दीपावलीचे दृश्यवैभव!

दिवाळीचा खास मराठी ठेवा म्हणजे दिवाळी अंक. ‘मनोरंजन’च्या दिवाळी अंकापासून सुरू झालेली ही परंपरा झळाळून उठली ती दीनानाथ दलालांच्या ‘दीपावली’मुळे.

आपल्यात अंगभूतच असते सौंदर्यभान. दिवाळी फक्त नको तो भाग कातून ‘सौंदर्याची आस तुमच्यात आधीपासूनच आहे’ याची जाणीव देते.

आज दिवाळी अंकांच्या दर्जाबद्दल वाद होऊ शकतात हे खरेच, पण दिवाळी अंकांचे दृश्यरूप आणि त्यामागले तंत्र मात्र निर्विवाद पुढे गेले आहे.

दीपावलीच्या दृश्यसमृद्धीची रूपे अनेक. त्यात मराठी भाषकांचा दीपोत्सव तर देखणेपणा, नेटकेपणा, रंगांचा नेमका वापर, कलात्मक रचनांमध्ये नावीन्याची आस यांनी फुललेला. शेजारी देताना फराळाचे ताट कसे रचायचे, कधी तरी हौसेने विणलेल्या क्रोशाच्या रुमालानेच ते कसे झाकायचे येथपासून तर किल्ला कसा सजवायचा किंवा कंदिलासाठी कुठकुठल्या रंगांचे पतंगी कागद आणायचे याचा विचार करणाऱ्यांपर्यंत, प्रत्येक कुटुंबीयाच्या दृश्यजाणिवा जाग्या करणारा सण दिवाळीचा. मखराचा आणि देखाव्यांचा मान मराठी मुलखातला महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी राखीव; पण दिवाळी हा दृश्यभान देणारा उत्सव. हा प्रकाशाचा सण. पण प्रकाश एकटाच कसा चालेल? त्याला रंगांची साथ हवीच. रंगांना आकाराचे कोंदण हवेच. हे आकार जिथे असतात त्याला म्हणतात अवकाश. ही चित्रकलेची परिभाषा समजा कोणास माहीत नसली तरीसुद्धा पणत्यांच्या रांगेची पुनरावृत्ती, ठिपक्यांच्या रांगोळीतली समरूपता, कंदिलाचा समतोल यांचा संस्कार दिवाळी करतेच प्रत्येकावर. ‘दिवाळीपूर्वीची साफसफाई’ हा जो घरोघरीचा, एखाद्या रविवारच्या वामकुक्षीचे खोबरे करून टाकणारा कार्यक्रम असतो, ती दिवाळीच्या या मोफत आणि आपसूक चालणाऱ्या दृश्यकला-वर्गाची प्रवेश परीक्षा असते खरे तर. त्या शिल्पकाराची गोष्ट आठवते ना? ओबडधोबड फत्तरातून कमनीय सुंदर शिल्प कातून काढणाऱ्या त्या शिल्पकाराला लोक विचारतात- ‘‘अहो, तो खडक तर साधाच दिसत होता, काय जादू केलीत हो?’’ तेव्हा शिल्पकार उत्तरतो- ‘‘ते शिल्प त्या दगडात होतेच, मी फक्त नको तेवढा भाग कातून काढला!’’ – तसे काय ठेवायचे आणि काय काढून टाकायचे याचे भान येतेच घरातल्या प्रत्येकाला. जपानी भाषेत म्हणे यालाच ‘कैझान’ म्हणतात आणि चांगले जगण्याचा तो संस्कार मानतात. पण याला बाहेरून झालेला संस्कार तरी का म्हणावे? आपल्यात अंगभूतच असते सौंदर्यभान. दिवाळी फक्त नको तो भाग कातून काढते दरवर्षी, आणि ‘सौंदर्याची आस तुमच्यात आधीपासूनच आहे’ याची जाणीव देते.

अशा दिवाळीचा खास मराठी ठेवा म्हणजे दिवाळी अंक. ‘मनोरंजन’च्या दिवाळी अंकापासून सुरू झालेली ही परंपरा झळाळून उठली ती दीनानाथ दलालांच्या ‘दीपावली’मुळे. दलालांना छपाईच्या तांत्रिक अंगांचेही भान अचूक होते. कोणता रंग कसा छापला जाईल, तो किती आकर्षक दिसेल, याची जाण होती. त्यामुळे ‘दीपावली’चा अंक नेहमीच उठून दिसला. मुखपृष्ठासह दलालांची चार-पाच रंगीत चित्रे ही त्यातली पर्वणी. पण पुढे छपाईतंत्राचा विस्तार जसा झाला तसे आणखीही अनेक अंक सुंदर दिसू लागले. जॉन फर्नांडिस, के. बी. कुलकर्णी यांच्या स्त्रीचित्रांना अनेक अंकांच्या मुखपृष्ठांवर स्थान मिळाले. ‘सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यांत असते,’ अशा अर्थाचे एक इंग्रजी सुभाषित आहे. त्या वेळच्या मराठी रसिकांचे डोळे हे धडधडीत सुंदर दिसते आहे त्यालाच सुंदर समजणारे होते आणि त्या संकेताचा जराही भंग न करता ही मुखपृष्ठे सजलेली असत. तरीही त्याच काळात काही अंकांनी आणखी निराळी वाट चोखाळली. ‘सत्यकथा’, ‘ललित’, ‘आवाज’ हे दिवाळी अंक अशा निराळ्या वाटांचे अग्रदूत. ही तीन नावे एकत्र घेणे कुणाला धाष्ट्र्याचे वाटेल, पण दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांची चौकट मोडण्याचे श्रेय या तिघांना सारखेच. मधुकर पाटकरांच्या ‘आवाज’ने खिडकीचित्रांची कल्पना वापरून बाजी मारली. फ्रेंच कॉमेडीच्या प्रकारातला, अंगभूत कामुकतेला आवाहन करणारा, पण पाहणाऱ्याचीच खिल्ली उडवणारा विनोद या खिडकीचित्रांमधून मराठीत अवतरला. सत्तर-ऐंशीच्या दशकात ही खिडकीचित्रे चोरून पाहिलेले अनेक जण आज स्मरणरंजनाच्या वयात असतील आणि ‘सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या डोळ्यांत असते,’ की नाही कोण जाणे, पण ‘पाप पाहणाऱ्याच्याच मनात असते,’ हे मात्र त्यांना पटेल! ‘सत्यकथा’ १९८२ मध्ये बंद पडले, पण त्याआधीची दहा वर्षे र. कृ. जोशी यांनी या अंकासाठी जे काही काम केले, ते मराठीतल्या अक्षराधारित कलेच्या सीमारेषा रुंदावणारेच ठरले. आज आपण संगणकावर युनिकोड आज्ञावलीत मराठी टंकित करताना जो ‘मंगल’ नावाचा टंक म्हणजे फॉण्ट वापरतो, त्याचे जनक हे र. कृ. जोशी. थोर मराठी अक्षरकार. १९७३ मध्ये पवईच्या जंगलात असलेल्या आयआयटीच्या आवारातील दोनखणी जागा भारतीय भाषांच्या संगणकीकरणाचे प्रयोग करण्यासाठी मुक्रर झाली, तेव्हापासून रकृ तिथे जाऊन मराठीच्या नाना कळा शोधू लागले होते. टंक कसा हवा? तर कितीही लहान वा मोठा केला तरी त्याचा डौल कायमच राहील! फाऊंड्री उद्योगातले हे पथ्य रकृंनी संगणकात पाळले, टंक तयार केले आणि १९७४ च्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ केवळ स-त्य-क-था या चार अक्षरांचे लहानापासून मोठ्ठे होत जाणारे टंक वापरून सजवले. त्यात ‘क’ या अक्षराचे भुईनळ्यासारखे कारंजे झाले, ‘स’चा बाण सूं सूं सुटला आणि ‘था’चा पदन्यास तालात घुमू लागला, हा अनुभव खुद्द रकृंनी सांगितला, लिहून ठेवला आहे. दिवाळी अंकांच्या निमित्तानेच संगणकीय मराठी टंक पहिल्यांदा छापले गेले, हा इतिहास रकृंनी घडवला. याच रकृंनी पुढे १९७५ च्या ऐन आणीबाणीत, ‘काम करा, खूप करा, अधिक खूप करा… नेमाने करा, नेटाने करा, जोमाने करा…’ असे लांबलचक आज्ञावजा वाक्य लिहून तथाकथित अनुशासन पर्वाचे धिंडवडे काढले होते आणि रकृंच्या सुलेखनातले हे वाक्य लोकांनी वाचले कुठे? तर थेट ‘सत्यकथा’ दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर! वसंत सरवटे हे मराठीजनांची बौद्धिक उंची नेमकी ओळखणारे चित्रकार, तेही ‘ललित’ मासिकाच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठचित्रातून दरवर्षी काहीएक वैचारिक भाष्यच मांडत… व्यंगचित्राच्या स्वरूपातले हे भाष्य, चोखंदळ मराठी भाषकांना बरेच काही सांगून जाई. शहरीकरण, संगणकीकरण, माणसांचे एकसाचीकरण असे अनेक विषय सरवट्यांनी या मुखपृष्ठांमधून हाताळले, म्हणून तर ते वैचारिक भाष्य.

ही काही उदाहरणे केवळ वानगीदाखल. त्यापलीकडची किती तरी! बाळ ठाकूर, श्रीधर अंभोरे, प्रभाशंकर कवडी, आज अनेक पुस्तकांचे मुखपृष्ठकार असलेले चंद्रमोहन, धनंजय गोवर्धने ही नावे दिवाळी अंकांमुळेच तर घरोघरी पोहोचली. इलस्ट्रेशन किंवा बोधचित्रांचे महत्त्व स्वान्तसुखाय केलेल्या कलात्म चित्रांपेक्षा अजिबात कमी नसते, हे मराठीजनांच्या मनांवर दिवाळी अंकांनीच बिंबवले. याच्या जोडीने १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून संगणकीय ऑफसेट छपाईचे प्रगत तंत्र मराठीच्या कवेत आल्यामुळे आणखी एक नवा मार्ग दिवाळी अंकांना गवसला, तो म्हणजे प्रख्यात चित्रकारांची चित्रेच मुखपृष्ठावर छापण्याचा. ‘आपल्याला ती चित्रंबित्रं काही कळत नाहीबॉ’ म्हणणारे मराठीत भरपूर असणार, हे ओळखून सुरुवातीच्या काळात मुखपृष्ठावरल्या चित्राविषयी, चित्र समजावून सांगणारी टीप लिहिण्याचा प्रघात सुरू झाला. प्रभाकर बरवे, गोपाळराव अडिवरेकर यांच्या चित्रांना त्या काळात मुखपृष्ठांवर स्थान मिळाले. बरवे यांच्या चित्रात फळ, इमारत असे आकार तरी दिसायचे… पण अडिवरेकरांचे चित्र तद्दन अमूर्त! मग त्या चित्राबद्दल ‘खडकातील पाणी आणि पाण्यातील खडक’ असे समजावून सांगितले गेले होते! चित्रातूनही अशा वैचारिकतेचा आदर करणारे संपादक त्या काळाने अनुभवले. दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर नटीच्या छायाचित्राऐवजी ‘कोण’ गोपाळराव देऊस्करांचे अभिजात चित्र छापले म्हणून तक्रार करणाऱ्यास ‘देऊस्कर माहीत नसतील अंक घेऊ नका’ असे जाहीर सुनावणारे गोविंदराव तळवलकर हे त्याच काळातील. मराठीत दृश्यकलाविषयक लिखाण वाढले, लोक कलादालनांमध्ये सहज डोकावू लागले, दृश्यसाक्षरता थोडीफार वाढली, याची साक्ष आजचे अनेक दिवाळी अंक देतात. पण या दृश्यसाक्षरतेचे सिंचनसंवर्धन केले ते दिवाळी अंकांनीच.

दिवाळी अंकांतले तेव्हाचे मान्यवर हे खरोखरचे मान्यवर वाटत. दिवाळी सरल्यानंतर कधी तरी रद्दीच्या दुकानात मुद्दामहून रेंगाळणे व्हायचे. लायब्ररीतून आणलेल्या- वाचलेल्या दिवाळी अंकांपैकी आवडलेले अंक स्वस्तात मिळतात का, पाहायला! या आवडलेल्या अंकांमध्ये साहित्य तर असायचेच… पण चित्रेही असायची. आज दिवाळी अंकांच्या दर्जाबद्दल वाद होऊ शकतात हे खरेच, पण दिवाळी अंकांचे दृश्यरूप आणि त्यामागले तंत्र मात्र निर्विवाद पुढे गेले आहे. दिवाळीचे दृश्यवैभव वर्षागणिक वाढतेच आहे. त्याबरोबर वैचारिकतेचा अंधारही दूर व्हावा, इतकेच!!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Editorial page diwali festival dispute over quality of diwali numbers forms of visual enrichment akp

ताज्या बातम्या