अभय टिळक agtilak@gmail.com

देऊळ असो कितीही भव्य, त्याचा प्राकार असो कितीही विस्तीर्ण, मंदिराच्या गाभाऱ्याचे प्रवेशद्वार मात्र असते ठेंगणेठुसकेच. गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो झुकूनच. व्हावेच लागते नतमस्तक तिथे. शिर झुकवून गाभाऱ्यात प्रवेश करावा लागण्यामागे संकेत आहे एक दडलेला. उन्नत मस्तक हा निदर्शक होय अहंकाराचा. ‘हा माथा वाकला नाही आणि वाकणारही नाही कोणापुढे’ असा जबर भाव असतो कित्येकांच्या मनात रुजलेला खोलवर. नाही चालत हा ताठा भगवंतापुढे जाताना. गाभाऱ्यात प्रवेश करायचा तो नम्रपणेच. गर्भगृहाचा दरवाजा निरुंद व ठेंगणा राखण्यातून तोच संदेश मिळत राहतो दर्शनेच्छूंना. परंतु याखेरीजही अन्य एक कमालीचा रोचक व सखोल अर्थ दडला आहे गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या रचनेत. ‘ज्ञानदेवी’च्या १८व्या अध्यायातील एका मार्मिक ओवीमध्ये त्याचे विलक्षण विलोभनीय सूचन घडवितात ज्ञानदेव आपल्याला. ‘एक अवधानाचा पुरा। विडापाउडा भीतरां। देऊनि रिघती गाभारां। अर्थज्ञानाचां’ या ओवीतील ज्ञानदेवांचा शब्दन् शब्द पराकोटीचा अर्थगर्भ आहे. ‘परावृत्त’, ‘मागे फिरलेला’, ‘माघार घेतलेला’ या होत अर्थच्छटा ‘पाऊडा’ या शब्दाच्या. तर ‘विडादक्षिणा’ हा अर्थ होतो ‘विडापाउड’ या जोडशब्दाचा. ‘निरोप देणे’ या अर्थाचा ‘विडा देणे’ किंवा ‘विडा दिला’ असा वाक्प्रचार आपल्या परिचयाचा आहेच. तोच  अर्थ अभिप्रेत आहे ज्ञानदेवांना इथे. चित्ताची पुरती एकाग्रता साध्य होणे ही अध्यात्मज्ञानाच्या गाभाऱ्यात प्रवेशण्याची मनीषा बाळगणाऱ्या साधकासाठी अनिवार्य अशी पूर्वअटच होय. परंतु ज्ञानदेवांच्या स्वानुभवानुसार तेवढेच नसते पुरेसे. शब्दानुभवाच्या गाभाऱ्यात पाऊल घालण्यासाठी सिद्ध होत असताना साधकाने आणखी एका गोष्टीला द्यावयाची असते निरोपाची पानसुपारी, असे सूचन आहे ज्ञानदेवांचे. आत्मविद्येच्या अर्थानुभवरूपी गाभाऱ्यात प्रवेशण्यापूर्वी तिथवर संपादन केलेल्या ज्ञानाचे बुद्धीवर झालेले जे संस्कार असतात त्यांना द्यावा लागतो निरोप गाभाऱ्याच्या उंबरठय़ापाशी. संचित ज्ञानाच्या संभाराला आणि ज्ञानसंपादनाच्या जाणिवेला निरोपाची पानसुपारी दिल्यानंतरच एकाग चित्ताने अर्थानुभवाच्या गाभाऱ्यात प्रविष्ट व्हावयाचे असते मुमुक्षू साधकाने, हा आहे ज्ञानदेवांचा सांगावा. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, एकाग्र चित्त आणि निर्मळ बुद्धी असल्याखेरीज नाही मिळत प्रवेश अर्थज्ञानाच्या गाभाऱ्यात. पूर्वसंचित ज्ञानाचे बुद्धीवर लेपन झालेले संस्कार हाही एक प्रकारचा मळच. तो झटकण्याखेरीज पर्याय नसतो साधकाला. संतभेट अत्यावश्यक ठरते तो मळ झटकण्यासाठी. ती घटका आयुष्यात घेऊन उगवेल तो दिवस भाग्याचा. ‘धन्य हे आनंदाची सापडली वेळ। तेणें संतसज्जन भेटलें कृपाळ। त्यांनीं फेडियेला बुद्धीचा वो मळ। दृष्टी दाखविला यशोदेचा बाळवो’ हे निळोबारायांचे अनुभवसंपन्न शब्द म्हणजे निखळ साक्षच त्या वास्तवाची. ‘गुरू’ हे तर संतकुळाचे राजेच. कोणालाही सहजी न आवरणाऱ्या अज्ञानरूपी मदोन्मत्त हत्तीला चितपट करून त्याच्या गंडस्थळातील ज्ञानरूपी मुक्तिमोत्यांचा घास शिष्याला भरवत अर्थज्ञानानुभवाच्या गाभाऱ्यात प्रवेशण्यास त्याला सक्षम बनविणारे सामथ्र्यसंपन्न अधिष्ठान म्हणजे सद्गुरू . गाभाराप्रवेश करण्यापूर्वी सद्गुरूपदाला वंदन करायचे ते त्यासाठीच. ‘मोडूनि मायाकुंजरू। मुक्तिमोतियाचा वोगरू। जेवविता सद्गुरू। निवृत्ति वंदूं’ हे ‘अनुभवामृता’च्या दुसऱ्या प्रकरणातील ज्ञानदेवांचे वचन निर्देश करते ‘गुरू ’ या अनन्यसाधारण अधिष्ठानाच्या अमोघ सामर्थ्यांकडेच.