scorecardresearch

अग्रलेख : काय करू मी तू ‘असल्यावर’?

देशातील सामान्य नागरिकांनीच नव्हे तर समस्त काँग्रेसजनांनीदेखील आपले विश्वप्यारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऋणी राहायला हवे.

Central government asked for agricultural law the announcement of the Prime Minister Modi abn

मोदी यांनी हे घणाघाती भाषण केले नसते तर काँग्रेस हा पक्ष इतका कर्तृत्ववान आहे हे आपणास आणि काँग्रेसी जनांस कळाले तरी असते का?

काँग्रेस नसती तर जवाहरलाल नेहरू यांच्यासारखी ‘य:कश्चित बुद्धिमत्ते’ची व्यक्ती पंतप्रधानपदी निवडली गेलीच नसती. त्यामुळे त्यांचे अनुकरण करण्याची वा त्यांच्यापेक्षा मोठे होण्याचे क्षुद्र आणि हास्यास्पद प्रयत्न करावेत अशी इच्छा नंतरच्या पंतप्रधानांना झाली नसती.

या देशातील सामान्य नागरिकांनीच नव्हे तर समस्त काँग्रेसजनांनीदेखील आपले विश्वप्यारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऋणी राहायला हवे. का की जे ज्या खुद्द काँग्रेसजनासी ठावके नाही आणि ज्याबाबत देशातील ‘सव्वासो क्रोर’ जनतादेखील अनभिज्ञ आहे ते सत्य मोदी यांच्यामुळे या देशास आणि विश्वास कळाले. या सत्याची जाणीव अन्य लहानमोठे आणि काँग्रेसी यांनाही नाही. ती असती तर ते बापडे मोदी यांच्याविरोधात आज आंदोलन छेडते ना. पंतप्रधानांच्या या अजरामर भाषणात त्यांनी असत्य कथन केले असा आरोप काँग्रेसी करतात. शिव शिव!  पंतप्रधान आणि असत्य? हे कसे शक्य आहे. या आरोपांनी हृदयास चांगल्याच वेदना होतात. ‘ज्याचे करावे भले ते म्हणते आपलेच खरे’ अशी एक म्हण मराठीत आहे. ‘काय, कसं काय?’ वगैरे दूरसंवादातील प्रश्नांवरून पंतप्रधानांचे मराठीवरील प्रभुत्व दिसून येते. त्यामुळे त्यांना ही म्हण खचितच माहीत असणार आणि आपल्या भाषणावरील काँग्रेसजनांची प्रतिक्रिया पाहून त्यांना ती आठवलीही असणार.

कारण असे की मोदी यांनी हे घणाघाती भाषण केले नसते तर काँग्रेस हा पक्ष इतका कर्तृत्ववान आहे हे आपणास आणि काँग्रेसी जनांस कळाले तरी असते का? हा पक्ष नसता तर देशात समानता नांदती, धार्मिक दंगे न होते आणि आणीबाणीही लागली नसती असे आपले पंतप्रधान म्हणतात. किती खरे आहे हे! म्हणजे काँग्रेस नसती तर असमानता म्हणजे काय, हेच मुळात कळाले नसते आणि तेच कळाले नाही तर समानता हवी असे कोणी म्हणालेही नसते. त्याचप्रमाणे काँग्रेस नसती तर अल्पसंख्याकवाद आलाच नसता. तो निर्माण झाला त्यास कारण काँग्रेस. ती नसती तर अल्पसंख्याकच संख्येने इतके राहिले नसते. म्हणजे अल्पसंख्याकच नाहीत म्हटल्यावर विरोधकांना बहुसंख्याकवादाचे राजकारण करायची वेळच आली नसती. कारण सर्वच बहुसंख्य. त्याचप्रमाणे काँग्रेस नसती तर आणीबाणीचीही वेळ आली नसती, हेही तितकेच खरे. कारण काँग्रेसच नसती तर आणीबाणी म्हणजे काय हेच मुदलात कळाले नसते. आणि मग आणीबाणी जारी न करताही आणीबाणीसदृश स्थिती कशी निर्माण करता येऊ शकते हेही भारतवर्षांस कळाले नसते. माध्यमस्वातंत्र्य म्हणजे काय हेच कळाले नसते काँग्रेस नसती तर. त्यामुळे ते हिरावून घेतल्याची जाणीवच झाली नसती आणि तसे झाल्याने आणीबाणी लादण्याची वेळच आली नसती. काँग्रेस नसती तर चीनची समस्याही निर्माणच झाली नसती. कारण चिनी सैनिकांनी आपला भूभाग व्यापल्याचे सरकारने कधी मान्यच केले नसते. आणि सरकारने मान्य न करणे म्हणजे प्रत्यक्षात ती घटना न घडणेच की! तेव्हा चीनची डोकेदुखी काँग्रेस नसती तर निर्माणच झाली नसती. म्हणून पंतप्रधान म्हणतात ते पूर्णत: खरेच आणि महत्त्वाचे.  असे महत्त्व ठासून भरलेले असल्याखेरीज आपले पंतप्रधान विधानच करीत नसल्यामुळे त्यांच्या प्रत्येक विधानात ओतप्रोत अर्थ भरून राहिलेला असतो हे नव्याने पुन:पुन्हा सांगण्याची गरजच नाही. उदाहरणार्थ काँग्रेस नसती तर जवाहरलाल नेहरू यांच्यासारखी ‘य:कश्चित बुद्धिमत्ते’ची व्यक्ती पंतप्रधानपदी निवडली गेलीच नसती. त्यामुळे त्यांचे अनुकरण करण्याची वा त्यांच्यापेक्षा मोठे होण्याचे क्षुद्र आणि हास्यास्पद प्रयत्न करावेत अशी इच्छा नंतरच्या पंतप्रधानांना झाली नसती. म्हणजे कोणाला कमी लेखण्याचा वा पाण्यात पाहण्याचा वा कोणाविषयी असूया असण्याचा प्रश्नच नाही. काँग्रेस नसती तर देशात आयआयटी, आयआयएम, इस्रो, टाटा विज्ञान संस्था वगैरे निर्माण झाल्याच नसत्या आणि त्या संस्थांतील ज्ञानाने पोषित तरुण परदेशांत गेले नसते. त्याचा फायदा असा की त्यामुळे अणुबॉम्बपेक्षा भारी ब्रह्मास्त्र, दुष्काळावर मात करणारे पर्जन्यास्त्र वा वरुणास्त्र, पुष्पक विमानासारखी आणखी काही विमाने आदी संरक्षणविषयक संशोधन देशात झाले असते आणि चीनला रोखण्यासाठी गोमयबॉम्ब आदी विकसित झाले असते. काँग्रेस नसती, पं. नेहरू पंतप्रधान नसते तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कारवाई करणारे सरदार वल्लभभाई पटेल हेदेखील गृहमंत्री नसते. म्हणजे संघावर कारवाई करण्याची वेळच आली नसती. अर्थात पटेल नसते तर त्यामुळे उत्तरकाळात इतका भव्य पुतळा कोणाचा बांधायचा हा प्रश्न निर्माण झाला असता, म्हणा. पण ती अडचण काही तितकी महत्त्वाची नाही. खरे तर या देशास स्वातंत्र्य मिळाले तेच मुळात परिवारातील लाखोंच्या बलिदानामुळे. त्यातील कोणाचा तरी पुतळा उभारताच आला असता. तसेही पुतळा कोणाचा आहे, त्या पुतळाबद्ध व्यक्तीची विचारसरणी कोणती, कर्तृत्व काय आणि ते बांधणाऱ्यांनी त्याचे काय घेतले आणि काय नाही याचा काही अन्योन्य वगैरे संबंध असायलाच हवा असे नाही. भव्य इव्हेंट, थेट प्रक्षेपण सलामत तर पुतळे पचास! पण तेही काँग्रेसचेच पाप. काँग्रेस नसती तर एका पक्षात इतके थोर थोर नेते तयार होऊ शकतात हेच आपल्याला कळले नसते. म्हणजे आपोआप ‘एक पक्ष एकमेव थोर’ हे समीकरण देशात रुजले असते आणि उगाच इतरांवर कोणावर लक्ष, आणि कॅमेराही, जाण्याची वेळच आली नसती. हे झाले इतिहासातील दाखले. आता वर्तमानाविषयी. देशात करोना काँग्रेसने पसरवला हेदेखील तंतोतंत खरेच असे विचार केल्यास (अलीकडे विचार हा प्रकार ‘ऑप्शन’ला असल्याने तो करावयास सांगणे अंमळ अवघडच. पण त्यासही जबाबदार काँग्रेसच. असो.) आपल्या लक्षात येईल. काँग्रेस नसती तर निवडणुकांचा प्रश्नच आला नसता. त्यामुळे आपल्या विश्वप्रिय नेत्यांस पश्चिम बंगाल आदी राज्य निवडणुकांत प्रचाराच्या रणधुमाळीत उतरावे लागलेच नसते. प्रचाराची गरज नसल्याने करोना पसरणार कसा? त्यातूनही समजा तो पसरलाच असता तर लसनिर्मिती कंपन्या ताब्यात घेऊन, त्यांच्या परदेशी आगाऊ मागण्या रद्द करवून सर्व लस देशातल्या देशातच वापरण्याचे आदेश देता आले असते आणि करोना नियंत्रणात आला असता. आणि समजा त्यातूनही तो हाताबाहेर गेलाच असता तर त्याबाबत बोंब ठोकायला काँग्रेसच नसती. म्हणजे त्यामुळे आंतरराष्ट्रीय मंचावर भारताची नाचक्कीही नक्की टळली असती. काँग्रेस नसती तर मोक्षदायी गंगा नदीत तरंगणारी प्रेते वगैरे मुद्दे देशवासीयांसमोर आलेच नसते. तसेच भाजप-नेत्यांना मुंबईतून विशेष रेल्वेगाडय़ांतून स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यांत पोहोचवा अशी मागणीही करावी लागली नसती. कारण या मजुरांच्या हालअपेष्टांचा प्रश्नच निर्माण झाला नसता.

 अर्थात काही भाजप नेत्यांस या रेल्वेसेवेसाठी आपल्या केंद्र सरकारचे आभार मानायची संधी मिळाली नसती, हे खरे. पण हे अगदीच क्षुल्लक नुकसान. काँग्रेस नसती तर मिळू शकले असते असे फायदे इतके आहेत की या एका लहानशा तोटय़ाचे ते काय?

तेव्हा काँग्रेस नसती तर आपले बरेच काही झाले असते. ‘तू असता तर..’ असे पी. सावळाराम यांचे एक प्रेमगीत लताबाईंनी गाऊन ठेवले आहे. त्यातील ‘असता’च्या जागी ‘नसता’ केले की पंतप्रधानांच्या भाषणाचे सार आपोआप आले.

तू ‘नसता’ तर प्रीत तुझीही

दु:खद झाली नसती कधीही

रडते तीही, रडते मीही

काय करू मी तू ‘असल्यावर’?

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-02-2022 at 00:15 IST

संबंधित बातम्या