केलें अशा शब्दांत, म्हणूनच, ज्ञानदेव निर्देश करतात भगवान श्रीकृष्णांच्या त्याच ऋणभाराचा. तेच सूत्र महर्षी व्यासांनी अचूक पकडले व पुढे नेले ते श्रीकृष्णोक्तीला गीताग्रंथाचा आकार प्रदान करून. मात्र, काळाच्या पुढील टप्प्यावर आला अडथळा भाषेचा. तिथे मदतीसाठी धावून आली गहिनीनाथांनी शिष्य निवृत्तिनाथांना केलेली आज्ञा. गीताबोधाच्या   ज्ञानप्रवाहामध्ये सुस्नात होण्याची इच्छा जपणाऱ्या जिज्ञासूंना पार करणे अशक्य होते त्या प्रवाहाच्या तीरावर दाटलेली संस्कृतभाषारूपी भरगच्च वनराई. त्यांपायी तो त्यांना अप्राप्य मानवधर्मज्ञानाचा ठेवा खुला करण्यासाठी त्या प्रवाहात उतरण्याची सोय करण्याबाबत निवृत्तिनाथांनी प्रेरणा दिली ज्ञानदेवांना. तीरें संस्कृताचीं गहनें। तोडोनि मऱ्हाठिया शब्दसोपाने। रचिली धर्मनिधानें। निवृत्तिदेवें अशा शब्दकळेद्वारे ज्ञानदेव ती प्रगट करतात. सर्वसामान्यांचे ज्ञानठेव्याद्वारे सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी अपार करुणेने ओथंबून सरसावलेले त्यांच्या सद्गुरूंचे अंत:करण. इथे ज्ञानदेवांनी योजलेला ‘मऱ्हाठी’ हा शब्द भाषावाचक आणि आशयवाचक आहे. ‘मराठी’ अथवा ‘प्राकृत’ हा त्या शब्दाचा भाषासूचक अर्थपैलू. तर, ‘सुगम’ हा आहे ‘मऱ्हाटी’ अथवा ‘मऱ्हाठी’ या शब्दाचा आशयवाचक अर्थपैलू. कृष्णद्वैपायन व्यासांनी शब्दरूप प्रदान केलेली श्रीकृष्णोक्ती प्राकृतामध्ये प्रगट करतानाच ती सर्वसामान्यांना आकळण्यास सुगम ठरेल, असे शब्दसोपान निर्माण करण्याची आज्ञावजा प्रेरणा ज्ञानदेवांना केली निवृत्तिनाथांनी. सद्गुरूंकडून प्राप्त झालेल्या त्या आज्ञेला मी मूर्तस्वरूप कसे प्रदान केले ते आणि तोचि हा मी आतां। व्यासाची पदें पाहतां पाहतां। आणिला श्रवणपथा। मऱ्हाठिया अशा शब्दांत स्पष्ट करतात ज्ञानदेव. जगण्याची जडणघडण होण्यास उपयुक्त ज्ञान केवळ लोकभाषेमध्ये आणून भागत नसते. त्याचे मुक्त आदान-प्रदान शक्य बनविणारी संस्थात्मक रचना यंत्रणाही सिद्ध बनवणे अगत्याचे ठरते. या संदर्भात नामदेवरायांचे योगदान ठरते केवळ अपूर्व आणि अलौकिक. ज्ञानसंपादनाची एरवी मठा-मंदिरांच्या चौकटीमध्ये सीमित राहणारी प्रक्रिया थेट जनमानसापर्यंत घेऊन जाण्यासाठी कीर्तन आणि कीर्तनकारांसारखी लोकसंस्था सक्रिय बनवत नामदेवरायांनी त्या व्यासपीठाला पेहराव बहाल केला खुल्या लोकविद्यापीठाचा. ‘गोसावी-वासुदेव-जोशी’ यांसारख्या ग्रामजीवनातील संवाहकांना मूल्यसिंचनाची माध्यमे बनवून नामदेवरायांचा वसा व वारसा नाथांनी बनविला अधिक समृद्ध. त्याच्याच जोडीने संस्कार घडविले स्वयंशिक्षणाचे. त्यासाठी लोकमानसापुढे आदर्श ठेवला अवधूत दत्तात्रेयांचा.

– अभय टिळक

agtilak@gmail.com