करोनावरील लस अत्यल्पावधीत तयार झाली, पण आफ्रिकेस ती मिळण्यास विलंबच होतो आहे. याउलट, मलेरियावरील लस मात्र आफ्रिकेतच सर्वप्रथम दिली जाईल…

या निमित्ताने लसकारणाबद्दल प्रश्न जरूर उभे राहतात. तरीही आफ्रिकेतील बालकांचा जीव वाचू शकतो, हे महत्त्वाचेच…

करोनामुळे जगभर उडालेला हाहाकार आणि त्याच्या निराकरणासाठी निरनिराळ्या लशींवर सुरू असलेले संशोधन, या लशींची व्यक्त अपरिहार्यता आणि त्या निमित्ताने होत असलेल्या संबंधित कंपन्यांच्या अव्यक्त जाहिराती या गदारोळात एका अत्यंत महत्त्वाच्या रोगावरील पहिल्यावहिल्या लशीच्या निर्मिती व मान्यतेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. हिवताप किंवा मलेरिया या डास-जन्य रोगाने मानवी इतिहासात कित्येक शतके हैदोस घातला. आजही विशेषत: सहाराच्या दक्षिणेकडील आफ्रिकी देशांमध्ये आणि त्यातही लहान मुलांमध्ये मलेरिया मृत्युदर लक्षणीय आहे. त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे, मलेरियाच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणारा सर्वांत घातक परजीवी – प्लास्मोडियम फॅलसिपेरम – वर्षभरात चार-पाच वेळा शरीरातच दडून रक्तपेशींवर प्रहार करू शकतो. त्याने पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू ओढवू शकतोच; शिवाय रोगप्रतिकारशक्ती क्षीण होणे, वाढ खुंटणे अशा सहव्याधी उद्भवू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार जगभरात आजही मलेरियामुळे दरवर्षी साधारण चार लाख माणसे दगावतात. भारतात मलेरियामुळे दगावणाऱ्यांची संख्या हल्ली बऱ्यापैकी आटोक्यात आली असली तरी हजारो आजही बाधित होतच असतात. मुंबई-पुणे-ठाणे अशा महापालिकांनाही वेळोवेळी मलेरियाच्या प्रादुर्भावाबाबत नागरिकांना सावधानतेचा इशारा द्यावा लागतो. मलेरिया निर्मूलनासाठी औषध फवारणीसारख्या विविध उपायांवर आजही कोट्यवधी रुपये आपल्याकडे खर्च होतात. मलेरियाबळींची संख्या आपल्याकडे बऱ्यापैकी कमी झाली असली (उदा. २०१०मध्ये १०१८ ते २०२०मध्ये ९३) तरी एकेकाळी अपरिमित हानी पोहोचवलेल्या या रोगाची दहशत कमी झालेली नाही. याचे कारण पोलिओ किंवा स्मॉल-पॉक्स (‘देवी’) या रोगांप्रमाणे मलेरियाचे समूळ उच्चाटन भारतातून झालेले नाही. मलेरिया पसरवणाऱ्या डासांना प्रतिबंध केला जातो म्हणून त्यांचा उच्छाद कमी होतो. परंतु त्याहीपेक्षा जालीम उपाय म्हणजे मलेरियाच्या हल्ल्यासाठी प्रतिकारशक्ती सज्ज ठेवणे अर्थात लसीकरण. ग्लॅक्सो- स्मिथक्लाइन या ब्रिटिश कंपनीने विकसित केलेल्या मॉस्क्युरिक्स (शास्त्रीय नाव – आरटीएस, एस) या लशीच्या प्रत्यक्ष वापरास जागतिक आरोग्य संघटनेने हिरवा कंदील दाखवला आहे. या लशीच्या चाचण्या केनिया, घाना आणि मालावी या देशांमध्ये घेतल्या गेल्या आणि त्यांतून बऱ्यापैकी सकारात्मक निष्कर्ष निघाले. या लशीची परिणामकारकता ३० टक्के आहे. करोनाप्रतिबंधक बहुतेक लशींची ७० ते ९० टक्के परिणामकारकता पाहता, या लशींच्या तुलनेत मॉस्क्युरिक्स फारच कुचकामी वाटण्याची शक्यता अधिक. मग तिचा इतका गाजावाजा कशासाठी? आणि अशी लस बनण्यासाठी इतकी वर्षे का लागावीत? या प्रश्नांची उत्तरे शोधताना, सध्याच्या करोनाप्रतिबंधक लस विकसन प्रयत्नांबाबतही नव्या जाणिवा तयार होतात.

सुरुवातीला मॉस्क्युरिक्सविषयी थोडे तपशिलाने. जगात शंभरहून अधिक प्रकारचे मलेरिया परजीवी अस्तित्वात आहेत. यापैकी पाचेक अधिक संसर्गजन्य मानले जातात. त्यातही सर्वाधिक घातक परजीवी म्हणजे प्लास्मोडियम फॅलसिपेरम. भारतामध्ये प्लास्मोडियम वायवॅक्स हा परजीवी अधिक प्रभावी ठरतो. मॉस्क्युरिक्स लस मात्र सध्या प्लास्मोडियम फॅलसिपेरमलाच लक्ष्य करणार आहे. या लशीच्या चाचण्या २०१५ मध्येच सुरू झाल्या. यात सरासरी दहापैकी चार मुलांना मलेरियापासून सरसकट संरक्षण मिळाल्याचे आढळले. उर्वरित तीन मुलांचा तीव्र संसर्गापासून बचाव झाला. याशिवाय जवळपास एकतृतीयांश रुग्णांना रक्त संक्रमणाची वेळ आली नाही. पण या निव्वळ चाचण्या होत्या आणि या लशीची परिणामकारकता वास्तव जगतात किती राहील याविषयी साशंकता होती. ही लस चार मात्रांमध्ये द्यावी लागते. अंतिम टप्प्यातील चिकित्सक चाचणीसाठी घाना, केनिया आणि मालावी या आफ्रिकी देशांतील पाच वर्षांखालील आठ लाख बालकांना या लशीच्या चारही मात्रा देण्यात आल्या. पैकी जवळपास दोनतृतीयांश बालकांना मच्छरदाणी आदी डास प्रतिबंधक उपायांचे कवच मिळण्याची कोणतीही सोय नव्हती. चाचणीचे निष्कर्ष तुलनेने आश्वासक वाटल्यामुळे तिला केवळ आफ्रिकी देशांमध्ये आणि तेही केवळ पाच वर्षे व त्याखालील मुलांसाठीच वापरण्याची परवानगी देण्यात आली. जवळपास ३० टक्के परिणामकारकतेचा उल्लेख सुरुवातीला आलाच आहे.

तरीही लशीला मान्यता मिळाली याची कारणे अनेक. मलेरियास कारणीभूत ठरणारा परजीवी अत्यंत गुंतागुंतीचा आणि चलाख असतो. हजारो वर्षे उत्क्रांत झाल्यामुळे मानवाच्या रोगप्रतिकारकशक्तीला सहज चकवा देऊ शकतो. सध्या करोना विषाणूची दहशत प्रचंड आहे. परंतु औषधशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्रातील दाखले द्यायचे झाल्यास, मनुष्य आणि डासांमध्ये वाढणारा प्लास्मोडियम परजीवी अधिक आव्हानात्मक ठरतो. यकृतपेशी आणि लाल रक्तपेशींमध्ये दडून बसण्याची त्याची क्षमता ही वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी आहे. सध्या विकसित झालेली मॉस्क्युरिक्स लस या परजीवीला यकृतापर्यंत पोहोचू देत नाही. आफ्रिकेसाठी ही लस वरदान ठरते. याचे कारण या रोगाने दरवर्षी जवळपास अडीच लाखांहून अधिक बालके एकट्या आफ्रिकेत दगावतात. मलेरिया बाधितांपैकी दरवर्षी ९४ टक्के एकट्या आफ्रिकेत आढळतात. त्यामुळे ही लस या उपेक्षित खंडासाठी संजीवनी ठरेल, कारण ती अत्यंत वाजवी दरात उपलब्ध होत आहे.

या निमित्ताने करोना लशीबाबत आफ्रिका खंडाची जी उपेक्षा सुरू आहे, ती ठळकपणे जाणवण्यासारखी आहे. मलेरिया लशीवरील अनेक प्रयोग मध्यंतरीच्या वर्षांत थंडावले, कारण प्रगत आणि नवप्रगत देशांतून मलेरियाचे उच्चाटन जवळपास पूर्ण झाले होते. पण हे उच्चाटन जागतिक नव्हते आणि मनुष्यजातीतील एक मोठा वर्ग या रोगाविरुद्ध असहाय होता याकडे त्या वेळीही फार कोणी लक्ष पुरवले नाही. मुळात हा रोग अत्यल्प वा अल्प उत्पन्न देशांमध्ये अधिक प्रभावी असल्यामुळे, लसनिर्मितीतून जो मलिदा औषधनिर्माण कंपन्यांना अपेक्षित असतो, तो अशा प्रकल्पांतून नगण्य प्रमाणात उपलब्ध होतो. एचआयव्ही विषाणूचा उद्भव आफ्रिकेतला. पण गतशतकाच्या उत्तरार्धात या विषाणूमुळे होणाऱ्या एड्स विकाराने सर्वाधिक थैमान घातले अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात. त्यामुळे एड्सप्रतिबंधक लशीची अवाढव्य बाजारपेठच जन्माला आली. यातूनही परिणामकारक लस आजतागायत हाती आलेली नाही हा भाग वेगळा. ‘कॉमन फ्लू’ किंवा ज्वर प्रतिबंधक हजारो लशी जगभर तयार होतात आणि प्रगत देशांमध्ये खोऱ्याने विकल्या जातात. अविकसित किंवा अर्धविकसित देशांमध्ये ज्वरमृत्यू एकतर फार संभवत नाहीत किंवा त्यांच्याकडे तितकेसे लक्ष दिले जात नाही. पण एड्स, फ्लू, आता करोना यांनी श्रीमंत देशांमध्ये हलकल्लोळ उडवल्यामुळे त्यांच्याशी संबंधित लशींना प्राधान्य. कारण नफ्याचे गणित साधता येते. मलेरियाने वर्षानुवर्षे थैमान घातले, पण तो बहुतांशी ‘आफ्रिकी’ रोग बनून राहिल्यामुळे लसनिर्मितीही संथ. मुळातच लसनिर्मिती ही अतिशय किचकट आणि गुंतागुंतीची प्रक्रिया. त्यात प्रचंड खर्च येतो, त्यामुळे त्याची भरपाई मिळणे निकडीचे बनते. ‘बीबीसी’सारख्या संकेतस्थळावर या लसनिर्मितीमुळे उल्हसित झालेल्या आफ्रिकी सर्वसामान्यांच्या आणि प्रतिष्ठितांच्या नुसत्या प्रतिक्रियांवर नजर टाकल्यास, त्यांच्यासाठी या लशीचे मोल सहज लक्षात येते. आफ्रिकेतील अनेक देशांच्या पिढ्या आता उभ्या राहतील आणि देशालाही उभे करतील, अशी अनेकांची समान भावना. मलेरिया प्रतिबंधक लस कशी लाखमोलाची आहे, आणि लशींच्या लाभापासून लाखो अजूनही कसे वंचित राहतात नि ठेवले जातात, हेच यानिमित्ताने अधोरेखित होते.