गोष्टीरूप ‘महाभारत’ वाचता-ऐकताना, लहानपणी, कळत्या न कळत्या वयात ‘उत्तरायण’ हा शब्द कानावर पडलेला असतो. शरपंजरी पडलेल्या इच्छामरणी पितामह भीष्मांनी सूर्य उत्तरायणात प्रवेश करता झाल्यानंतरच कुडीत्याग केला, हे कथानक ऐकताना त्या बालवयात मन अचंब्याने भारून जाते. ‘उत्तरायणात प्राण जाणे’ ही काही तरी चांगली बाब असावी, एवढाच काय तो बोध त्या गोष्टीद्वारे मनावर बिंबतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्यापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो, उत्तर गोलार्धात सूर्याचे भ्रमण ज्या सहा महिन्यांच्या काळात घडत राहाते त्या कालखंडाला ‘उत्तरायण’ असे म्हणतात… असा तपशील पुढे भूगोलादी विषयांशी तोंडओळख झाल्यानंतर आकलनाच्या कक्षेमध्ये प्रवेशतो. प्राचीन धारणांच्या विश्वात डोकावले तर, उत्तरायणादरम्यान मृत्यू आल्यास त्या व्यक्तीला मोक्ष लाभतो, या श्रद्धेशी परिचय घडतो आणि इच्छामरणी पितामहांनी उत्तरायणापर्यंत मृत्यूला का थोपवून धरले असावे, या जिज्ञासेचे शमन होते. मकर राशीमधून सूर्याचा प्रवेश कर्क राशीमध्ये झाल्यापासून दक्षिणायन सुरू होते आणि मराठी कालगणनेनुसार आषाढ ते पौष असा सहा महिन्यांचा हा कालखंड असतो, हे बारकावे ध्यानात आल्यानंतर ‘उत्तरायण’ आणि ‘दक्षिणायन’ या दोन संज्ञा-संकल्पना पुरेशा स्पष्ट होतात. तर संतबोधाच्या विचारविश्वात पाऊल घातल्यानंतर, ‘उत्तरायण’ आणि ‘दक्षिणायन’ या कालखंडांना कालनिरपेक्ष अर्थ प्रदान केला गेल्याचे ध्यानात येते. भागवतधर्ममूल्यांच्या प्रांतामध्ये  या संज्ञा कालसंबद्ध स्वरूपात उरतच नाहीत. त्या बनतात मूल्यवाचक, स्थितीदर्शक अवस्था. मोठी रोचक बाब दडलेली आहे ती नेमकी इथेच. तिचा अनुबंध आहे तुकोबांच्या सत्शिष्या बहेणाबाईंशी. आपल्या तब्बल १२ पूर्वजन्मांचा वृत्तान्त बहेणाबाई आपल्या मुलाला कथन करतात असे घटित व्यक्त करणारा अभंगांचा एक गुच्छच आहे बहेणाबाईंच्या गाथेमध्ये. अद्वयबोधाच्या मूल्यसाम्राज्यात ‘उत्तरायण’ या संज्ञेचा अभिप्रेत अर्थ प्रपंची विन्मुख जालियाने चित्त। उत्तरायण सत्य तेचि आम्हा। असा सांगतात बहेणाबाई त्यांच्या मुलाला. प्रपंचरचना अनुभवून झाल्यानंतर प्रापंचिकाच्या मनामध्ये संसाराबद्दल अनास्था उत्पन्न होईल त्या क्षणी त्याच्या जीवनामध्ये उत्तरायणाचा आरंभ घडून येतो, हा आहे त्यांच्या कथनाचा इत्यर्थ. मग पंचांगानुसार तेव्हा तिथी अथवा काल कोणताही असो! त्या कालबिंदूवर पंचांग अप्रस्तुतच शाबीत होते हे वास्तव नाही काज तया उत्तरायणाचे। सांगितले साचे तुज पुत्रा। अशा शब्दांत मांडत बहेणाबाई स्पष्ट करतात फरक पंचांगातील उत्तरायण आणि परमार्थातील उत्तरायण या दोहोंदरम्यानचा. चित्त प्रपंचामध्ये गुंतले आहे तोवर आयुष्यक्रमाची वाटचाल दक्षिणायणातून सुरू आहे असे समजावे, असा रोकडा सिद्धान्त प्रपंचाभिमुख मानस सर्वदा। दक्षिण प्रसिद्धा मन तेची। इतक्या नि:संदिग्ध शब्दकळेद्वारे विशद करतात बहेणाबाई. परमार्थसाधनेद्वारे व्यक्तीला स्वायत्त बनविणे हा होय संतप्रणीत खटाटोपाचा गाभा. आपल्या जीवनक्रमात आपण दक्षिणायनातून उत्तरायणात केव्हा प्रविष्ट व्हावयाचे हे आकाशस्थ सूर्याच्या भ्रमणक्रमापेक्षा आत्मसूर्याच्या प्रेरणेनुसार आपणच निश्चित करावे, हा बहेणाबाईंच्या या विवेचनाचा केंद्रबिंदू. प्राचीन धारणाश्रद्धांची विवेकनिष्ठ चिकित्सा अंगीकारून पारंपरिक संज्ञा-संकल्पनांची बदललेल्या ऐहिक पर्यावरणाशी सुसंगत अशी पुनव्र्याख्या करण्याचा भागवतधर्मी संतपूर्वसुरींचा वारसा बहेणाबाई जपतात तो असा. – अभय टिळक

agtilak@gmail.com

२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Loksatta explained Due to the continuous increase in mustard production, the discussion of yellow revolution is starting
विश्लेषण: देश पिवळय़ा क्रांतीच्या दिशेने..
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!