scorecardresearch

अग्रलेख : पाडले कोणास? पडले कोण?

पहिली घटना म्हणजे शिवसेना फुटीर आणि भाजप यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची घोषणा करणे. हाच अनेकांस धक्का होता.

eknath shinde

भाजप श्रेष्ठींनी फडणवीस यांना ‘तुमच्या इच्छेपेक्षा आमचे आदेश महत्त्वाचे’ असा जाहीर संदेश देण्याचे कारण नव्हते. असा उघड उपमर्द काँग्रेसनेही कधी केला नसेल..

मुख्यमंत्रीपदी शिंदे यांच्या निवडीऐवजी ‘सरकारात मी नसेन’ म्हणणाऱ्या फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागणे याची चर्चा अधिक मोठी ठरली..

उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर गुरुवारी दिवसभर ज्या काही घडामोडी घडल्या त्या पाहिल्यास कोणाही विचारी जनाच्या मनास पडणारा प्रश्न असेल : पाडले कोणास आणि पडले कोण?

या प्रश्नाचे उत्तर शोधताना जे काही घडले त्याचा आढावा घेणे आवश्यक. यातील पहिली घटना म्हणजे शिवसेना फुटीर आणि भाजप यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची घोषणा करणे. हाच अनेकांस धक्का होता. या निमित्ताने सतत धक्का देत राहण्याची आपली परंपरा भारतीय जनता पक्षाने कायम राखली आणि उद्धव ठाकरे गच्छन्तीनंतर त्यांच्या एकेकाळच्या उजव्या हातास म्हणजे एकनाथ शिंदे यांस मुख्यमंत्रीपदी बसवले. या संदर्भात एक कबुली द्यायला हवी. तीन दिवसांपूर्वी असे काही होणार असल्याचा सुगावा ‘लोकसत्ता’च्या ठाणे प्रतिनिधीस लागला होता आणि तशी बातमीही दिली जाणार होती. परंतु माध्यमांत जर-तरला स्थान नसते. त्यामुळे ते वृत्त प्राधान्याने द्यायला हवे होते असे आता म्हणण्यात अर्थ नाही. अन्यांस मात्र शिंदे यांची निवड हा पूर्ण धक्का असेल. भाजपचा सध्याचा इतिहास पाहता खरे तर या धक्का देण्याच्या तंत्राचाही धक्का बसेनासा झाला आहे. असो. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांची निवड जाहीर झाल्यानंतर भाजपने असे का केले हा प्रश्न.

शिंदे यांच्या हाती मुख्यमंत्रीपद देणे या कृतीचे वर्णन सोप्या मराठीत ‘काटय़ाने काटा काढणे’ असेच होऊ शकते. भाजपसाठी सध्या सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे तो शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस. यांपैकी शिवसेनेस ‘थंड’ करण्याचे काम शिंदे अधिक सुलभपणे करू शकतील. परत शिंदे यांची संभावना आता गद्दार वगैरे विशेषणांनी करणेही अवघड. अशा टीकेचा अतिरेक झाल्यास ‘सामान्य सैनिक मुख्यमंत्रीपदी बसलेला ठाकरे यांस पाहवत नाही’ असे म्हणण्याची सोय शिंदे यांस अधिक. यातील दुसरा मुद्दा सामान्य शिवसैनिकास जास्त आकर्षक वाटू शकतो. तेव्हा शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवल्याने शिवसैनिकांच्या विरोधाची धार आपोआप बोथट होऊ शकते. असे करण्यातील भाजपचा स्वार्थ म्हणजे त्यामुळे शिवसेनेच्या टीकेचा रोख हा यापुढे भाजप नेतृत्वावर न राहता तो शिंदे यांच्यावर असेल आणि शिंदे यांच्यावरील टीका उलटण्याची शक्यता लक्षात घेता त्या टीकेसही नैसर्गिक मर्यादा राहतील. तसेच अद्याप शिवसेना नक्की कोणती आणि कोणाची हे प्रश्नही निकालात निघालेले नाहीत. आपलीच सेना खरी असे शिंदे आणि त्यांचे फुटीर म्हणत आहेतच. आता खुद्द शिंदेच मुख्यमंत्री झाल्याने हे नाकारणे आणि सेनेवरील प्रभुत्व/नियंत्रण राखणे ठाकरे यांस अधिक जड जाईल, असा विचार भाजपने केला असण्याची शक्यता आहे. त्याच वेळी जे ठाकरे यांच्या शिवसेनेत अद्याप आहेत त्यांनाही शिंदे यांच्याकडे जाण्याचा अधिकाधिक मोह होत राहील. म्हणजे भाजप जे करू पाहतो ते काहीही स्वत: न करता भाजपसाठी साध्य होईल. याखेरीज अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासकीय, धोरणात्मक आदी अनुभवासाठी शिंदे यांस पूर्णपणे भाजपवर अवलंबून राहावे लागेल. शिंदे यांच्या समर्थक आमदारांची संख्या भले चांगली असेल. पण गुणात्मकतेच्या आघाडीवर त्यांच्याकडे खडखडाटच दिसतो. तेव्हा शिंदे यांस स्वत: अधिकाधिक फडणवीस यांच्याकडे पाहावे लागेल. येथपर्यंत ठीक.

हे जाहीर करताना ‘ठाकरे सरकार पाडा’ मोहिमेचे गेल्या कैक महिन्यांतील सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे त्यागाची भूमिका घेतली आणि सरकारात सामील न होण्याचा निर्णय घेतला. नव-भाजपच्या गणंगांपैकी एक राम कदम आदींनी फडणवीस यांस त्यागमूर्ती ठरवून त्यांची समाजमाध्यमी आरतीही सुरू केली. येथपर्यंत ठीक. शिंदे हे(च) मुख्यमंत्री होणार असतील तर सरकारात सामील न होण्याचा फडणवीस यांचा निर्णय अत्यंत स्तुत्य होता. तथापि त्यानंतर अवघ्या काही काळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सत्ताधाऱ्यांच्या गृहवाहिनीसमोर फडणवीस यांनी नव्या सरकारात शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे असा ‘निर्णय’ पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांनी घेतल्याचे जाहीर केले. महाराष्ट्राचे सरकार पडणे, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणे, त्यानंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली जाणे या सर्व धक्क्यांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि विध्वंसक धक्का होता तो फडणवीस यांनी ‘उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे’ या आदेशाचा. हा प्रकार भयंकर म्हणावा असा. फडणवीस यांनी जाहीरपणे आपण सरकारात सामील होणार नाही असे सांगितल्यावरही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जाहीरपणे फडणवीस यांना सरकारात सामील होण्याचे, त्यातही तुलनेने कनिष्ठ अशा नेत्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री हे पद स्वीकारण्याचे ‘निर्देश’ देतात हे धक्कादायक आहे. इतकेच नाही तर गृहमंत्री अमित शहा हेदेखील पाठोपाठ फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी ‘नेमले’ जात असल्याचे ट्वीटद्वारे सूचित करतात, हे काय दर्शवते? फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहू नये, सत्तेत सहभागी व्हावे अशी पक्षश्रेष्ठींची इच्छा होती तर तिच्या पूर्तीचा सभ्य मार्ग होता.  गुरुवारी नाहीतरी फक्त शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होते. म्हणजे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणे आले. या विस्तारात फडणवीस यांच्या हाती उपमुख्यमंत्रीपदाची धुरा देता आली असती. तसेही करावयाचे नव्हते तर मुख्यमंत्री शिंदे हे फडणवीस यांना सत्तासहभागाचा जाहीर आग्रह करतील, गळ घालतील अशी व्यवस्था करावयाची आणि मग या खास लोकाग्रहास्तव फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे. हे दोनही आदरणीय मार्ग सोडून भाजप श्रेष्ठींनी फडणवीस यांना ‘तुमच्या इच्छेपेक्षा आमचे आदेश महत्त्वाचे’ असा जाहीर संदेश देण्याचे कारण नव्हते. आपल्याच पक्षाच्या नेत्याचा असा उघड उपमर्द काँग्रेसनेही कधी केला नसेल असे यावर म्हणावे लागते. उद्धव ठाकरे यांचे सरकार पडावे वा पाडावे यासाठी जिवाचे रान केले देवेंद्र फडणवीस यांनी, एकहाती पक्ष हाकला देवेंद्र फडणवीस यांनी, एकनाथ शिंदे यांस आणि त्यांच्या समर्थकांस आंजारले-गोंजारले फडणवीस यांनी आणि तरीही त्यांना दिली गेलेली वागणूक ही अशी. त्यांच्या हाती मुख्यमंत्रीपद दिल्यास त्यांचे प्रतिमासंवर्धन होऊन नरेंद्र मोदी यांच्यानंतर कोण याच्या उत्तरात त्यांचा सहभाग निश्चित होता. इतकी क्षमता आणि कर्तृत्व फडणवीस यांच्या खाती निश्चितच आहे. त्याचा आदर राखणे दूरच. उलट त्यांना अशी वागणूक दिली जाणे भाजपस न शोभणारे आहे. भाजप ज्येष्ठांचे हे असे वर्तन अंतिमत: राजकीयदृष्टय़ाही महागात पडू शकते. याचे कारण असे की पूर्ण मराठी मातीतच मुळे असलेली शिवसेना वा राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्दय़ास ‘महाराष्ट्राचा घोर अपमान’ ठरवून त्यावर रान उठवू शकतात. तसे झालेच तर खुद्द भाजपच्याच अनेक नेत्यांची-  यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही अनेक आले- यास सहानुभूतीच असेल. राष्ट्रीय स्तरावर मोदी यांची जशी एक प्रतिमा आहे तशी राज्य स्तरावर फडणवीस यांची आहे. राज्यातील वरिष्ठ मध्यमवर्गीयांचा एक मोठा गट फडणवीस यांचा चाहता आहे. या सगळय़ाची कसलीही कदर न करता त्यांना जी वागणूक दिली गेली त्यामुळे हा वर्ग भाजपवर नाराज झाल्यास आश्चर्य नाही. दुसरे असे की फडणवीस यांस उपमुख्यमंत्रीपदावर बसवणे भाजपस चालणारे होते तर मग उद्धव ठाकरे यांचा मूळ अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव काय वाईट होता? तो स्वीकारला असता तर फडणवीस असेही याच काळात उपमुख्यमंत्री झालेच असते. पण त्यात त्यांचा आदर राखला गेला असता. ते बहुधा दिल्लीश्वरांस नकोसे असावे.

या प्रकारामुळे आज दिवसभराच्या अखेरीस वृत्तमूल्यातही फडणवीस आघाडीवर होते. मुख्यमंत्रीपदी शिंदे यांच्या निवडीऐवजी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना घ्यायला लावणे ही अधिक मोठी ‘बातमी’ ठरली. त्यामुळे अंतिमत: एकनाथ शिंदे यांच्या बंडाने पाडले कोणास आणि पडले कोण हा प्रश्न पडतो.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Editorial bjp fadnavis announced chief minister shinde government ysh

ताज्या बातम्या