इंग्लंडविरुद्धच्या ‘करोनामय’ क्रिकेट कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात बाजी मारणाऱ्या वेस्ट इंडिज संघाने, चाहत्यांच्या स्मरणरंजनालाही चालना दिली..

सर व्हिव्हियन रिचर्ड्स, मायकेल होल्डिंग यांची आठवण व्हावी, असा विचारीपणाचा गुण वेस्ट इंडिजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डरकडे आहे..

जवळपास चार महिन्यांच्या अवकाशानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गेल्या आठवडय़ात इंग्लंडमध्ये सुरुवात झाली, त्या वेळी दोन्ही सहभागी संघ- इंग्लंड आणि वेस्ट इंडिज- बऱ्यापैकी जोखीम स्वीकारून मैदानात उतरले. करोनाकाळातही खऱ्या अर्थाने मैदानी म्हणता येईल असा फुटबॉलव्यतिरिक्त सुरू झालेला खेळ क्रिकेटच. प्रेक्षागृहात प्रेक्षक नसताना, प्रत्यक्ष खेळावर अनेक आरोग्यविषयक बंधने असूनही हा कसोटी सामना कंटाळवाणा झाला नाहीच, उलट अखेरच्या दिवसापर्यंत रंजकच ठरला. त्याहूनही उल्लेखनीय म्हणजे, चित्रवाणीवरून तो लाखोंनी पाहिला. म्हणजे टी-२०च्या गल्लाभरू, मारधाड युगात चांगल्या दर्जाच्या कसोटी क्रिकेटला भवितव्य नाही ही ओरड तशी अनाठायीच. सामना वेस्ट इंडिजने जिंकला. निव्वळ आकडेवारीचा विचार केल्यास हा विजय अभूतपूर्व ठरतो. इंग्लंडमध्ये गेल्या २० वर्षांत वेस्ट इंडिजने मालिकेत विजयी आरंभ केलेला नाही. गेल्या ३२ वर्षांत वेस्ट इंडिजने या देशात मालिकाही जिंकलेली नाही. विद्यमान मालिकेत अजूनही दोन कसोटी सामने बाकी आहेत. ते जिंकण्याची संधी दोन्ही संघांना समसमान आहे. पण साऊदॅम्प्टनला झालेल्या त्या कसोटी सामन्याचे कवित्व निराळे आणि आकडेवारीच्या पलीकडचे आहे. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी एका गुडघ्यावर बसून ‘ब्लॅकलाइव्ह्जमॅटर’ चळवळीला पाठिंबा दिला, तेव्हा या सामन्यातील मुख्य अश्वेत संघ म्हणून तो जिंकण्याची आपली जबाबदारी जणू अधिक आहे, या ईर्ष्येने कर्णधार जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजचा संघ खेळला. ‘ब्लॅकलाइव्ह्जमॅटर’ हे ठीकच. पण मुद्दा केवळ एका सामन्यापुरता किंवा एका विजयापुरता मर्यादित नाही. अन्यायग्रस्त, द्वेषग्रस्त हे शिक्के पुसण्याचा हाही मार्ग असू शकतो हे त्या संघाने दाखवून दिले. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या जगभरातील क्रिकेटदर्दीसाठी हव्याशा वाटणाऱ्या स्मरणरंजनाला यानिमित्ताने चालना मिळाली. त्याचा वृत्तमाध्यमे व समाजमाध्यमांवरील आवेग प्रचंड होता. त्याची दखल घेणे भाग पडते.

भारतासारख्या अश्वेत देशातील क्रिकेटवेडय़ांना स्वदेश सोडून ज्या एका संघाच्या विजयाचा कधीही त्रास वाटला नाही, असा संघ म्हणजे वेस्ट इंडिज! याचे प्रमुख कारण म्हणजे, क्रिकेटचे प्रस्थापित संदर्भग्रंथ टराटरा फाडून या मंडळींनी स्वत:ची शैली निर्माण केली. त्या शैलीत रांगडा गोडवा होता.. आणि अभिमानही! गोऱ्यांसारखे क्रिकेट शिकावे, पण खेळावे मात्र वेस्ट इंडिजसारखे, असे भारतातील प्रत्येकाला वाटायचेच. मात्र वेस्ट इंडिजसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नव्हता. ती अभिव्यक्ती होती. या अभिव्यक्तीची गरज निर्माण झाली ती वर्णातून.

काळेपणाचे टोमणे वेस्ट इंडिजचा संघ वर्षांनुवर्षे ऐकत आला आहे. या टोमण्यांना प्रत्युत्तर निव्वळ प्रतीकात्मक निषेधातून नव्हे, तर मैदानावरील खेळातूनच सर्वात उत्तम प्रकारे देता येते हे या संघाच्या गतशतकातील महान कर्णधारांनी आणि खेळाडूंनी ओळखले होते. ‘आमच्या देशात आलेल्या वेस्ट इंडियन क्रिकेट संघाला आम्ही रांगायला लावू,’ असा वर्मी लागेलसा टोमणा सत्तरच्या दशकात तत्कालीन इंग्लिश कर्णधार टोनी ग्रेगने मारला होता. टोनी ग्रेग मूळचा दक्षिण आफ्रिकेतला. त्या देशाने तोपर्यंत वर्णद्वेषाला राष्ट्रीय धोरण म्हणून तिलांजली दिलेली नव्हती. वेस्ट इंडियन संघाला दुखावण्याचा ग्रेगचा उद्देश नसेलही; पण वर्णद्वेषासारख्या गंभीर मुद्दय़ावरची त्याची तोकडी संवेदनशीलता प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या प्रखर आणि तिखट प्रतिसादास कारणीभूत ठरली. इंग्लंडने इंग्लंडमध्येच ती मालिका गमावली, शिवाय कर्णधार ग्रेगसह त्यांच्या क्रिकेटपटूंना वेस्ट इंडियन तेज गोलंदाजांच्या उसळत्या चेंडूंची ‘प्रेमळ परतफेड’ झेलावी लागली होती! दक्षिण आफ्रिकी सरकारच्या वर्णद्वेषी धोरणांमुळे त्या देशावर क्रीडा जगताने बहिष्कार टाकला. त्यानंतरही त्या देशातील क्रिकेट व्यवस्थेने प्रामुख्याने गोऱ्या क्रिकेटपटूंना मोठय़ा रकमेचे आमिष देऊन आपल्या देशात बोलावणे सुरूच ठेवले होते. त्याला भुलून काही खेळाडू दक्षिण आफ्रिकेत जात राहिले. अशांना खडे बोल सुनावण्याचे काम महान फलंदाज आणि कर्णधार सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी केले होते. इतरांनीही तसे बोल सुनावले असतील. पण रिचर्ड्स यांचा मैदानावरील वावर, त्यांचा अभिनय-अभिनिवेश औरच. त्याहीपुढे जाऊन आक्रमक फलंदाजीचा जो मानदंड त्यांनी निर्माण केला, तो कालातीत ठरला. हा आक्रमकपणा त्यांच्या मनातील खदखदीचा आविष्कार होता का? वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंचा उल्लेख नेहमीच ‘कॅलिप्सो किंग्ज’ असा केला जाई. आजही होतो. कॅरेबियन द्वीपसमूहातील देशांमध्ये प्रचलित विशिष्ट संगीतावरून हे नाव त्यांना पडले. पण त्या वेळच्या आणि आजच्याही बहुतेक वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंना हा उल्लेख मुळीच आवडत नाही. या उल्लेखात त्यांना गोऱ्यांचा वर्चस्वदर्प जाणवतो. ‘गरीब बिचारे.. पण नाचतात, गातात छान हं..’ असे थेट म्हणण्याऐवजी कॅलिप्सो किंग्ज वगैरे म्हटले, म्हणजे जणू कौतुक करण्याची गोऱ्यांची जबाबदारी संपते. ते काय म्हणतात, याची फिकीर करण्याऐवजी मैदानावर जीव ओतून खेळायचे आणि त्यांनीच निर्माण केलेल्या खेळात त्यांना हरवून दाखवायचे हा सन्मार्ग वेस्ट इंडियन क्रिकेटपटूंनी साठ, सत्तर, ऐंशीच्या दशकात अनुसरला. वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी सर्वाधिक आक्रमक गोलंदाजी इंग्लिश फलंदाजांसमोर केली. ग्रेगला ‘त्या’ मालिकेत हे दिसून आले. जेफ्री बॉयकॉटसारख्या तंत्रशुद्ध इंग्लिश फलंदाजाला त्यांनी बेजार केले. सध्या होल्डिंग समालोचक आहेत आणि वर्णद्वेषाविरोधात अधिक ठसठशीत भाष्य करण्यात आघाडीवर असतात. आसपास सुरू असलेल्या अन्यायाविरोधातील खदखद आपल्या मैदानावरील कामगिरीत उमटली पाहिजे, असा त्यांचा विशेष आग्रह असतो.

परवाचा वेस्ट इंडिजचा विजय या पार्श्वभूमीवर तपासावा लागेल. तो पहिला नाही.. शेवटचाही नसेल. जेसन होल्डर हा ज्योएल गार्नर यांची आठवण करून देणारा ताडमाड उंचीचा गोलंदाज. पण तो वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सुवर्णयुगातील गोलंदाजांसारखा आक्रमक नाही. उसळत्या चेंडूंऐवजी तो स्विंग, सीम गोलंदाजीला प्राधान्य देतो. त्याच्या संघातील अनेक फलंदाज प्रामुख्याने ‘टी-२०’वर पोसलेले. गेल्या अनेक वर्षांत विशेषत: ख्रिस गेलसारख्या ‘भाडोत्री’ फलंदाजांमुळे वेस्ट इंडियन क्रिकेटचे वेगळ्या अर्थाने ‘कॅलिप्सो’करण सुरू होते. तगडे, बलदंड क्रिकेटपटू आपल्या कंपूत आणल्याने जगभरच्या फ्रँचायझींचे उखळ पांढरे झाले; तरी वेस्ट इंडियन क्रिकेटचे मातेरे झाले. कारण पांढऱ्या पोशाखात सबुरीने कसोटी क्रिकेट खेळण्याची यांची आता लायकीच उरलेली नाही, असा समज सार्वत्रिक होऊ लागला होता. क्रिकेटच्या इतिहासात कधीही कसोटी क्रिकेटमध्ये वारंवार अपयशी ठरलेल्या संघांना एका मर्यादेबाहेर प्रतिष्ठा मिळू शकलेली नाही. तरी हल्ली ‘टी-२०’त पैसा असल्याने वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सक्रिय राहिले आणि तेथील क्रिकेट मृतवत झाले नाही. मात्र तेथील कसोटी क्रिकेटला संजीवनी दिली जेसन होल्डरसारख्या विचारी क्रिकेटपटूंनी. तो उत्तम गोलंदाज आणि अष्टपैलू क्रिकेटपटू आहेच. पण रिचर्ड्स, होल्डिंग यांच्या दर्जाचा तो विचारी क्रिकेटपटूही आहे.

कदाचित वेस्ट इंडिज क्रिकेटला गतवैभव वगैरे मिळवून देण्याचा पोक्त विचार त्याच्या मनात आलेला नसेल. परंतु व्यक्त व्हायचे ते मैदानावर, कौशल्य दाखवायचे ते कसोटी क्रिकेटमध्ये हे (मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यशस्वी ठरूनही) त्याला नेमके समजले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटचे सुवर्णयुग जे आजवर स्वप्नवत वाटत होते, ते वास्तवात पुन्हा उतरवण्याची शक्यता जेसन होल्डर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी परवाच्या विजयातून निर्माण केली, हेही नसे थोडके.