विराटला एका ट्वीटवजा प्रसिद्धीपत्रकातील शेवटच्या परिच्छेदातील उल्लेखाद्वारे एकदिवसीय कर्णधारपदावरून दूर करण्याइतका तो फुटकळ नक्कीच नाही!

एक मावळता कर्णधार मंडळाच्या अध्यक्षाच्या विधानाशी पूर्ण विसंगत विधान करतो. एका यशस्वी कर्णधाराला वेगळ्याच एका बैठकीच्या दीड तास आधी कळवले जाते, की तुला पदच्युत केले जात आहे. या घडामोडी बीसीसीआयच्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगणारी ठरतात.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
mpsc mantra study current affairs State National International Level Events
mpsc मंत्र: चालू घडामोडी अभ्यासाचा ‘आधार’
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

क्रिकेट किंवा कोणत्याही खेळामध्ये कर्णधारपदावरून एखाद्याची गच्छंती होणे यात सहसा अनैसर्गिक, अतार्किक असे काही असत नाही. याचे एक कारण कर्णधाराचे निष्प्रभ नेतृत्व असू शकते, किंवा त्याची वा तिची ढासळलेली मैदानावरील कामगिरी असू शकते. किंवा मग त्या खेळाच्या खऱ्या शासकांचा अविश्वास वा खप्पामर्जी असू शकते. विराट कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर आपण त्या संघाच्या कर्णधारपदावर राहणार नसल्याचे स्पर्धेपूर्वीच स्पष्ट केले. यात विशेष काहीच नव्हते. कारण या प्रकारात त्याचे नेतृत्व प्रभावी ठरत नाही हे पूर्वी दिसून आले होते आणि स्पर्धेतील भारताच्या नामुष्कीने त्यावर शिक्कामोर्तब केले. याउलट ५० षटकांच्या कर्णधारपदावरून त्याची रीतसर उचलबांगडी झाली. या निर्णयाची मीमांसा प्रस्तुत टिपणात पुढे होईलच. परंतु या उचलबांगडीविषयी विराटला कळवले गेले केव्हा? तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघ निवडण्यासाठी ८ डिसेंबर रोजी विराट आणि निवड समितीदरम्यान दूूरसंवाद बैठक झाली, त्या बैठकीच्या ९० मिनिटे आधी! हा घोळ येथेच संपत नाही. टी-२० क्रिकेट संघाच्या नेतृत्वबदलाविषयी स्पष्टीकरण देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली याने मध्यंतरी सांगितले, की कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा असे मंडळाने व निवड समितीने विराटला सांगितले होते. मात्र अशी विचारणाच मंडळाकडून झाली नसल्याचे विराटने बुधवारी स्पष्ट केले. याचा एक अर्थ सौरव धादांत खोटे बोलला असा होतो किंवा मग विराटच असत्यकथन करतो असाही निघू शकतो! विराटचे विधान हा या गोंधळपर्वातील शेवटचा अध्याय नसावा. खुलासे-स्पष्टीकरणे होतच राहणार. थोडक्यात, एक मावळता कर्णधार मंडळाच्या अध्यक्षाच्या विधानाशी पूर्ण विसंगत विधान करतो. एका यशस्वी कर्णधाराला वेगळ्याच एका बैठकीच्या दीड तास आधी कळवले जाते, की तुला पदच्युत केले जात आहे. या सगळ्या घडामोडी अंतिमत: बीसीसीआयच्या प्रतिष्ठेची लक्तरे वेशीवर टांगणारी ठरतात. पण लक्षात कोण घेतो? 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा बीसीसीआयच्या वतीने ८ डिसेंबर रोजी करण्यात आली. घोषणा म्हणजे केवळ प्रसिद्धीपत्रक. याव्यतिरिक्त माध्यमांशी वा आणखी कोणाशी संवाद साधण्याची रीत व गरज बीसीसीआयला ठाऊक नसावी. असो. तर प्रस्तुत पत्रकाच्या शेवटाला, पाचव्या परिच्छेदात एक उल्लेख होता तो असा – ‘अखिल भारतीय वरिष्ठ क्रिकेट निवड समितीने रोहित शर्माला टी-२० आणि एकदिवसीय संघांच्या कर्णधारपदी नियुक्त करण्याचा निर्णयही घेतला’! इतका महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यासाठी स्वतंत्र पत्रपरिषद घ्यावी असे मंडळाला वाटले नाही. एकदिवसीय संघाचे नेतृत्व अजून काही वर्षे करायला आवडेल, असे विराटने निवड समिती व मंडळाला सांगितले होते. त्याविषयीचा खुलासा पूर्णपणे वेगळ्या परिप्रेक्ष्यात सौरवने केला. त्याच्या मते पांढऱ्या चेंडूंच्या क्रिकेटमध्ये (टी-२० आणि एकदिवसीय) दोन वेगवेगळे कर्णधार नको होते. भूमिका म्हणून ती रास्तच. परंतु हे विराटलाच योग्य वेळी कळवायला कोणाची ना होती? ज्या दिवशी विराटने टी-२० कर्णधारपदाचा त्याग केला, त्या वेळी प्रसृत केलेल्या निवेदनात त्याने स्पष्ट म्हटले होते, की एकदिवसीय आणि कसोटी संघांचे नेतृत्व करण्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे. किंबहुना, या निर्णयाचे सुरुवातीला बीसीसीआय आणि निवड समितीने स्वागतच केले होते. मग पांढऱ्या चेंडूंच्या क्रिकेटमध्ये दोन कर्णधार नकोत हा साक्षात्कार म्हणजे पश्चातबुद्धी म्हणायची का? बरे, विराटला एकदिवसीय कर्णधारपदावरून एका ट्वीटवजा प्रसिद्धीपत्रकातील शेवटच्या परिच्छेदातील उल्लेखाद्वारे दूर करण्याइतका तो फुटकळ नक्कीच नाही! एकदिवसीय क्रिकेटमधील तिसरा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून तो ओळखला जातो. डझनाहून अधिक सामन्यांमध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना शतक झळकावणारा निर्भीड कर्णधार म्हणूनही तो ओळखला जातो. त्याच्या नावापुढे तरीही एखादे आयसीसी अजिंक्यपद लागू शकले नाही किंवा खेळ वा संघापेक्षा स्वत:ला वलयांकित ठरवण्याची त्याची प्रवृत्ती काही वेळेस प्रमाणाबाहेर जाते, या मुद्द्यांवरून ‘लोकसत्ता’सह अनेक माध्यमांनी त्याच्यावर रास्त टीकाही केली आहे. तरीही तो सन्मानपूर्वक निरोपाचा, किमानपक्षी बीसीसीआयकडून तशा उल्लेखाचा दावेदार ठरतोच. तसे काहीच न घडल्यामुळे बीसीसीआयवर समाजमाध्यमांमध्ये चौफेर टीका सुरू झाली. तशी ती झाल्याच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी विराटच्या एकदिवसीय क्रिकेटमधील महतीविषयी बीसीसीआयला साक्षात्कार झाला. मग त्याच्या काही चांगल्या खेळींच्या चित्रफिती प्रसृत करणे वगैरे पापक्षालनाचे क्षीण प्रयत्न झाले.

बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर सौरव गांगुलीसारखा कसलेला माजी कर्णधार विराजमान आहे. क्रिकेटपटूंच्या हक्कांसाठी आणि प्रतिष्ठेसाठी प्रसंगी व्यवस्थेशी टक्कर घेण्यात, प्रतिस्पर्धी कर्णधारांना वठणीवर आणण्यात त्याने कोणाचीही पत्रास ठेवली नव्हती. अशा त्या सौरवने पदभार स्वीकारल्यानंतर जवळपास एकदाही पत्रपरिषद घेतलेली नाही. तो किंवा बीसीसीआयचे सचिव जय शहा किंवा वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा पत्रकार वा माध्यमांसमोर येतच नाहीत. न्यूझीलंडविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील मुंबई कसोटी सामन्याच्या दिवशी सकाळी उपकर्णधार अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा ‘जायबंदी’ असल्याचे जाहीर झाले. दुखापत कधी झाली, तिचे स्वरूप काय वगैरे तपशिलाचा पत्ताच नाही! गेली कित्येक वर्षे संघनिवडीच्या वेळी कर्णधार, निवड समिती अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव माध्यमांना सामोरे जायचे. ती प्रथाच गेल्या काही वर्षांत बंद पडली आहे. करोनापूर्वकाळात परदेश दौरे किंवा देशांतर्गत पत्रपरिषदांना माध्यम व्यवस्थापक नामे व्यक्तीवर प्रश्नांचे ‘रहदारी नियंत्रण’ करण्याची जबाबदारी दिली जायची. म्हणजे कर्णधार मोजक्याच प्रश्नांची उत्तरे देणार. बहुधा ते प्रश्नही काही ‘पेरलेले’ माध्यम प्रतिनिधी आधीच विचारून मोकळे होत. संपली परिषद. या संस्कृतीमध्येच विराटही कर्णधार बनला आणि मोठा झाला. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक संस्मरणीय विजय मिळवले. परंतु बीसीसीआयची ही ‘संस्कृती’ बदलण्याचा प्रयत्न त्याने किंवा सौरव गांगुलीने किंवा व्यावहारिक शहाणपणाचा दावा करणारे माजी प्रशिक्षक/व्यवस्थापक रवी शास्त्री यांनी कधीही केला नाही हे कटू वास्तव.

बीसीसीआय नामक साचलेल्या बजबजपुरीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त न्या. लोढा समितीने काही प्रमाणात केला. परंतु त्या मात्रेचा प्रभाव ओसरत चालल्याची स्पष्ट चिन्हे दिसत असून आता तर माहिती प्रसृतीबाबत निर्ढावलेपणा हा अपवादाऐवजी नियम बनू लागला आहे. याच निर्ढावलेपणातून विराटला नारळ मिळाला हे तो तरी कसे नाकारणार आणि आता त्याविषयी माध्यमांकडे साद किंवा दाद मागितल्याने काय फरक पडणार? प्रश्नांना सामोरे जाण्याविषयीच्या तुच्छतेला प्रतिष्ठा मिळण्याचा सध्याचा काळ. सत्ताधीश ठरवतात, सत्ताधीश करून टाकतात. त्यात काही चुकले-माकले तर चिकित्सा करण्याची सोय नाही. या देशातील राजकारण, अर्थकारण, संस्कृतीचे सारे गुणदोष मुरलेले बीसीसीआय या बदललेल्या संस्कृतीला अपवाद कसे काय ठरणार, हा प्रश्न आपणच आता आपल्याला विचारायला हवा! म्हणूनच बीसीसीआयमधील सर्वांत शक्तिमान पदावर नियुक्त असलेले जय शहा विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव आहेत हा योगायोग चक्रावणारा ठरत नाही. क्रिकेटचा खेळ आधीच्या मंडळांनीही मांडला, पण त्या वेळी किमान संवाद जिवंत होता. आता सारा खेळच विसंवादाचा झालेला आहे.