शांती- क्षमा

आपला अपराध करणाऱ्याला उदार अंत:करणाने क्षमा करण्यापुरताच शांतीचा पैस सीमित असणे हेही अमान्यच आहे नाथांना.

उद्वेगाने कुटीचे दार बंद करून बसलेल्या ज्ञानदेवांची समजूत घालताना, हात आपुला आपणा लागे। त्याचा करू नये खेद असे एक कमालीचे आशयघन वचन मुक्ताईंच्या मुखातून बाहेर पडते. एक विलक्षण विरोधाभासही दडलेला आहे मुक्ताईंच्या या कथनात. अद्वयानंदाचे तत्त्वदर्शन ‘ज्ञानदेवी’च्या उपसंहारामध्ये सूचित करणाऱ्या ज्ञानदेवांना, त्याच अद्वयबोधाच्या उपयोजित पैलूचे स्मरण त्यांच्या धाकट्या बहिणीने करून द्यावे, हे चित्रच अतिशय लाघवी होय. सिद्धान्त आणि व्यवहार यांत कोठेही फट पडू न देणे हेदेखील योगप्रधान जीवनप्रणालीचे एक परिमाण गणावे लागते, हे सूक्ष्मतम मूल्यच जणू मुक्ताई या प्रसंगाच्या निमित्ताने अधोरेखित करतात. द्वंद्वातीतता आणि तिच्या कुशीतून निपजणारी शांती हे योगाचे परमसार होय, असा निखळ संदेश मुक्ताईंच्या उक्ती-कृतीद्वारे आपल्या पुढ्यात साकारतो. वैराग्य योग ज्ञान ध्यान। त्याचें फळ तें शांति जाण। ते शांति साधूनि संपूर्ण। आपणिया आपण उद्धरिती हे ‘एकनाथी भागवता’च्या २२व्या अध्यायातील नाथवचन निर्देश करते मुक्ताईंच्याच संदेशाकडे. वृत्तीमधील द्वैतभावनेचा आणि त्या द्वैतभावामधून उमलणाऱ्या द्वंद्वाचा समूळ निरास घडून आल्याखेरीज अशा शांतीचा प्रसव असंभवनीय ठरतो, असेही आवर्जून प्रतिपादन करतात नाथराय. आपला अपराध करणाऱ्याला उदार अंत:करणाने क्षमा करण्यापुरताच शांतीचा पैस सीमित असणे हेही अमान्यच आहे नाथांना. कारण, सूक्ष्मपणे बघितले तरी अपराध्याला क्षमा करण्याच्या भूमिकेतसुद्धा द्वैत प्रच्छन्नपणे नांदताना दिसतेच. एखाद्याने आपला अपराध केला तरी त्याचे शल्य न बाळगता, त्याही पुढे जाऊन, त्याच्याच हितासाठी झटण्यास प्रवृत्त होणे, ही निद्र्वंद्व शांतीची, नाथांच्या मते अव्वल खूण होय. अपराध साहोनु अंगीं। त्याच्या प्रवर्ते हितालागीं। तेचि शांति पैं जगीं। होय दाटुगी निद्र्वंद्व अशी निखळ व्याख्याच सिद्ध करतात नाथराय या संदर्भात. आपला हात आपल्या डोळ्याला लागला तर त्या हाताला शिक्षा करण्याचा विचारदेखील आपल्या मनात येत नाही कारण तिथे द्वंद्व-द्वैत अणुमात्रही नसते. ज्ञानदेवांना नेमके हेच सांगतात मुक्ताई. अशी प्रगाढ द्वंद्व-द्वैतमुक्ती जिथे नांदते तिथे विकारांना मूळ धरण्यास अवकाशच लाभत नसतो. अंत:करणातच विकार नसल्याने ते वाणीद्वारे बाहेर डोकवण्याची शक्यता मुदलातच निकालात निघते. वेचीं तें वचन। जेणें राहे समाधान असा उपदेश मुमुक्षूंना करणाऱ्या तुकोबारायांचा रोख आहे तो शुद्ध, विकाररहित अंत:करणावरच. विमल मानसाद्वारे उमटणारी वाणी विकारशून्य असल्याने तिची परिणती शांतिपूर्ण समाधानात घडून यावी, हे स्वाभाविकच ठरते. परी तेथींची नवलपरी। अपकाऱ्या होय उपकारी। विकार नाहीं ज्याचे अंतरीं। जाण ते खरी निजशांति असा ‘शांती’ या तत्वमूल्याचा निखळ उलगडा उद्धवांबरोबरच्या संवादादरम्यान भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने करतात, असा दाखलाच आहे नाथांचा. अशा निरपवाद निजशांतीचे दर्शन पृथ्वीच्या रूपाने आपल्या पुढ्यात सदासर्वकाळ साकारत असल्यामुळेच पृथ्वीला माझा आद्य गुरू  मी मानतो, असे सांगतात अवधूत ‘एकनाथी भागवता’च्या सातव्या अध्यायात यदुराजांना. येथ भूतीं पृथ्वी पूजिली। नातरी विष्ठामूत्रीं गांजिली। हर्षविषादा नाहीं आली। निश्चळ ठेली निजशांतीं हे अवधूतांच्या मुखातील उद्गार पृथ्वीची द्वंद्वातीतताच अधोरेखित करतात. ‘क्षमा’ हे  नाव पृथ्वीला म्हणूनच तर आहे. – अभय टिळक

agtilak@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Theory and practice to be motivated akp

ताज्या बातम्या