‘तुकोबा’ म्हणजे नि:संशयच असाधारण विभूती. केवळ अलौकिक आणि अचाट! समाज व्यवहार आणि लोकमानस यांचे अतिशय सूक्ष्म आणि तितकेच मर्मभेदक परीक्षण करून ढोंगाचे बुरखे टरारून फाडून काढण्याचे त्यांचे सामर्थ्य तर निव्वळ अमोघ. अवचितच एखादा अभंग अथवा अभंगातील एखादा चरण असा दाणदिशी आपल्या पुढ्यात अवतरतो, की झिणझिण्या जातात थेट मेंदूतच! एक तटस्थ मानसीं। एक सहज चि आळसीं। दोन्ही दिसती सारिखीं। वर्ण जाणे तो पारखी। हा असाच तुकोबारायांचा एक अभंग. अस्सल आणि वरपांगी सोंग या दोहोंतील गुणात्मक फरक अगदी लख्खदिशी उलगडणारा. द्वंद्वातीत अवस्था उपभोगणारा तापस आणि निखळ आळशी माणूस या दोघांत वरकरणी तरी काहीच फरक दिसत नसतो. शारीरिक पातळीवर निश्चलता हा त्या दोघांतील समान गुण बाह्यात्कारी दृश्यमान होत राहतो. मात्र त्या दोन अवस्थांमधील सूक्ष्मतम असा गुणात्मक फरक हेरतो अंत:करण पारखण्यात वाकबगार असलेला जाणकारच. आमचे नाथराय हे अशा पारख्यांपैकीच एक. ‘समाधी’ ही केवळ शरीर स्थिती नसून ती प्रगाढ अशी आंतरिक अवस्था होय, हे वर्म न उमगताच मांडी ठोकून डोळे मिटून बसणाऱ्यांची बुद्धी कशी ठकलेली असते, त्यांचे विलक्षण मनोज्ञ विवरण नाथराय मांडतात. ‘एकनाथी भागवता’च्या दुसऱ्या अध्यायात. ताटस्थ्या नांव समाधी। म्हणे त्याची ठकली बुद्धी। ते समाधी नव्हे त्रिशुद्धी। जाणावी नुसधीं मूच्र्छा आली। ही नाथांची या संदर्भातील मार्मिक टिप्पणी प्रत्येकालाच अंतर्मुख होण्यास भाग पाडणारी अशीच. नाथ आणि तुकोबाराय यांच्या दरम्यान नांदणाऱ्या आंतरिक अनुबंधाचे मोठे मधुर दर्शनही घडते आपल्याला इथे. बेशुद्ध पडलेला माणूसही बाह्य जगातील व्यवहारांप्रत तटस्थच गणावा लागतो. तेव्हा मानसिक स्तरावरील तटस्थता हा समाधीचा गाभा होय हे सारभूत तत्त्व ‘तटस्थ मानसी’ या दोन शब्दांत स्पष्ट करीत तुकोबा भानावर आणतात आपल्या सगळ्यांनाच. इथे ‘तटस्थ’ या शब्दाचादेखील नाथांना अभिप्रेत असणारा अर्थ नीट समजावून घ्यावयास हवा. ‘ताटस्थ्य’ म्हणजे ‘बधीरपण’ नव्हे! ‘तटस्थ’ या संज्ञेद्वारे नाथराय निर्देश करतात तो निद्वंद्व अशा मानसिक स्थितीकडे. द्वंद्वातीतता हा तर समाधीचा गाभाच. द्वंद्वरहितता ही एकान्त अथवा लोकान्त या दोहोंच्याही असते निरपेक्ष. वरकरणी डोळे मिटून बसलेल्या साधकाच्या मनात द्वंद्वादिकांचा कल्लोळ अविरत चालू असणे अगदी सहजशक्य असते. अशा साधकाला समाधिवस्थेचा गाभा हस्तगत होणे अवघडच हे ते बुडालें द्वंद्वसंधीं। आधिण्याधि महार्णवीं। इतक्या नितळ शैलीत स्पष्ट करून टाकतात नाथराय. ‘चिंता’, ‘काळजी’, ‘मानसिक दु:ख’ असे विविध अर्थपदर लाभलेले आहेत ‘आधि’ या शब्दाला. या सगळ्या मानसिक शल्यांचे मूळ आहे द्वंद्वांत. द्वंद्वामधूनच निपजत राहते विषमता. मुळात, समदृष्टीचेच अधिष्ठान नसेल तर समाधिवस्था कोठून लाभायला? सदा ‘उघड समाधी’ भोगी। कल्पान्तिही जगीं। विषमता तो न देखे। अशा शब्दांत अंमळ वेगळ्याप्रकारे हेच सारतत्त्व मांडतात श्रीधरस्वामी त्यांच्या ‘वेदान्तसूर्य’ या ग्रंथात. जेथें शमली मनाची आधी। ते जाणावी ‘परमसमाधी’। हे नाथांचे वचन म्हणजे ‘समाधी’विषयक चर्चेचा जणू कळसच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

– अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social behavior lokmanas very subtle equally test akp
First published on: 01-10-2021 at 00:16 IST