चिलीचे नवे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक यांनी  प्रतिस्पर्ध्याची विचारसरणी किती फॅसिस्ट आहे वगैरे पठडीतला डावा प्रचार केला नाही…

मतदार समाजमाध्यमांच्या माध्यमातून जसा भरकटू शकतो, तसेच चार दावे ताडून पाडण्याची सवयही त्याला जडू लागली आहे, हे दक्षिण अमेरिकेतील या लहान देशाच्या निवडणुकीतून दिसले…

sharad pawar discussions with congress leaders on five to six disputed seats in maha vikas aghadi
महाविकास आघाडीत अद्याप पाच-सहा जागांवर पेच; शरद पवार, काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा; जागांबाबतचा वाद मिटविण्याचा प्रयत्न
national science day celebration 2024
हम सायन्स की तरफ से है
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
Acharya Pramod Krishnam
पंतप्रधान मोदींमुळेच देशात ‘हे’ तीन महत्त्वाचे निर्णय घेतले गेले; माजी काँग्रेस नेत्याचा दावा

‘मिलेनियल लेफ्ट’ असे नवीन सहस्राकात विशीपंचविशीचे झालेल्या नववाम पिढीला संबोधले जाते. चिलीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक हे अशा पिढीचे ‘आयकॉन’. नवीन सहस्राकातील नवलाईच्या बाबी अनेक. उदा. कृत्रिम प्रज्ञा (एआय), कूटचलन (क्रिप्टोकरन्सी), इंटरनेट ऑफ थिंग्ज वगैरे. ‘मिलेनियल लेफ्ट’ हे प्रकरणही याच यादीत समाविष्ट करावे इतके अद्भुत ही विचारसरणी कालबाह्य आणि मृतवत झाली असल्याची बाजारपेठाभिमुख तथाकथित मुक्त विचारसरणीच्या मंडळींची खात्री आणि आशाही. उजव्या विचारसरणीच्या मंडळींसाठी – विशेषत: अमेरिका खंडात – लाल बावटा म्हणजे जगबुडीचा इशाराच. गेल्या अमेरिकी निवडणुकीत तर समोरचा उमेदवार किती ‘लाल’ किंवा डावीकडे झुकलेला हा निवडणुकीचा मुद्दा बनला होता. या पार्श्वभूमीवर बोरिक यांची निवडणूक अभ्यासाचा मुद्दा ठरतो. सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे ते डावे असले, तरी नवीन सहस्राकातील पिढीला आपले वाटावेत असेच. चिलीच्या पार्लमेंटमध्ये २०१४ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले, त्या वेळी रॉक बँड टी-शर्ट, जीन्स आणि दर्शनी भागावर अनेक टॅटू गोंदून पहिल्या दिवशी अवतरले! ते ध्यान पाहून त्यांच्या पक्षातील अनेक पोथिनिष्ठ डाव्यांना त्या दिवशी धक्कायुक्त आवंढा गिळावा लागला होता असे सांगतात. फिडेल कॅस्ट्र्रा किंवा चे गवेरा यांच्याप्रमाणेच गॅब्रिएल बोरिक यांच्याकडेही समकालीन तरुण पिढीला भुरळ पाडण्यासारखे व्यक्तिमत्त्व नक्कीच आहे. पण केवळ त्यांचे उद्दिष्ट असेल हे संभवत नाही. वयाच्या ३५व्या वर्षी चिलीच्या अध्यक्षपदावर निवडून आलेले ते सर्वांत तरुण उमेदवार. ब्रॉड फ्रंट नामे डाव्या आघाडीचे नेतृत्व ते करतात. या आघाडीत काही डाव्या पक्षांचा आणि चळवळींचा समावेश आहे. जगभर त्यांच्याइतक्या कमी वयात राष्ट्रप्रमुखपदी निवडून आलेले थोडकेच असतील. चिलीच्या इतिहासातील ही सर्वाधिक ध्रुवीकरण पाहिलेली निवडणूक ठरली. बोरिक यांचे प्रतिस्पर्धी होजे अंतोनियो कास्ट यांनी बोरिक यांच्या डाव्या विचारसरणीला प्रचारादरम्यान लक्ष्य केले. हे कास्ट चिलीचे कुख्यात माजी हुकूमशहा ऑगस्टो पिनोशेट यांचे चाहते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेही त्यांचे आदर्श. पिनोशेट यांनी अमेरिकेच्या मदतीने चिलीमध्ये लष्करी बंड घडवून आणले आणि १९७३ ते १९९० अशी १७ वर्षे निरंकुश सत्ता उपभोगली. त्या काळात कोणत्याही प्रकारचा राजकीय विरोध चिरडून टाकण्यात आला नि ‘लोकशाहीचे जागतिक ठेकेदार’ असलेल्या अमेरिकेने इतर काही दक्षिण अमेरिकी देशांप्रमाणेच चिलीमध्येही लोकशाहीचे पाय छाटण्याकामी भूमिका उत्तम निभावली!

बोरिक यांनी प्रतिस्पर्ध्याची विचारसरणी किती फॅसिस्ट आहे वगैरे पठडीतला डावा प्रचार केला नाही. चिलीतील आर्थिक विषमता कमी करू, श्रीमंतांवर अधिक कर आकारू, सामाजिक सुरक्षा योजनांची व्याप्ती वाढवू आणि अर्थव्यवस्था शाश्वत व हरित विकासाभिमुख करू ही त्यांची आश्वासने विशेषत: युवा पिढीला भावली. त्याहीपेक्षा त्यांना भावला असावा, बोरिक यांनी नकारात्मक चिखलफेक प्रचाराचा प्रयत्नपूर्वक टाळलेला मार्ग! जगभरातील निवडणुकांमध्ये हल्ली ‘समोर आहेच कोण?’ किंवा ‘अमक्याला निवडाल तर सर्वनाश अटळ!’ या ठेवणीतल्या सूत्रांपलीकडे प्रचार जातच नाही. फारच थोड्यांकडे स्वत: काय करणार याविषयी सांगण्यासारखे असते. ‘ब्रॉड फ्रंट’ आघाडीत बोरिक यांना आव्हान देऊ शकतील असे काही होते. त्यातही सँटियागो या राजधानीच्या शहराचे महापौर डॅनिएल जादेयू हे प्रमुख. परंतु युवा मतदारांचा वाढता टक्का पाहून बोरिक यांना संधी मिळाली. वस्तुत: त्यांच्या मते ते मध्यममार्गी म्हणजे डाव्यांच्या नजरेतून ‘उजवे’च! अनेक आर्थिक निकषांवर सधन असूनही चिलीमध्ये आर्थिक विषमताही तितकीच भीषण आहे. या विषमतेतून साहजिक उद्भवणाऱ्या असंतोषाच्या लाटेवर स्वार होऊन बोरिक अध्यक्षीय निवडणूक जिंकू शकले. २०१९ पासून चिलीमध्ये प्रचंड निदर्शने सुरू आहेत. चिलीमध्ये नवीन राज्यघटना बनवण्याची प्रक्रिया सुरू असून, विषमतेवर काही घटनात्मक उपाय शोधले जातील अशी अपेक्षा आहे. बोरिक हे समाजवादी असतील, तर ते नेमक्या कोणत्या डाव्या दिशेला जाणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. त्यांना स्वत:ला दक्षिण अमेरिकेतील इतर काही देशांनी राबवलेल्या साम्यवादवजा समाजवादी राजवटींपेक्षा युरोपातील कल्याणकारी व्यवस्थेला प्राधान्य देणारे काही पश्चिम युरोपीय देश आदर्शवत वाटतात. उदा. सध्याचे जर्मनी आणि फ्रान्स. परंतु कल्याणकारी व्यवस्था राबवताना वित्तीय बेशिस्तीलाही फाटा द्यावा लागतो. कल्याणकारी राज्य याचा अर्थ मूलभूत सुविधा सर्व स्तरांना परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करून देणे. मात्र ‘गरिबांना आम्हीच पोसणार’ असा एकाच वेळी घमेंडखोर प्रतिपाळभाव आणि आर्थिकदृष्ट्या अडाणी पवित्रा नव्हे. कास्ट यांनी बोरिक यांना याच मुद्द्यावरून लक्ष्य केले होते. ‘क्युबा, व्हेनेझुएला आणि निकाराग्वा या देशांच्या वाटेने हे चिलीला घेऊन जातील. अशा साम्यवादी राजवटी गरिबीचा प्रसार करतात, ज्याला कंटाळून लोकांना असे देश सोडून पळून जावेसे वाटते’ असा स्पष्ट उल्लेख कास्ट यांच्या भाषणात होता. त्यांच्या या पवित्र्यामुळे काही मतदार त्यांच्या गळाला लागले असतीलही. परंतु मतदारही इतरत्रही पाहात असतातच. विशेषत: युवा मतदार. वरकरणी नवउदारमतवाद तरी प्रत्यक्षात संकुचित व प्रतिगामी राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या सरकारांनी विशेषत: करोनाच्या महासाथीमध्ये जनतेशीच कशी फसवणूक केली हे प्रामुख्याने अमेरिका, ब्राझील आणि ब्रिटन या देशांमध्ये दिसून आले. तेव्हा कास्ट यांचा चिलीयन राष्ट्रवाद आणि साम्यवादी भयाख्यान पुरेशा मतदारमानसाला स्पर्शू शकले नाही.

दक्षिण अमेरिकेतील अनेक देश समाजवादी वा साम्यवादी असतील, याचा अर्थ त्यांचा परस्परांमध्ये भ्रातृभाव आहे असे समजण्याचे कारण नाही. बोलिव्हिया, व्हेनेझुएला, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना अशा देशांतील डाव्या नेत्यांनी बोरिक यांचे स्वागत केले. तरी क्युबाचे शासक मिग्युएल डियाझ कानेल आणि निकाराग्वाचे नेते डॅनिएल ऑर्तेगा यांनी प्रतिक्रियाच दिली नाही. ते साहजिकच आहे. कारण याच दोन्ही नेत्यांना बोरिक यांनी लक्ष्य केले होते. ऑर्तेगा चौथ्यांदा निवडून आले त्या वेळी ‘निकाराग्वाला लोकशाहीची गरज आहे. बनावट निवडणुका आणि विरोधकांच्या गळचेपीतून हे साधणार नाही’ असे उद्गार बोरिक यांनी काढले होते. क्युबात सरकारविरोधी निदर्शकांप्रति बोरिक यांनी सहानुभूती व्यक्त केली होती. तेव्हा चिलीला कोणत्या दिशेने न्यावयाचे आहे याविषयी बोरिक यांच्या मनात काही ठोस संकल्पना आहेत.

तसे पाहायला गेल्यास चिली हा जागतिक राजकारण वा अर्थकारणाच्या परिप्रेक्ष्यात फार मोठा देश नाही. पण येथे जे घडून आले, त्याचे गुणधर्म वैश्विक आहेत. कल्याणकारी अर्थवादाविषयी आजही जनतेच्या मनात आकर्षण आहे. सांस्कृतिक व आक्रमक राष्ट्रवाद आणि विरोधी विचारसरणीविषयीचा भयप्रचार निवडणूक यशाची हमी देईलच असे नाही. नवीन मतदार समाजमाध्यमांच्या माध्यमातून जसा भरकटू शकतो, तसेच चार दावे ताडून पाडण्याची सवयही त्याला जडू लागली आहे, जी एखाद्या निवडणुकीत जय-पराजयातील फरक ठरू शकते. मतांच्या बाजारपेठेत डाव्या विचारसरणीचे चलन अजूनही शाबूतच नव्हे, तर खणखणीत वाजूही शकते ही ‘मिलेनियल’ जाणीवही कर्कश लोकानुनयवादापेक्षा निराळी आणि म्हणूनच,  वठलेल्या वृक्षाच्या नव्या पालवीसारखी ठरते.