scorecardresearch

अग्रलेख : तरुणही न इतुके..

कुष्ठरोग्यांसाठी छातीचा कोट करून उभे राहिलेल्या बाबा आमटे यांच्याबाबतीतही हेच घडले.

अग्रलेख : तरुणही न इतुके..

भारतीय संस्कृती जसा वयाचा मान राखते, तसेच आपण बाजूला होऊन पुढच्या पिढीला, तिच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी वानप्रस्थाश्रमही याच संस्कृतीत आहे..

नव्याने जग बदलू पाहणाऱ्या तरुण रक्ताला संस्थात्मक जीवनात वाव मिळणे हे त्या संस्थेलाच सळसळते चैतन्य मिळवून देणारे ठरू शकते..

भारतीय परंपरेने ज्ञानाबरोबरच वयाचाही आदर केलेला आहे. चेहऱ्यावर चार सुरकुत्या जास्त दिसायला लागल्या, केस काळय़ाचे पांढरे झाले, बरोबरच्या माणसांपेक्षा चार पावसाळे जास्त बघितल्याचे उल्लेख त्या माणसाच्या बोलण्यात कळत नकळत यायला लागले की आपोआपच त्याला जास्त मान दिला जायला लागतो. चार गोष्टींत त्याचा सल्ला विचारला जायला लागतो. त्याच्या शब्दाला वजन येते. त्याचा अनुभव इतरांना मार्गदर्शक ठरायला लागतो. आशीर्वादासाठी लहान पोरेसोरे त्याच्या पायावर घातली जातात. त्याने पाहिलेल्या हजारभर पौर्णिमांचे कौतुक म्हणून सहस्रचंद्रदर्शन सोहळे साजरे होतात. वयाचा, अनुभवाचा, त्यामधून येणाऱ्या शहाणिवेचा आदर करण्याची ही एक रीत आहे. आपल्या आसपास घरादारांमध्ये ही परिस्थिती असेल तर सामाजिक पातळीवर वावर असलेल्या, चार चळवळी चालवलेल्या, चार संस्था उभ्या केलेल्या आणि आता वय झालेल्या माणसांबद्दल तर समाजामध्ये किती आदर असेल ते वेगळे सांगायला नको. खरे तर वय हा अशा माणसांच्या नावापुढचा फक्त आकडा असतो. त्यांची तडफ, शारीरिक- मानसिक क्षमता त्या आकडय़ालाही लाजवणाऱ्या असतात. महाराष्ट्राच्या सामाजिक वर्तुळात वावरणाऱ्या अशा किती तरी व्यक्तींसंदर्भात हे लागू पडण्यासारखे आहे. पण या सगळय़ांच्या बाबतीत एक ‘पण..’ही लागू पडतो. अशा व्यक्तींनी उभ्या केलेल्या अफाट कामाबद्दल चर्चा होताना या ‘पण’बद्दलदेखील चर्चा होणे आवश्यक आहे.

पुण्यात ‘हमाल पंचायत’सारखे अद्वितीय काम उभारणारे, १९७०-८० च्या दशकात कुणाच्या गावीदेखील नसताना रिक्षावाल्यांचे संघटन उभारणारे, ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ, ‘कष्टाची भाकर’सारखा आगळावेगळा उपक्रम चालवणारे बाबा आढाव हे अशा व्यक्तींपैकी एक. नसानसांत पुरोगामी विचार घेऊन जगणारे बाबा आढाव हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व आहे. पुण्यातील अनेक सामाजिक चळवळी, उपक्रम यांचे ते आधारवड राहिले आहेत. बाबांची नुकतीच म्हणजे त्यांच्या वयाच्या ९२ व्या वर्षी हमाल पंचायतीच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. गेली ६० वर्षे ते या संघटनेच्या अध्यक्षपदी आहेत. वयाच्या ९२ व्या वर्षीदेखील अशा पद्धतीने कार्यरत राहण्याची ऊर्जा असणे ही अफाट गोष्ट खरीच, पण एखाद्या व्यक्तीने एखाद्या संस्थेच्या अध्यक्षपदी साठेक वर्षे राहणे हे कितपत सयुक्तिक आहे? ही निवड लोकशाही पद्धतीने झालेली असते हे खरे असले तरी मुळात एकाच व्यक्तीने एकाच पदावर ६० वर्षे असणे हेच लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांशी विसंगत ठरणारे नाही का? घरातला तरणाबांड मुलगा कौटुंबिक व्यवसायात शिरला की बापलेकांचे खटके सुरू होतात. घरात नवीन सून आली की सासू- सुनांच्या धुसफुशी सुरू होतात. या सगळय़ामागे कारण एकच असते, ते म्हणजे बिघडलेला सत्ता समतोल. तरुण रक्ताला त्याच्या काळाप्रमाणे नवे काही करायचे असते आणि घरातल्या ढुढ्ढाचार्याना असे बदल अजिबातच नको असतात. त्या त्या व्यक्तींच्या प्रभावक्षमतेनुसार तिथे गोष्टी घडतात. हे असे कौटुंबिक पातळीवर चालू शकते. पण एक निश्चित विचार घेऊन उभ्या असलेल्या संस्थेच्या पातळीवर नेतृत्वबदल साठ साठ वर्षे होणारच नाही हे कसे चालावे? आणि चालावे तरी का? आपण लावलेले रोपटे फोफावताना पाहणे अतीव समाधानाचे असले तरी त्या वृक्षाच्या वाढीची, त्याची निगा राखण्याची जबाबदारी वेळीच पुढच्या पिढीकडे का दिली जाऊ नये? ही जबाबदारी सांभाळणारी पुढची फळी उभारण्याची तसदी वेळीच का घेऊ नये?

कुष्ठरोग्यांसाठी छातीचा कोट करून उभे राहिलेल्या बाबा आमटे यांच्याबाबतीतही हेच घडले. त्यामुळे त्यांचे कार्य हा आज त्यांच्या पुढच्या पिढीचा कौटुंबिक उद्योग होऊन बसला आहे. सामाजिक कामांबाबत असे कसे होऊ शकते? एके काळी सामाजिक अभिसरण घडवून आणणाऱ्या, वर्गमुक्त, जातीमुक्त नवसमाजाचे स्वप्न पाहणाऱ्या, नावातच ‘युवक’ असलेल्या युक्रांद अर्थात युवक क्रांती दल या साठच्या दशकात पुण्यातील तरुण-तरुणींनी उभारलेल्या चळवळीचे अध्यक्ष आजही तिचे संस्थापक ८० वर्षांचे कुमार सप्तर्षी हेच आहेत. एके काळी युवकांनी सुरू केलेल्या चळवळीचे अध्यक्ष तिचे आज वयोवृद्ध झालेले संस्थापकच असणार असतील, तर काही तरी चुकते आहे असे नाही का? एके काळी दबदबा निर्माण करणारी ही चळवळ खुंटली, तिची वाढच झाली नाही की ती केवळ त्या काळाचे अपत्य होती? तसे असेल तर ती आज नावाला तरी का आहे? आणखी एक उदाहरण राष्ट्र सेवा दलाचे. स्वातंत्र्यासाठी लढणारे तरुण घडवणे, त्यांच्यामध्ये समाजवादी विचार रुजवणे या उद्देशाने एके काळी साने गुरुजींच्या प्रेरणेतून तरुणांसाठी सुरू झालेल्या राष्ट्र सेवा दल या संघटनेच्या अध्यक्षपदी सत्तरीमधले डॉ. गणेश देवी आहेत. तिथे एखादा तरुण का असू शकत नाही? 

अर्थात ही ठळकपणे समोर असलेली उदाहरणे. ती तेवढीच नाहीत, अशी आणखीही नावे देता येतील. मुद्दा या कुणाचाही अनादर करण्याचा नाही. या सगळय़ाच मंडळींनी आपापल्या क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्याबद्दल उभ्या महाराष्ट्राला अतीव आदरच आहे. पण भारतीय संस्कृतीमध्ये जसा वयाचा मान सांगितला आहे, तसाच वानप्रस्थाश्रमही सांगितला आहे. आपण बाजूला होऊन पुढच्या पिढीला, तिच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठीच तो विचार आहे. आजच्या काळासंदर्भात तो आपण बाजूला होणे आणि नवा विचार येऊ देणे या अर्थाने घेता येऊ शकतो. दर पाच वर्षांनी पिढी बदलते, असे एके काळी मानले जात असे. आता ती दर दोन वर्षांनी बदलते असे मानले जाते. तंत्रज्ञान तर त्यापेक्षा किती तरी पट वेगाने बदलते आहे. आणि ते नुसतेच बदलत नसून जीवनाच्या सगळय़ा क्षेत्रांना कवेत घेते आहे. एके काळी फायली चाळाव्या लागत असत. आज हातातल्या मोबाइलवरून कामाचा ढीग उपसला जातो. असे बदल जाणणाऱ्या, ते आत्मसात करून अमलात आणणाऱ्या, नव्याने जग बदलू पाहणाऱ्या तरुण रक्ताला संस्थात्मक जीवनात वाव मिळणे हे त्या संस्थेलाच सळसळते चैतन्य मिळवून देणारे ठरू शकते. हा विचार फक्त सामाजिकच नाही तर राजकारण, साहित्य, उद्योग अशा सगळय़ाच क्षेत्रांना लागू होणारा आहे. पण एके काळचे ‘कार्यकर्त्यांचे मोहोळ’ असलेल्या महाराष्ट्राचे वेगवेगळय़ा प्रश्नांवर काम करणाऱ्या सामाजिक संघटना हे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. ते टिकायला हवे असेल तर त्यातील अशा गोष्टींवर चर्चा व्हायला हवी.

कोणत्याही सामाजिक प्रश्नांवर भारतीयांना गांधींना वगळून पुढे जाताच येत नाही, तसेच इथेदेखील आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस हा पक्ष विसर्जित करा असे सांगणाऱ्या गांधीजींना काँग्रेसचे सर्वेसर्वा होता आलेच असते. पंतप्रधानपद, राष्ट्रपतीपद असे हवे ते सर्वोच्च पद विनासायास घेता आले असते. पण यातले काहीच न करता ते नोआखलीत दंगलग्रस्तांचे अश्रू पुसायला निघून गेले, हा इतिहास फार जुना नाही, फक्त ७५ वर्षांपूर्वीचा आहे.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2022 at 00:09 IST

संबंधित बातम्या