scorecardresearch

मृगजळातील ओलेते..

संयुक्त अरब अमिराती, बहारीन या देशांशी इस्रायलचे करार घडवून आणणे ही ट्रम्प यांची राजकीय खेळी.

मृगजळातील ओलेते..
संग्रहित छायाचित्र

संयुक्त अरब अमिराती, बहारीन या देशांशी इस्रायलचे करार घडवून आणणे ही ट्रम्प यांची राजकीय खेळी. तीस ऐतिहासिक मानण्याचे काहीही कारण नाही..

ही खेळीदेखील निव्वळ स्वप्रेमातून आलेली आहे आणि शांततेशी तिचा काहीही संबंध नाही, असे म्हणावे लागते. तो असता, तर इराण वा इजिप्तकडे ट्रम्प यांनी आधी पाहिले असते..

स्वत:वर फारच प्रेम जडले की अतिरंजित आभाससुद्धा खरे वाटू लागतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत पश्चिम आशियात इस्रायलच्या बेरकी सहकार्याने जो ‘शांतता करार’ नामक सर्कशींचा सपाटा लावला आहे तो असा स्वप्रेमाचा अतिरंजित आविष्कार आहे. काही स्वप्रेमींत एक निर्बुद्ध निरागसता असते. ती काही काळापुरती का असेना लोभस भासू शकते. पण अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वप्रेम हे यात मोडत नाही. त्यामागे राजकीय हिशेब असतात. आताही निवडणुकीला जेमतेम दोन महिने राहिलेले असताना आणि प्रत्येक आघाडीवर देशांतर्गत राजकारणात लक्तरे निघू लागलेली असताना ट्रम्प यांचा हा आंतरराष्ट्रीय कंड समजून घेण्यासारखा. घरचे जमेनासे झाले की अनेक नेते दारचे मिरवणे हा पर्याय मानतात. तो नसतो. पण तेवढेच समाधान. त्यात ट्रम्प यांना अशा घटनांची अधिक भावनिक गरज. याचे कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील गंड. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापेक्षा कोणत्याही आघाडीवर आपण तसूभरही कमी नाही हे सतत सिद्ध करण्याच्या त्यांच्या ईर्ष्येतून हा गंड दिसून येतो. बौद्धिकदृष्टय़ा आपण आपल्या पूर्वसुरींपेक्षा किती तरी कमी आहोत याच्या आतून पोखरणाऱ्या सततच्या जाणिवेतून अनेकांकडून अशी कृत्ये होतात. ओबामा यांनी पश्चिम आशियातील शांततेसाठी काही करार केले. त्यामुळे आपणही तसे काही करून  दाखवणे आवश्यक असे ट्रम्प यांच्या मनाने घेतले असणार. त्यात पश्चिम आशियाचे त्यांचे धोरण-सल्लागार त्यांचे जावई जेरेड कुशनेर. म्हणजे स्वत:चा गंड सुखवताना दशमग्रहाचीही शांती. ती किती फक्त कागदोपत्री आहे हे इस्रायल या करारावर स्वाक्षरी करीत असताना गाझा पट्टीत सुरू झालेल्या बॉम्बफेकीने दाखवून दिले.

पण हे असले वास्तव लक्षात घेण्याच्या मन:स्थितीत ट्रम्प दिसत नाहीत. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती, इस्रायल आणि बहारीन यांच्यात काही असे कथित शांतता करार ट्रम्प यांनी घडवून आणले. ते अत्यंत ऐतिहासिक आणि क्रांतिकारी आहेत, असा ट्रम्प यांचा दावा आहे आणि इतरांनी हा दावा मान्य करावा असा त्यांचा आग्रह आहे. या करारांनंतर अलीकडेच इस्रायलच्या शिष्टमंडळाने अमिरातीचा अधिकृत दौरा केला. इस्लामी देश आणि यहुदी यांच्यात या करारामुळे किती सामंजस्याचे वातावरण निर्माण झाले आहे, हे दाखवणे हा या दौऱ्यामागचा उद्देश. या करारांनंतर आता पश्चिम आशियातील सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारीन आदी देशांचे इस्रायलशी व्यापारसंबंध सुधारतील आणि या आसमंतात शांतता नांदू लागेल, असे दावे केले गेले. मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये हा करार सोहळा झाला. त्यानंतर अशा आशावादाचा प्रवाह दुथडी भरून वाहू लागला असून आगामी निवडणुकांत त्यामुळे मतांचे पीक चांगले येईल अशी खात्री ट्रम्प यांना दिसते. त्या निवडणुकीत काय होईल ते होवो. पण या कराराचे विश्लेषण केल्यास काय दिसते? या करारांमुळे वर उल्लेखलेल्या देशांशी इस्रायलचे व्यापारी संबंध प्रस्थापित होतील असे हे करारसमर्थक सांगतात.

तेच हास्यास्पद आहे. त्याची हास्यास्पदता सिद्ध करण्यासाठी यातील कोणत्या देशाशी इस्रायलचे व्यापारी संबंध नाहीत, हे आधी सिद्ध करावे लागेल. ते तसे करता येणार नाही. कारण यापैकी जवळपास सर्वच देशांशी इस्रायलचे व्यापारी संबंध आताही आहेत. या करारांबाबत फार आशावादी असणाऱ्यांनी आधी इस्रायलचे दोन चेहरे लक्षात घ्यायला हवेत. धर्म, त्यावर होणारे इस्लामचे अतिक्रमण आणि त्याविरोधात कडवेपणाने लढणारा इस्रायल हा त्याचा एक चेहरा. पण त्यामागील त्या देशाचा खरा चेहरा तद्दन व्यापारी आहे. त्यामुळे आर्थिक लाभाची हमी असेल तर सामान्य जनतेच्या मते कडव्यातील कडव्या शत्रूशीदेखील हातमिळवणी करायला इस्रायल कधीही मागेपुढे पाहात नाही. ऐंशीच्या दशकात ओसामा बिन लादेन याचा उदय होत असताना त्यास लागणारी शस्त्रास्त्रे इस्रायलच्या मध्यस्थीने दिली गेली हा इतिहास आहे. त्या व्यापारातील दलालीतूनच निकाराग्वाचे काँट्रा बंडखोर प्रकरण घडले. त्या वेळी आणि त्यानंतर इराक-इराण युद्धात अमेरिका सद्दाम हुसेन आणि अयातोल्ला खोमेनी या दोघांनाही परस्परांविरोधात लढण्यासाठी शस्त्रपुरवठा करीत होती आणि त्यातही मध्यस्थ इस्रायल होता. ज्या इराणविरोधात शंख करणे इस्रायलला आवडते त्या इराणशीही इस्रायलचे व्यापारी संबंध होते. तेव्हा या करारामुळे यहुदी आणि हे इस्लामी देश यांत रोटी-बेटी व्यवहार सुरू होतील या दाव्यावर विश्वास ठेवणे केवळ मूर्खपणाचे ठरेल.

ट्रम्प यांना या प्रदेशातील शांततेची इतकीच आस होती तर त्यांनी या करारात इराण आणि इजिप्त यांना सहभागी करून घ्यायला हवे होते. पश्चिम आशियातील शांततेसाठी हे दोन देश आणि त्यानिमित्ताने सीरिया आदी प्रदेश हे महत्त्वाचे आहेत. हे सर्व घटक एका पंगतीत बसेपर्यंत या प्रदेशांत शांतता नांदूच शकत नाही. आताही या बहुचर्चित करारांवर इराणची काहीही प्रतिक्रिया नाही. तसेच दुसरा मुद्दा म्हणजे या प्रदेशात असलेले रशियाचे हितसंबंध. त्यास तेलाची जशी किनार आहे तशी अमेरिकी बलाचे संतुलन करणे या विचाराचीही बाजू आहे. त्याचमुळे इराण आणि रशिया, रशिया आणि सीरिया यांचे संबंध या परिसरातील शांततेसाठी महत्त्वाचे. याचा अर्थ असा की केवळ ट्रम्प यांनी दोनपाच देशप्रमुखांना बोलावून कोणा कागदावर काही स्वाक्षऱ्या करून घेतल्या म्हणजे यशस्वी शांतता करार झाला असे होत नाही. अशा प्रकारच्या समारंभात एक वृत्तछायाचित्र संधी असते. तितकेच तिचे महत्त्व. त्यासाठी करार होणे पुरते. मागून शांतता येईलच याची शाश्वती नाही. किंबहुना ती न येण्याचीच शक्यता अधिक. कारण त्यासाठी जे दीर्घकाल प्रयत्न करावे लागतात त्यांचा यात संपूर्ण अभाव आहे. ट्रम्प यांना वाटले, त्यांनी शांतता कराराची गळ घातली आणि करार झाले, हे वास्तव आहे. आगामी काही महिन्यांत निवडणुका नसत्या तर या परिसरातील शांततेची किती फिकीर ट्रम्प यांनी बाळगली असती, हा प्रश्नच.

आणि दुसरे वास्तव असे की या प्रकारचे अनेक करार या प्रदेशाने अनुभवलेले आहेत. माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या काळात झालेला, बिल क्लिंटन यांच्या पुढाकाराने कँप डेव्हिड येथे घडलेला, ओबामा यांनी घडवून आणलेला आणि आता ट्रम्प करू पाहात असलेला हे यातील काही प्रमुख. हे करार झाले तेव्हा तेही आताच्या कराराप्रमाणे ऐतिहासिकच होते. पण वर्तमानात त्यांची अवस्था काय, हे वेगळे सांगावयास नको. याचा अर्थ ट्रम्प यांच्या या उतावळ्या करारांनी वास्तवात फरक पडण्याची शक्यता शून्य. व्हाइट हाऊसमध्ये करारावर स्वाक्षऱ्या होत असताना गाझा पट्टीत इस्रायलची बॉम्बफेक हेच अधोरेखित करते. या करार स्वाक्षरीसाठी अमेरिकेकडे निघालेल्या बिन्यामिन नेतान्याहू यांना खुद्द मायदेशातच निदर्शनांचा सामना करावा लागला यातच काय ते आले. या ट्रम्पाधारित करारांत पॅलेस्टिनी वादाचा उल्लेखही नाही. जणू तो प्रश्नच अस्तित्वात नाही. एका प्रचंड जनसमुदायास त्याची हक्काची भूमी नाकारून त्या परिसरात शांतता नांदेल असे मानणे हा दुधखुळेपणा आहे. तो ट्रम्प करत असतील तर ती त्यांची निवडणुकीची गरज आहे. पण अन्यांनी या मृगजळाच्या पाणथळीत ओलेचिंब होण्याची स्वप्ने पाहण्याचे कारण नाही.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या