शैवागमाच्या तत्त्वबोधाचे व्यवहारातील उपयोजन अतिशय नेमकेपणाने हेरलेली दोन भावंडे म्हणजे चोखोबा आणि त्यांची बहीण निर्मळा. विश्वात्मक देव ही संकल्पना अचूक आकळली तर द्वैत, द्वेष, मत्सर, भेदाभेद, विषमता, स्पर्धा, हिंसा, विटाळ, अन्याय, पिळवणूक, अत्याचार, यांसारख्या हिणकस भावना प्रेरणांना लोकव्यवहारात मुळात थाराच मिळणार नाही. ज्या जगात आपण प्रत्येक क्षण व्यतीत करत असतो ते जग म्हणजे वस्तुत: परमशिवाचे प्रगट विलसन होय, हा अद्वयबोधाचा गाभा एकदा का आपल्या अस्तित्वाशी एकजीव झाला,की जगाबरोबरच्या आपल्या नातेसंबंधाचा पोत आमूलाग्र बदलूनच जाईल. जाणिवेच्या प्रत्येक क्षणी आपला व्यवहार शिवतत्त्वाशी होतो आहे याची प्रचीती अंत:करणात दृढ झाली की भवतालातील लोकव्यवहारासह स्वत:कडे बघण्याची आपली दृष्टी आरपार पालटून जावी. साधना,भक्ती, उपासना यांसारख्या संकल्पनांसंदर्भातील आपले पारंपरिक असे ठोकळेबाज आकलन मग पडेल गळून.

‘ज्ञानी इयेतें स्वसंविती। शैव ह्मणती  शक्ती। आह्मी परमभक्ती। आपुली ह्मणों’ या ज्ञानदेवीच्या १८ व्या अध्यायात ज्ञानदेव करत असलेल्या प्रतिपादनांचा इत्यर्थ मग आपल्याला नेमका उमगावा. भक्ती हे साध्य अथवा साधन नसून अद्वयदर्शनानुसार ती यच्चयायवत पदार्थमात्रांची निसर्गदत्त अशी सहजावस्था होय, या वास्तवाचा साक्षात्कार घडला की जगण्याचे प्रयोजन क्षणार्धात उलगडते. अखिल विश्व हे विशुद्ध शिवतत्त्वाचे विलसन होय, असे म्हटल्यानंतर या जगापेक्षा सत्य,सुंदर,पवित्र असे वेगळे काही गन्तव्य उरतच नाही मग. ‘या’ जगातून सुटका करून घेऊन यापेक्षा पवित्र, श्रेष्ठ अशा ‘त्या’दुसऱ्या जगात आसन पटकाविण्यासाठी ‘परमार्थ’ म्हणून वेगळी काहीतरी कसरत करण्याचा सवालच उरत नाही. ‘परमार्थ’ म्हणजे लौकिकापेक्षा वेगळे असे काही एक खास साधनाकांड नव्हे, तर ऐहिक जीवन व्यतीत करण्याची ती एक हातोटी होय, याची जाणीव होणे, हाच लौकिक जगण्यातील विलक्षण मौल्यवान असा ‘टर्निंग पॉइंट’! अत्यंत मोक्याचे ते वळण आपल्या नजरेच्या आवाक्यात आणि जाणिवेच्या कक्षेत आणून देणे, हे चोखोबांचे आणि त्यांच्या भगिनी निर्मळांचे  उभ्या जगावरील चिरंतन उपकारच. साधन ते एक जगासी प्रमाण। परदारा परधन वमन जैसें  इतकी साधी हातोटी आहे ती. जिच्यावर आपला दूरान्वयेदेखील हक्क अगर अधिकार नाही अशा कोणत्याही चीजवस्तूची अपेक्षा न धरणे यालाच चोखोबा म्हणतात ‘परमार्थ’! निखळ नैतिकतेची कास धरणे हीच ‘आध्यात्मिक’ असण्याची प्रधान अंतर्खूण मानतात चोखोबा. ऐसा ज्याचा भाव तोचि एक साधु। येर अवघे भोंदू  जगामाजी अशा शब्दांत अंतर्शोधनासाठी आपल्याहाती जणू एक आरसाच ठेवतात चोखोबा अलगद. अद्वयदर्शनाचे उपयोजन आपल्या ऐहिक जगण्याशी थेट भिडलेले आहे ते असे. परमशिवाच्या विश्वात्मक रूपाची उपासना करण्याची प्रक्रिया आणि सामग्री म्हणूनच आहे आगळी वेगळी. ‘परमार्थाला लागणे’ अथवा ‘पारमार्थिक असणे’ याची निर्मळा माउलींना अभिप्रेत असणारी व्याख्या निंदा दोष स्तुती मान अपमान। वमनासमान लेखा आधीं। परद्रव्य परान्न परनारीचा विटाळ। मानावा अढळ परमार्थी अशी निखळ ऐहिक आहे. आपला लौकिक व्यवहार निरामय बनण्यासाठी अद्वयबोधाच्या उपयोजनांचे हे अव्वल सूत्रच जणू!

– अभय टिळक

agtilak@gmail.com