काही प्रश्न वरकरणी दिसतात-भासतात फार सोपे. परंतु, त्यांची उत्तरे शोधू गेले की मात्र उडते पुरती भंबेरी. त्यांतच भर पडते ती चकवा देणाऱ्या काही धारणांची. ‘निष्काम बनल्याखेरीज परमार्थाचे सार हाती येत नसते’, ही त्यांपैकीच एक धारणा. मग, ‘परमार्थाच्या मार्गाला लागणाऱ्याने कर्म करावे की नाही ?’, हा प्रश्न लगोलग पुढ्यात उभा राहतो. इथे मदतीला धावून येतात बहेणाबाई. यथोचित कर्म फळाचा तो त्याग। कर्तृत्व-विभाग अहंत्यागे। बहेणि म्हणे कर्मत्याग नाही कदा। करावे मर्यादा नुल्लंघोनी हे बहेणाईंचे या संदर्भातील नि:संदिग्ध उद्गार म्हणजे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही प्रांतांतील जिज्ञासूंना अक्षय मार्गदर्शन करणारा दीपस्तंभच जणू. बहेणाबाईंच्या या कथनातील ‘कर्तृत्व-विभाग’ ही शब्दसंहती लक्षणीय होय. ‘भावना’ वा ‘कल्पना’ हे ‘विभाग’ या शब्दाचे दोन अर्थ. हातून सारलेल्या कामाच्या कर्तेपणाचा अहंकार एकदा का विसर्जित केला की त्या कामाचे भलेबुरे फळ मिळण्या- न मिळण्याची मातबरी आपसूकच अप्रस्तुत ठरते. म्हणजे, एकदा का कर्तेपणाच्या भावनेचा त्याग केला की केली जाणारी सारी कामे ‘यथोचित’ ठरतात, असा दाखला आहे बहेणाबाईंचा. मुळात, कोणत्याही प्रकारे अंगीकृत कर्मांचा आणि वाट्याला आलेल्या जबाबदाऱ्यांचा त्याग अजिबात करायचा नाही, असा तर सज्जड सांगावाच देतात त्या. परंतु इथेही, केलेली सारी कामे ‘यथोचित’ ठरण्याची आणखी एक कळ त्या निर्देशित करतात प्रत्येक कर्माच्या मर्यादेकडे आपले लक्ष वेधत. इथे ‘मर्यादा’ या शब्दाने बहेणाबाईंना अभिप्रेत आहे ती प्रत्येक काम करण्याची ‘योग्य पद्धत’. यालाच, अंमळ शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर, म्हणतात ‘विधि’. प्रत्येक मनुष्याने त्याची प्रत्येक कृती जर विधिवत केली तर कर्मबंधाची भीती बाळगण्याचे मुळीसुद्धा कारण नाही, असाच जणू आभासक निर्वाळा देतात बहेणाबाई पारमार्थिकांइतकाच प्रापंचिकांनाही. बहेणाईंचे त्यांच्या सद्गुरूंशी, म्हणजेच, तुकोबांशी असलेले वैचारिक नाते इथे स्वच्छपणे प्रगटते. केवळ रोजची कामेच नव्हेत तर, योग्य रीतीने विषयसुखांचा घेतलेला उपभोग हाही त्यागसमानच होय, असा हवालाच देतात तुकोबा विधीनें सेवन। विषयत्यागातें समान अशा निखळ शब्दांत! प्रपंचामध्ये वावरत असताना रागलोभांच्या लहरींपासून सुटका नसते होत कोणाचीच. मनातील तरंग उमटतात इंद्रियांच्या माध्यमातून बाहेरच्या व्यवहारांत. ‘विधि’ या संज्ञेला जे अर्थाचे अनेक पदर आहेत त्यांतील एक म्हणजे ‘आज्ञा’. मनासह सर्वच इंद्रियांच्या वृत्ति-प्रवृत्तींना आज्ञांकित करून मर्यादेमध्ये राखले की अंत:करणात द्वैताचे जंगल माजण्याची शक्यता मुळातूनच खांदली जाते, असा अनुभवसिद्ध उपदेश बहेणाबाई करतात समकालीन स्त्रीविश्वाला. इंद्रियांच्या वृत्ति विधीने सावरी। न दिसे अंतरी द्वैतभाव हे त्यांचे उद्गार अधोरेखित करतात नेमका तोच कार्यकारणभाव. द्वैतजन्य भेदभावनेचे अंगावर क्षणोक्षणी कोसळणारे आघात सोसावेच लागतात कुटुंबातील स्त्रीला जन्मापासूनच. ते सारे आघात झेलत-पचवत जी स्त्री प्रपंच आणि परमार्थ लीलया तडीस नेते ती खरी पतिव्रता, अशी ‘पतिव्रता’ या संज्ञेची आगळी उपपत्ती सिद्ध करतात बहेणाई प्रपंच परमार्थ चालवी समान। तिनेचि गगन झेलियेलेअशा तेजस्वी शब्दकळेद्वारे. बहेणाईंचे हे वचन म्हणजे जीवनभर त्यांच्या वाट्याला आलेल्या होरपळीचे शब्दरूपच. – अभय टिळक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some questions appear to be grooming sounds very simple akp
First published on: 05-10-2021 at 00:06 IST