शेतकऱ्यास बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणे हीच शेतकऱ्यांच्या समस्येची गुरुकिल्ली होय, हा शरद जोशी यांचा युक्तिवाद सर्वमान्य झाला. तसा तो होत नव्हता तोपर्यंत त्यांनी तो का होत नाही याची केलेली मीमांसा ही आजतागायत वैध ठरते. जागतिक व्यापार संघटना, परदेशी भांडवल आदी संकल्पना ज्या वेळी अनेकांना समजतदेखील नव्हत्या त्या काळी त्यांचे खुल्या दिलाने स्वागत करण्याची बौद्धिक दिलेरी फक्त जोशी यांच्याकडेच होती. त्याचमुळे ते इतरांपेक्षा कैक योजने पुढे होते.

भारतात पहिल्यांदा शेतीचे धर्मपुराण आणि अर्थपुराण मांडले शरद जोशी यांनी. शेती हा परंपरेने केला जाणारा व्यवसाय आहे, तो करणाऱ्यास माती, पाणी, हवामान आदी जीवनावश्यक घटक सोडले, तर अन्य कोणतेही भान आणि ज्ञान असावेच लागते असे नाही आणि मुख्य म्हणजे आíथक धोरणांच्या मांडणीत त्यास काही स्थान नसले तरी बिघडत नाही ही मांडणी भारतात ज्याने पहिल्यांदा मोडली असा शेती विषयाचा अर्थोद्गाता म्हणजे शरद जोशी. गेल्या काही महिन्यांच्या आजारपणानंतर शनिवारी त्यांचे निधन झाले. शेतकऱ्यांचा नेता ही त्यांची ओळख अत्यंत अपुरी आणि त्यांच्यावर अन्याय करणारी आहे. शरद जोशी हे शेती आणि अर्थशास्त्र यांचे भाष्यकार तत्त्वज्ञ होते. आपल्याला उमगलेले हे ज्ञान इतरांना समजावून सांगण्याची विलक्षण ताकद त्यांच्याकडे होती. आपल्याकडे कामगार, शेती आदींचे नेते हे शहरी, बुद्धिजीवी वर्गापासून फटकून असतात. हे दोन्ही बाजूंनी घडते. शहरी मंडळींना कृषी समाजातील नेते आपले वाटत नाहीत, तर या शहरी मंडळींना शेतीतील काय कळते, असे शेती करणाऱ्यांना वाटत असते. ही दरी बुजवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य शरद जोशी यांनी केले. नागरी समाजास शेती, त्याचे अर्थशास्त्र आणि नीतिपुराण समजावून सांगितले शरद जोशी यांनी. ते समजावून सांगण्यासाठी लागणारी बौद्धिक क्षमता त्यांच्या ठायी आत्यंतिक होती. त्यामुळे ते शेतकरी आणि शेतीशी काहीही संबंध नसलेले अन्य क्षेत्रीय यांच्यात तितक्याच सहजतेने मिसळत. मराठी तसेच इंग्रजी आणि संस्कृत भाषेवरील उत्तम प्रभुत्व, प्राचीन आणि आधुनिक वाङ्मयाच्या परिशीलनाने समृद्ध झालेल्या व्यक्तिमत्त्वास मिळालेली कृतिशीलतेची जोड हे शरद जोशी यांचे डोळ्यात भरावे असे वैशिष्टय़. हे झाले त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी. अशा संपन्न व्यक्तिमत्त्वातून घडलेली आंदोलनेदेखील तितकीच समृद्ध आणि र्सवकष होती. आजच्या प्रसंगी त्यांचा आढावा घेणे हे आपले कर्तव्य ठरते.
संयुक्त राष्ट्रासाठी स्वित्र्झलडमधील गुबगुबीत चाकरी सोडून शरद जोशी भारतात आले आणि १९७८ मध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनास सुरुवात झाली. हा काळ मोठा धामधुमीचा. आणीबाणीच्या आठवणी ताज्या होत्या. जागतिक स्तरावर इस्रायल आणि अरब यांच्यातील युद्ध आणि त्यानंतर अमेरिकेवर अरबांनी घातलेला तेल बहिष्कार आणि परिणामी आलेली मंदी, यामुळे अस्थिरता होती. खनिज तेल दरात ४०० टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे.. म्हणजे तेलाचे भाव ३ डॉलर प्रतिबॅरल वरून १२ डॉलर प्रतिबॅरलवर गेल्यामुळे.. महागाईच्या झळा बोलक्या मध्यमवर्गास चांगल्याच लागत होत्या. अशा काळात शरद जोशी यांनी आंदोलन छेडले. तोपर्यंत भारतीय समाजास गांधीवादी वा िहसक अशीच आंदोलने ठाऊक होती. शरद जोशी यांनी आंदोलनास आíथक हत्यारांची जोड दिली. शेतकऱ्याने माल पिकवला, पण बाजारात आणलाच नाही तर काय होते हे यानिमित्ताने प्राधान्याने ग्राहक असलेल्या वर्गास या वेळी समजले. सुरुवात झाली कांद्यासारख्या तोपर्यंत दुर्लक्षित पिकाने. नंतर त्यांनी उसास हात घातला आणि मग कापूस. या तीनही पिकांत महाराष्ट्र आघाडीवर आहे. ही सर्व आंदोलने अत्यंत नावीन्यपूर्ण होती. त्यांचा आकृतिबंध एकसारखा नव्हता. विठोबाला साकडे, ठिय्या, पान फूल आंदोलन आदी अनेक नवनवे प्रयोग जोशी यांनी केले. आंदोलनाच्या स्वरूपावरून ते करणाऱ्याच्या बुद्धीची चमक दिसून येते.जिंदाबाद मुर्दाबादच्या निर्बुद्ध घोषणा आणि दगडफेक अशा आंदोलनांना अक्कल लागत नाही. जोशी यांनी केलेली सर्व आंदोलने अत्यंत चमकदार होती. पुढे असे एकेका पिकाच्या आंदोलनाने फारसे काही साध्य होत नाही, हे जाणवल्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्तीचे आंदोलन छेडले. ‘‘शेतीमालाला योग्य तो बाजारभाव मिळू द्यायचा नाही आणि शेतकरी कर्जबाजारीच राहील अशीच व्यवस्था करायची हेच सरकारचे धोरण असते, सबब शेतकऱ्यांची सर्वच कर्जे अनतिक आणि बेकायदेशीर ठरतात, त्यामुळे ती रद्दच व्हायला हवीत,’’ असा त्यांचा युक्तिवाद होता. जोशी तो पटवून देत. किलोभर कांद्यासाठी शंभर रुपये मोजावे लागले तर बिघडले कोठे, या त्यांच्या प्रश्नाचे सयुक्तिक उत्तर देण्याची क्षमता राजकीय नेत्यांत नव्हती. शेतकरी कोणतेही अनुदान मागत नाही, त्यास सूट नको आहे. हवी आहे ती बाजारपेठेतून मिळणारी रास्त किंमत ही त्यांची मांडणी शेतीमालाचा ग्राहक असलेल्या वर्गासाठी धक्कादायक आणि राज्यकर्त्यांसाठी अडचणीची होती. जोशी यांचा रोख हा ग्राहकवर्गावर नव्हता. तो सरकारवर होता. कारण उणे अनुदान देऊन सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना हलाखीत ठेवते, असे त्यांचे म्हणणे होते. ‘‘शेतकऱ्यास बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणे हीच शेतकऱ्यांच्या समस्येची गुरुकिल्ली होय,’’ हा त्यांचा युक्तिवाद नंतर सर्वमान्य झाला. तसा तो होत नव्हता तोपर्यंत जोशी यांनी तो का होत नाही याची केलेली मीमांसा ही आजतागायत वैध ठरते. या युक्तिवादात त्यांनी देशाची ‘भारत’ आणि ‘इंडिया’ अशी केलेली वर्गवारी ही त्या वेळी समाजाचे डोळे उघडणारी होतीच. पण आज इतक्या वर्षांनंतरही ती अधिकच प्रकर्षांने रास्त ठरताना दिसते. हे जोशी यांचे बुद्धिवैभव. वास्तविक त्यांच्या काळात महैंद्रसिंग टिकैत आदी अनेक शेतकरी नेते होते. परंतु जोशी यांच्याइतके बौद्धिक अधिष्ठान अन्य कोणाकडेच नव्हते आणि आजही नाही. जागतिक व्यापार संघटना, परदेशी भांडवल आदी संकल्पना ज्या वेळी अनेकांना समजतदेखील नव्हत्या त्या काळी त्यांचे खुल्या दिलाने स्वागत करण्याची बौद्धिक दिलेरी फक्त जोशी यांच्याकडेच होती. त्याचमुळे जोशी हे इतरांपेक्षा कैक योजने पुढे होते. त्यांच्या चळवळीचे आणखी मोठेपण म्हणजे त्यांनी बांधलेली शेतकरी महिलांची संघटना. १९८६ साली नाशिक जिल्हय़ातील चांदवड येथील अभूतपूर्व आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो महिलांनी विचारलेला आम्ही मरावं तरी किती, हा सवाल त्या वेळी विचारी जनांच्या मनांवर ओरखडा उमटवून गेला होता. त्या वेळची ‘चांदवडची शिदोरी’ ही पुस्तिका आंदोलनाच्या तेजस्वी पर्वाची आजही साक्षीदार आहे.
शेतीचा थेट संबंध राजकारणाशी असतो. त्यामुळे जोशी यांच्या कृषी आíथक विचारास राजकारणाचे आकर्षण वाटले नसते तरच नवल. परंतु त्या आघाडीवर मात्र जोशी तितके यशस्वी ठरले असे म्हणता येणार नाही. जॉर्ज फर्नाडिस ते बाळासाहेब ठाकरे अशा अनेकांना समवेत घेऊन त्यांनी राजकीय मोळी बांधण्याचा प्रयत्न केला. परंतु ती कायमच सल राहिली. शरद पवार यांच्याशीदेखील त्यांचा स्नेह होता. परंतु त्यानेही शेतीचे काही भले झाले असे नाही. पुढे स्वतंत्र भारत पक्ष काढून त्यांनी काही काळ राजकारण केले. भारतीय जनता पक्षाच्या साहय़ाने संसदेतही ते गेले. परंतु त्यामुळे ना राजकारण पुढे गेले ना शेतीकारण. यावरून त्यांच्या चळवळीतही फाटाफूट झाली. अनेकांनी स्वतंत्रपणे शेतकऱ्यांचे लढे, चळवळी उभारल्या. परंतु जोशी यांच्याइतके समर्थ बौद्धिक अधिष्ठान अन्य कोणाकडे नसल्यामुळे त्यांचा आवाका मर्यादितच राहिला. अशा चळवळींना राजकारणाने ग्रासण्याचा शाप असतो. शरद जोशी यांची चळवळही त्यापासून वाचू शकली नाही. परिणामी उत्तम मांडणी, त्याहूनही उत्तम संघटन कौशल्य असूनही या चळवळीची परिणामकारकता मर्यादित राहिली. परंतु ही मर्यादा जोशी यांच्यापेक्षा आपली म्हणावयास हवी. आíथक साक्षरता बेतास बात असलेल्या आपल्या समाजात असा प्रखर अर्थविचार पटणे आणि पचणे तसे अवघडच असते.
ही सर्व मांडणी करताना स्वत:लाही शेतीचा अनुभव असायला हवा, उगाच कोरडे पांडित्य नको, या भूमिकेतून परदेशातून आल्यावर पुण्याजवळ आंबेठाण येथे जोशी यांनी साडेतेवीस एकर जमीन घेतली, तीदेखील कोरडवाहू. तेथे जोशी शेतीचे स्वत: प्रयोग करीत आणि मग त्यावर भाष्य करून त्याचे तत्त्वज्ञान मांडत. अशा तऱ्हेने जोशी अन्यांसारखे कधी क्रियेविण वाचाळ झाले नाहीत. आमचा आणि जोशी यांचा वैयक्तिक स्नेह होता. वयाचे अंतर पार करून नव्यांना अधिक नवे विचार दाखवणारी नजर जोशी यांच्याकडे होती. सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांत नरहर कुरुंदकर, मानववंशशास्त्र, संस्कृती, इतिहास आदी विषयांत दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे अशा नवे विचार देणाऱ्या महानुभावांच्या मालिकेत जोशी मोडतात. आंबेठाण येथील गढीवर त्यांचे विविध विषयांवर विवेचन ऐकणे नेहमीच थक्क करणारे आणि अधिकाची आस जागवणारे असे. तेथील शेतजमिनीच्या तुकडय़ास, कुसुमाग्रजांच्या ‘पायतळी अंगार..’ या काव्यपंक्तीशी नाते सांगत त्यांनी नाव दिले होते अंगारमळा. त्यांनी मांडलेला अर्थविचारांचा मळा आता फुलू लागला असला तरी शरद जोशी यांचा अंगार मात्र आता निमाला. त्यांच्या स्मृतीस ‘लोकसत्ता परिवारा’ची विनम्र श्रद्धांजली.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप