अभिव्यक्तिस्वातंत्र्य या संकल्पनेची पंचाईत अशी की ती अर्धवट स्वीकारता येत नाही. ते पूर्ण आणि निरंकुश असेच असावे लागते..
उदयपूरमधील नृशंस हत्या करणाऱ्यांचा माणुसकी, किमान सभ्यता आदींशी संबंध आला नसणार असे दिसते. अशांस आधुनिक समाजमन कळणे अशक्यच, पण मुळात त्यांना स्वत:चा धर्म तरी कळला आहे काय हा प्रश्न पडतो..




महाराष्ट्रातील लाजिरवाणे राजकीय नाटय़ सुरू असताना देशात अन्यत्र दोन हत्या झाल्या. त्यापैकी एक अधिक भीषण, नृशंस आणि माणुसकीला काळिमा फासणारी होती; कारण त्यात एकाचा जीव गेला. दुसऱ्या प्रकरणाचे वर्णन ‘हत्या’ असे करावे की त्यास ‘हत्येचा प्रयत्न’ असे म्हणावे हा मुद्दा अद्याप संदिग्ध असू शकतो. या हत्येत वा हत्येच्या प्रयत्नात कायदा, व्यवस्थेचा विवेक आणि सामाजिक सहिष्णुता यांचा बळी गेला. पहिल्या हत्येत बळी पडलेली व्यक्ती हिंदु होती. कन्हैयालाल असे या व्यक्तीचे नाव. नराधम म्हणावेत अशा दोन मुसलमान तरुणांकडून राजस्थानातील उदयपूर या तलावांच्या शहरात तो मारला गेला. दुसरी हत्या वा हत्येच्या प्रयत्नांत बळी नाही पण बलिवेदीवर चढवली गेलेली व्यक्ती मुसलमान आहे. मोहम्मद झुबेर हे त्याचे नाव. त्यास दिल्ली पोलिसांनी अटक केली. म्हणजे केंद्रीय गृह खात्याने असे म्हणायला हवे. याचे कारण दिल्ली हे राज्य असले तरी तेथील पोलीस राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाहीत. त्यांचे नियंत्रण केंद्रीय गृह खात्याकडे असते. कन्हैयालाल पेशाने कपडे शिवणारा होता आणि झुबेर हा ‘आल्ट न्यूज’ या विख्यात वृत्तसेवेचा एक संस्थापक. योग्य मापात वस्त्रप्रावरणे शिवणे हे पहिल्याचे काम तर बातम्या म्हणून जे काही ठरवून संघटितपणे पसरवले जात आहे ते सत्याच्या मापात आहे की नाही हे पाहणे ही दुसऱ्याची जबाबदारी. या दोन्ही घटनांचा वरवर पाहता काही संबंध नाही, असे अनेकांस वाटेल. त्यांचा गैरसमज दूर करण्याचे कारणही नाही. तथापि या दोन घटनांतून समोर काय येते याचा विचार आपण समाज म्हणून करण्याइतके प्रगल्भ आहोत किंवा काय हा प्रश्न. त्याच्या उत्तरासाठी या घटनांचा अन्वयार्थ लावावा लागेल.
कन्हैयालालची हत्या दोघा मुसलमान माथेफिरूंनी केली. कारण या कन्हैयालालने इस्लामचे संस्थापक पैगंबरांविषयी अनुदार उद्गार काढणाऱ्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना पाठिंबा दिला होता. तोही समाजमाध्यमांद्वारे. त्याबद्दल त्याच्यावर कारवाई झाली होती. मुळात या कारवाईचीच गरज नव्हती. या नूपुरबाई जे काही बरळल्या ते योग्य आहे असे कन्हैयालाल यांस वाटले असेल तर त्यात कारवाई करण्यासारखे काय? ही मुळात अभिव्यक्तिस्वातंत्र्याचीच गळचेपी. अभिव्यक्तिस्वातंत्र्य या संकल्पनेची पंचाईत अशी की ती अर्धवट स्वीकारता येत नाही. ते पूर्ण आणि निरंकुश असेच असावे लागते. तितकी प्रौढता या समाजापासून हजारो मैलोगणती दूर. त्यामुळे सत्ताधारी/ व्यवस्था/ बहुमतवादी आदींच्या मर्जीवर ही बिचारी अभिव्यक्ती अवलंबून असते. गांधी यांच्या विचारांचा आदर करणे हे जसे अभिव्यक्तिस्वातंत्र्यात बसते तसेच त्यांच्या विचारास विरोध करणे हेदेखील त्याच अभिव्यक्तिस्वातंत्र्यात अंतर्भूत असते. हा विरोध सभ्य आणि अिहसक असावा इतकेच. त्या परिप्रेक्ष्यात नूपुरबाईंकडून मोहम्मद पैगंबर यांच्यावर टीका झाली. तो त्यांचा दृष्टिकोन. पण त्यावर गदारोळ उडाला आणि म्युनिकमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या आणाभाका घेणाऱ्या नेत्याच्या पक्षाने बाईंवर कारवाई केली. अनेक हिंदुंप्रमाणे ती कारवाई कन्हैयालालास रुचली नसावी. त्याने नूपुरबाईंना पाठिंबा दिला. त्या राज्यातील अतिउत्साही काँग्रेस सरकारने कन्हैयास तुरुंगात डांबले.
यातील खास भारतीय हास्यास्पद प्रकार हा की मुळात हा ‘गुन्हा’ केला नूपुरबाईंनी. त्यांना काही झाले नाही. पण त्यांना पाठिंबा देणाऱ्या कन्हैयावर कारवाई. यातूनच त्यास इस्लामी माथेफिरूंकडून धमक्या येत गेल्या. त्यातच त्याची हत्या झाली. ती करणाऱ्यांचा माणुसकी, किमान सभ्यता आदींशी कसलाही संबंध आला नसणार असे दिसते. अशांस आधुनिक समाजमन कळणे अशक्य. पण मुळात त्यांना इस्लाम तरी कळला आहे किंवा काय हा प्रश्न पडतो. अलीकडे सीरिया, लिबिया वा नायजेरिया आदींत दिसून येणारा तालिबान, अल-कईदा वा बोको हराम यांच्याकडून आचरण केला जाणारा इस्लाम हा खरा इस्लाम नाही. इस्लाम हा हिंदु धर्माइतका सहिष्णू कधीच भासला वा दिसला नाही; हे खरेच. तथापि कौटुंबिक उतरंडीत मुलीला वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्याइतका एके काळी सुधारणावादी असलेला इस्लाम पुढच्या टप्प्यात त्या धर्मात फुले- आंबेडकर- आगरकर न झाल्याने मागास होत गेला. त्यासाठी त्या धर्माच्या प्रेषितास बोल लावणे हे जसे अज्ञानमूलक तसेच त्या प्रेषितास बोल लावणाऱ्याचा वध करणे आदिम.
कायद्याच्या मुद्दय़ावर तीच अधोगत वृत्ती आपल्या व्यवस्थेने मोहम्मद झुबेर याचे वा तिस्ता सेटलवाड यांचे प्रकरण हाताळताना दाखवलेली आहे. या मोहम्मदास अटक केली गेली ती त्याच्या २०१८ सालच्या ट्वीटसंदर्भात. ते ट्वीट होते एका सिनेमातील दृश्याबद्दलचे. फारूख शेख आणि दीप्ती नवल हे त्या चित्रपटातील जोडपे मधुचंद्रासाठी ज्या ‘हनिमून हॉटेल’मध्ये जातात त्याच्या फलकावरील अक्षरांची पडझड होऊन ते नाव ‘हनुमान हॉटेल’ असे लिहिल्याप्रमाणे दिसते, त्यावरील भाष्य आणि ते भाष्य हे ट्वीट. यासाठी त्यावर पहिल्यांदा कलमे लावली गेली ती ‘धर्माचा अपमान करीत कोणास इजा’ केल्याबद्दलची. भर न्यायालयात झुबेर याच्या वकिलांनी याबाबत विचारणा केल्यावर त्यात बदल होऊन ‘जाणूनबुजून धर्मभावना दुखावल्या’चा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. वास्तविक त्याविरोधात कोणा हिंदु धर्मबांधवाने तक्रार केली होती, असे म्हणावे तर तेही नाही. त्याच्या वकिलाने ही बाब निदर्शनास आणल्यावरही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आणि सरकारी दमनशाहीचा वरवंटा त्याविरोधात फिरला. सदर मोहम्मद हा आपला मोबाइल आणि लॅपटॉप ‘पुसून’ टाकेल असे हास्यास्पद कारण त्याच्या पोलीस कोठडीसाठी दिले गेले आणि ते स्वीकारले गेले. ‘जामीन हा नियम आणि तुरुंगवास वा कोठडी हा अपवाद’ असे ज्या दिल्लीतून सर्वोच्च न्यायालय उच्चरवात सांगते त्याच दिल्लीत जामिनाचा नियम पायदळी तुडवला गेला आणि मोहम्मद झुबेर यास तुरुंगवास दिला गेला. पण त्याच्यावरील कारवाईचे कारण काय? हा मोहम्मद झुबेर ‘आल्ट न्यूज’ या अत्यंत लोकप्रिय महाजाल सेवेचा संस्थापक. महाजालात फिरवल्या जाणाऱ्या ‘बातमी’ची सत्यासत्यता या सेवेत निश्चित केली जाते. हे अर्थातच असत्य प्रसारकांसाठी मोठेच अडचणीचे. या कामाचाच एक भाग म्हणून ‘आल्ट न्यूज’च्या या झुबेरने प्रेषिताची बदनामी करणारे नूपुर शर्मा यांचे हे कथित वक्तव्य प्रसृत केले आणि त्यामुळेच पुढचे रामायण घडले. म्हणजे उदयपुरात कन्हैयालालची हत्या झाली त्यामागेही नूपुर शर्मा यांचे हे वक्तव्य आणि दिल्लीत मोहम्मद झुबेरवर कारवाई झाली त्यामागेही तेच वक्तव्य.
कन्हैयालालबाबत या वक्तव्याची परिणती त्याच्या हकनाक हत्येत झाली आणि मोहम्मद झुबेर याच्या प्रकरणात या विषयाचा शेवट भारतातील उरल्या-सुरल्या सहिष्णुतेच्या हत्येत (वा हत्येच्या प्रयत्नात) झाला. या दोन हत्या वा एक हत्या वा एक हत्येचा प्रयत्न एक लोकशाहीवादी देश म्हणून आपल्याविषयी काय चित्र निर्माण करतात याचे उत्तर विचारी जनांनी मनातल्या मनात द्यायला हवे. त्यातही आपण कमी पडलो तर या अशा हत्या वा हत्येचे प्रयत्न अधिक जोमाने सुरू राहतील याबाबत तिळमात्रही संदेह नाही.