नगर पंचायत निकालांत भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला हे सत्य समाधान व्यक्त करण्याइतके लक्षणीय असले, तरी सत्तानंदासाठी तितकेच पुरेसे नाही..

काँग्रेसचे पारंपरिक प्रभावक्षेत्र या निवडणुकीत कायम राहिले, पण राष्ट्रवादीचा प्रभाव वाढला. शिवसेनेच्या जागा वाढल्या आणि काळजीदेखील..

Shivsena, NCP, Mahavikas Aghadi,
महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा वरचष्मा, काँग्रेसची फरफट, नाराजीची पटोलेंकडून कबुली
Sanjay Raut on Congress Sangli
“तुमची नौटंकी…”, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यानाच संजय राऊंताचा इशारा
Sanjay Kokate of Shiv Sena Shinde group is join NCP Sharad Pawar group
शिवसेना शिंदे गटाचे संजय कोकाटे राष्ट्रवादी शरद पवार गटात
pawar group fixed 10 candidates for lok sabha election 2024 zws
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जागावाटप जाहीर; अहमदनगरमधून निलेश लंकेच्या नावाची घोषणा

अलीकडे प्रत्येक निवडणूक जीव खाऊन लढण्याची प्रथा झालेली असल्यामुळे माध्यमांसही त्यांची दखल घेण्याखेरीज पर्याय नाही. यासाठी काही जण माध्यमांसही जबाबदार धरतील. म्हणजे माध्यमे जास्त दखल देऊ लागल्याने प्रत्येक निवडणुकीचे महत्त्व वाढले, असे त्यांचे म्हणणे असेल. तथापि यामागील वास्तवाची शहानिशा करण्याच्या फंदात न पडता जे घडले आहे त्यावरच भाष्य करण्याची माध्यममर्यादा पाळणे योग्य. असा वास्तववादी विचार केल्यावर समोर येते राज्यभरातील नगर पंचायतींच्या निवडणुकांचे वास्तव. या निवडणुका महाराष्ट्राच्या ३६ पैकी ३२ जिल्ह्यांत लढल्या गेल्या. म्हणजे त्या अर्थी राज्याच्या सर्व भागांचे प्रातिनिधिक चित्र त्यात दिसते असे म्हणणे योग्य. या सर्व ठिकाणी मिळून १८०२ जागांसाठी मतदान झाले. यातील १८०१ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. म्हणजे जवळपास सर्वच. यांत सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे तो भाजप. त्या पक्षाचे ४२० इतके उमेदवार विजयी झाले. भाजपचे हे यश सर्वत्र समान आहे. म्हणून ते लक्षणीय ठरते आणि त्या पक्षाची कामगिरी अभिनंदनीय. त्याखालोखाल राष्ट्रवादी (३७०), काँग्रेस (३५५), शिवसेना (२९८) आणि इतर ३५८ अशी ही गोळाबेरीज. ही सर्व आकडेवारी पाहिल्यावर भाजपच्या यशाचे मोठेपण लक्षात यावे.  तितक्याच ठसठशीतपणे अधोरेखित होईल त्या पक्षाचे एकटे पडणे. तीन वर्षांपूर्वीपर्यंत राज्यात भाजप आणि शिवसेना हे जणू जोडशब्द असावेत असे होते. ते आज तसे असते तर भाजप आणि सेना मिळून या यशाचा आकार ७१८ इतका झाला असता. ते तसे असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही जोडीदेखील तशीच असली असती या गृहीतकाधारे बेरीज केल्यास ती ७२५ अशी झाली असती. म्हणजे एका बाजूला भाजप-सेना आणि दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी असे साधारण तुल्यबळ राज्यभरात दिसले असते. म्हणजे युती विरुद्ध आघाडी. पण २०१९ घडले आणि हे संतुलन ढळले. त्यामागील कारणे काहीही असोत आणि खरेखोटे काहीही असो पण शिवसेना आणि भाजप यांचा काडीमोड झाला आणि सेनेने भाजपकेंद्रित राजकारणातील ‘धर्म’रेषा ओलांडत काँग्रेस-राष्ट्रवादी असा तिहेरी घरोबा पत्करला. त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्राचा राजकीय दुभंग भाजपचे ४२० चे यश विरुद्ध राष्ट्रवादी- काँग्रेस- शिवसेना या महाविकास आघाडीचे १०२३ इतका अत्यंत असंतुलित बनला. म्हणजे भाजपचे सर्वात मोठा पक्ष (सिंगल लार्जेस्ट पार्टी) ठरण्याचे समाधान या आघाडीतील तीन पक्ष हातमिळवणी करून पार पुसून टाकतात. या तीन विरुद्ध एक  बेरजेतून आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट होते. या तीन पक्षांची युती कायम राहिली तर तीवर मात करणे भाजपसाठी असंभव नाही; पण अत्यंत अवघड ठरेल. खरे तर राजकारणात काहीही असंभव नसते असे म्हणतात. म्हणून भाजपसमोरील आव्हान ‘अत्यंत अवघड’ आहे असे म्हणायचे. प्रत्यक्षात ते अशक्यप्रायच आहे. आणि याचे भान अन्य कोणास असो वा नसो. पण ते भाजपला निश्चितच आहे. म्हणूनच आघाडी सरकार पाडण्याची भाषा, तसे प्रयत्न आणि ते पडेल ही आशा. ही स्पष्टोक्ती भाजप-समर्थकांस अन्याय्य वगैरे वाटेल. त्या पक्षाच्या समाजमाध्यमात पाळलेल्या टोळय़ा या अन्यायास वाचा फोडण्याचाही प्रयत्न करतील. पण तसे करणाऱ्यांस एका सत्याची जाणीव करून देणे अगत्याचे ठरते.

जे पेरले ते उगवले; हे ते सत्य. आक्रमक विस्तार मोहिमेचा भाग म्हणून विद्यमान भाजपने सुवर्णकालीन काँग्रेसची शैली स्वीकारलेली आहे. म्हणजे असे की ज्या प्रदेशात आपण अशक्त आहोत तेथे सशक्त भिडू निवडायचा, कालौघात आपला अशक्तपणा दूर करायचा आणि स्वत:च्या आरोग्याची खात्री पटल्यावर या भिडूस कोरडेपणाने दूर करायचे, ही ती शैली. तीनुसारच महाराष्ट्रात भाजपने सेनेचा हात धरला, पंजाबात अकाली दलाशी शय्यासोबत केली आणि तमिळनाडूत अद्रमुक, द्रमुक अशी मिळेल त्याच्याशी सोयरिकीचा प्रयत्न केला. पहिले दोन्ही फसले आणि तिसऱ्याने भाजपच्या नेत्रपल्लवीकडे लक्षच दिले नाही. ज्या कथित दूरसंचार घोटाळय़ावर भाजपने २०१४ सालचे यश मिळवले त्या कथित घोटाळय़ातील माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्या द्रमुक पक्षास वश करण्याचा प्रयत्न दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनीही करून पाहिला. द्रमुक बधला नाही. अशा राजकीय शैलीत काही काळ यश मिळते. पण जोडीदारास संशय आला की तेही दुसऱ्या घरोब्यासाठी प्रयत्न करू लागतात. महाराष्ट्र, पंजाब आणि तमिळनाडू या राज्यांत नेमके हेच झाले. इतकेच नव्हे तर उद्या बिहारातही असेच होणार नाही, याची हमी नाही. ज्या पद्धतीने भाजप आणि नितीश कुमार यांचा पक्ष एकमेकांची उणीदुणी काढू लागले आहेत ते पाहता उद्या आणखी एक काडीमोड झाल्यास आश्चर्य नाही. उत्तर प्रदेश आणि अन्य चार राज्यांतील निवडणुकांत काय होते यावर बिहारातील संसारस्थैर्य अवलंबून असेल. या सगळय़ाचा अर्थ इतकाच की आम्ही सगळय़ात मोठा पक्ष ठरलो आहोत हे भाजपचे विधान सत्य असले, ते सत्य समाधान व्यक्त करण्याइतके लक्षणीय असले तरी सत्तानंदासाठी ते तितकेच पुरेसे नाही. आता यावरही ‘आम्ही सत्तेसाठी राजकारण करीत नाही’, असे पोपटमुखी शोभेलसे विधान कोणी करतील. पण ते शुद्ध थोतांड. हा सर्व राजकीय आटापिटा सत्तेसाठी नसेल तर कोणी युती तोडली काय आणि जोडली काय, वेदनेने हुळहुळे होण्याचे काही कारण नाही.

या निकालाचा दुसरा अर्थ राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या संख्याबळात आढळेल. प्रथम काँग्रेसविषयी. बोलघेवडय़ा नवज्योतसिंग सिद्धूचा महाराष्ट्र अवतार असलेले नाना पटोले यांना त्यांच्या मतदारसंघात बसलेला फटका वगळता या निवडणुकीत काँग्रेस सिंचनाखालील प्रदेश तसूभरही कमी झालेला दिसत नाही. म्हणजे इतकी आदळआपट त्या पक्षाच्या नावे होत असली तरी काँग्रेसची ठरावीक मते अजूनही शाबूत आहेत. त्या पक्षाच्या नेत्यांस याची जाणीव आहे की नाही, हा प्रश्न अलाहिदा, पण त्या पक्षाचा टक्का फार घसरलेला नाही. त्याच विचारांच्या मुशीतील राष्ट्रवादी काँग्रेसने तर आपले बस्तान चांगलेच वाढवल्याचे या निवडणूक निकालातून दिसते. म्हणजे या पक्षाची पकड सैल करण्यासाठी अमित शहा यांच्या सहकार खात्यास अधिक कष्ट करावे लागतील आणि केंद्रीय यंत्रणांसही अधिक काम करावे लागेल. या निवडणुकीतील राष्ट्रवादी यश पाहूनही कदाचित भाजपच्या वेदनांत वाढ होऊ शकेल. कारण हा पक्षही भाजपच्या संभाव्य जोडीदारांत होता. तसा प्रयत्नही झाला. पण तो फसला. या निवडणुकीनंतर काळजी वाढेल ती शिवसेनेची. त्या पक्षाचे संख्याबळ काही प्रमाणात वाढले असेल. पण भाजपच्या ‘अरे’स स्वत:च्या जिवावर ‘कारे’ असे म्हणण्याइतके ते नाही. तसे करण्यासाठी सेनेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची जोड लागेल. अर्थात सेनेस नगर पंचायतींत इतका रस नाही, हेही खरेच. सेनेचा जीव आहे तो मुंबई महापालिकेत. तेथे त्या पक्षाचा आणि भाजपशी शत्रुत्व घेण्याचा खरा कस लागेल.

एकूण काय तर या नगर पंचायत निवडणुका निकाल राजकारणातील बेरजेचे महत्त्व दाखवून देतात. सध्या धर्म, प्रांत आदी मुद्दय़ांवर वजाबाकी करण्यात मश्गूल भाजपस ते लक्षात येईल काय, हा खरा प्रश्न. पाच राज्यांच्या निवडणुकांत त्याचे उत्तर मिळेल.