प्रसंग आहे तुकोबांच्या जीवनातील. खऱ्याअर्थाने कसोटीचा. अभंगांच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर डोहाच्या नजीकच तुकोबांनी निर्वाण मांडले… तब्बल १३ दिवस. जलदिव्यामधून तावूनसुलाखून अभंगगाथा अभंग स्वरूपात हाती आल्यानंतर मात्र तुकोबांच्या भावविभोर अंत:करणास अपार वेदना झाल्या. वाडवडिलांपासून घराण्यामध्ये तब्बल आठ पिढ्या ज्याची अविरत सेवा चालू आहे त्या पांडुरंगाला आपण साकडे घातले याचा महाराजांना अतीव खेद वाटला. मनाच्या तशा त्या पश्चात्तापदग्ध अवस्थेत तुकोबांच्या मुखातून जी अभंगवाणी त्या क्षणी स्रावली ती अपरंपार कृतज्ञता, पराकोटीचे कारुण्य, भक्ती, कमालीचा अपराधी भाव, उपरती, प्रेम, जिव्हाळा, क्षमायाचना अशा अनंत छटांनी मंडित झालेली आहे. महाराजांच्या अंत:करणात उसळलेला वेदनेचा डोंब शब्दांकित झालेले त्या प्रसंगीचे ते सारेच अभंग मुळातूनच वाचावेत असे आहेत. तिथे एके ठिकाणी अभंगात आलेल्या दोन ओळी प्रचंड आशयघन आणि असाधारण अनुभूतीची प्रचीती शब्दांकित करणाऱ्याआहेत. अद्वयतत्त्वाचा गाभाच जणू तिथे एकवटलेला दिसतो. ‘पांडुरंगा, अरे १३ दिवस माझा पंचमहाभूतात्मक देह तू एकीकडे डोहाच्या काठावर रक्षण केलास आणि तिकडे डोहामध्ये माझे अक्षररूपही तूच अभंग राखलेस,’ हा भाव- ‘‘वांटिलासी दोहीं ठावीं मजपाशीं आणि डोहीं। लागों दिला नाहीं येथें तेथें आघात।’’ अशा कमालीच्या प्रांजळ परंतु अलौकिक अनुभूतीपूर्ण शब्दांत तुकोबा व्यक्त करतात. एकच एक तत्त्व दोन्ही ठिकाणी विद्यमान होते, हा प्रचीतीचा भाव तुकोबांचे हे शब्द प्रकट करतात. किंबहुना, डोहामध्ये आणि डोहाच्या बाहेर तूच पांडुरंगा दोन्ही ठायी वाटलेला होतास, हे तुकोबांचे दर्शन म्हणजे अद्वयाच्या साक्षात्काराचे शब्दरूपच! दोन पृथक अस्तित्वांच्या माध्यमातून एकत्वाचेच प्रगटन ‘शिव-शक्ती’नामक मेहूण जगामध्ये सर्वत्र घडवत आहे, हा सिद्धान्त- ‘‘दाऊ नि दोनीपण। येक रसाचे आरोगण। करीत आहे मेहुण। अनादि जे।।’’ अशा शब्दांत सिद्ध करत, एक प्रकारे तुकोबांचीच अनुभूती ज्ञानदेव ‘अमृतानुभव’मध्ये मांडत आहेत. जाणिवेच्या अशा लोकोत्तर कोटीमध्ये स्थिर झालेल्या महात्म्याची जगण्याची रीत नेमकी असते तरी कशी, ते तुकोबा- ‘‘अवघा जाला आह्मां एक पांडुरंग। आतां नाहीं जग माझें तुझें।’’ अशा स्वानुभवसिद्ध पद्धतीने विवरून सांगतात. नेमके हेच दर्शन- ‘‘सबाह््य अभ्यंतरीं अवघा व्यापक मुरारी’’ अशा शब्दकळेद्वारे ज्ञानदेवही प्रकट करतात. ‘देव’ आणि ‘भक्त’ या भासमान भेदासह सगळ्याच द्वंद्वांचा या अवस्थेत निरास घडून येतो, याची आपल्याला आलेली रोकडी प्रचीती, तुकोबा- ‘‘आठव नाठव गेले भावाभाव। जाला स्वयमेव पांडुरंग।’’ अशा समर्थ शब्दकळेद्वारे उघड मांडतात. या जगामध्ये एका जगदीश्वराखेरीज दुसरे काहीही नाही असे शास्त्रांचे सांगणे आहे आणि त्याच बोधावर मी आता स्थिर झालेलो असल्याने अवघे विश्व म्हणजे वस्तुत: माझेच विस्तारित रूप होय, या वास्तवाचा स्पर्श झालेल्या तुकोबांच्या मुखातून- ‘‘मीचि मज व्यालों। पोटा आपुलिया आलों।’’ असे दिव्य उद्गार मग उमटतात. तुकोबा हे काय अद्भुत रसायन आहे, याची अंधुकशी तरी कल्पना यावरून यावी. अद्वयदर्शनाच्या साकार रूपाची ही चरमसीमाच जणू!

– अभय टिळक agtilak@gmail.com