ढोल-ताशांचा जोशही थंडावला, कार्यकर्त्यांचा राबता हरपला असे यंदाचे दुसरे वर्ष… पण सार्वजनिक गणेशोत्सवातील उत्साहाचे स्वरूप आधीच बदलू लागले होते…

एकेकाळी राजकीय-सामाजिक भान असलेला हा उत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांनी बहरला, पण तो बहरही ओसरून ‘ग्राहक’ आणि ‘इव्हेन्ट’ असे स्वरूप त्याला येऊ लागल्याचे दिसले…

…या चौकात संध्याकाळी भीमसेनांचे गाणे आहे, तर पलीकडच्याच चौकात गजानन वाटवे भावगीते सादर करत आहेत. शंभर पावलांवर ‘स्वातंत्र्याचा अर्थ’ या विषयावर कुणा विचारवंताचे भाषण सुरू आहे; तर कुठे देशापुढील आर्थिक प्रश्नांचा ऊहापोह करणारा विद्वानांचा परिसंवाद सुरू होत आहे. कुठे नामवंतांचे कविसंमेलन तर कुठे कथाकथन. कुठे कुठे जायचे, असा प्रश्न पडलेले सारे जण गणेशोत्सवाच्या काळात आपली वैचारिक आणि कलेची भूक भागवण्यासाठी अक्षरश: धावपळ करत असत. कोणत्या मंडळाच्या कार्यक्रमाला अधिक गर्दी झाली, यावरच त्या मंडळाचे यश अवलंबून असे. गणपतीचे दहा दिवस विचारवंत व कलावंत यांचे धावपळीचे असत. समाजासमोर जाण्याची ही संधी त्यांच्यासाठी अप्रूपाची असे. तेही आपली सगळी ताकद पणाला लावून या उत्सवात सहभागी होत. दिवाळी अंकांमध्ये लिहिण्याचे निमंत्रण मिळण्यापूर्वीच लेखनाला सुरुवात करणाऱ्या नामवंत लेखकांचा हा काळ. किती अंकांमध्ये हजेरी लावली, यावर यश मापण्याचे हे दिवस. गणेशोत्सवात निमंत्रणे किती, याला त्यामुळेच महत्त्व. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घरातल्या गणपतीचा सामाजिक उत्सव करण्याचे निमित्त संपले, तरीही सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी असे सार्वजनिक कार्यक्रम उत्सवाच्या निमित्ताने का होईना, घडत असत. या काळात होणारे हे वैचारिक आणि कलात्मक अभिसरण समाजाची उंची वाढवण्यास कणभर तरी साहाय्यभूत होत असे.

कोणताही उत्सव किंवा सण सार्वजनिक पातळीवर साजरा करण्याची खरेतर भारतीय परंपरा नाही. काही थोडे अपवाद वगळता, बव्हंशी सण खासगीरीत्या साजरे करण्यात आपल्याला अधिक रस असतो. एकमेकांना भेटण्यासाठी, कौटुंबिक जिव्हाळा टिकवण्यासाठी सण आणि उत्सव साजरे करण्याकडेच आपला खरा कल. गेल्या काही दशकांत मात्र प्रत्येक सण आणि उत्सव सार्वजनिक करण्याची नवी पद्धत रूढ झाली. तीच आपली परंपरा आहे, असेही मानले जाऊ लागले. आनंद उधाण आल्यासारखा साजरा करण्याची ही नवी रीत समाजमान्य झाली, परंतु त्यातील खरा आनंद मात्र विरत चालला आहे की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती निर्माण झाली. दिवाळीत आपण पहाटे उठून सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ लागलो. होळी किंवा दहीहंडी हे आता ‘इव्हेंट’ झाले. गणेशोत्सवही त्याच मार्गावर परिक्रमा करू लागला. घरातील गणपती रस्त्यावर येण्यामागे काही विशेष कारण होते. ब्रिटिशांच्या राजवटीत कोणत्याही कारणास्तव सार्वजनिक ठिकाणी जमा होण्यासाठी सरकारची परवानगी घ्यावी लागत असे. गणेशाच्या उत्सवात तशी परवानगी घेण्याची गरज भासत नसे. या सोयीचा उपयोग करत गणेशोत्सव सार्वजनिक झाला. लोकमान्य टिळकांनी त्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यातून स्वातंत्र्यलढ्याचे स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न केला. त्याला आता सव्वाशेहून अधिक वर्षे झाली. आता हा उत्सव नुसताच सार्वजनिक राहिला आहे आणि त्याचा मूळ हेतू हळूहळू संपुष्टात येत आहे. काळानुरूप होत आलेला समाजरचनेतील बदल आणि जगण्यातील गुंतागुंत हे त्याचे कारण.

गणपती ही विद्येची आणि कलेची देवता. ‘त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वमसि’ ‘त्वं साक्षादात्मासिनित्यम्’, ‘त्वमेव खल्विदं ब्रह्मासि’  ही अथर्वशीर्षातील वचने  या देवतेची ओळख सांगतात. या दैवताची आराधना विचारांनी व त्याच्या अन्वयार्थाने करायची असते. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंतचे दिवस या देवतेची पूजा कलाराधनेने आणि विचारमंथनाने व्हावी, असा या उत्सवाचा मूळ हेतू. स्वातंत्र्याच्या लढ्यात लोकांना मिळवण्यासाठी या हेतूंचा पुरेपूर उपयोग केला गेला. नंतरच्या काळात या उत्सवाने सामाजिक घुसळण होण्यास मोठी मदत केली. गणपतीपुढे केवळ अभिजात संगीत किंवा भक्तिसंगीत सादर करायचे असते, छचोर गीतांना तिथे अजिबात स्थान नसते, असा दंडक पाळला जाण्याचा काळ सरला. प्रत्येक घटनेचे ‘इव्हेंट’मध्ये रूपांतर करणारी नवी संस्कृती आली. करमणूक अधिक मोलाची झाली आणि गणेशाचाही ‘फेस्टिवल’ झाला. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात प्रभात फेऱ्या, मेळे होत. त्यामध्ये हिरिरीने सहभागी होणे, हे राष्ट्रभक्तीचे द्योतक असे. काळ सरला, आवडी बदलल्या, आनंदाची ठिकाणेही बदलली. बदल हा जगण्याचा अविभाज्य भाग. चित्रवाणी वाहिन्या आल्यावर स्वाभाविकच कलावंत, विचारवंत आता गणेशोत्सवाची वाट पाहीनासे झाले. कुणा राजकीय कार्यकत्र्याने वा नेत्याने त्याच्या मतदारांसाठी काही कार्यक्रम ठेवले, तर कधीतरी मिळणारे निमंत्रण ही पर्वणी. केवळ गणेशोत्सवासाठी तयार केली जाणारी आणि लोकप्रिय होणाऱ्या गाण्यांची आठवण काढली, तरी गंमत वाटावी. अलीकडले ‘कोलावेरी’चे रीमिक्स असो की ‘शांताबाई’ उत्सवी दंग्यात या गाण्यांना मागणी प्रचंड. सर्वेजनांच्या आवडी त्यातून बदलत गेल्या आणि गणेशोत्सवाची आरासदेखील.

मंडळांचे देखावे, त्यातील सामाजिक आशय, त्या कळसूत्री बाहुल्या, इतिहासातील अनेक प्रसंगांचे पुतळ्यांच्या साह्याने होणारे दर्शन, त्यातील वैविध्य, कलात्मकता आणि कलेकडे पाहण्याची नजर यावरून मंडळाचा ‘दर्जा’ ठरत असे. सजावटकारांसाठी ते आव्हानात्मक असे. वर्गणी गोळा करून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या मनाला सौंदर्याचा स्पर्श करणारे देखावे सादर करण्यासाठी वर्षभर तयारी करणारी मंडळे हळूहळू कंत्राटी होऊ लागली. सजावटीचे कंत्राटदार निर्माण झाले. त्यामुळे तोच तो देखावा एका शहरातून पुढच्या वर्षी दुसऱ्या गावी दिसू लागला. याच काळात देखावे सादर करण्याऐवजी केवळ दिव्यांची आरास करण्याची टूम आली. मग ‘डान्सिंग बल्ब’ आले. गाण्यावर नाचणारी ही रोषणाई नवलाची झाली. तंत्रज्ञानाच्या या ‘अचाट’ सामथ्र्याने भाविक दीपूनही जाऊ लागले. देखाव्यांऐवजी हे तुलनेने सोपे आणि कंत्राटी. पण तरीही मंडळाच्या कार्यकर्त्यांची हौस फिटत नव्हतीच. त्यातून मग जिवंत देखाव्यांना सुरुवात झाली. मंडळाचेच कार्यकर्ते ध्वनिमुद्रित केलेल्या  संवादांवर अभिनय करू लागले. ही नवलाई आकर्षक तर खरीच. गणेशोत्सव मंडळांमध्ये त्यामुळे आपोआप स्पर्धा सुरू झाली. हा सगळा कलेचा व्यवहार कलावंतांसाठी, तंत्रज्ञांसाठी अर्थार्जनाचा. त्यामुळे नावीन्याचा शोध घेत सतत काही नवे देण्याचा प्रयत्न करणाऱ्या कलावंतांमध्येही स्पर्धेचे वातावरण निर्माण होऊ लागले. वर्गणीतून हा सगळा व्यवहार पूर्ण होणे जवळजवळ दुरापास्त होऊ लागले. परिणामी उत्सवातील गर्दी ‘ग्राहक ’ बनली. जाहिरातींचे मोठमोठे फलक उत्सवात जोर धरू लागले. मंडळाचा मांडव जाहिरात फलकांनीच भरू लागला. मंडळाच्या नावापेक्षा आणि  बुद्धिदात्याच्या मूर्तीपेक्षा या जाहिरातींचाच तोरा वाढू लागला.

आता गणेशोत्सव हा आर्थिक व्यवहाराचे एक मोठे केंद्र बनला. मूर्तिकारांपासून ते फुगे विकणाऱ्यांपर्यंत आणि देखावे तयार करणाऱ्या सजावटकारांपासून ते गर्दीत शेंगदाणे विकणाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला या उत्सवातून काही लाभ होऊ लागला. गर्दी वाढत जाणे ही त्यासाठीची प्राथमिक गरज आणि ‘देखावे बघण्याचे वय’ निघून जाता कामा नये, ही आवश्यकता. घरातील गणपतीची साग्रसंगीत पूजाअर्चा आता गुरुजींच्या ध्वनिमुद्रित आदेशांनुसार होऊ लागली. आरत्यांचे संग्रह खपू लागले. तरीही त्या वाचून म्हणण्याची हिंमत हळूहळू हरवत गेली. आरत्या ध्वनिमुद्रित होऊन उपलब्ध होऊ लागल्या आणि भाविकांना फक्त टाळ्या वाजवण्याचे काम राहिले. उत्सवातला उत्साह असा हळूहळू  पालटत असताना, त्यातील सत्त्व टिकले की नाही असा प्रश्न अनेकांना पडत असताना गेल्या दोन वर्षांत तर ढोल-ताशांचा जोशही थंडावला, कार्यकर्त्यांचा राबता हरपला.  यंदाचे वर्ष अशाच वातावरणात जाणार, हे खरे. मात्र  येणारा काळ असा ग्रासलेला नसावा, उत्साहाला नवे धुमारे फुटावे आणि समाज आणि संस्कृतीचे भानही उत्सवाला पुन्हा यावे, यासाठीच्या तयारीची संधीच गेल्या दोन वर्षांच्या  कुंठितावस्थेने दिली आहे, असे का मानू नये?