मोदी अमेरिकेत असतानाच भारताचा मित्र असलेल्या इराणचे सर्वोच्च धर्मगुरू खामेनी हे काश्मीरसंदर्भात वक्तव्य करतात, हे आपल्यासाठी खूपच सूचक आहे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत माध्यमांच्या मधुचंद्रात अन्य एक महत्त्वाची घटना दुर्लक्षित राहिली. ती म्हणजे इराणचे धर्मगुरू अयातोल्ला खामेनी यांनी काश्मीरसंदर्भात केलेले वक्तव्य. रमझान ईदच्या पवित्र मुहूर्तावर जगभरातील इस्लामी बांधवांना उद्देशून दिलेल्या संदेशात अयातोल्ला खामेनी यांनी काश्मीरचा उल्लेख केला. ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दोन वर्षांतील पाचव्या दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले त्या दिवशीची. या अमेरिका दौऱ्यात भारताच्या हाती जणू कसले घबाडच लागणार असा आभास चॅनेलीय चर्चावीरांनी निर्माण केला. त्यांच्या अव्याहत हुच्चपणाच्या मनोरंजन रंगात समस्त भारतवर्ष रंगलेला असताना अयातोल्ला खामेनी यांचे हे वक्तव्य आले. कोणती तरी फुटकळ मिरवणूक जात असताना कर्णकर्कश ढोलताश्यांच्या निनादात कोणा महत्त्वाची हाक कानी पडूच नये असे या संदर्भात झाले, असे म्हणावे लागेल. खामेनी यांचे हे वक्तव्य अनेक अर्थानी महत्त्वाचे ठरते. इराण हा आंतरराष्ट्रीय मंचावरचा भारताचा जुना साथीदार. भारत आणि एकेकाळचा हा पर्शिया यांच्यातील संबंधही अत्यंत ऐतिहासिक. भारतात आजही मोठय़ा प्रमाणावर एकेकाळचे पर्शियन, म्हणजे आताचे इराणी, यांचे वास्तव्य असून ते स्थानिकांना परके वाटत नाहीत. त्यामुळे या देशाचे प्रमुख धर्मगुरू अयातोल्ला यांनी केलेले वक्तव्य दखलपात्र ठरते.

या खामेनी यांच्या मते जगभरातील अनेक प्रांतांत मुसलमानांवर अत्याचार सुरू असून या अत्याचारग्रस्त प्रांतांच्या यादीत जम्मू-काश्मीरदेखील मोडते. या संदर्भात त्यांनी बहारीन, येमेन आदी देशांचे दाखले दिले आणि त्याच माळेत काश्मीरला नेऊन बसवले. आज अनेक देशांत मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, त्यांना गंभीर अवस्थेस तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा जगभरातील अन्य मुसलमानांनी या आपल्या धर्मबांधवांवरील अत्याचारांच्या विरोधात उभे राहावे, असे आवाहन खामेनी यांनी या वेळी केले. आपल्या इस्लामी बांधवांची मुस्कटदाबी करणाऱ्यांच्या विरोधात जगभरातील इस्लामधर्मीयांनी उभे राहावे आणि या प्रश्नातून मार्ग काढावा, असे खामेनी यांचे आवाहन. येथपर्यंत एकवेळ ठीक. परंतु खामेनी येथेच थांबत नाहीत. इस्लामी धर्मबांधवांच्या हितरक्षणार्थ काय करायला हवे हे सांगत असताना खामेनी म्हणतात : संकटातील धर्मबांधवांचे रक्षण करताना काही अहंकारी व्यक्ती आणि हुकूमशाही प्रवृत्ती कदाचित दुखावल्या जातील. तसे झाले तरी बेहत्तर. पण जगभरातील इस्लामी जनतेने आपल्या धर्मबांधवांचे रक्षण करण्याकरिता एक व्हावे. हे अहंकारी आणि हुकूमशाही कोण?

ही वक्तव्ये अन्य कोणा इस्लामी माथेफिरू धर्मगुरूने केली असती तर त्यांची संभावना अनुल्लेखाने करता आली असती. पण ही वक्तव्ये करणारी व्यक्ती इराण या देशाची सर्वोच्च धर्मगुरू आहे आणि आपले इराणशी असलेले संबंध अत्यंत ऐतिहासिक आहेत. किंबहुना संयुक्त राष्ट्राचे व्यासपीठ असो की अन्य काही आंतरराष्ट्रीय. इराणने जम्मू-काश्मीर आणि अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर आपल्याला कायमच पाठिंबा दिलेला आहे. याशिवाय इराण आपला दुसऱ्या क्रमांकाचा खनिज तेल पुरवणारा देश आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात तर इराण ते भारत अशी विशेष तेलवाहिनी विकसित करता येईल काय, अशीही चर्चा होती. इराणवर त्या वेळी अमेरिकेचे र्निबध होते. तरीही आपला इराणकडून तेल मिळविण्याचा प्रयत्न होता. तत्कालीन तेलमंत्री मणिशंकर अय्यर हे या तेलवाहिनीसाठी उत्सुक होते. पण पंतप्रधान विरोधात. त्यातूनच अखेर मणिशंकर अय्यर यांना या खात्यातून हलवले गेले. त्या काळात इराण हा एकच देश असा होता की भारतास तेल आदी खरेदीसाठी रुपया या चलनाचा वापर करता येत होता. त्या काळात सरकारी मालकीच्या काही बँकांनी इराणशी मोठा व्यवहार केला. हे सगळे नमूद करण्याचा उद्देश भारत आणि इराण या देशांतील सौहार्दाचे संबंध दाखवून देणे, हा आहे. त्यात, इराण हा शियाबहुल आणि भारतात शियांची मोठी वस्ती. त्यामुळे अयातोल्ला खामेनी यांच्या या वक्तव्यांची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. इस्लामधर्मीयांसाठी पवित्र असलेल्या रमझान ईदच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही मते व्यक्त केली. महाजालात खामेनी यांच्या नावे हे सर्व प्रसिद्धदेखील झाले. ईदचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असण्याचा संदर्भ यास असला तरी या विधानांची प्रेरणा इतकी तात्कालिक आहे, असे मानणे दूधखुळेपणाचेच ठरेल. खामेनी यांची ही विधाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवनव्या दोस्तान्यांची जी काही आस लागलेली आहे, त्यांच्या पाश्र्वभूमीवर पाहायला हवीत.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर अमेरिकेच्या इराणशी सुधारू लागलेल्या संबंधांत पुन्हा कोलदांडा घातला. ट्रम्प यांचे पूर्वसुरी बराक ओबामा यांनी या प्रश्नावर मुत्सद्दीपणाचे दर्शन घडवीत इराणशी अणुकरार केला आणि त्या देशावर काही बंधने घालत संबंध प्रस्थापित केले. ते सर्व निर्णय ट्रम्प यांनी फिरवले असून इराणसंदर्भात अगदी टोकाची भूमिका घेतली आहे. आणि अशा या ट्रम्प यांची गळाभेट घेणे ऐतिहासिक आहे, असे मोदी यांना वाटते. त्याआधी सौदी अरेबिया संदर्भातही मोदी यांची वर्तणूक ही अशीच होती. लवकरच होऊ घातलेल्या इस्रायल दौऱ्यातही यापेक्षा वेगळे काही होण्याची शक्यता नाही. या घडीला ट्रम्प, सौदी अरेबिया आणि इस्रायल हे तीनही घटक इराण विरोधात आहेत. इराणचा अणू कार्यक्रम इतरांसाठी धोकादायक आहे, असे या तीनही घटकांचे मत आहे. अशा वेळी अमेरिका जिंकून घेण्यासाठी प्रयत्न करीत असताना भारताने इराणच्या रागालोभाची पर्वा करावी काय, असा प्रश्न काहींकडून सोयीस्कररीत्या उपस्थित केला जाऊ शकतो. या प्रश्नामागील गृहीतकच चुकीचे आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुत्सद्देगिरीत ‘याच्या’ बदल्यात ‘ते’ असे नसते. किंबहुना एकाच म्यानात जास्तीतजास्त तलवारी कशा बसतील असा प्रयत्न करणे म्हणजे मुत्सद्देगिरी. असे करीत असताना फक्त काळजी घ्यायची ती इतकीच की या उद्योगांची वाच्यता करावयाची नसते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधात पडद्यासमोरच्यापेक्षा पडद्यामागील घटनांना महत्त्व द्यावयाचे असते. परंतु प्रसिद्धी, आपण काही भव्यदिव्य केल्याचे मिरवणे यांचा सोस असेल तर पडद्यासमोरील गळामिठी आदींना अधिक महत्त्व येते. याचा परिणाम असा की त्यामुळे पडद्यामागील शक्यतांचा अवकाश आकसतो.

आपले सध्या हे असे होते किंवा काय, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतही बलुचिस्तानातील फुटीर कारवायांना उत्तेजन देईल असे खुद्द पंतप्रधानच म्हणतात, नागा बंडखोरांचा नि:पात करण्यासाठी आम्ही ब्रह्मदेशात घुसून कारवाई केली असे मिरवून आपले सुरक्षा सल्लागार शेजाऱ्याला अडचणीत आणतात आणि आता आपल्या नवनव्या मित्र जोडण्याच्या पद्धतीमुळे इराणसारखा आपला जुना पाठीराखा दुखावतो. इराणकडून अशी प्रतिक्रिया येत असताना आणि मोदी यांचा आणखी एक परदेश दौरा संपत असताना चीनने आपल्या सिक्कीमसंदर्भात अधिक ताठर भूमिका घ्यावी हा काही योगायोग नव्हे. इतक्या प्रच्छन्नपणे आपण अमेरिकेच्या कच्छपि लागत असल्याचे दिसत असल्यामुळे इराणसारखे आपले जुने पाठीराखे बिथरत असतील तर चीनसारखे जुने वैरी अस्वस्थ झाले तर नवल ते काय? तेव्हा हे असेच होत राहिले तर आपल्याला आपल्या कार्यपद्धतीचा फेरविचार करावा लागेल. पुढचे पाठ होत असताना मागचे सपाट करणे शहाणपणाचे नसते.