साधकावस्था मोठी खडतरच असते. नाना प्रकारचे प्रश्न उभे ठाकत राहतात पदोपदी. ‘नाम’ श्रेष्ठ की भगवंताचे ‘रूप’ श्रेष्ठ,  हा असाच मोठा जटिल प्रश्न. साधनेदरम्यान लक्ष केंद्रित करायचे नामावर की रूपावर याचा निर्णय नाही होत लवकर. भगवंताचे नाम होय अरूप. त्यामुळे, नामावर ध्यान स्थिर करणे बनते मोठे कठीण. ध्यानासाठी, त्या मानाने रूप अधिक सोपे व सोयीस्कर. डोळे मिटले की परतत्त्वाचे आपल्या आवडीचे रूप करता येते उभे अंत:चक्षूंच्या पुढ्यात. ‘नाम की रूप?’ या गुंत्यात गुरफटलेल्या साधकांच्या मदतीस धावून येतात  नामदेवराय. ‘नाम हाच देव’ असा दृढ भाव जपणाऱ्या नामदेवरायांचा निरपवाद कौल आहे नामाच्या पक्षाला. आम्हापासूनियां जातां  नये तुज। तें हें वर्म बीज नाम घोकूं। आम्हांसी तों  तुझें नामचि पाहिजे। मग भेटी सहजें देणें  लागे। अशा नि:संदिग्ध शब्दांत नामदेवराय व्यक्त  करतात त्यांचे  नामप्रेम. साधकाने टाहो फोडला की आपल्या ब्रीदाचे रक्षण करण्यासाठी का होईना, पण भगवंताला धाव घेत त्याचे  अव्यक्तपण सोडावेच लागते, हा सांगावा आहे सामावलेला नामदेवरायांच्या या कथनात. परंतु, केवळ एवढ्यावरच थांबत नाहीत नामदेवराय. परतत्त्वाचे रूप आणि त्याचे नाम यांच्या दरम्यान नांदणाऱ्या असाधारण अनुबंधाचे तत्त्व प्रकट केलेले आहे नामदेवरायांनी त्यांच्या एका अभंगात. नाम तेंचि रूप, रूप तेंचि नाम। नामारूपा भिन्न नाही नाही  हे नामदेवरायांचे अनुभूतीसंपन्न उद्गार विलक्षण मार्मिक ठरतात या संदर्भात. नाम आणि रूपाचे अभिन्नत्व अनुभवतच असतो आपणही आपल्या रोजच्या जगण्यात.ऋतू कोणताही असो, हंगामाचा भले मागमूस नसला कोठेही, तरी ‘आंबा’ असा शब्द कानावर पडला जरी कोठून, तरी मन:चक्षूंसमोर छबी उभरते रसाळ आंब्याची.  त्याचप्रमाणे  चित्रात जरी दर्शन  घडले फळांच्या राजाचे तरी ‘आंबा’  हे शब्द उमटतात ओठांद्वारे आपल्या. व्यवहारातील याच न्यायाचे परमार्थाच्या प्रांतातील उपयोजन अधोरेखित करतात नामदेवराय. स्मरणाबरोबर रूपाचे प्रकटीकरण घडवून आणणे एवढ्यापुरतेच काय ते नामाचे सामर्थ्य सीमित नाही. परतत्त्वाच्या नामाचे ठायी अंत:करणाच्या गाभ्यापासून एकदा का जिव्हाळा जडला,की  नजर जाईल त्या प्रत्येक रूपामध्ये वा आकारामध्ये साधकाला दर्शन घडू लागते त्या एकल चिद्वस्तूचे. किंबहुना, भवतालातील यच्चयावत अस्तित्वामध्ये  चैतन्यांची अनुभूती येणे, ही नामसाधन पक्के मुरल्याची अंत:खूण समजावी, असे प्रतिपादन होय नामदेवरायांचे. एकांत एकला सर्व आहे हरी। ऐसेंचि अहर्निशीं धाइजे तूं। नामा म्हणे नाम प्रेम उच्चारण। सर्वही कारण होईल तुझें असा उपदेश नामदेवराय परमार्थ पथावरील पांथस्तांना करतात तो याचसाठी. एकाच सद्वस्तूचे विलसन हर एक वस्तुमात्राच्या माध्यमातून घडते आहे, या अनुभूतीमध्ये स्थिर होऊन साकारणारे भजन हे सर्वतोपरी शुद्ध होय, असा सिद्धान्तच मांडतात नामदेवराय. सर्वांभूतीं भजन हेंचि पैं चोखडे। ब्रह्म माजीवडे करोनी घेई  हे नामदेवरायांचे सांगणे आहे हृदयावर कोरून ठेवावे असेच. याच जाणिवेमध्ये स्थित होऊन नामाचा रात्रंदिवस ध्यास घेतला नामदेवरायांनी. भजनाची त्यांची परी होती या अवस्थेच्याही पलीकडची.  नामा म्हणे तुझी विठ्ठल होऊन। अभंग भजन करीतसां असा सांगावा देत विठ्ठलस्वरूपात देहाचे विसर्जन घडवून आणले नामदेवरायांनी आषाढ वद्य चतुर्दशीस. – अभय टिळक

agtilak@gmail.com