आध्यात्मिक अथवा पारमार्थिक गणल्या जाणाऱ्या सिद्धान्तांच्या व्यावहारिक उपयोजनापेक्षाही त्यांच्या तात्त्विक चर्चामंथनाचाच भारतीय मनाला प्रचंड सोस आहे. कोणत्याही सिद्धान्ताची बौद्धिक-तार्किक चिकित्सा झालीच पाहिजे यांबद्दल कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, सिद्धान्त हे आचरणात आणण्यासाठी असतात या अंतिम वास्तवाचा मात्र संपूर्ण विसरच बहुतेकदा चवित्चर्वणाच्या भरात बहुतेकांना पडून जातो. केवळ इतकेच नाही तर, सैद्धान्तिक चर्चेची परिणती आचरणामध्ये घडून येऊन त्यांद्वारे आपल्या व्यक्तिगत तसेच सार्वजनिक वर्तनामध्ये इष्टसा बदल साकारणे अपेक्षित असते हे तर जवळपास आपल्या गावीही नसते. ‘परिवर्तन’ या संज्ञेमध्ये अभिप्रेत आहे ते नेमके तेच. अद्वयदर्शनात अनुस्यूत असणाऱ्या ‘भक्ती’ या तत्त्वाचा विचार या अंगाने करतच नाही आपण कधी. भक्ती ही प्रत्येक जीवमात्राची निसर्गसिद्ध अवस्था होय हा तर अद्वयदर्शनाचा गाभा. मात्र, आपण भक्तीची घट्ट सांगड घातलेली आहे ती कर्मकांडाशी. अगदी नामचिंतनासारख्या अमोघ साधनालादेखील आपण कर्मठतेचा पेहराव बहाल केलेला आहे. परतत्त्वाचे चिंतन किती भावशुद्ध झाले यापेक्षाही बोलबाला अधिक होतो किती माळा जपल्या याचाच ! तान मान सर्वथा । तें भजन न मने चित्ता । वाचा करूनी सोंवळी । उच्चारीन नामावळी ही नामस्मरणाची नाथांनी निर्देशित केलेली शिस्त तर आपल्याला पूर्ण अपरिचितच असते व आहे. आपल्या दैनंदिन जीवनरहाटीवर नामस्मरणाचा चोखोबारायांच्या अर्धांगिनीला, म्हणजे सोयराबाईंना, अपेक्षित असलेला उरला नाहीं भेदाभेद । झालें शुद्ध अंतर । विटाळाचें होतें जाळें । तुटलें बळें नामाच्या हा परिणाम तर आपल्या विचारांच्या कक्षेकडे चुकूनही फिरकतदेखील नाही कधीच. विश्वात्मक शिवचैतन्याच्या प्राप्तीसाठी नव्हे तर अनुभूतीसाठी जे काही करायचे त्याला ‘साधना’ असे संबोधन लाभते अद्वयाच्या प्रांतात. कारण, ज्ञानदेवांच्या अनुभवसिद्ध कथनानुसार ‘भक्ती’ ही होय एक अवस्था. एºहवीं तिजी ना चौथी। हे पहिली ना सरती। पै माझिये सहजस्थिती । भक्ति नांव या ‘ज्ञानदेवी’च्या १८व्या अध्यायातील ओवीमध्ये याच धारणेचा निरपवाद उच्चार करतात ज्ञानदेव. आर्त, जिज्ञासू, अथार्थी आणि ज्ञानी अशा भक्तांच्या चार श्रेणी गीतेमध्येच श्रीकृष्णमुखातून प्रगटलेल्या असल्या तरी, विश्वात्मक परमशिवाचे केवळ ‘असणे’ या अवस्थेलाच ‘भक्ती’ असे म्हणतात, हे ज्ञानदेवांचे वैशिष्ट्यपूर्ण प्रतिपादन शांभवाद्वयाच्या तत्त्वचौकटीमध्ये समजावून घ्यावयास हवे. दृश्यमान असणारे विश्व हे परमशिवाचे प्रगटन असल्याने, शांभवदर्शनानुसार, ‘भक्ती’ ही या विश्वातील प्रत्येक अस्तित्वाची, हरएक आकाराद्वारे विलसणाऱ्या शिवतत्त्वाची निसर्गदत्त सहजस्थितीच ठरते. त्यांमुळे, ‘भक्ती’ हे साध्य म्हणून उरतच नाही. ती होय स्वयंसिद्ध अवस्था. मग, या जगामध्ये जगताना प्राप्तव्य काय ठरते, असा जो प्रश्न साहजिकच उभा राहतो त्याचे संतबोधानुसार एकमात्र, अंतिम आणि नि:संदिग्ध उत्तर होय नीती ! संतप्रणीत भक्तीविचार हा स्वरूपत: नीतीविचार होय तो म्हणूनच आणि याच अर्थाने. आणि त्यामुळेच तो ठरतो निखळ ऐहिक. नाथांनी जी अनेकविध रूपके रचली त्यांत ‘नीती’ या शीर्षकाचे एक स्वतंत्र कथन समाविष्ट करावे याला मोठा अर्थ आहे. भलतें भरीं पडूं नये। अनाचार करूं  नये।  कपट मनीं धरूं नये। कोणी एक हे नाथांचे सांगणे थेट निर्देश करते भागवतधर्मप्रवर्तित भक्तितत्त्वाला लगडलेल्या नीतीच्या अस्तराकडेच. – अभय टिळक

agtilak@gmail.com