विविध गटांनी त्यांना सोयीच्या व्यक्तिमत्त्वास आपले वा विरोधी मानणे या वैश्विक रोगाचे ताजे लक्षण म्हणजे, धर्मवादी लसविरोधकांनी जोकोव्हिच यास ‘आपला’ मानणे…

ऑस्ट्रेलियन सरकार आधी गप्प बसले आणि मग जोकोव्हिचवर कारवाई झाली. ती आता वैध ठरली असली तरी जगभरच्या ‘कट’वादी वेडसरांची सहानुभूतीही त्याला मिळू शकते…

Indian Man who earns Rs 5 crore daily his parents wanted him to pursue PhD Google CEO Sundar Pichai Daily Salary Morning Habits
भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..
national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
have you ever eaten dancing bhel
Video : डान्सिंग भेळ खाल्ली का? भेळ विक्रेत्याचा मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

‘‘तुम्ही सर्व काही मिळवू शकता, पण म्हणून लोकांचे प्रेम आणि आदर मिळेल असे नाही,’’ असे कमालीचे, अनेकांस लागू होणारे सर्वव्यापी विधान बोरिस बेकर याने ज्या खेळाडूविषयी केले तो नोवाक जोकोव्हिच. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील त्याच्या सहभागाचा वाद समाजकारण आणि राजकारण समजून घेण्यासाठी आवश्यक ठरतो. बेकर हा स्वत: प्रतिभावंत खेळाडू काही काळ जोकोव्हिच याचा प्रशिक्षक होता आणि त्याचे हे विधान जोकोव्हिच याच्या तुलनेत रॉजर फेडरर आणि नादाल या खेळाडूंचे जे कौतुक होते त्यास अनुसरून होते. या दोघांइतक्याच किंबहुना काकणभर अधिक विजेतेपदांवर जोकोव्हिच याचे नाव कोरले गेलेले आहे. या दोहोंच्या तुलनेत जोकोव्हिच याचे सामाजिक कार्यही मोठे आहे. अनाथांसाठी शाळा चालवण्यापासून बेघर आदींस आर्थिक मदत करण्यापर्यंत तो बरेच काही करीत असतो. या दोहोंच्या तुलनेत त्याची शारीरिक क्षमताही अतुलनीय म्हणावी अशीच. पण तरीही स्पेनचा नादाल आणि स्वित्झर्लंडचा फेडरर यांच्याविषयी, त्यातही फेडररबाबत अधिक, जनतेत आदराची, प्रेमाची आणि ‘याने कधीही हरू नये’ अशी भावना आहे ती जोकोव्हिच याच्याविषयी नाही. दोन वर्षांपूर्वी अमेरिकी ओपन स्पर्धेत वा विम्बल्डनमध्ये तर महत्त्वाच्या सामन्यांत त्याच्याविरोधात टाळ्या पिटल्या गेल्या. तरीही तो जिंकला. पण जनतेच्या विराट कौतुक-प्रेमाचे वाटेकरी ठरले ते फेडरर वा नादाल. हे असे का होते याचा खल येथे अपेक्षित नाही. हा मुद्दा तूर्त बाजूस ठेवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या वादावर मात्र भाष्य करायला हवे.

याचे कारण आपल्याकडल्या वादांप्रमाणेच या वादास अनेक कंगोरे आहेत. ऑस्ट्रेलियातील केंद्र-राज्य संबंध हा एक. ऑस्ट्रेलिया आपल्याप्रमाणे संघराज्य. त्या देशातील व्हिक्टोरिया या राज्याने ही स्पर्धा भरवणाऱ्या संघटनेशी, म्हणजे ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’शी, परस्पर हातमिळवणी करून जोकोव्हिच यास स्पर्धेचे निमंत्रण दिले. वास्तविक गेल्या वर्षीच जोकोव्हिच याने ऑस्ट्रेलिया आणि त्या देशातील करोना नियंत्रणाचे कठोर नियंत्रण यावर टीका केली होती आणि विलगीकरण नियम सैल करण्याची मागणी केली होती. त्यामुळे व्हिक्टोरिया राज्याने जोकोव्हिच याचे स्वागत करण्याआधी याचा विचार करायला हवा होता. ऑस्ट्रेलिया या देशातील करोना नियम हे जागतिक पातळीवर काही प्रमाणात टिंगलीचा विषय झालेले आहेत. एखाद्या शहरात एक जरी करोनाबाधित आढळला तरी संपूर्ण शहर टाळेबंद करण्यापर्यंत त्या देशाची मजल गेली आहे. आताही करोनाच्या ओमायक्रॉन उत्परिवर्तनाने त्या देशास ग्रासलेले आहे आणि जनता टाळेबंदी आदी उपायांमुळे त्रस्त झालेली आहे. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा भरत असताना व्हिक्टोरिया राज्याने ही पाश्र्वभूमीही विचारात घ्यायला हवी होती. ते झाले नाही. त्यामुळे केंद्रीय भूमिकेशी फारकत घेत हे राज्य आणि ‘टेनिस ऑस्ट्रेलिया’ यांनी जोकोव्हिच यास निमंत्रण दिले. पण हे सर्व जाहीरपणे होत असताना, ऑस्ट्रेलियन ओपन आणि तीत जोकोव्हिच याचा सहभाग निश्चित दिसू लागलेला असताना केंद्र सरकार ते सर्व पाहात राहिले. स्पर्धेत सहभागासाठी जोकोव्हिच हा ऑस्ट्रेलियाकडे कूच करता झाल्यावर मात्र पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना कंठ फुटला. ‘या देशात नियम म्हणजे नियम’, असे बाणेदार वगैरे उद्गार काढत त्यांनी जोकोव्हिच यास देशात प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. व्हिक्टोरिया राज्य, टेनिस ऑस्ट्रेलिया हे दो हातांनी जोकोव्हिच याचे स्वागत करण्यास सिद्ध असताना पंतप्रधानांस ही अशी भूमिका का घ्यावी लागली? 

ऑस्ट्रेलियातील जनमत हे त्याचे उत्तर. लसीकरणासाठी, करोना नियंत्रणासाठी तो देश जंगजंग पछाडत असताना लसीकरणाविरोधात इतकी उघड भूमिका घेणाऱ्या जोकोव्हिच याचे स्वागत आपण कसे काय करणार, हा प्रश्न तेथे उघडपणे विचारला जाऊ लागला. खरे तर तो तसा विचारला जाण्याआधीही यातील विरोधाभास पंतप्रधान मॉरिसन यांच्यासह सर्वांनाच ठाऊक असणार. पण तरीही सर्वांनी मौन पाळले. कारण तसे करणे सोयीचे होते. ऑस्ट्रेलियात, जोकोव्हिच याच्या सर्बियात आणि एकंदरच जगात धर्माच्या अंगाने लसीकरणास विरोध आहे. गर्भपातास विरोध करणारे, स्कंद पेशी (स्टेमसेल) संशोधनास विरोध करणारे आणि लसीकरणाच्या विरोधात भूमिका घेणारे हे सर्व एकाच माळेचे मणी. या धर्मवाद्यांमुळेच अमेरिकी अध्यक्षपदावर असताना जॉर्ज बुश यांनी स्कंदपेशी संशोधनाचा निधी रोखला आणि गर्भपात अधिकाराविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे जोकोव्हिचला विरोध करणे म्हणजे धर्मवाद्यांचा रोष ओढवून घेणे असा विचार पंतप्रधान मॉरिसन यांनी केला असल्यास अजिबात आश्चर्य नाही. यंदाचे हे वर्ष ऑस्ट्रेलियात निवडणूक वर्ष. पुढील काही महिन्यांत निवडणुकांचे रर्णंशग त्या देशात फुंकले जाईल. निवडणुकांच्या वर्षात धर्मास किती महत्त्व येते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. तेव्हा याच सोयीच्या विचाराने मॉरिसन यांनी प्रथम या वादाकडे काणाडोळा केला. पण समाजातील बुद्धिवादी  जोकोव्हिच याच्या ऑस्ट्रेलिया प्रवेशाविरोधात व्यक्त होत आहेत हे लक्षात आल्यावर मॉरिसन जागे झाले आणि याविरोधात बोलले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि जोकोव्हिच ऑस्ट्रेलियात दाखलही झाला होता. मग पुढचे नाटक घडले. तेव्हा स्थानिक राजकारणातील या दुहीचा उपयोग तो न करता तरच नवल. त्या राज्यातील न्यायालयानेही या दुहीकडे बोट दाखवत पंतप्रधानांच्या विरोधात निर्णय दिला. आपल्या सर्वोच्च नेत्याच्या मुखभंगाची फिकीर न्यायालय करीत नाही, हे सुखद दृश्य ऑस्ट्रेलियात दिसून आले आणि न्यायालयाने स्वदेशाविरोधात निर्णय दिला. त्यानंतर खरे तर मॉरिसन यांच्या सरकारने गप्प बसण्यात शहाणपण होते. पण नाही. आपले नाक वर हे दाखवण्याच्या नादात सरकार प्रथम अतक्र्यपणे गप्प बसले आणि सामने सुरू होण्यास दोन दिवस असताना जोकोव्हिचचा प्रवेश परवाना पुन्हा रद्द केला. ही कृती केंद्रीय न्यायालयाने रविवारी वैध ठरवली. ही एक बाजू.

ती लक्षात घेताना सहानुभूती वरकरणी जोकोव्हिच यास अधिक मिळणे संभवते. पण ते योग्य नाही. याचे कारण जोकोव्हिच याची विज्ञानविरोधी भूमिका आणि त्याने एकप्रकारे केलेली लबाडी. त्याच्या प्रवेशबंदीचा मुद्दा निकालात निघाल्यानंतर आपण करोनाबाधित होतो असे तो कबूल करतो आणि ते न सांगण्यात चूक झाली हेही सांगतो. आणि तरीही याचा लसीकरणास विरोध. तो इतका की त्याने आपल्या मुलांसही करोनाविरोधी लस टोचून घेतलेली नाही. त्याच्या सर्बिया या देशभरच करोना लसीकरणाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि त्या देशातील बहुसंख्य या लसीकडे जागतिक शक्तींचे वा दैत्याचे कारस्थान या नजरेतून पाहतात. अशा कट-वादी वेडसरांचे प्रमाण अलीकडे सर्वच देशांत वाढताना दिसते. समाजमाध्यमांत अशांची चलती असते. त्यातूनच या लसविरोधाचा मोठा गट समाजमाध्यमांत कार्यरत असून जोकोव्हिच हा त्यांचा नायक. वास्तविक जोकोव्हिच याने लस घेतली नाही, हे सत्य. त्यास त्याचा विरोध आहे हेही सत्य. पण म्हणून त्याने लसविरोधी कट-वाद्यांस र्पांठबा दिलेला नाही, हेही सत्य. पण तरीही लसीविरोधात भूमिका घेणारे हे अंधश्रद्ध जोकोव्हिच यास ‘आपला’ मानतात.

हे असे विविध गटांनी त्यांना त्यांना सोयीच्या व्यक्तिमत्त्वास आपले वा विरोधी मानणे ही सध्याची एक वैश्विक डोकेदुखी. अशा वेळी तळ्यात-मळ्यात न करता समाज नायक व्यक्तींनी विज्ञानाच्या बाजूने ठामपणे उभे राहायला हवे. तसे न झाल्यास काय होते हे जोकोव्हिचच्या वादातून दिसून येते. या अविज्ञानवाद्यांचे तिमिर जावो हे खरे आजचे पसायदान. त्याच्या पूर्ततेसाठी शहाण्यांची विवेकजागृती आवश्यक. हा विषयप्रपंच त्याचाच एक प्रयत्न.