scorecardresearch

ऊटपटांग वि. उथळ

कर्तृत्व वा कर्तृत्वशून्यता या दोनही निकषांवर या स्तंभातून दखल घ्यावी असा या कोणा शार्जिल उस्मानी या इसमाचा लौकिक नाही

ऊटपटांग वि. उथळ
(संग्रहित छायाचित्र)

 

ज्या निकषांवर परधर्मीयांचे मूल्यमापन करायचे त्याच निकषांवर स्वधर्मीयांचेही मूल्यमापन करण्याइतका बौद्धिक प्रामाणिकपणा नसेल, तर दिसतो केवळ उठवळपणा..

..याचे प्रदर्शन या इसमाच्या बडबडीनंतर काही नेत्यांनी घडवले. हिंदू धर्मावर टीका केली म्हणून इतका सात्त्विक संताप या मंडळींना येत असेल तर आगरकर, डॉ. आंबेडकर ते कुरुंदकर यांचे काय करायचे?

कर्तृत्व वा कर्तृत्वशून्यता या दोनही निकषांवर या स्तंभातून दखल घ्यावी असा या कोणा शार्जिल उस्मानी या इसमाचा लौकिक नाही. हे गृहस्थ काय करतात, कोठे असतात आणि त्यांच्या विद्वत्तेचे क्षेत्र कोणते याबाबतची अनभिज्ञता लपवण्यात आम्हास काही कमीपणा वाटत नाही. माध्यमांच्या सुकाळामुळे अलीकडे अद्वातद्वा बोलून प्रसिद्धीचा झोत आपल्या चेहऱ्यावर पाडून घेणाऱ्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की त्यांची नोंद ठेवणे हे पूर्णवेळ जल्पक वा रिकामटेकडे या दोघांसच शक्य होईल. ‘लोकसत्ता’ या दोहोंपासून तितकाच दूर. तरीही मग या इसमाची दखल घेणारे संपादकीय का, असा प्रश्न सुजाण वाचकांस पडू शकेल. त्याचे उत्तर असे की, या इतक्या दुर्लक्षणीय इसमाच्या वक्तव्यावर लक्षणीयांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्या पाहता त्या प्रतिक्रियांची आणि त्यामागील कारणांची मीमांसा करण्याची गरज आहे, हे. सदरहू इस्लाम धर्मीयाने हिंदू धर्माविषयी काढलेले अनुदार उद्गार हे सध्याच्या कथित वादळाच्या मुळाशी आहेत. त्याची दखल घेण्याआधी या सदर इसमास मुळात इस्लाम आणि इस्लामधर्मीय यांच्या अवस्थेच्या वास्तवाचे भान किती आहे, या प्रश्नाचे उत्तर शोधावयास हवे.

स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेनंतर दोन दशकांनंतरही आपले धर्मबांधव आधुनिक शिक्षणासाठी पुरेसे उत्सुक नाहीत या वास्तवाने सर सय्यद अहमद यांच्यासारखी असामी दु:खी होती हे या इसमास माहीत आहे काय? १८५७ सालच्या बंडानंतर मोठय़ा संख्येने हिंदू हे तत्कालीन सत्ताधारी साहेबाच्या कच्छपि लागत असताना मुसलमानांना प्रगती करावयाची असेल तर आधुनिक शिक्षणास पर्याय नाही, हे सर सय्यद अहमद यांनी ताडले आणि त्यासाठी ‘द मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल’ महाविद्यालाची स्थापना केली. या महाविद्यालयाचे नंतर ‘अलीगढ मुस्लीम विद्यापीठ’ झाले. पण तरीही त्या वेळी या महाविद्यालयात प्रत्यक्ष विद्यादान सुरू होण्यास तीन वर्षे गेली ती का, यामागील कारण या इसमास माहीत आहे काय? मुळात सय्यद अहमद हे आकर्षिले गेले होते ते राजा राममोहन रॉय यांनी हाती घेतलेल्या हिंदू धर्मातील सुधारणांकडे. इस्लाम धर्मातील ‘राममोहन रॉय’ आपण व्हावे ही त्यांची मनीषा होती असे तत्कालीन कवी अल्ताफ हुसेन हाली यांनीच नमूद करून ठेवलेले आहे. हे हाली हे मुसलमान होते आणि सुधारणांसाठी हिंदू धर्माचे अनुकरण करण्यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नाही. तसेच आपण रॉय यांच्यासारखे व्हावे अशी इच्छा सर सय्यद अहमद यांनी बाळगली आणि ती लपविली नाही हे महत्त्वाचे. यात या उभयतांचे मोठेपण आणि तत्कालीन समाजाची सहिष्णुता दडलेली आहे. या विद्यापीठाच्या स्थापनेनंतर सर सय्यद अहमद पायास भिंगरी लावल्यासारखे फिरले. कशासाठी? तर इस्लामधर्मीयांनी अधिकाधिक संख्येने आधुनिक शिक्षणाची कास धरावी यासाठी. इतके करूनही विद्यापीठाच्या स्थापनेनंतर जवळपास दोन दशकांनंतरही मुसलमान पुरेशा संख्येने शिकत नाहीत यामुळे सर अहमद हताश झाले होते. उदाहरणार्थ, १८९३ साली बंगालच्या लोकसंख्येत मुसलमानांचे प्रमाण ४५.९ टक्के इतके होते, पण तरीही पदवीधरांची संख्या दर तिसांमागे एक इतकीच होती. त्या वेळी मद्रास प्रांतात सात टक्के मुसलमान होते. पण पदवीधर जेमतेम एक टक्का इतकेच. यास अपवाद होता तो एकटय़ा ‘युनायटेड प्रोव्हिन्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रांताचा. यात आजच्या उत्तर प्रदेशातील भूभाग प्राधान्याने येतो. या प्रांतात त्या वेळी ११.२ टक्के मुसलमान होते. पण पदवीधरांचे प्रमाण होते १७.२५ टक्के. याचा अर्थ सर सय्यद यांच्या प्रांताने तेवढे त्यांचे म्हणणे ऐकले आणि आधुनिक शिक्षणात रस दाखवला. पण ते तेव्हा. हिंदू धर्माविषयी काहीबाही वक्तव्य करणारा सदर इसम सांप्रतकाळी सर सय्यद यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करतो. तेव्हा आपल्या जन्मभूमीत मुसलमानांच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे याचा तपशील तो देईल काय? हिंदू धर्माविषयी वक्तव्य करण्याआधी या इसमाने हमीद दलवाई यांच्या कार्याविषयी काही जाणून घेतले आहे काय? दलवाई यांना मुसलमानांतील सामाजिक सुधारणांसाठी स्थापन करावी असे वाटले ती ‘मुस्लीम सत्यशोधक समाज’ ही संघटना ‘हिंदूधर्मीय’ समाजसुधारक जोतीराव फुले यांच्या सत्यशोधक समाजावर आधारित होती ही बाब या इसमाने लक्षात घ्यायला हवी. मागासांप्रमाणे सुधारणेच्या मुद्दय़ांवरही सर्व धर्मातील प्रागतिक हे एकसमान विचार करीत असतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

आणि म्हणून या इसमाच्या बडबडीवर आदळआपट करणे, त्याच्या अटकेची भाषा करणे, त्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला जावा इत्यादी मागण्या करणे हे अनावश्यक ठरते. यातून स्वधर्माविषयी आदर दाखवता येतो असे संबंधितांना वाटत असेल तर ते त्यांच्या वैचारिक मर्यादांचे निदर्शक ठरते. या अशा मागण्यांतून दिसते ती केवळ अनुदारता आणि ही भावना अन्यधर्मीयांविषयी व्यक्त करणे नेहमीच सोपे. खरा कस लागतो स्वधर्मीयांना सुधारण्यात. ज्या निकषांवर परधर्मीयांचे मूल्यमापन करायचे त्याच निकषांवर स्वधर्मीयांचेही मूल्यमापन करण्याइतका बौद्धिक प्रामाणिकपणा असेल तर ती कृती आदरणीय असते. अन्यथा दिसतो तो केवळ उठवळपणा, ज्याचे प्रदर्शन या इसमाच्या वक्तव्यावर काही नेत्यांनी घडवले. या इसमाची कृती जर राष्ट्रद्रोह असेल, तर परधर्मीय शत्रुराष्ट्राविरोधातील कारवाईची कथित गुप्त वार्ता फोडणाऱ्याच्या कृतीस शौर्यसन्मानाने गौरविणार काय? हिंदू धर्मावर टीका केली म्हणून इतका सात्त्विक संताप या मंडळींना येत असेल तर अस्पृश्यास गुरू मानून अद्वैत सिद्धान्ताची रचना करणाऱ्या आदी शंकराचार्याचे आपण काय करणार? विवेकानंदांना आपण कोठे बसवणार? रूढीत अडकलेल्या हिंदू धर्माविरोधात सपासप कोरडे ओढणाऱ्या गोपाळ गणेश आगरकरांचे काय? ‘मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी मरणार मात्र हिंदू म्हणून नाही,’ असे जाहीर करणाऱ्या

डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विरोधात कोणता गुन्हा दाखल करणार? कथित धर्मपालनाचा अतिरेक करणाऱ्याची संभावना आणि चिकित्सा अत्यंत कठोरपणे करणाऱ्या नरहर कुरुंदकर यांचे ही मंडळी काय करणार?

तेव्हा हिंदू धर्मावर टीका केली म्हणून या मंडळींचे रक्त इतके उसळायची काही गरज नाही. ते उसळवून घ्यायचेच असेल तर सुधारणांसाठी उसळणे जास्त सयुक्तिक तसेच गरजेचे आहे. मुलींना संपत्तीत मुलाइतकाच वाटा देण्याचे पुरोगामित्व दाखवणाऱ्या इस्लाम धर्मात महिलांची इतकी दशा का हा प्रश्न हिंदुधर्माभिमान्यांनी यानिमित्ताने सदर इसमास विचारणे पोक्तपणाचे ठरले असते. धर्माच्या शुद्धतेचा आग्रह धरणाऱ्या ‘बोको हरम’सारख्या संघटनेत शेकडो बालिका आणि मुली यांच्यावर आजही लैंगिक अत्याचार होतात, त्यांना लैंगिक वेठबिगार म्हणून वापरले जाते हे कधी थांबणार हा मुद्दा उपस्थित करणे शहाणपणाचे ठरले असते. एकविसाव्या शतकातही आधुनिक शिक्षण देणाऱ्या शाळांपेक्षा मदरशांत आपल्या पाल्यांस पाठवावे असे पालकांना वाटतेच कसे, हा सवाल त्यास करणे धूर्तपणाचे ठरले असते.

पण ते झाले नाही. कारण एकमेकांतील सुधारणांच्या गरजेऐवजी कुप्रथा चिघळणे हे उभय धर्मीयांसाठी राजकीयदृष्टय़ा सोयीचे असते. तेच आता होते आहे. त्यातून धर्मानुयायी तर खुजे ठरतातच, पण त्यावर आधारित राजकारण त्याहून अधिक खुजे होते. तसेच यातून राजकारणासाठी धार्मिक विद्वेषाखेरीज संबंधितांकडे अन्य भरीव मुद्दा नाही, असाही संदेश जातो. हे अधिक वाईट. म्हणून कोणा ऊटपटांगाचे विधान राजकारणाच्या केंद्रस्थानी आणणे हा शुद्ध उथळपणा ठरतो. सबब ऊटपटांग विरुद्ध उथळ हे सामने आता पुरेत.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या