scorecardresearch

Premium

‘साथ साथ’

बर्ड फ्लू आदी साथीच्या वृत्तांमध्ये नागरिक दंग झाले की अलीकडे औषध कंपन्यांप्रमाणे सरकार वगैरे यंत्रणाही खूश होतात.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

 

बर्ड फ्लू आदी साथीच्या वृत्तांमध्ये नागरिक दंग झाले की अलीकडे औषध कंपन्यांप्रमाणे सरकार वगैरे यंत्रणाही खूश होतात. कारण त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल देता येते..

गेल्या दशकभर वा अधिक काळात या बर्ड फ्लूची मानवी लागण होऊन प्राण गमवावे लागल्याची एकही घटना आपल्याकडे घडली नसूनही राज्यात भयकंप होत राहतो..

करोनाच्या सावटातून जग बाहेर पडायच्या आत तुलनेने कमी उपद्रवी अशा त्याच्या कनिष्ठ बंधूने, म्हणजे ‘बर्ड फ्लू’ने, उगाचच दाणादाण सुरू केल्याचे दिसते. इकडे शंभर कोंबडय़ा गेल्या, तिकडे पन्नास कावळे गतप्राण झाले, आणखी कोठे बदके संसारास अंतरली वगैरे छापाच्या बातम्यांचा धबधबा यानिमित्ताने सुरू झालेलाच आहे. पाठोपाठ सरकारने यावर काय करायला हवे याचे यानिमित्ताने दिले जाणारे सल्ले ओघाने आलेच आणि त्यापाठोपाठ राजकीय भूमिकेनुसार सरकार सक्रिय की निष्क्रिय याचे आरोप-प्रत्यारोपदेखील तितकेच ओघाने आले. ‘युद्धस्य कथा रम्या’ मानल्या जातात. सुरक्षित वातावरणातील सर्वसामान्यांना युद्धाच्या कथा चघळायला आवडते. अलीकडे (सुदैवाने) युद्धे तशी कमी होतात. त्यामुळे त्या तशा करमणूकप्रधान कथा कमी झाल्या आहेत. त्यांची जागा या साथींनी घेतली असावी. गेल्या मार्च महिन्यापासून आपण याचा प्रत्यय घेत आहोत. त्या वेळी ‘अमुक ठिकाणी करोनाग्रस्त वा संशयित सापडला’ वा ‘तमुक ठिकाणी आढळला’ अशा बातम्या येत. जणू काही एखादा चोर वा दरवडेखोर आढळून यावा त्या अभिनिवेशात त्या वेळी या साथीचे वार्ताकन झाले. आता ते तसे या बर्ड फ्लूचे होत आहे. फरक इतकाच की पक्षीगणास वृत्तमाध्यमांची गरज नसल्याने अभिनिवेशातील आवेश काहीसा कमी इतकेच. पण प्रकार तोच.

वास्तविक ‘एव्हिएन इन्फ्लुएन्झा’ ऊर्फ बर्ड फ्लू हा गेले दशकभर तरी आपला वार्षिक पाहुणा राहिलेला आहे. या काळात तो येतोच. कारण आपल्याकडच्या- तुलनेने सह्य हिवाळ्यातल्या-  उबदार वातावरणात युरोप आदी प्रांतांतल्या गोठवणाऱ्या थंडीतून स्थलांतरित पक्षी मोठय़ा प्रमाणावर येतात. त्यांच्यासमवेत हा फ्लूदेखील येतो. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्यानंतरच्या सर्दी-पडशाप्रमाणे ही साथ. तिचा इतका बाऊ करायचे काहीही कारण नाही. पण नागरिक अशा साथवृत्तांत दंग झाले की अलीकडे औषध कंपन्यांप्रमाणे सरकार वगैरे यंत्रणाही खूश होतात. कारण त्यामुळे मूळ प्रश्नांना बगल देता येते. दुष्काळ जसा सरकारी यंत्रणेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवतो त्याप्रमाणे अशा साथींचा अतिरेकी माध्यम झंझावात सरकारी यंत्रणांना दिलासा देणारा ठरतो. या बर्ड फ्लूस नव्या करोना फ्लूची साथ मिळाल्यामुळे त्याची तीव्रता अधिक भासते आहे. त्याच्या फैलावाच्या बातम्या आल्याआल्या लगेच आपल्याकडे भीतीने चिकन, अंडी खाणारे शाकाहाराकडे वळू लागले. त्यामुळे कुक्कुटपालन उद्योगावर दुष्परिणाम होणार हे उघड आहे. हा व्यवसाय म्हणजे फक्त कोंबडी विकणारे असा काहींचा समज. त्यांची उपासमार होणार असेल तर इतरांनी, त्यातही शाकाहारींनी, इतके अस्वस्थ होण्याचे कारण काय असा युक्तिवाद होताना दिसतो. बर्ड फ्लूत कोंबडय़ा, बदके वगैरेंबाबत भीती उत्पन्न झाल्याने शाकाहारींनाही उगा आपल्या नैतिकतेची खात्री पटून स्वत:चा अभिमान वगैरे वाटू लागतो. हे सर्व सध्याच्या आपल्या कप्पेकरण प्रक्रियेस अनुरूपच म्हणायचे.

पण ते मिथ्याधारित आहे. कोंबडी वा चिकन दुकानात विकले जाण्याआधी बरीच मोठी प्रक्रिया असते आणि त्यात अनेक उद्योग गुंतलेले असतात. त्यामुळे कोंबडय़ा मारण्याने केवळ खाटकाचेच नुकसान होणार आहे असे नाही. तर आधीच्या या उद्योगांनाही त्याचा फटका बसणार आहे. कोंबडय़ांचा खुराक हा मोठा उद्योग आहे. मका आदी अनेक धान्यांचा उपयोग त्यासाठी होतो. या सर्वाना या कथित साथीची किंमत मोजावी लागेल. शिवाय चिकन खाणाऱ्यांची संख्या घटल्यास भाजीपाला आणि अन्य शाकाहारी घटकांची मागणी वाढेल. म्हणजे त्यांच्या किमतीही वाढतील. त्याचा फटका शाकाहारींनाही बसेल. तेव्हा मांस-मटण खाणे वा शाकाहारी राहणे यात नैतिक-अनैतिक असे काहीही नाही. शिवाय आज अंडी वा चिकन यांच्या इतकी संपृक्त प्रथिने अन्य कशातूनही एकगठ्ठा मिळत नाहीत. आधीच भारतीयांच्या अन्नात कर्बयुक्त घटकांचा वापर अधिक. त्यात अंडी/चिकन यांवरही मर्यादा आणल्या गेल्यास आरोग्यदृष्टय़ा ते काही शहाणपणाचे ठरणार नाही. साधारण दहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात या बर्ड फ्लूने मोठा हाहाकार उडवला होता. म्हणजे त्या वेळच्या सरकारला तसे वाटले. सत्य हे आहे की गेल्या दशकभर वा अधिक काळात या बर्ड फ्लूची मानवी लागण होऊन प्राण गमवावे लागल्याची एकही घटना आपल्याकडे घडलेली नाही. पण त्याही वेळी या बर्ड फ्लूचा इतका भयकंप निर्माण झाला की कोटय़वधी कोंबडय़ा, बदके आदी पक्ष्यांना आपल्याकडे मारले गेले. या फ्लूवर एकच कथित औषध असल्याची भूमका त्या वेळी उठली होती. आता रेमडेसिविर मिळवण्यासाठी नागरिक जसे जितके वेडेपिसे झाले होते तसेच तितके त्याही वेळी त्या कथित औषधासाठी गावभर हिंडत होते. त्या काळात त्या कथित औषधाच्या लाखो गोळ्या महाराष्ट्र सरकारने सदर कंपनीकडून विकत घेतल्या. त्याचे पुढे काय झाले यासंदर्भात एखादी माहितीहक्क याचिका सादर झाल्यास मनोरंजक माहिती मिळू शकेल. यातील आणखी ‘योगायोग’ असा की त्या वेळी बर्ड फ्लूवरील कथित औषधाने आणि सध्या करोना-फ्लूवरील कथित औषधाने मालामाल झालेली औषधनिर्मिती कंपनी एकच.

हे सगळे तपशिलाने अशासाठी समजून घ्यायचे कारण साथवार्तेने निर्माण होणारा वेडाचार आता तरी कमी व्हावा म्हणून. आताच दिल्ली सरकार आणि काही अन्य स्थानिक पातळीवर कोंबडय़ा वगैरे विकण्यास मनाई करण्यात आली आहे. हे अन्यायकारक. आपल्यासारख्या लोकशाही जाणिवा प्रगल्भ नसलेल्या देशात अशा साथकाळात सरकारनामक यंत्रणा अतिउत्साही होते. बंदी, कोणत्याही पर्यायी व्यवस्थेचा विचार न करता टाळेबंदी यातून अशा सरकारी अतिरेकाचे आणि अधिकारशाहीचेच दर्शन घडते. आताही नेमके तेच सुरू आहे. बर्ड फ्लूमुळे काय काय होऊ शकते, तो कसा टाळावा, झाल्यास उपाययोजना काय आदी माहिती सरकारने नागरिकांना जरूर द्यावी. पण सबळ कारण न देता यावर बंदी घाल, त्यास मनाई कर असल्या उपायांची गरजच काय? यातून आपल्या हाती असलेल्या अधिकारांचे दर्शन होईल, कुक्कुटपालन क्षेत्रातील कंपन्या, व्यापारी वगैरे बंदी घालू नका असा आक्रोश करीत भेटावयास येतील, मग मागल्या दाराने काही देवाणघेवाण होईल हे सर्व घडेल. पण साथीच्या नियंत्रणास त्याचा उपयोग काय? गेल्या खेपेप्रमाणे आताही कोंबडय़ादी पक्षी मारून टाकण्याची लाट येईल. तीही टाळायला हवी. बर्ड फ्लू पसरवणारा विषाणू उच्च तापमानास जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे चिकन, अंडी उकडली तरी तो नष्ट होतो. असे असताना कोंबडी विक्रेत्यांच्या पोटावर पाय आणण्याचे कारण काय?

आधीच करोना उपायांच्या अरेरावीने आपल्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडलेले आहे. जी साथ आपल्यासाठी किती धोकादायक आहे याचा कसलाही अंदाज, अभ्यास न करता उपाय लादले गेल्याने साथ रोखण्यात ‘यश’ आल्याबद्दल काहींना पाठ थोपटून घेता आली हे खरे. अमेरिका, जर्मनी, ब्रिटन यांची अशा कडक उपायांअभावी वाताहत झाली हेदेखील सत्यच. पण या देशांनी गरजूंना आर्थिक मदत किती दिली आणि आपली उडी कुठपर्यंत हे समजून घेतल्यास आपण वाहात जाणे धोक्याचे का, हे कळेल. तेव्हा झाले तेवढे पुरे. उगाच बर्ड फ्लूचाही बागुलबुवा निर्माण करण्याचे काहीही कारण नाही. हे विषाणू आणि आपण साथ साथच राहावे लागणार आहे. उगाच मधल्यामध्ये काहींना आर्थिक आणि राजकीय उखळ पांढरे करायची संधी मिळायला नको.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Editorial on bird flu outbreaks abn

First published on: 14-01-2021 at 00:05 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×