अभय टिळक agtilak@gmail.com

सत्तेचा स्वभाव म्हणा वा प्रकृती, ती केंद्रीकरणाचीच असते. सत्ता राजकीय की आर्थिक की शैक्षणिक की आध्यात्मिक, हा प्रश्न इथे गौण ठरतो. एकदा का सत्तेचे केंद्रीकरण चालू झाले, की सत्ताकेंद्राभोवती हितसंबंधांच्या जाळ्या विणल्या जाऊ लागतात. हे टाळायचे असेल तर सत्तेच्या विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सतत गतिमान राखणे अगत्याचे ठरते. सर्व स्तरांवर नांदणारा खुलेपणा ही ठरते विकेंद्रीकरणाची पूर्वअट. खुलेपणामुळे विकेंद्रीकरणाबरोबरच साध्य होते सर्वसमावेशकता. कोणताही व्यवहार सर्वसमावेशक बनला, की हितसंबंधी गटोपगटांच्या संकुचित हितसंबंधांची जपणूक करणाऱ्या व्यवस्थांच्या निर्मितीची शक्यता मुळातूनच खुडली जाते. ज्ञानव्यवहाराच्या संदर्भात हे वास्तव अचूक हेरणारा अद्वयबोधाच्या परंपरेतील आगळा पुरुष म्हणजे गहिनीनाथ. भगवान शंकरांपासून परंपरेने माझ्यापर्यंत प्रवाहित राहिलेले हे ज्ञानसंचित तू या विश्वातल्या यच्चयावत आर्त-जिज्ञासूंसाठी मुक्तहस्ताने खुले कर, असा उपदेश गहिनीनाथांनी त्यांचे शिष्य निवृत्तिनाथांना दिल्याचे ‘ज्ञानेश्वरी’च्या उपसंहारात ज्ञानदेव विदित करतात. गुरूंची ती आज्ञा कानावर पडल्यावर निवृत्तिनाथांची मन:स्थिती नेमकी कशी झाली, याचे वर्णन- ‘‘आधींच तंव तो कृपाळू। वरी गुरू आज्ञेचा बोलू। जाला जैसा वर्षांकाळू। खवळणें मेघां।।’’ अशा विलक्षण प्रत्ययकारी शब्दांत ज्ञानदेव करतात. उदरात अपरंपार जलसाठा असलेल्या पावसाळ्यातील मेघाला थंड वारा लागल्यानंतर तो जसा झडझडून बरसतो अगदी तशीच, मुळातच करुणेने अंत:करण व्यापलेल्या माझ्या सद्गुरूंची अवस्था झाली, हे ज्ञानदेवांचे कथन विलक्षण सूचक होय. मेघ जसा मुक्तपणे बरसतो, अगदी तसेच समाजाभिमुख कनवाळू लोकशिक्षकाचे आचरण असावे, ही भागवतधर्माची अपेक्षाच ज्ञानदेव निवृत्तिनाथांच्या माध्यमातून स्पष्ट करतात. आपण सिंचन करत असलेली भूमी ही उपजाऊ शेतजमीन आहे की मुरमाड, बरड माळ आहे, याची तमा न बाळगता पावसाळी मेघ जसा बरसतो तसे लोकशिक्षकाचे अध्यापन असावे, ही गहिनीनाथांची मुळातील अपेक्षा. शिकण्याच्या अपेक्षेने आपल्या आश्रमात, मठात अथवा गुरुकुलामध्ये येतील तेवढय़ांनाच काय ते ज्ञानदान करावयाचे, हा संकुचित ज्ञानव्यवहार समाजाच्या वैचारिक-बौद्धिक उन्नयनासाठी पूरक-उपकारक ठरत नाही, हेच ज्ञानदेवांना इथे सूचित करावयाचे आहे. ज्ञान हेच सक्षमीकरणाचे आद्य साधन होय, हे अचूक हेरलेल्या या परंपरेने  ज्ञानव्यवहार पूर्णपणे मुक्त, खुला राहावा यासाठी प्रचलित केलेली ही सर्वोदार व्यवस्था अशी खुली, समन्यायी व सर्वसमावेशक होय. या अध्यापन व्यवस्थेचा लाभ ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे उठवावा. पाऊस सर्वत्र समानच बरसला तरी जमिनीच्या मगदुराप्रमाणे आणि बी-बियाणाच्या प्रतवारीनुसार त्या त्या ठिकाणी पीक पिकत असते, ही लोकशिक्षकाची भूमिका व दृष्टी असावी, हे तत्त्व- ‘‘मेघ वर्षे निर्मळ जळ। जैसें बीज तैसें फळ।’’ अशा मार्मिक शब्दांत नाथराय विशद करतात. खुल्या ज्ञानव्यवहाराला संस्थात्मक रचनेची कुंपणे पडली, की आचार्यव्रताचे रूपांतर घडून येते गुरूबाजीमध्ये व अध्ययन-अध्यापनाच्या मूलभूत कार्याला शिक्षणेतर बाबींचे अस्तर चिकटायला सुरुवात होते. हा धोका ओळखूनच- ‘‘नव्हें हें गुरुत्व मेघवृष्टि वाणी। ऐकावी कानीं संतजनी।’’ अशा प्रकारे भागवतधर्मीय ज्ञानव्यवहाराचे आगळेपण तुकोबा अधोरेखित करतात.