अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘नारायण’ या नामाची फार मार्मिक व्याख्या केलेली पाहायला सापडते नाथरायांनी ‘एकनाथी भागवत’च्या दुसऱ्या अध्यायात. हा प्रसंग आलेला आहे भगवान श्रीकृष्णांचे तीर्थरूप असणारे वसुदेव आणि ब्रह्मर्षी नारद यांच्यातील संवादादरम्यान. भागवत धर्मविचाराची गुणवैशिष्टय़े वसुदेव विचारतात नारदांना त्या संवादादरम्यान. ‘नारायण.. नारायण’ हा तर महर्षी नारदांचा प्रिय मंत्र! भागवत धर्मालाच ‘नारायणीय धर्म’ असेही नाव आहे. महाभारतामध्ये महर्षी व्यासांनी भागवत धर्माच्या संदर्भात ‘नारायणीय धर्म’ असाच उल्लेख केलेला सापडतो. ‘‘नरांचा समुदाय गहन। त्यासी ‘नार’ म्हणती जाण। त्याचें ‘अयन’ म्हणजे स्थान। म्हणौनि म्हणती ‘नारायण’ आत्मयासी।’’ अशा शब्दांत ‘नारायण’ या नामाची व्युत्पत्ती नाथराय नारदमुखाद्वारे स्पष्ट करतात. ‘नारायण’ हे मानवमात्रांचे अधिष्ठान होय, हेच सुचवायचे आहे नारदांना इथे. अशा नारायणापासून ज्या विचाराची निर्मिती झालेली आहे तो नारायणीय धर्मविचार. लोकतत्त्व हे भागवत धर्माचा गाभा ठरते ते असे. ‘लोक’ हा समूहवाचक शब्द होय. ‘समाज’, ‘संघ’, ‘समूह’, ‘राष्ट्र’, ‘प्रांत’, ‘राज्य’ अशा विविध अर्थच्छटा लाभलेल्या आहेत या शब्दाला. ‘लोकांचा समूह’ याच अर्थाने ‘समाज’ या संकल्पनेसाठी ‘लोकसंस्था’ अशी अर्थवाही संज्ञा योजतात ज्ञानदेव. एकेकटय़ा व्यक्तीच्या नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा, उत्क्रांतीचा विचार सतत केंद्रस्थानी ठेवणे, हे भागवत धर्माचे असाधारणत्व ठरते. भागवत धर्मविचार सर्वसमावेशक आहे तो असा. अनेक व्यक्तींचा मिळून समाज बनत असतो, त्यामुळे व्यक्ती ही समाजाचे लघुरूप वा आद्य एकक होय, याचे पुरेपूर भान राखतो भागवत धर्मविचार. त्यामुळे समाजात परिवर्तन घडवून आणावयाचे असेल तर त्या प्रक्रियेची सुरुवात व्यक्तीपासून करणे अगत्याचे ठरते, हे सूत्र भागवतधर्मी संतांनी अचूकपणे हेरले. परंतु त्याच वेळी, एकटी-दुकटी व्यक्ती बदलण्याने समाजात त्याचे प्रभावशाली पडसाद उमटत नसल्याने, व्यक्तिगत पातळीवरील परिवर्तनासाठी योजावयाची साधने समूहमनालाही भावतील, आवाहन करतील अशी असावीत, याची दक्षता भागवतधर्मी संतपरंपरेने सतत जपलेली दिसते. नामस्मरण हे याचे आदर्श उदाहरण ठरावे. नामजप एकांतामध्येही करता येतो आणि नामचिंतनाचा तोच व तितकाच आनंद नामाच्या सामूहिक उच्चारणाद्वारेही उपासकाला होतो. ‘‘तुका म्हणे जनां सकळांसहित। घेऊं अखंडित प्रेमसुख।’’ या तुकोबारायांच्या संकल्पामध्ये हेच सार दडलेले आहे. एकांतात काय अथवा लोकांतात काय, नामस्मरणाद्वारे प्राप्त होणाऱ्या परमतत्त्वाच्या प्रेमसुखाची लज्जत अभंग राहणार असेल तर चारचौघांसह आनंदाने नामघोष का करू नये, इतकी सोज्वळ आहे भूमिका तुकोबारायांची. अंत:वृत्ती निर्मळ बनविणे हे नामोच्चारणाचे सर्वोच्च ध्येय दोन्ही पर्यायांमध्ये समसमान साध्य आहे याची ग्वाही- ‘‘एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ। लेश तोही मळ नाहीं येथें।’’ इतक्या नि:संदिग्ध शब्दांत तुकोबाराय देतात त्याचे इंगित तेच. तपसायास करून एकटय़ानेच वैकुंठप्राप्ती करून घेण्यापेक्षा नामघोषाद्वारे उभे विश्वच वैकुंठस्वरूप बनविणे हे किती तरी अधिक श्रेयस्कर होय, ही भूमिका- ‘‘कहीं एकाधेनि वैकुंठा जावें। तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें। ऐसें नामघोष गौरवें। धवळलें विश्व।’’ ही ‘ज्ञानदेवी’च्या नवव्या अध्यायातील ओवी भागवत धर्माने शिरोधार्य मानलेल्या नामचिंतनभक्तीमध्ये केंद्रस्थानी असणारे लोकतत्त्वच अधोरेखित करत नाही काय?

 

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pilgrims of lord krishna loksatta advayabodh article zws
First published on: 21-06-2021 at 03:39 IST