शारीरिक आणि भौतिक सुखाच्या आशेवर विजय मिळवला तरी संन्यस्त योग्याच्या अंत:करणातून कामना समूळ नाहीशी झालेली असेल याची हमी देता येत नाही. जगावर रुसून लोकव्यवहारापासून विन्मुख बनू पाहणाऱ्या ज्ञानदेवांना, हेच सूत्र पटवून देण्याचा प्रयत्न करतात मुक्ताबाई. लोकांनी केलेल्या निंदा-उपहासापायी मन दुखावले जाणे, ही बाबदेखील, अंतर्मनात कामना जिवंत असल्याच्या वस्तुस्थितीचा पुरावा मानायचा असा कमालीचा सूक्ष्म दंडक, ज्ञानदेवांच्या निमित्ताने काय केला योगधर्म। नाहीं अंतरीं निष्काम अशा टोकदार शब्दांत उभ्या योगीसमूहासाठी प्रगट करतात मुक्ताई. योगसाधनेची परिणती मन-बुद्धी निष्काम आणि निद्र्वंद्व होण्याद्वारे अक्षय सुखसमाधानाच्या प्राप्तीमध्ये घडून येते, असा नाथांचाही दाखला दिसतो. कधीही ओहोटी न लागणाऱ्या सुखसमाधानाने चित्त शिगोशिग भरलेले असणे, ही ‘योगी’पणाची आद्य खूण मानतात मुक्ताई आणि नाथराय. किंबहुना, योगसाधनेद्वारे अंतर्यामी बोधदीप उजळल्याची तीच या दोघांच्याही लेखी अंतिम पावती ठरते. मग लौकिकार्थाने अशी व्यक्ती सर्वसंगपरित्याग केलेली विभूती असो अथवा संसार पेलणारा कुटुंबवत्सल असो. ‘योगी’पदाला पोहोचलेला साधक सदासर्वकाळ आनंदचित्त, हसतमुख, चिंतामुक्त दिसण्याचा कार्यकारणसंबंध नाथराय जोडतात निजबोधाशी. अंतर्यामी स्थिरावलेल्या परिपूर्ण ज्ञानबोधाची बाह्य अभिव्यक्ती म्हणजे अम्लान प्रसन्नता, हे समीकरण समुद्र सदा सुप्रसन्न। योगी सदा प्रसन्नवदन। केव्हांही धसमुशिलेंपण। नव्हे जाण निजबोधें अशा मोठ्या प्रत्ययकारी शब्दकळेद्वारे सिद्ध करतात नाथराय. एखाद्या वर्षी पाऊसमान कमी झाल्याने समुद्रातील जलनिधी जसा आटत नाही अथवा ऋतुकालमानानुसार असंभाव्य वृष्टी झाली तरी ज्याप्रमाणे समुद्राचे पाणी तुंबळ वाढत नसते, अगदी त्याच न्यायाने, भौतिक पर्यावरणातील अनुकूलता-प्रतिकूलता योग्याच्या चित्ताची समस्थिती विस्कटून टाकत नसतात, हा होय नाथांच्या कथनाचा इत्यर्थ. असा स्थिरबुद्धी योगसाधक व्यवहारी जगातील टक्केटोणपेही तितक्याच समचित्ताने पचवतो. आपल्याशी अनुचित वर्तन करणाऱ्या भवतालातील वृत्ति-प्रवृत्तींशी त्यांच्या त्या अवनत पातळीवर उतरत धसमुसळेपणा करण्याची ऊर्मी तर योग्याच्या व्यक्तिमत्त्वातून केव्हाच हद्दपार झालेली असते, हेच बिंबवतात नाथराय आपल्या मनावर. सुख दु:ख साहे। हर्षामर्षीं भंगा नये या तुकोबारायांच्या कथनानुसार अवस्था असते योगसाधना परिपक्वपणे अंगी बाणलेल्या उपासकाची. ‘योग्या’चे परिवर्तन ‘संता’मध्ये परिपूर्ण घडून येत असल्याच्या या साऱ्या अंतर्खुणाच जणू. अंतर्विश्व बोधामृताने न्हाऊन निघालेल्या त्या समाजाभिमुख संतयोग्याने, मग, त्याच बोधाचा शिडकावा करत व्यावहारिक जगातील पोळलेली मने निवविण्यासाठी कार्यरत बनायचे असते, हा होय मुक्ताईंनी ज्ञानदेवांच्या निमित्ताने केलेल्या व्यापक अशा उपदेशवजा आवाहनाचा विलक्षण उद्बोधक असा पुढील टप्पा. सुखसागर आपण व्हावें। जग बोधें निववावें। बोधा करू नयें अंतर। साधु नाही आपपर हे मुक्ताईंचे उद्गार म्हणजे ‘योगी’विश्वातून ‘संत’कोटीमध्ये प्रविष्ट झालेल्या विभूतींसाठीची अनिवार्य अशी आचारसंहिताच! – अभय टिळक

agtilak@gmail.com