scorecardresearch

Premium

सौंदर्याला वार्धक्य?

तपभराच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मैदानावर संगीतसुलभ लय-ताल दाखवून फुटबॉलचे सौंदर्य वृद्धिंगत करणारे पेले ऐंशी वर्षांचे झाले..

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

तपभराच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मैदानावर संगीतसुलभ लय-ताल दाखवून फुटबॉलचे सौंदर्य वृद्धिंगत करणारे पेले ऐंशी वर्षांचे झाले..

सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला निवृत्त झालेल्या पेलेंना आजवरचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू ठरवावे का, या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. कारण आजचे फुटबॉल तर बदलले आहेच, पण फुटबॉल चाहत्यांची संस्कृती आणि अभिरुचीही बदलली आहे..

वांशिक आणि वर्णीय जाणिवा विस्तारलेल्या आजच्या युगात विख्यात फुटबॉलपटू पेले यांना ‘ब्लॅक पर्ल’ असे संबोधणे हे राजकीय शहाणपणाचे खचितच ठरले नसते. त्यांना काळा मोती असे काहीसे हिणकसपणे गौरवणाऱ्यांनी पांढरा किंवा अस्सल मोती कोण हे सांगण्याचा वा शोधण्याचा प्रयत्न चलाखीने केला नाही. कारण पेले यांच्यापेक्षा श्रेष्ठ तर सोडाच, पण त्यांची बरोबरी करू शकेल असा शोधूनही सापडला नसता, हे संबंधितांना पक्के ठाऊक होते. पेले हे विख्यात बॉक्सर मोहम्मद अली यांच्यासारखे ‘ठकासि ठक’ प्रवृत्तीचे असते तर कदाचित केव्हा तरी ‘काळा कशाला? मोतीच म्हणा ना. लाज वाटते?’ असे काहीसे दरडावू झाले असते. पेलेंची सारी ऊर्जा फुटबॉलच्या मैदानावर रिती व्हायची. त्या परिघापलीकडच्या संघर्षांचे क्षण त्यांच्या आयुष्यात कमी आले किंवा त्यांनी तसे ते येऊ दिले नाहीत. शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी ते ८० वर्षांचे झाले. अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांनी फुटबॉलपेक्षाही संगीतात रस घ्यायला सुरुवात केली आहे. लौकिक अर्थाने हे वेगळे क्षेत्र असले, तरी १९५८ ते १९७० अशा जवळपास एका तपाच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत मैदानावर संगीतसुलभ लय आणि ताल दाखवूनच फुटबॉलचे सौंदर्य पेले यांनी वृद्धिंगत केले. ८० वर्षे वय झालेल्या व्यक्तीला सहस्रचंद्रदर्शन झालेले असते, असे मानायची आपल्याकडे पद्धत. पेलेंसाठी मात्र सहस्रचंद्रदर्शनापेक्षा त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि क्लब कारकीर्दीत मिळून झळकावलेले सहस्राहून अधिक गोल नक्कीच अधिक मोलाचे ठरतात.

नॉस्टॅल्जिया किंवा स्मरणरंजन हे नेहमीच तर्कसंगत मूल्यांकनाला झाकोळते असे म्हणतात. पेले खेळून सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला निवृत्त झाले. त्यामुळे पेलेंना आजवरचा सर्वश्रेष्ठ फुटबॉलपटू ठरवावे का, आजच्या मेसी-रोनाल्डोच्या युगातही पेले तितक्याच उत्कटतेने तळपले असते का, युरोपीय डावपेचात्मक फुटबॉलसमोर त्यांचे नजाकतदार, प्रवाही फुटबॉल टिकाव धरू शकते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. कारण आजचे फुटबॉल तर बदलले आहेच. पण फुटबॉल चाहत्यांची संस्कृती आणि अभिरुचीही बदलली आहे. आजची सर्वाधिक लोकप्रिय जोडी लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी गेल्या १५ वर्षांमध्ये एकही विश्वचषक स्पर्धा जिंकलेली नाही. नवीन सहस्रकाच्या सुरुवातीला, म्हणजे २००२ मध्ये ब्राझीलने विश्वचषक जिंकल्यानंतर प्रत्येक वेळी हा मान एखाद्या युरोपीय देशालाच मिळालेला आहे. हे देश म्हणजे इटली (२००६), स्पेन (२०१०), जर्मनी (२०१४) आणि फ्रान्स (२०१८). या चारही जगज्जेत्या संघांतील फुटबॉलपटू लोकप्रिय झाले, परंतु त्यांच्यापैकी एकालाही लोकप्रियतेत आणि पुरस्कारांमध्ये मेसी-रोनाल्डोची उंची गाठता आलेली नाही. तेव्हा एखाद्या फुटबॉलपटूला महान किंवा महानतम ठरवण्याचे जे निकष गत सहस्रकात होते, तसे ते आता राहिलेले नाहीत. पेलेंसारखा एखादा महान का ठरतो, तर त्याने अमुक इतके गोल केले किंवा तो अमुक बचावपटूंना चकवत चपळाईने गोल करायचा हे आजच्या युवा फुटबॉलप्रेमींसमोर फार समर्थपणे मांडता येणार नाही. कारण त्यांच्यावर क्लब फुटबॉलचे गारूड असते. ते लगेच सांगतील की, मेसीने तर इतके गोल केलेत, रोनाल्डो फुटबॉल सामन्यांदरम्यान अमुक इतके किलोमीटर निव्वळ मैदानांवर धावतो वगैरे. आणि त्यांनी जिंकलेल्या खंडीभर ट्रॉफ्यांचे काय? वैयक्तिक मानसन्मानांचे काय? मात्र ही चर्चा क्लब फुटबॉलपलीकडे जात नाही.

हीच बाब कदाचित या युक्तिवादामधील कमकुवत दुवे अधोरेखित करते. फुटबॉल हा वैश्विक खेळ मानला जातो. मोजक्या युरोपीय क्लबांची ती मक्तेदारी नव्हे! शिवाय त्या स्पर्धा दरवर्षी होतात. विश्वचषकासारखी स्पर्धा चार वर्षांनी एकदाच होते. त्यामुळे तिचे पावित्र्य वादातीत. पेले यांनी तो तीन वेळा जिंकला. १९५८, १९६२ आणि १९७० असा तीन वेळा! हा सन्मान कोणाच्याही नावावर नाही. जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबाउर, अर्जेटिनाचा दिएगो मॅराडोना, फ्रान्सचा झिनेदिन झिदान, स्पेनचा शावी हर्नाडेझ हे महानतेच्या यादीत कदाचित पेले यांच्यानंतरचे उमेदवार ठरतील. कारण या सगळ्यांनी विश्वचषक आणि व्यावसायिक क्लब फुटबॉल या दोन्ही प्रतलांमध्ये समान यश संपादले. नेदरलँड्सचे योहान क्रयुफ किंवा हंगेरीचे फेरेन्क पुस्कास किंवा फ्रान्सचे मिशेल प्लॅटिनी यांच्या नावावर जगज्जेतेपद नाही. त्यामुळे महानतम कोण, या चर्चेत त्यांचे नाव मागे राहते. पेले यांच्या काळात क्लब फुटबॉल विकसित नव्हते. ते ज्या काळात जिंकू लागले, त्याकडे मागे जाऊन पाहावे लागेल.

१९५८ मध्ये स्वीडनला झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ब्राझील पहिल्यांदा जगज्जेते ठरले. त्या वेळी पेले केवळ १८ वर्षांचे होते. युरोपीय भूमीवर लॅटिन अमेरिकी संघाने मिळवलेले ते आजवरचे एकमेव जगज्जेतेपद! पुढे १९६२ आणि १९६६ मध्ये पेले ब्राझीलकडून खेळले, पण स्पर्धा संपेपर्यंत नव्हे. कारण या दोन्ही स्पर्धामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्यांना जायबंदीच करून टाकले. ही त्यांच्या कौशल्याची दहशत होती. १९७० मधील विश्वचषक स्पर्धेत ते उतरले आणि कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळ करून आपल्या देशाला तिसऱ्यांदा जगज्जेते बनवूनच दिमाखात बाहेर पडले. त्या स्पर्धेलाही योगायोगाने या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली. आजवरची सर्वाधिक परिपूर्ण स्पर्धा असे तिचे वर्णन आजही होते. या परिपूर्णतेच्या केंद्रस्थानी होते पेले. फुटबॉलच्या खेळातील सौंदर्य गृहीत धरून त्याला ब्राझिलियन पोर्तुगीज भाषेत ‘जोगो बोनितो’ असे म्हणतात. दूरचित्रवाणीवरून हा सुंदर खेळ आणि त्यानिमित्ताने पेले घराघरांमध्ये पोहोचले. फुटबॉलचा खेळ युरोप आणि दक्षिण अमेरिकेच्या सीमा ओलांडून खऱ्या अर्थाने जागतिक त्यानंतर बनला. सत्तरच्याच दशकात बेकेनबाउर, क्रयुफसारख्यांनी या खेळावरील आडदांडपणाचा प्रभाव पुसून तो नेत्रसुखद बनवला, या बदलत्या संस्कृतीचे श्रेय नि:संशय पेले यांच्याकडे जाते.

साठच्या दशकात अमेरिकेत कृष्णवर्णीयांची चळवळ नव्या दमाने आणि जोमाने उभी राहिली तिच्यामागेही मोहम्मद अली आणि पेले यांचीच प्रेरणा होती. १९७० च्या स्पर्धेच्या चलचित्रफिती आजही यूटय़ूबवर पाहता येतील. त्या पाहिल्यानंतर आणि पेलेंच्या खेळाचे विश्लेषण करणारे असंख्य वृत्तलेख तपासल्यावर एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते. पेले केवळ गोल करत नव्हते, ते उच्च संघभावनेने खेळायचे. त्यांच्या फुटबॉलमध्ये आत्मकेंद्रितपणाचा दंभ नव्हता. सध्याच्या काळातील बहुतेक वलयांकित फुटबॉलपटूंच्या व्यक्तिमत्त्वातच तो दिसून येतो. या आत्मकेंद्रिततेतून भलेही संबंधितांकडून उत्तम खेळ होत असेल. पण त्यातून संघभावनेची वीण उसवली जाते, ती कायमची. स्वत: अश्वेत असूनही प्रामुख्याने श्वेतवर्णीयांनी जन्माला घातलेल्या आणि वाढवलेल्या खेळात पेलेंनी सादर केलेला आविष्कार एका अर्थाने जगभरातील अश्वेतांचा हुंकार ठरला.

हे वैश्विकत्व इतर कोणत्याही खेळाडूला त्यापूर्वी किंवा त्यानंतर मिळालेले नाही. बंगाल, गोवा, केरळ आणि नंतर जवळपास संपूर्ण भारतभर ब्राझील या देशाविषयी आपुलकी निर्माण झाली, कारण तो पेलेंचा ब्राझील होता! आज त्याच ब्राझीलला जागतिक फुटबॉलमध्ये पूर्वीइतका प्रभाव दाखवता येत नाही, हे शल्य जगभरच्या अश्वेत फुटबॉलप्रेमींमध्ये असते. ते शल्य पेलेंच्या वार्धक्याची हुरहुर अधिक गहिरी करून जाते. फुटबॉलचा खेळ आज अधिक वलयांकित झाला, पण पेलेंच्या काळातील फुटबॉलच्या सौंदर्याला या वलयाने ग्रासले तर नाही ना?

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Editorial on football legend pele turns 80 abn

First published on: 24-10-2020 at 00:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×