सणाची सूरश्रीमंती!

णांत दिवाळीलाच हे असे स्वरांचे प्रदीर्घ कोंदण मिळाले त्याचे काय कारण असेल याचा कोणी तरी शोध घ्यायला हवा.

guru-pushya-nakshatra-before -diwali

रंग-गंध-चवी यांच्या जोडीला दिवाळीत सोहळा असतो प्रसन्न सुरांचा! या सुरांचे हिंदोळे ‘तेव्हा’पासून ‘आता’पर्यंत झुलताहेत; बदललो ते आपण…  

दिवाळीच्या प्रकाशात स्वरांचे हे चांदणे झिरपत राहणे हे खुशालीचे आणि सौंदर्यपूर्ण जगण्याचे आश्वासन देणारेच; पण ते स्वीकारण्याची उसंत हवी…

सर्व सणांत दिवाळीचे भाग्य असे की या सणास सुरांची साथ लाभली. हा एकमेव सण असा असेल की ज्याच्या पहिल्या दिवशी नरकचतुर्दशीस ‘आकाशवाणी’चे विशेष पहाट प्रक्षेपण सुरू होई. तेव्हा ‘आज दिवाळी’ ही आनंदभावना त्या वेळी अंथरुणातच ‘आकाशवाणी’वरून बिस्मिल्ला खान यांच्या सनई सुरातून जागी व्हायची, मग एखादे कीर्तन नरकासुराख्यानाचे पाल्हाळ लावणारे आणि नंतर आज विस्मृतीत गेलेल्या मालती पांडे, माणिक वर्मा यांची भावगीते किंवा कुमार गंधर्व-वाणी जयराम यांचे ‘उठी उठी गोपाळा’ ऐकत आंघोळ करून प्रसन्नचित्ते, नवे कपडे घालून ‘रांगोळ्यांनी सडे सजवले…’ पाहायची वेळ व्हायची!

संगीतातील आनंद हा असा जगण्यातले सगळे सौंदर्य एकवटून येतो. नेहमीच. पण दिवाळीच्या वातावरणात त्याचा गुणाकार होतो. संगीत माणसाला कशासाठी जगायचे हे शिकवते. दीपावलीतल्या पणतीच्या प्रकाशात ही जाणीव सर्वांगास होते. गंमत अशी की काही काही गाणी त्या वेळी हमखास दिवाळीच्या वातावरणात अधिक फुलायची. फुलतातही. खरे तर ‘प्रभात’चा ‘शेजारी’ चित्रपट दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीलाच झळकला. अशा संकटसमयीही मास्तर कृष्णराव यांनी लावलेली चाल आजही प्रत्येक दिवाळीत आळवली जाते. ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या!’ हे गीत आजही प्रत्येकाच्या मनाला उभारी देते आणि लाख दिव्यांच्या लखलखणाऱ्या तेजाची आरती ओवाळते. ‘आनंदून रंगून, विसरून देहभान, मोहरली सारी काया, हरपली मोहमाया, कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून एक होऊ या’… या गीताच्या पुढच्या कडव्यात व्यक्त झालेल्या या भावना तर प्रत्येकाच्या जगण्याशी जोडलेल्या. मराठी माणसाला ही अशी दिवाळी हवी असते आणि त्यासाठी तो वर्षभरातील तम सरण्याची वाट पाहत असतो. दिवाळीत या मांगल्यास स्वरांचे असे हिंदोळे मिळतात आणि त्यातून लक्ष दिवे उजळून येतात. दिवाळीचे हे सुख शब्दस्वरांत जसेच्या तसे पोहोचवण्याची किमया साधणाऱ्या कलावंतांनाही तो आनंद रसिकांपर्यंत पोहोचवण्याची आस असते. कदाचित दिवाळीच्या चार दिवसांत ही आस पुरी करून घेणे त्यांच्यासाठीही सोपे जात असणार. कारण हे चार दिवस फक्त आणि फक्त आनंदाचेच असा निग्रहच वातावरणात ठाम दिसतो.

सर्व सणांत दिवाळीलाच हे असे स्वरांचे प्रदीर्घ कोंदण मिळाले त्याचे काय कारण असेल याचा कोणी तरी शोध घ्यायला हवा. किती सण आहेत आपल्याकडे. काहींना गंध आहे, काहींना रंग आहे, काहींना तर सोबतीला गोंगाट आहे. पण दिवाळी मात्र या सर्वांस अपवाद. एरवी आपल्या सणांची सोबती असलेली कर्णकटू चर्मवाद्ये दिवाळीत कानावर आदळत नाहीत. या चार दिवसांत सारे कसे प्रसन्न. तेव्हा या दिवसांत हमखास ऐकायला मिळणारे एक गाणे म्हणजे ‘तम निशेचा सरला, अरुणकमल प्राचीवर फुलले, परिमळ या गगनी भरला’ हे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेले हे नाट्यगीत रामदास कामत यांच्यासारख्या कलावंताने असे काही रंगवले, की सारे स्वर उजळून मनाचा गाभारा स्वच्छ आणि निर्मळ होऊन जातो. त्यातील अभिजातता हा अभिषेकी बुवांचा खास गुण. ‘हे सुरांनो चंद्र व्हा, चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा’ या कुसुमाग्रजांच्या अप्रतिम कवितेचे गीतात रूपांतर करताना, त्यावर त्यांनी जो स्वरसंस्कार केला, त्याने त्या साऱ्या भावनांचे उन्मेष सहजपणे पोचले. दिवाळीच्या सणाला या स्वरसौंदर्याचे कोंदण देणाऱ्या या अभिजात कलावंतांना मानाचा मुजरा करताना, प्रत्येक रसिकाला त्यातून मिळणारी अपूर्वाई अधिक मोलाची ठरते. त्यामुळेच कुमार गंधर्वांसारख्या सौंदर्यपूजकाला मालकंस रागात ‘आज आनंद मना’ यासारखी बंदिश सादर करावीशी वाटते. भीमसेनजी मिया की तोडी रागात ‘एरी माई आज शुभमंगल गावो, शौक पुराओ, मृदुंग बजाओ, रिझावो’, असे गाऊन जातात. हा सारा स्वरसोहळा दिवाळीच्या आशादायी सणात आनंदाची भर घालतो आणि जगण्यातील आनंद वृद्धिंगत होऊ लागतो. ही दिवाळीची पुण्याई!

त्या वेळी या सगळ्याची एक अपूर्वाई असे कारण आकाशवाणी आणि गणपती उत्सव ही दोनच ठिकाणे सर्वसामान्यांचे संगीतभोज्जे! सहज हाती लागणारे. तेव्हा टेपरेकॉड्र्र्स अगदी मोजके होते आणि रेकॉर्ड प्लेअर्स तर दुर्मीळच. त्यामुळे दिवाळीतल्या ‘आकाशवाणी’च्या बहराकडे सर्वांचा कान असायचा. नंतर काळ्यापांढऱ्या का असेना, पण दूरदर्शनने आवाजाच्या या बैठकीस चलचित्राची जोड दिली. दिवाळीच्या निमित्ताने एखादे संगीत नाटक व्हायचे. गाण्यांची बैठक असायची, श्रीकांत मोघे-दया डोंगरे यांचा एखादा विशेष ‘गजरा’ माळला जायचा. या सर्वात आनंदाचा परमोच्च आविष्कार ठरली ती पुलंच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधली ‘रविवार सकाळ’. पूर्वी घरात काय पण इमारतीतही टीव्ही एखादा असायचा. पण त्याची आकर्षून घेण्याची ताकद इतकी होती की सारी इमारत त्या टीव्हीसमोर जमा व्हायची. आता घरोघरीच काय, पण घरातल्या दोन-तीन खोल्यांतही सर्रास टीव्ही आढळतात. पण त्यात ऐवज नाही. आकर्षून घेण्याची ताकद नाही. तेव्हा माणसे मनोरंजनासाठी दिवाळीच्या दिवसांत घरातून बाहेर जायला लागली.

म्हणून टीव्ही सपक होण्याचा आणि ‘दिवाळी पहाट’नामे खुळाने मूळ धरण्याचा काळ एकच. दिवाळीच्या मंगल वातावरणात भल्या पहाटे होणाऱ्या अशा ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांत सजूननटून जाण्याची ही कल्पना मराठी मनांना अधिक आकर्षक न वाटती तरच नवल. गेल्या दोन दशकांत हा सण घराघरांत साजरा होत असतानाच, त्याला सार्वजनिक पातळीवरही पोहोचता आले. एरवी हा सण कुटुंबाने साजरा होत असे. जगण्यातील गुंतागुंत वाढू लागली, अतिवेगाने मेंदू सुन्न होऊ लागला, अटीतटीच्या स्पर्धेमुळे मनावरचा ताण वाढू लागला आणि आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी यांच्यासमवेत अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची गरजही वाढू लागली. मोठ्या शहरांमध्ये अशा कार्यक्रमांना होऊ लागलेली गर्दी हे त्याचे निदर्शक. चांगलेचुंगले कपडे घालून सुरेल वातावरणात मिरवणे कोणाला नाही आवडणार? स्वर निकोप असतात. त्यांना स्वत:चा असा भाव नसतो. ते दुसऱ्या स्वराच्या सहवासातच संगीत निर्माण करू शकतात. दिवाळीच्या मांगल्याची स्वरात भिजणारी आठवण म्हणूनच हवीहवीशी. जगणे अभिजात व्हायला हवे असेल, तर त्यासाठी शब्दस्वरांचे लेणे अनुभवण्याची क्षमताही असायला हवी. प्रसन्न वातावरणात ही श्रीमंती वाढते. निदान तसा आभास तरी निर्माण होतो.

पण ही क्षमता कायमची अंगी बाळगून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत व्हायचे असेल तर ऐश्वर्य कधी मिरवायचे नसते ही सुसंस्कृतता लक्षात घ्यायला हवी. ही जाणीव ‘त्या’ दिवाळीला असायची. रंगांची, स्वरांची प्रकाशाची शालीन आकर्षकता आणि डोळे दिपवणारी, कान किटवणारी कर्कशता यातला हा फरक आहे. पुढे काळाच्या ओघात चकली/चिवडे, कलिंगड वगैरे जसे बारमाही ठरले तसेच संगीताचेही झाले. बाजारपेठेची गरज म्हणून अमाप पिकांची वाणे पेरली की गल्ला भरतोदेखील. पण बऱ्याचदा अशा पिकातले सत्त्व कमी झालेले असते. संगीताबाबत हे कळण्यासाठी ‘दिलखेचक’ आणि ‘हृदयस्पर्शी’ यातला भेद कळावा लागतो. फार अवघड नसते हे ओळखायला शिकणे. त्यासाठी मनास उसंत द्यावी लागते. दिवाळीच्या चार दिवसांत पूर्वी ती मिळायची. म्हणून दिवाळीच्या प्रकाशात स्वरांचे हे चांदणे झिरपत राहणे हे खुशालीचे आणि सौंदर्यपूर्ण जगण्याचे आश्वासन देणारे होते. दिवाळीची ही सांस्कृतिक श्रीमंती जपायला हवी.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Editorial page diwali festival diwali celebration all india radio bismillah khan sanai sura akp

Next Story
अर्थभयाचे आव्हान