scorecardresearch

आजचा अग्रलेख : भाषावैविध्याची बोली…

एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे, काळाबरोबर सतत बदलणारे, चैतन्यशील, जिवंत, रसरशीत असे सांस्कृतिक संचित आहे. जगाच्या तुलनेत आपल्या वाट्याला तर या संचिताचा चांगलाच घसघशीत वाटा आलेला आहे.

आजचा अग्रलेख : भाषावैविध्याची बोली…

आसामी कवी नीलमणी फुकन आणि कोंकणी लेखक दामोदर मावजो हे ‘ज्ञानपीठ’चे मानकरी ठरल्याने, लिपी नसूनही भाषा जिवंत राहू शकते याचा प्रत्यय आला!

…आपल्या भाषावैविध्यापुढील प्रश्न दोन : पहिला अनुवादांचा आणि दुसरा, शहरीकरणाच्या रेट्यापुढे अभिव्यक्ती खुंटल्याचा…

आश्चर्यचकित व्हायला लावणारे भाषिक वैविध्य असलेल्या आपल्या देशात दरवर्षी दिला जाणारा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ हा एक भाषिक सोहळाच. यंदाच्या या सोहळ्याचे उत्सवमूर्ती आहेत आसामी कवी नीलमणी फुकन आणि कोंकणी लेखक दामोदर मावजो. या दोघांच्याही ज्ञानपीठ पुरस्काराच्या निमित्ताने कथा, कविता आणि कादंबरी या तिन्ही साहित्य प्रकारांचा गौरव झाला आहे. या दोन्हींमधली कोंकणी ही त्यातल्या त्यात मराठीला जवळची. भौगोलिकदृष्ट्या तर ती जवळची आहेच शिवाय कोंकणी भाषा सहसा लिहिली जाते ती मराठीसारख्या देवनागरी लिपीतच. आसामी भाषेचेही तसेच आहे. तिला स्वत:ची लिपी नाही. त्यामुळे ती लिहिली जाते बंगाली लिपीमध्ये. म्हणजे यंदा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या या दोन्ही भाषांना स्वत:ची अशी लिपीच नाही. लिपी हे खरे तर भाषेचे शरीर मानले जाते. पण ती नसली तरीही त्या ‘भाषा’ आहेत एवढेच नाही; तर ज्ञानपीठ मिळवण्याच्या तोडीची जिवंत, रसरशीत साहित्यनिर्मिती या भाषांमधून होते आहे. या वेळच्या ज्ञानपीठ पुरस्कारांमधले हे एवढे एकच वैशिष्ट्य लक्षात घेतले तरी भारत देश नावाच्या अजब रसायनाच्या वेगवेगळ्या पैलूंकडे दिङ्मूढ होऊन पुन:पुन्हा का पाहावेसे वाटते ते लक्षात येते. आपल्या राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीने एकूण २२ (आणि राज्यघटनेचा पहिला मसुदा ज्या भाषेत झाला ती इंग्रजी २३ वी) भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता दिली असली तरी आपल्या देशात २००१ च्या जनगणनेमधील आकडेवारीनुसार १२२ मुख्य आणि १५९९ इतर भाषा बोलल्या जातात. यातल्या कित्येक भाषांना अर्थातच लिपी नाही. मौखिक परंपरेत त्यांनी आपले अस्तित्व टिकवून धरले आणि मुद्रणाचा शोध लागल्यानंतर त्या त्या परिसरातील प्रबळ भाषेच्या लिपीचा आधार घेतला. अर्थात एखाद्या भाषेला लिपी आहे किंवा नाही या मुद्द्यापेक्षा ती भाषा आहे हेच केवढे मोठे संचित. आणि त्याबाबतीत खरे तर आपल्या श्रीमंतीची जगात कुणाशीच तुलना होऊ शकत नाही अशी परिस्थिती. कारण एक एक भाषा म्हणजे एक एक संस्कृती. दगडांची शस्त्रे करून त्याआधारे शिकार करत आपली उपजीविका करणाऱ्या आदिमानवाच्या काळात खाणाखुणांच्या माध्यमातून साधल्या जाणाऱ्या संवादापासून सुरू झालेला भाषेचा प्रवास आज जगभरातल्या मिळून हजारो भाषांपर्यंत येऊन पोहोचला आहे. तेही फक्त मौखिक भाषेच्या स्वरूपात नाही तर प्रत्येक भाषेची लिपी, तिचे व्याकरण, तिचे शब्दोच्चार, तिच्यामध्ये होणारी सर्व प्रकारची साहित्यनिर्मिती, प्रत्येक भाषेच्या विविध बोली ही सगळी मानवी मेंदूची निव्वळ कमाल आहे. कोणत्याही भाषेत साहित्यनिर्मिती नेमकी कधी सुरू झाली त्याचा टप्पा सांगता येतो. त्याहीआधी त्या भाषांचा नेमका उगम कसा झाला, त्या कशा विकसित झाल्या, कशा बदलत गेल्या, एखादी भाषा मृत का झाली, एखाद्या भाषेचे महत्त्व का कमी झाले आणि एखादीचे का वाढले याचे अभ्यासातून आडाखे मांडले जातात; पण तरीही हजारो वर्षे बोलल्या जात असलेल्या अनेक भाषांचा हा प्रवाह अचंबितच करणारा ठरतो. कोणतीही भाषा कुणा एकाची नाही, ती बोलणाऱ्या समूहाची तर ती आहेच; पण म्हटले तर पुन्हा ती त्या समूहातल्या प्रत्येकाची आहे. त्यामुळेच प्रत्येक भाषा म्हणजे हजारो वर्षे चालत आलेले, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारे, काळाबरोबर सतत बदलणारे, चैतन्यशील, जिवंत, रसरशीत असे सांस्कृतिक संचित आहे. जगाच्या तुलनेत आपल्या वाट्याला तर या संचिताचा चांगलाच घसघशीत वाटा आलेला आहे. पण आपण त्याचे काय केले आहे?   

यंदाच्या ज्ञानपीठ विजेत्या नीलमणी फुकन आणि दामोदर मावजो या साहित्यिकांचेच उदाहरण समोर आहे. त्यांनी केलेले लेखन, त्याचे वैशिष्ट्य याची माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे. त्यापलीकडे त्यांच्याबद्दल त्या भाषांपलीकडे फारशी कुणालाच माहिती नसते की त्यांचे लेखन फारसे वाचले गेलेले नसते. कारण आपले भाषिक वैविध्य हे जसे आपले सामर्थ्य आहे तशीच ती आपली मर्यादाही आहे. जुजबी इंग्रजी बोलू शकणारा एखादा भारतीय माणूस युरोप- अमेरिकेत सहज वावरून येऊ शकतो, पण तो शेजारच्याच कर्नाटक किंवा अगदी गुजरातमध्येदेखील ठार अक्षरशत्रू ठरतो. काही प्रमाणात उत्तर भारत वगळला तर दक्षिणेकडच्या तसेच पूर्वेकडच्या राज्यांमध्ये जायचे झाल्यास तिथली भाषा न समजणे ही एक समस्याच होऊन बसते. त्यामुळे नोबेल आणि तत्सम मोठमोठे पुरस्कार मिळवणारे जगभरामधले लेखक अनेकांना माहीत असतात, त्यांची इंग्रजीमधली पुस्तकेही वाचलेली असतात, पण ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या आपल्या शेजारच्या राज्यामधल्या साहित्यिकाचे लेखन अनुवाद झाल्याशिवाय आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. दुसरीकडे जागतिक पुरस्कारांच्या तोडीची निर्मिती करणारे किती तरी साहित्यिक अगदी प्रत्येक भारतीय प्रादेशिक भाषेत होऊन गेले आहेत, आजही आहेत; पण ते जगापर्यंत पोहोचू शकत नाहीत. अर्थात तो वेगळ्या चर्चेचा विषय आहे. मुद्दा इतकाच की पिढ्यान्पिढ्यांच्या वारशाच्या रूपात आपल्यापर्यंत आलेल्या आपल्या भाषासंचिताचे यापुढील काळातील प्राक्तन काय आहे?

इंग्रजीच्या आक्रमणामुळे सगळ्याच भारतीय भाषांचे काय झाले ते वेगळे सांगायची गरज नाही. जागतिकीकरणाच्या सुरुवातीच्या रेट्यातील सांस्कृतिक सपाटीकरणाला चित्रवाणी माध्यमाच्या विस्तारीकरणाने आणखी हातभार लावला आहे. त्यामुळे इंग्रजीबरोबर हिंदीही तेवढ्याच प्रमाणात लादली गेली आहे. त्यात शहरीकरणाचा वाढता रेटा सगळ्याच प्रादेशिक वैशिष्ट्यांवर जणू काही वरवंटा फिरवताना दिसतो आहे. त्यातून भाषिक अभिव्यक्ती तरी कशी सुटणार? वेगवेगळे प्रादेशिक समूह, वेगवेगळ्या जाती-जमाती या सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाषांचे, त्यांच्या बोलींचे उद्या काय होणार याबाबतची धोक्याची घंटा भाषातज्ज्ञ सतत वाजवताना दिसत आहेत. पण तरीही त्यातल्या त्यात आशादायी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टींचे प्रमाणीकरण हवे असले तरी त्याचबरोबर सगळ्याच अस्मिताही टोकदार ठेवायच्या आहेत. तिथेही भाषा अपवाद नाही. खरा प्रश्न या कात्रीतून सुटायचे कसे हा आहे. पुढच्या काळात कदाचित तंत्रज्ञानाचीच त्यासाठी मोठी मदत होईल. ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’मुळे नजीकच्या काळात कदाचित एखाद्या डिव्हाइसमुळे एकमेकांची भाषा ठार न येणारी दोन माणसे एकमेकांशी विनासायास उत्तम संवाद साधू शकतील असेही वर्तवले जात आहे. त्यामुळे आपापल्या भाषा जपत कदाचित ‘हे विश्वचि माझे घर’ होऊ शकेलही. कारण सामान्य माणसाचे त्याच्या भाषेवर प्रेम असतेच. त्याच्या भाषेसाठी तो रस्त्यावरही उतरतो, हे इतिहास सांगतो. प्रश्न आहे हे सगळे राजकारण्यांना कसे कळणार याचा. हिमाचल प्रदेशातील एका भाषेत बर्फ या शब्दासाठी ९० च्या आसपास समानार्थी शब्द आहेत असे सांगितले जाते. तसे कदाचित राजस्थानात ऊन किंवा वाळवंट या शब्दासाठी असेल, पूर्वेकडील राज्यांमध्ये सूर्यासाठी असेल. कोकणात प्रत्येक नक्षत्रातल्या पावसासाठी आहेतच स्थानिक शब्द; तसे दाक्षिणात्य भाषांत आणखी कशासाठी असतील. अशी सगळी भाषिक श्रीमंती आपल्याला वारसाहक्काने मिळालेली असताना ‘एक देश, एक भाषा’ असा आग्रह धरण्यापेक्षा भाषासंचिताचे भोई होण्यातच जास्त धन्यता आहे हे त्यांना कुणी तरी सांगायला हवे. ‘ज्ञानपीठ’ने लिपी नसलेल्या भाषांतील साहित्याचा सन्मान करून, भाषावैविध्याचा आवाज बुलंद केला आहे. त्या आवाजाची बोली आपण ऐकायला हवी.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या