विवेक-दीपावली

साहजिकच मग, रामा जनार्दनांनी रचलेल्या आरतीमधील ‘पंक्ती लोपले ज्ञान जनीं’ अशी वाचावी लागते अथवा वाचावी लागेल.

‘रामा जनार्दन’ हे त्यामानाने अल्पज्ञात विभूतिमत्व. त्याला कारणही तसेच. मुळात, रामा जनार्दनांबाबत निरपवाद विश्वसनीय असा तपशीलच हाताला लागत नाही फारसा. नाथ आणि तुकोबा या उभय संतांचे रामा जनार्दन हे समकालीन. नाथ समाधिस्थ झाले त्या वेळी रामा जनार्दन होते ११ वर्षांचे. तर, तुकोबाराय वैकुंठाला गमन करते झाले त्याआधीच दोन वर्षे रामा जनार्दनांच्या जीवनाची परिसमाप्ती झालेली होती. मात्र, नाथांप्रमाणेच रामा जनार्दनांची गणना जनार्दनस्वामींच्या शिष्यवरांतच केली जाते. अशा या विभूतीसंदर्भात फारसे काही संदर्भ गवसत नसले तरीही रामा जनार्दनांचे नाव सर्वतोमुखी झालेले दिसते ते त्यांनी रचलेल्या ज्ञानदेवांच्या आरतीमुळे. लहानथोरांपासून सगळ्यांनाच चांगल्यापैकी परिचित असणाऱ्या रामा जनार्दनकृत त्या आरतीमधील ‘लोपले ज्ञान जगीं। हित नेणती कोणी। अवतार पांडुरंग। नाम ठेविले ज्ञानीं’ हे दुसरे चरण अतिशय मार्मिक आणि ‘संत’ या कोटीतील व्यक्तिमत्त्वांच्या भागवतधर्माला अभिप्रेत असलेल्या गाभावैशिष्ट्यांसंदर्भात कमालीचे उद्बोधक शाबीत होते. या चरणातील ‘लोपले ज्ञान जगीं’ या पंक्तीसंदर्भात एक संभाव्य पाठभेद आणि पर्यायी शब्दरचना सादर करणारी एक भूमिका क्वचित मांडली जाते. ती फारशी परिचित नसली तरी अनुल्लेखाने थेट विस्मरणात मोकलून द्यावी इतकी तकलादूदेखील म्हणता येणार नाही. ‘लोपले ज्ञान जगीं’ या पंक्तीमधील ‘जगीं’ या शब्दरूपाच्या ठायी ‘जनीं’ अशी शब्दयोजना असावी, अशी ही पर्यायी भूमिका मांडली जाते. साहजिकच मग, रामा जनार्दनांनी रचलेल्या आरतीमधील ‘पंक्ती लोपले ज्ञान जनीं’ अशी वाचावी लागते अथवा वाचावी लागेल. जगामधील ज्ञान लोपून गेल्यामुळे प्रत्यक्ष पांडुरंगानेच त्या ज्ञानाची पुनस्र्थापना घडवून आणण्यासाठी ‘ज्ञानदेव’ असे नामाभिधान धारण करून अवतार घेतला, असे रामा जनार्दनकृत ज्ञानदेवांच्या आरतीमधील मूळ शब्दपंक्ती सांगते. आता, ज्ञानदेवप्रणीत अद्वयदर्शनानुसार दृश्य जगत हे निखळ ज्ञानस्वरूप असलेल्या परमशिवाचेच साक्षात प्रगटीकरण असल्यामुळे जगतातील ज्ञानाचा विलय अथवा लोप घडून येईल, ही शक्यताच मुळात निराधार आणि अप्रस्तुत ठरते. कारण, विश्वाचे आदिबीज असणारे शिवशंभू हे तर अनादी-अनंत असे तत्त्व होय. तेव्हा, मुळात अंतर्बाह्य ज्ञानमय असणाऱ्या या विश्वातील जनलोकांना त्या विश्वाच्या सत्यस्वरूपासंदर्भातील अज्ञानाने घेरल्यामुळे त्या घनघोर अज्ञानाचे निराकरण घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष पांडुरंगच माउली ज्ञानोबारायांचा अवतार घेऊन अवतरले, हे सूचन घडवणारी ‘लोपले ज्ञान जनीं’ ही रामा जनार्दनांची उक्तीच वस्तुत: मूळ पाठामध्ये असावी, असे ‘लोपले ज्ञान जनीं’ या पर्यायी पंक्तीचा पक्ष उचलून धरणाऱ्या भूमिकेचे प्रतिपादन होय. विचारार्ह ठरू शकणाऱ्या या भूमिकेला तात्त्विक पातळीवर पूरक ठरते ती ‘ज्ञानदेवी’च्या चौथ्या अध्यायातील ‘मी अविवेकाची काजळी। फेडूनि विवेकदीप उजळीं। तैं योगियां पाहें दिवाळी।’ निरंतर ही ज्ञानदेवांची जीवनप्रेरणा. केवळ पारलौकिकच नव्हे तर, लौकिक जीवनव्यवहारही निरामय बनविणाऱ्या विवेकदीपावर काजळी धरते तेव्हा भागवतधर्माला अभिप्रेत असणारे लोकाभिमुख संतत्व ती काजळी फेडण्यासाठी क्रियाशील बनते आणि त्यांनी पुन्हा उजळलेल्या विवेकदीपाचा प्रकाश सर्वत्र तेजाळल्याने योगीभक्तांना दिवाळीचा आनंदोत्सव निरंतर साजरा करता येतो, हे आहे ज्ञानदेवांचे कथन. ज्ञानाची दिवाळी म्हणतात ते तिलाच. – अभय टिळक

agtilak@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vivek diwali touching bhagavad gita of personalities akp

Next Story
द्वैताची झाडणी..
ताज्या बातम्या