आत्मकेंद्रीपणाला तर्कबुद्धी आणि सत्य-पडताळणी यांचा आधार नसल्यास काय होते, हे ट्रम्प यांच्या कारकीर्दीच्या पहिल्याच महिनाभरात दिसू लागले..

आपल्यावरील प्रत्येक टीका ही व्यापक कटाचा भाग आहे, या भावनेतून यच्चयावत अमेरिकी पत्रकारांना बोगस ठरवणाऱ्या ट्रम्पनाच, फ्लिन प्रकरणाला माध्यमांनी वाचा फोडल्यामुळे आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार १३ दिवसांत बदलावे लागले. ट्रम्प यांचे जागतिक हसे सुरूच राहणार, हे स्वीडनने लक्षात आणून दिले..

साऱ्या आत्मकेंद्रित नेत्यांत काही साम्य असते. या साम्यस्थळांतील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वत: संदर्भातील कोणत्याही घात/अपघातांसाठी ते स्वत: सोडून इतर सर्वाना दोष देतात आणि आपले काही, कधी चुकले आहे असे त्यांना वाटतही नाही. त्याचप्रमाणे आपला प्रत्येक निर्णय, आपण केलेली प्रत्येक कृती ही तर्कबुद्धी, न्यायबुद्धी आदींच्या कसोटीवर टिकणारी आहेच आहे, असा त्यांचा ठाम समज असतो. तसे समजा घडले नाहीच तर अशा व्यक्ती त्याचीही जबाबदारी परिस्थितीवर टाकतात. परंतु आपला निर्णय चुकूही शकतो, असे ते कधीच मान्य करीत नाहीत. तसेच आपल्यावरील प्रत्येक टीका ही व्यापक कटाचा भाग आहे, यावर ते ठाम असतात. आपला कोणताही समीक्षाकार, टीकाकार आपले मूल्यमापन करण्याइतका सक्षम नाही, त्याने/तिने जी काही समीक्षा/टीका केली आहे ती आपल्याविरुद्धच्या कारस्थानाचा भाग आहे, असेच त्यांना वाटत असते. या असल्या स्वभावामुळे अशा मंडळींत कधीही सुधारणा होत नाहीत. कारण सुधारणांसाठी आवश्यक असलेले मोकळे वारे मनात येऊ देण्याची व्यवस्था अशांनी कधीच उभारलेली नसते. यांच्या मनाची कवाडे बंदच असतात. तेव्हा इतिहासात अशा व्यक्तींचा कपाळमोक्ष झाल्याचेच दिसून येते. अशा वेळी वर्तमानात त्यांचे काय होणार, हा प्रश्न अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे निर्माण होतो. त्याचे उत्तर शोधण्याची गरज आहे याचे कारण ट्रम्प यांच्याबाबतचे निष्कर्ष अन्य अनेक नेत्यांनाही लागू होत असल्याने इतरांच्या भविष्याचाही वेध त्यामुळे घेता येईल. ट्रम्प यांनी २० जानेवारीस पदाची शपथ घेतली. सोमवारी त्यास महिना पूर्ण झाला. या एकाच महिन्यात त्यांनी जे काही केले यामुळे त्यांच्या निर्णयांचा आढावा घेणे आवश्यक ठरते. या महिनाभराच्या अवधीत त्यांचे दोन निर्णय गाजले आणि दोन्हीही त्यांना मागे घ्यावे लागले. पहिला निर्णय म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावर झालेली माईक फ्लिन यांची नियुक्ती आणि अवघ्या दोन आठवडय़ांत त्यांच्यावर आलेली पदत्यागाची वेळ. आणि दुसरा निर्णय म्हणजे काही विशिष्ट देशांतील स्थलांतरितांवर बंदी घालण्याचा अट्टहास. तोदेखील त्यांना सोडून द्यावा लागला. त्याचे साद्यंत वर्णन आम्ही ‘धोरणशून्यांची धडाडी’ या अग्रलेखात (३१ जानेवारी २०१७) केले होतेच. तेव्हा आता या फ्लिन प्रकरणाची चर्चा आवश्यक ठरते.

ट्रम्प यांनी नेमलेले हे फ्लिन वास्तविक आपल्याकडच्या उपलष्करप्रमुख पदाच्या दर्जाचे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवडय़ात ट्रम्प यांनी त्यांना या पदाची जबाबदारी घेण्यास सुचवले. अमेरिकी पद्धतीप्रमाणे निवडणूक वर्षांत ८ नोव्हेंबर याच दिवशी मतदान होते आणि नवनिर्वाचित अध्यक्ष २० जानेवारीस पदग्रहण करतो. हा मधला काळ त्यास आपले संभाव्य मंत्री आदी निवडण्यासाठी वापरता येतो. त्यानुसार ट्रम्प यांनी ही निवड केली आणि फ्लिन यांना या पदासाठी निवडले. दरम्यान, अमेरिकी निवडणुकांत रशियाने हस्तक्षेप केल्याचे सिद्ध झाले होते आणि हिलरी क्लिंटन समर्थक नेत्यांच्या संगणकात मोठी घुसखोरी झाल्याचेही आढळले होते. यास हॅकिंग म्हणतात. या हॅकिंगमध्येही रशियन संगणकतज्ज्ञांचा हात होता. ते निश्चित झाल्यावर गतसाली २९ डिसेंबर या दिवशी तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियावर आर्थिक र्निबध लागू केले. त्याच दिवशी या फ्लिन महाशयांनी रशियाचे अमेरिकेतील राजदूत सर्गेइ किसलियाक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि २० जानेवारीच्या शपथविधीनंतर ट्रम्प हे र्निबध उठवतील असे त्यांना सांगितले. यातील आक्षेपार्ह बाब म्हणजे आपण रशियन राजदूताशी बोललो होतो हे त्यांनी स्वत:च्या शपथविधीआधी सरकारला सांगितले नाही. अमेरिकी कायद्यानुसार कोणतीही व्यक्ती स्वत:च्या अधिकारात राजनैतिक विषयांत नाक खुपसू शकत नाही. तो गुन्हा आहे. २९ डिसेंबर २०१६ या दिवशी फ्लिन यांची अधिकृत नेमणूक झालेली नव्हती. म्हणजे ते सरकारच्या नव्हे तर स्वत:च्या अधिकारात वागले. अमेरिकेच्या एफबीआय यंत्रणेने हे सर्व संभाषण टिपलेले असल्याने फ्लिन यांची लबाडी उघड झाली.

यातील धक्कादायक बाब म्हणजे एफबीआयने हा सर्व तपशील ट्रम्प यांच्याकडे सादर केला होता आणि फ्लिन यांची नेमणूक करू नका, असेही सुचवले होते. ते त्यांनी ऐकले नाही. फ्लिन यांची नेमणूक झाली. त्यानंतर या सर्वास माध्यमांत वाचा फुटली आणि फ्लिन यांचा अगोचरपणा सिद्ध झाला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरील व्यक्तीने करू नये ते केलेले आढळल्याने आणि त्यास माध्यमांत वाचा फुटल्याने अखेर फ्लिन यांना पायउतार व्हावे लागले. अवघ्या १३ दिवसांत ट्रम्प यांच्यावर आपली एक महत्त्वाची नेमणूक माघारी घेण्याची वेळ आली. या संदर्भात आणखीही लाजिरवाणा भाग म्हणजे फ्लिन यांचा उत्तराधिकारी म्हणून ट्रम्प यांनी ज्यांची नेमणूक केली त्या रॉबर्ट हॉवर्ड यांनी हे पद नाकारले. एक तर त्यांना हवे होते ते कामातील स्वातंत्र्य आणि अधिकार देण्यास ट्रम्प यांनी नकार दिला आणि त्याच वेळी आधीचे फ्लिन यांनी नियुक्त केलेल्या काही वरिष्ठांना पदावरून दूर केले जावे ही त्यांची विनंतीही ट्रम्प यांनी अव्हेरली. तेव्हा ट्रम्प यांच्या अरेरावी आणि मी म्हणेन ती आणि तीच पूर्व या वृत्तीशी जुळवून घेता येणार नाही, हे जाणवल्यामुळे हॉवर्ड यांनी पद नाकारले. त्यामुळे पुन्हा ट्रम्प यांचेच हसे झाले. हे कमी म्हणून की काय या नंतरच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी यच्चयावत माध्यमांना बोल लावत सर्व पत्रकार बोगस आहेत, असे विधान केले. ते करताना ट्रम्प यांनी आपले प्रशासन कसे अमेरिकेचे आतापर्यंत सर्वोत्तम आणि गतिमान प्रशासन आहे, मी कसा आतापर्यंतचा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेला अध्यक्ष आहे, माझ्या डोक्यावर आधीच्या राजवटीने केलेल्या घाणीचा बोजा कसा आहे आदी अनेक दावे केले.

परंतु त्यांची चूक ही झाली की हे सर्व दावे सत्याच्या कसोटीवर पडताळून पाहता येणारे आहेत, हे त्यांना लक्षात आले नाही. ते आणून देण्यासाठी अमेरिकी माध्यमांनी ट्रम्प राजवटीबाबतचा सर्वच तपशील जाहीर केला. त्यामुळे ट्रम्प पूर्णपणे खोटे ठरले. अमेरिकेच्या इतिहासात ट्रम्प यांच्यापेक्षाही गतिमान प्रशासन असल्याचे दिसून आले, ट्रम्प यांच्यापेक्षाही ओबामा यांची अध्यक्षपदाची पहिली खेप अधिक मताधिक्याची होती हे सत्य समोर आले आणि ट्रम्प यांनी शपथ घेतली त्या वेळी अमेरिकेची अर्थव्यवस्था धडधाकट होती आणि त्यांच्यापेक्षा ओबामा यांच्या समोरील आव्हाने अधिक तीव्र होती, हेही उघड झाले. वास्तविक माध्यमांतून मिळालेला हा इशारा होता. परंतु जगातील सर्वच आत्मानंदी मग्न नेत्यांप्रमाणे ट्रम्प यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी त्यांना आणखी एका फजितीस तोंड द्यावे लागले. दोनच दिवसांपूर्वी फ्लोरिडा येथील सभेत बोलताना ट्रम्प यांनी आदल्या रात्री स्वीडनमध्ये काहीही झाले नसताना पॅरिस वा जर्मनीप्रमाणे दहशतवादी हल्ला झाल्याचे सूचित केले, त्यामुळे स्वीडन सरकारसकट सगळेच चक्रावले. कारण असा काही प्रकारच घडलेला नव्हता. यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षाचे जागतिक हसे झाले.

हे येथे संपणारे नाही. ट्रम्प यांचे स्वत:वरचे प्रेम कमी झाले नाही तर हे असे प्रकार वारंवार घडणार, यात शंका नाही. अहं ब्रह्मास्मि हे खरेच. पण फक्त तेच खरे, असे नाही. ट्रम्प यांचे जे काही होत आहे तो अन्य अशा नेत्यांसाठी म्हणूनच इशारा ठरतो.