आंतरराष्ट्रीय मंचावर मिरवले वा खिलाडू वृत्तीच्या जाहीर प्रदर्शनातून प्रतिमाबदलाचा प्रयत्न केला म्हणून आम्ही भुलणार नाही, हे ऑस्ट्रेलियन मतदारांनी दाखवून दिले..

चीनची अरेरावी रोखण्यातील अपयश, महागाई आटोक्यात आणण्यातील उदासीनता, इंधन दर रोखण्यातील बेपर्वाई, हुकूमशाही प्रवृत्ती, लोकशाही असूनही कारभारातील एकाधिकारशाही, ज्येष्ठ सहकाऱ्यांनाही विश्वासात न घेण्याची वृत्ती, महिलांविषयी अत्यंत अनुदार वर्तणुकीचे वाढते प्रमाण, खाणसम्राटांशी नको इतकी जवळीक इत्यादी कारणे निवडणुकीत महत्त्वाची ठरतात हे दिसून आले आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन हे त्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकांत अखेर पराभूत झाले. हे गृहस्थ गेली तीन वर्षे पंतप्रधानपदी आहेत. त्या देशातील आघाडीचे राजकारण लक्षात घेता इतकी वर्षे सलग पंतप्रधानपदी एखादा राहणे ही तशी कौतुकाचीच बाब. ऑस्ट्रेलियात निवडणुका दर तीन वर्षांनी होतात आणि प्रतिनिधी सभेतील सर्व आणि आपल्या राज्यसभासदृश सदनांतील निम्मे सदस्य निवडणुकांस सामोरे जातात. म्हणजे मॉरिसन यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. पण त्यांचे या काळातील वर्तन आपल्या हाती सत्ता जणू आमरण राहणार आहे, असेच होते. ही त्यांची वर्तनशैली. वास्तविक त्यांच्या काळात ऑस्ट्रेलिया अधिक वंशवादी झाल्याची टीका झाली आणि अन्य कोणापेक्षा त्या देशात गोऱ्यांचे अधिक प्राबल्य असल्याचे बोलले जाऊ लागले. तरीही मॉरिसन यांना त्याची फिकीर नव्हती. कारण त्यांची उजवी, सनातनवादी विचारधारा. अलीकडे देशोदेशांत हे उजवे अधिक व्यापारउद्योग-स्नेही मानण्याचा प्रघात पडलेला दिसतो. उजवे म्हणजे भांडवलशाहीवादी आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेस अधिक पोषक असा हा समज. तो किती अस्थानी आणि बालिश आहे हे अमेरिकादी देशांत दिसून आले. ऑस्ट्रेलियातही जनतेचा तसाच समज होता. पण गेल्या तीन वर्षांच्या कारभारात त्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि नागरिकांस भान आले. त्यामुळेच हा उजवा नेता अखेर पराभूत झाला. हे सत्तांतर महत्त्वाचे ठरते.

याचे कारण असे की अर्थगती, महागाई, इंधन-दरवाढ, स्त्रियांवषयी असहिष्णुता, परराष्ट्र नीतीतील दारुण अपयश हे जणू देशांतर्गत राजकारणातील महत्त्वाचे मुद्देच नाहीत असे मानले जाऊ लागले आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्टय़ा- आर्थिक नव्हे- उजव्यांचे प्राबल्य अनेक ठिकाणी वाढले आहे. त्याची प्रचीती ठिकठिकाणी येते. तथापि ऑस्ट्रेलिया, त्याआधी फ्रान्स, जर्मनी आणि या सर्वाआधी अमेरिका अशा देशांतील निवडणुका या विषयांचे गांभीर्य दाखवून देतात. त्या देशातील मतदारांच्या लोकशाही जाणिवेचे सौष्ठव जसे यातून दिसते तसेच त्यातून एककल्लींच्या राजकारणाच्या मर्यादा कशा उघडय़ा पडतात हेदेखील समजून घेता येते. अनेक देशांतील नागरिकांस हवाहवासा वाटणारा कायदा ऑस्ट्रेलियात आहे. तो म्हणजे मतदानाच्या सक्तीचा. त्यामुळे या निवडणुकीत जवळपास ९७ टक्के मतदारांची नोंदणी होती. अर्थात तरीही मतदारांची संख्या १ कोटी ७२ लाख इतकीच. आकाराने प्रचंड पण जनसंख्येने मर्यादित असा हा देश. त्या देशात अमेरिकेप्रमाणे निवडणुकीची निश्चित तारीख नसते. पण निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींस तीनपेक्षा अधिक वर्षांचा कार्यकाल नसतो. पंतप्रधान हा निवडून आलेल्यांतील असणे आवश्यक. म्हणजे मागच्या- राज्यसभासदृश दाराने- पंतप्रधानपद मिळवण्याची शक्यता नाही. मॉरिसन यांचे सरकार आघाडीचे होते आणि या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळणार असा आत्मविश्वास त्यांना होता.

तो फोल ठरला आणि मतदारांनी मजूर पक्षाचे, काहीसे अर्ध-डावे अशा अँथनी अल्बानीसी यांच्या बाजूने कौल दिला. हे अँथनी ऑस्ट्रेलियाचे सर्वात ज्येष्ठ म्हणता येतील असे राजकारणी. अल्बो या टोपणनावाने ते लोकप्रिय आहेत. राज्य आणि केंद्र अशा दोन्ही पातळय़ांवर काम केलेल्या या अल्बो यांनी अद्याप साठी गाठायची आहे. तरीही ते ज्येष्ठ. कारण वयाच्या विशीतच त्यांनी मजूर पक्षाच्या कामास सुरुवात केली. त्यांची पार्श्वभूमी मोठी करुण आहे. पौगंडावस्थेत येईपर्यंत त्यांना आपले वडील जन्माआधीच गेले असे वाटत होते. प्रत्यक्षात ते युरोपात आहेत आणि आपण विवाहपूर्व संबंधांतून जन्मास आलेलो आहोत हे नंतर त्यांना कळले. तेव्हा हा तरुण आपल्या वडिलांच्या शोधार्थ निघाला आणि त्याने इटलीत आपल्या वडिलांस गाठले. त्यांचे लहानपणीचे पालनपोषण गरीबगृहांत झालेले. त्यांची आई ही एकल-पालक असल्याने विविध अडचणींचा सामना त्यांना लहान वयातच करावा लागला. त्यामुळे गरीब, गरिबी, भिन्निलगी, समिलगी आदींबाबत अल्बो यांस अत्यंत करुणा आहे. यातून त्यांची राजकीय दृष्टी पुरोगामी बनली. विद्यमान पंतप्रधान मॉरिसन यांच्या उमरावी राजकारणाच्या बरोबर उलट. वर्णवर्चस्ववाद हा ऑस्ट्रेलियाच्या रक्तातच भिनलेला. पण अलीकडच्या काळात त्यात बदल होत असून अल्बो यांची सर्वोच्चपदी निवड हे त्या बदलाचे लक्षण मानले जाते. नेतृत्वाचा एक मानवी चेहरा विरुद्ध आत्ममग्न, आत्मविश्वासू आणि आढय़ताखोर नेता अशी ही लढाई होती.

तीत आढय़ताखोराचा पराभव झाला. त्यात लक्षात घ्यावी अशी बाब म्हणजे मॉरिसन यांच्या पराभवात मोठा वाटा आहे तो त्यांच्याच काही ज्येष्ठ साथीदारांचा. त्यांचे दोन मंत्री, पक्षातील ज्येष्ठ सहकारी आदींनी मॉरिसन यांच्या अरेरावी वृत्तीविरोधात सातत्याने भूमिका घेतली. त्यांच्या एका मंत्र्याने तर अगदी अलीकडे मॉरिसन यांचा उल्लेख ‘फेकू’ (लायर) असा केला. त्यांची ही टीका उघड झाल्याने पंतप्रधानांची चांगलीच कोंडी झाली. दुसऱ्या एका मंत्र्याचा ‘‘आपले पंतप्रधान विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत’’ असा ईमेल निवडणुकांच्या धामधुमीतच ‘फुटला’. त्यामुळे आधीच विरोधी असलेले जनमत मॉरिसन यांच्या विरोधात आणखी गेले. त्यांनी ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला खरा. पण त्यास उशीर झाला. तरुण पोरांशी फुटबॉल खेळून, त्यात पडापड करून आपण किती खिलाडू वृत्तीचे आहोत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयास वाया गेला. जनतेने त्यांच्याबाबतचे मत काही बदलले नाही. ते योग्यच.

कारण गेल्या तीन वर्षांच्या त्यांच्या कारभारावरून निर्माण झालेली प्रतिमा तीन आठवडय़ांत बदलण्याइतका ऑस्ट्रेलियाचा मतदार हलका नाही. पर्यावरण हा त्या देशात गांभीर्याने घेतला जाणारा विषय. त्या मुद्दय़ावर मॉरिसन यांच्याकडे दाखवण्यासारखे काही नाही. उलट झाकण्यासारखेच अधिक. कारण बडय़ा खाणसम्राटांशी त्यांचे असलेले साटेलोटे. या खाणसम्राटांना मॉरिसन यांनी मुक्तद्वार दिले अशी टीका तेथे होते. या खाणसम्राटांतील एक भारतीय आहे. तेव्हा या टीकेचा भारतीय धागा लक्षात यावा. तसेच चीनबाबतची त्यांची धोरणेही अत्यंत फसवी ठरली. ऑस्ट्रेलियाच्या उंबरठय़ावर असलेल्या सॉलोमन आयलंडसारख्या प्रदेशात चीनने मोठी घुसखोरी केली. ते मॉरिसन यांना पहिल्यांदा कळलेच नाही. कळले तेव्हा त्यांनी ‘त्यात काही एवढे गंभीर नाही’, ‘हे मला माहीतच होते’ वगैरे थापेबाजी केली खरी. पण त्यातही ते उघडे पडले. फ्रान्ससारख्या सुसंस्कृत देशाची त्यांनी अणुइंधनाधारित पाणबुडी करारात केलेली फसवणूक हा आणखी एक प्रमाद. देशांतर्गत पातळीवर फारसे काही न जमलेले हे गृहस्थ ‘क्वाड’ या भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या गटात मोठे सक्रिय होते. पण ते केवळ मिरवणे झाले. अशा आंतरराष्ट्रीय मिरवण्याचा देशांतर्गत राजकारणात काहीही उपयोग नसतो हे कळण्याइतके ऑस्ट्रेलियन मतदार सुज्ञ असल्याने त्याचाही काही उपयोग झाला नाही. करोनाकाळातील करकचून लावलेली टाळेबंदी हीच काय ती या नेत्याची जमेची बाजू. पण ती विजय मिळवून देण्याइतकी पुरेशी नव्हती. यातून त्यांची दृढनिश्चयी, धडाडीचा नेता अशी प्रतिमा तयार झाली. त्यामुळेच त्यांस ‘बुलडोझर’ असे म्हटले जायचे. ते त्यांना आवडायचेही. या विरोधातले अल्बो मात्र नेमस्त. माध्यमे त्यांना ‘बिल्डर’ म्हणायची. म्हणजे सर्वाना समवेत घेऊन काही एक उभारणारा. मतदारांनी या ‘बिल्डर’च्या बाजूने उभे राहात ‘बुलडोझर’ला धूळ चारली यातून त्या देशातील सर्वात मोठय़ा नसूनही प्रगल्भ लोकशाहीचे दर्शन घडते. म्हणून ते घेणे महत्त्वाचे.