अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पराकोटीच्या भावविभोरतेने गुरू महिमा गाताना शब्दश: उदंड बहर येतो ज्ञानदेवांच्या प्रतिभेला आणि वाणीलाही. अनंत उपमा बहाल करतात ज्ञानदेव ‘गुरू’ या अधिष्ठानाच्या सामर्थ्यांला आणि कृपेला, ‘अनुभवामृता’च्या दुसऱ्या प्रकरणातील पहिल्याच ओवीतील ‘उपायवनवसंतु’ ही ‘गुरू’तत्त्वाला ज्ञानदेवांनी योजलेली उपमा प्रगल्भ आणि तितकीच उद्बोधक होय. वसंत ऋतूचे आगमन झाले की वनश्री फळाफुलांनी बहरून येते, या निसर्गदत्त न्यायाचे अत्यंत काव्यात्म उपयोजन घडविले आहे ज्ञानदेवांनी या ओवीमध्ये. शिष्याच्या साधकावस्थेदरम्यान सद्गुरू वसंत ऋतूची भूमिका पार पाडत असतात हेच सुचवायचे आहे ज्ञानदेवांना त्या उपमेद्वारे. लतावृक्ष जैविकदृष्टय़ा परिपक्व आणि फलधारणेस नैसर्गिकरीत्याच सक्षम बनलेले असले तरी वनामध्ये वसंतागम होत नाही तोवर फळेफुले बहरत नाहीत, हा तर निसर्गाचा नियमच होय. अगदी त्याच न्यायाने, परतत्त्वाच्या प्राप्तीसाठी साधकाने अवलंबलेला उपाय अथवा साधनरूपी वनश्रीमध्ये जोवर गुरूकृपारूपी वसंताचा प्रवेश होत नाही तोवर अनुभूतीची फलधारणा केवळ असंभवच होय, असा नि:संदिग्ध सांगावा आहे ज्ञानदेवांचा. उपायांची अथवा साधनांची वने या शब्दावलीद्वारे ज्ञानदेवांना इथे अभिप्रेत आहेत परमेश्वरप्राप्तीच्या साधनांचे संभार. अनंत प्रकारची साधने मुमुक्षूस उपलब्ध असतात. आपापल्या मगदुराप्रमाणे ज्याची त्याची तपस्या जो तो करत असतो. त्यासाठी  साधनामार्गावरील प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर विविध प्रकारचे उपाय साधक अवलंबत असतो. एका प्रकारे, गहन अरण्यातून वाट काढण्याचाच हा प्रकार. परतत्त्वप्राप्तीसाठी अत्यावश्यक गणल्या गेलेल्या साधनांमध्ये अनुस्युत असलेले कर्मोपचार यथाविधी अवलंबत असताना, अवचित, कर्मकांडांमध्ये गुंतून जाण्याचा धोका जणू पदोपदी ठेवलेलाच. अशा वेळी विरागी साधकाला बळकट जोड आवश्यक भासते ती विवेकाची. ‘म्हणोनि जाणतेनो गुरु भजिजो। तेणें कृतकार्या होईजे । जैसें मूळसिंचने सहजें । शाखापल्लव संतोषती’ ही ‘ज्ञानदेवी’च्या पहिल्या अध्यायातील ओवी या संदर्भात मननीय ठरते या ठिकाणी. महाकाय वृक्षाला पाणी घालायचे म्हणजे प्रत्येक फांदीला आणि पानापानाला पाणी पाजायचे नसते. तर, वृक्षाच्या मुळाशी जलसिंचन केले की त्याच्या शेंडय़ापर्यंत सर्वत्र पानाफुलांना टवटवी प्राप्त होते. याच धर्तीवर, जाणीवपूर्वक आणि जाणतेपणाने ‘गुरू’नामक तत्त्वाचे आराधन जीवनामध्ये आरंभले की साधनकार्याची यथार्थ सांगता आपसूकच घडून येत असते. त्यामुळे, ईश्वरेच्छा मनीमानसी प्रबळ बनलेल्या उपासकाने एका ‘गुरू’तत्त्वाची उपासना आरंभली की त्याची तपश्चर्या फलद्रुप होते, हा होय ज्ञानदेवांच्या कथनाचा इत्यर्थ. साधनापथावर असलेल्या साधकाने मूळसिंचन करायचे म्हणजे नेमके काय करायचे, असा प्रश्न उद्भवेल एखाद्याच्या मनात. ‘गुरू वैराग्याचे मूळ । गुरू परब्रह्म केवळ । गुरू सोडवी तात्काळ । गाठ लिंगदेहाची’ अशा शब्दांत उत्तर देऊन ठेवलेले आहे त्या प्रश्नाचे ज्ञानदेवांनी त्यांच्या गुरुगौरवपर अभंगात. मुमुक्षूने डोळसपणे सिंचन करायचे ते वैराग्याचे मूळ असणाऱ्या विवेकाचे. शिष्याच्या मनोभूमीत सारासार विचाराचे मूळ प्रयत्नांतीदेखील खोलवर रुजलेच नाही तर सगळेच तपसायास फोल. उपायरूपी वनामध्ये प्रवेशून साधनांचे संभार उपसल्यानंतरही विवेकाची प्राप्ती साधकाला झालीच नाही तर सगळेच मुसळ केरात!

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Root irrigation god of knowledge loksatta advayabodh article zws
First published on: 27-07-2021 at 01:29 IST