scorecardresearch

Premium

वनमंत्र्यांचे जंगलराज!

खरे तर वाघ मृत्यू वाढले हे एकच कारण या संजय राठोड यांना मंत्रिपदावरून हाकलण्यासाठी पुरेसे आहे.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

 

वनमंत्री राठोड यांस वाघाची आणि पर्यायाने आपल्या खात्याची काही फिकीर आहे याचे एकही चिन्ह हे सरकार अस्तित्वात येऊन दीड वर्ष होत आले तरी दिसलेले नाही..

thackeray group organizes hou de charcha event in kalyan dombivali
कल्याण-डोंबिवलीत ‘होऊ द्या चर्चां’च्या चौक सभा; शिवसेना ‘उबाठा’तर्फे आयोजन
Rishi Sunak and Akshata Murthy
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा G20 मधून परतताच मोठा निर्णय, ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
The employee boarded the truck to collect the toll from the truck driver
ट्रक चालकाकडून टोलचे पैसे घेण्यासाठी कर्मचारी चढला चालत्या ट्रकवर; Video पाहून हसू आवरणार नाही…
aditya thackeray letter to bmc commissioner demand to disposed accumulated waste in city
मुंबईत साचलेल्या कचऱ्याच्या ढिगांची विल्हेवाट लावावी; आदित्य ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र

..हे कारण त्यांच्या हकालपट्टीसाठी मुख्यमंत्र्यांना पुरेसे वाटत नसेल तर या सहकाऱ्याने  करोना-निर्बंध धाब्यावर बसवून मंगळवारी काय धुमाकूळ घातला याची दखल ठाकरे यांनी घ्यावी..

संजय राठोड नामे नरपुंगवाची मंत्रिमंडळातील उपस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी फारच अपरिहार्य दिसते. त्यामागील कारणांवर भाष्य करण्याचा येथे उद्देश नाही. कारण ती कारणे मुख्यमंत्र्यांनाच माहीत. तसेच राठोड यांचे कर्तृत्व संपादकीयांतून भाष्य करावे असेही नाही. एरवी या गृहस्थांची दखल आवर्जून घ्यायची गरज वाटली नसती. पण ती वेळ आली. याचे कारण या गृहस्थांकडील खाते. हे राठोड वनमंत्री आहेत. या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी या बेजबाबदाराहाती दिल्याने वन खात्याची कशी वाताहत सुरू आहे याचे तपशीलवार विवेचन संपादकीय पानांत अन्यत्र आढळेल. त्याखेरीज या राठोड यांचा जमाखर्च मांडण्याची वेळ आली आहे.

मुख्यमंत्री नेतृत्व करीत असलेल्या शिवसेनेचा वाघ हे लाडके प्रतीक. हे राठोडदेखील शिवसेनेचेच. पण त्यांच्या हाती वन खात्याची सूत्रे दिल्यापासून महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूत मोठी वाढ झाली आहे आणि यातील बहुतांश मृत्यू हे शिकारीमुळे झालेले आहेत. शिवसैनिक या नात्याने आपल्या पक्षाच्या प्रतीकाचे राजकीय महत्त्व कळण्याइतके शहाणपण राठोड यांच्या ठायी असणे अपेक्षित. पण त्याबाबत त्यांची कामगिरी ढ म्हणावी अशीच. खरे तर वाघ मृत्यू वाढले हे एकच कारण या संजय राठोड यांना मंत्रिपदावरून हाकलण्यासाठी पुरेसे आहे. महिला बालकल्याण खाते हाताळणाऱ्याच्या नालायकपणामुळे खात्यातच महिलांवरील अत्याचारात वाढ होत असेल तर ज्याप्रमाणे त्यावर कारवाई व्हायला हवी त्याप्रमाणे वाघांचे मृत्यू वाढले असतील तर वनमंत्र्यावर कारवाई होणे त्याहूनही अधिक गरजेचे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य हेदेखील संजय यांच्या बरोबरीने मंत्रिमंडळात आहेत. ते पर्यावरण खाते हाताळतात. मुंबईतील मेट्रोचा मुद्दा असो वा सांगलीजवळ महामार्ग उभारणीमुळे जिवास धोका निर्माण झालेला वृक्ष असो. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणस्नेही भूमिका घेतली. मुंबईतील नागरिकांच्या प्रवाससोयीसाठी हजारो वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घालण्यास त्यांचा विरोध हा चर्चेचा विषय. असे असताना आपल्याच पक्षाच्या अकार्यक्षम मंत्र्यामुळे महाराष्ट्रात वाघांचे मृत्यू वाढत असतील तर पर्यावरणमंत्री या नात्याने आदित्य ठाकरे यांचे केवळ हृदय द्रवून चालणार नाही. त्यांनी या मंत्र्यास घरी पाठवायला हवे. वाघ हा जीवचक्राच्या केंद्रस्थानी असतो हे आदित्य ठाकरे जाणतातच. पृथ्वीतलावरील या अत्यंत देखण्या, राजबिंडय़ा जिवास आपण वाचवू शकत नसू तर त्याइतके पर्यावरणास घातक काही नाही. पण या राठोड यांस वाघाची आणि पर्यायाने आपल्या खात्याची काही फिकीर आहे याचे एकही चिन्ह हे सरकार अस्तित्वात येऊन दीड वर्ष होत आले तरी दिसलेले नाही.

याचे कारण या राठोड यांना रस आहे तो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांत. वन खात्याइतक्या नाजूक, संवेदनशील खात्याची जबाबदारी हाती आल्यावर या गृहस्थाची पहिली कृती काय होती? तर बदल्या. वन खात्यात बदल्या यापुढे कशा प्रकारे होतील याची ३८ कलमी पत्रिकाच त्यांच्या कार्यालयातर्फे प्रसिद्ध केली गेली. या बदल्या का आणि कोणत्या कारणांनी केल्या जातात याचा अंदाज बांधण्यासाठी सरकार या विषयाचा काहीही अभ्यास असण्याची गरज नाही. आपल्या खात्याची कामगिरी सुधारण्यात रस घेण्याऐवजी आपल्या वैयक्तिक खात्यातील गंगाजळी कशी वाढेल याकडेच लक्ष असलेल्या राजकारण्यांहाती बदल्या हे एक असे अस्त्र असते की ज्याच्या वापराने लक्ष्मीदर्शन सुलभ होते. राठोड यांच्याकडे वन खाते आल्यापासूनच्या बदल्यांसदर्भातील वदंता प्रसिद्ध केल्या तर प्रशासनाचे उत्कृष्ट  ‘जंगलबुक’ ठरेल. यातून एकच बाब दिसून येते. ती म्हणजे या गृहस्थास आपल्या खात्याचे भले करून नाव कमवण्यात काडीचाही रस नाही. असे असतानाही वन खात्यासारखा महत्त्वाचा विभाग त्यांच्याहातीच ठेवला जात असेल तर त्यामुळे अन्य अनेक शंकाकुशंका जन्मास येतील.

वास्तविक इतके महत्त्वाचे खाते देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी आपल्या या नेत्याचा प्रशासकीय लौकिक जाणून घ्यायला हवा होता. त्यासाठी सध्या सत्ताधारी आघाडीचाच घटक असलेले एकनाथ खडसे यांची सक्रिय मदत झाली असती. खडसे गेल्या सरकारात महसूलमंत्री असताना हे राठोड महाशय हे त्या खात्याचे राज्यमंत्री होते. तेव्हाही राज्याच्या महसूलवृद्धीसाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांना कशाच्या महसूलवाढीची चिंता होती याच्या सुरम्य कथा महसूल खात्यात अजूनही चर्चिल्या जात असतील. पण तरीही या सगळ्या इतिहासाकडे दुर्लक्ष वा काणाडोळा करून संजय राठोड यांच्याकडे अधिक महत्त्वाचे खाते या वेळी दिले गेले. पाणी आपली पातळी गाठते या वैज्ञानिक सत्याप्रमाणे राठोड यांनी कर्तृत्व मर्यादा दाखवून दिली. वास्तविक राज्याच्या वनक्षेत्रात अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या गडचिरोली परिसरातील जंगल व्यवस्थापनासाठी गेले कित्येक महिने अधिकारीच नेमला गेलेला नाही. तेथे जाण्यास कोणी उत्सुक नाही वा सुयोग्य अधिकारी नाही हे यामागील कारण नाही. तर या महत्त्वाच्या पदावरील नियुक्तीसाठी वनमंत्र्यांच्या गरजा भागवण्यास कोणीही तयार नाही, हे यामागील कटू वास्तव. या वास्तवामुळेच वाघांच्या शिकारी पुन्हा एकदा आपल्याकडे वाढू लागल्या आहेत. कर्तबगारीपेक्षा मंत्र्याच्या कृपेने अधिकारी नेमले जात असतील तर या कृपाप्रसादासाठी केलेल्या गुंतवणुकीवरील परतावा हे अधिकारी वसूल करणारच करणार. त्यासाठी म्हणून चोरटय़ा शिकारींचा मार्ग.

हे भयानक आहे. विशेषत: पर्यावरणप्रेमी मुख्यमंत्री असताना या असल्या मंत्र्यास सहन करणे अक्षम्य ठरते. खरे तर गेल्या सहा वर्षांत राज्याच्या वन खात्याची कामगिरी नक्कीच प्रशंसनीय होती. गेल्या सरकारातील वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भाजपनेत्यांच्या सवयीप्रमाणे वृक्षलागवड वगैरेबाबत गगनभेदी घोषणा केल्या असतील. पण तरीही त्यांची वनमंत्री म्हणून कामगिरी कौतुक करावी अशीच. वाघ आणि अन्य प्राण्यांचे संरक्षण, जंगल व्यवस्थापन, आदिवासींसाठी बांबूआधारित अर्थोद्योग अशा अनेक कल्पना सुधीरभाऊंनी राबवल्या. ते हे करू शकले याचे कारण त्यांना या खात्याविषयी ममत्व होते. वन खाते हे अन्य खात्यांप्रमाणे नाही. हे खाते हाताळणाऱ्यास वनांविषयी किमान प्रेम आणि आस्था हवी. ती असणे दूरच. पण राठोड यांचे ममत्व कशाविषयी आहे हे एव्हाना स्पष्ट झालेलेच आहे.

हे कारण त्यांच्या हकालपट्टीसाठी मुख्यमंत्र्यांना पुरेसे वाटत नसेल तर आपल्या मंत्रिमंडळातील या सहकाऱ्याने मंगळवारी पोहरादेवी परिसरात काय धुमाकूळ घातला याची दखल उद्धव ठाकरे यांनी घ्यावी. करोना प्रसार रोखण्याच्या उपायांबाबत सरकार जनतेस एकीकडे धमकावत असताना या गृहस्थाने मुख्यमंत्र्यांच्या सूचनाच खुंटीवर टांगल्या. हे राठोड त्यांच्या समाजास श्रद्धेय गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी तेथे गेले होते. त्यांना या अशा आशीर्वादाची अचानक टंचाई का भासू लागली हा प्रश्न बाजूला ठेवला तरी ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या समर्थकांना हुल्लडबाजीसाठी रान मोकळे सोडले ते केवळ आक्षेपार्हच नव्हते तर राज्य सरकारच्या करोना नियंत्रणाच्या प्रयत्नांबाबत संशय निर्माण करणारे होते. करोनाच्या कारणाने शिवजयंती उत्सव रद्द करायचा, पंढरपूर यात्रा रद्द करायच्या, इतकेच काय पण विधानसभा अधिवेशनासही कात्री लावायची आणि दुसरीकडे या असल्या आपल्या मंत्र्यास वाटेल तसे गुण उधळू द्यायचे हे राठोड यांच्यासाठी नसेल पण सरकारसाठी अशोभनीय आहे.

या पापास एकच उतारा. अशा बेमुर्वतखोर मंत्र्यास हाकलणे. आपल्यामागे आपला समाज किती मोठय़ा संख्येने आहे हे दाखवण्याचा प्रयत्नही या राठोड यांनी केला. तो तर अधिकच आक्षेपार्ह. कसेही वागायचे आणि समाजाच्या पाठिंब्यावर सर्व धाब्यावर बसवून संबंधितांना वेठीस धरायचे हे जंगलराज जर खपवून घेतले जाणार असेल तर शिवाजी महाराजांचे नावही घेण्याचा अधिकार राहात नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Editorial on five tigers hunted in the state in two months abn

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×