रितेपण

अंमळ काही वेळाने एक गिऱ्हाईक आले आणि त्याने मागणी केली १५ शेर तेलाची.

गुरू नानकदेवांच्या चरित्रातील एका मार्मिक प्रसंगाभोवती गुंफलेली कथा लोकमानसात प्रचलित आहे. १०-१२ वर्षांच्या आतबाहेरच असेल वय त्या प्रसंगी नानकदेवांचे. काही कामासाठी बाहेर जायचे होते नानकदेवांच्या वडिलांना. ‘‘घरगुती कामासाठी मी जरा बाहेर जाऊन येतो, तोवर पेठेतील आपल्या दुकानात बसून आल्या-गेल्या गिऱ्हाईकांना काय हवे-नको ते बघ,’’ असे नानकदेवांना सांगून वडील कामासाठी निघून गेले. वडिलांनी बजावल्यानुसार नानकदेव बसले दुकानात. अंमळ काही वेळाने एक गिऱ्हाईक आले आणि त्याने मागणी केली १५ शेर तेलाची. शेराचे माप हाती घेऊन नानकदेव बुधल्यातून तेल मापून गिऱ्हाईकाच्या भांड्यात घालू लागले. बाहेरचे काम त्या मानाने लवकरच आटोपल्याने नानकदेवांचे वडीलही दुकानी परतले. मुलगा कसा व्यवहार करतो आहे ते बघावे म्हणून, आपल्या येण्याची चाहूल न लागू देता, नानकदेवांचे वडील एका कोपऱ्यात उभे राहून निरखू लागले. एक शेर, दोन शेर… अशी गणती करत नानकदेवांनी १२ शेर तेल मोजून घातले गिऱ्हाईकाच्या भांड्यात. पुन्हा बुधल्यात माप बुडवून गिऱ्हाईकाच्या भांड्यात ते रिकामे करताना नानकदेवांनी उच्चार केला ‘तेरा…’ आणि झाले! बघता बघता नानकदेवांचा देहभाव हरपला. तेलाचा १४ वा शेर गिऱ्हाईकाला देतानाही नानकदेवांचा ‘तेरा…’ हाच उच्चार चालू. १५ व्या शेराच्या बाबतीतही तीच बाब. गिऱ्हाईक अचंबित तर नानकदेवांचे वडीलही स्तंभित. १५ शेर तेल घालून झाले तरी नानकदेवांचा ‘तेरा…’ हा घोष आणि तेलाचे माप गिऱ्हाईकाच्या भांड्यात रिते करण्याचा सपाटा काही थांबेना. दुरून तो सारा देखावा बघणारे नानकदेवांचे वडील अखेर पुढे झाले आणि तेलाचे माप धरलेल्या हाताचा खांदा गदगदा घुसळून त्यांनी नानकदेवांना भानावर आणले. प्रश्नांकित भाव चेहऱ्यावर दाटलेल्या वडिलांची सरबत्ती जरा ओसरल्यानंतर नानकदेवांच्या मुखातून शब्द उमटले, ‘‘पिताजी, ‘तेरा’ हा शब्द मी उच्चारला मात्र आणि एकदम मला जाणीव झाली की, ‘प्रभो, सब कुछ  जो हैं वो तेरा हैं। मेरा तो यहाँ कुछ भी नहीं.’ बस्! त्या जाणिवेने माझ्या अस्तित्वाचा पुरता ताबाच घेऊन टाकला. चुकले का माझे काही…’’ संपली कथा! विकर्माची पुरेपूर जोड बाह््य कर्माला लाभली की कत्र्याची अवस्था नेमकी कशी होत असते, याचा सम्यक बोध घडविणारा असाच हा नानकदेवांच्या जीवनातील प्रसंग. विकर्माने अंत:करण विमल झाले की तिथे अवशिष्ट राहिलेल्या जाणिवेलाच म्हणतात ‘अकर्तात्मबोध’! काही केल्याने अगर काही करत असल्याने उत्पन्न होणारा कर्तेपणाचा अभिमान म्हणा अथवा जाणीव, विकर्माने धुतली गेली की उरते केवळ प्रगाढ रिकामपण. एका परमतत्त्वाचीच सत्ता सर्वश्रेष्ठ, अंतिम आणि सर्वगामी असल्याचा बोध चित्तावर ठसला, की अंतर्विश्वात नांदणाऱ्या रितेपणाचे प्रगटन- ‘‘तुका म्हणे चळे एकाचिया सत्ता। आपुलें मी रितेपणें असें।’’ अशा मोठ्या प्रत्ययकारी शब्दांत करतात तुकोबाराय. अशा निखळ रितेपणामध्ये स्थित झालेल्या साधकाचा जीवनव्यवहार नित्याप्रमाणेच चालू राहतो. तो सगळी कामे पूर्ववतच करत असतो, मात्र तिथे पूर्ण अभाव असतो कर्तेपणाच्या भावनेचा. ‘‘काम नाहीं काम नाहीं। जालों पाहीं रिकामा।’’ अशा शब्दांत त्या अवस्थेचे वर्णन करतात तुकोबा. अस्तित्वाच्या त्या अवस्थेलाच अध्यात्मशास्त्राने प्रदान केलेली संज्ञा म्हणजे- निष्कामता! – अभय टिळक

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Touching incident in the character of guru nanak akp

Next Story
विकर्म
फोटो गॅलरी