इंग्लंडची राणी हयात असताना तिच्यावर ४० भागांची वेबमालिका निघते आणि त्यात राजघराण्याचे, राणीसह त्यातल्या व्यक्तींचे यथोचित वाभाडे काढले जातात, हे धाडसच…

…पण प्रेक्षक मिळवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या मालिकांप्रमाणे ही मालिका नव्हती, म्हणून सात पुरस्कारांचा पराक्रम तिने नोंदवला!

१३ नामांकने मिळवणाऱ्या अ‍ॅपल टीव्ही प्लसच्या ‘टेड लासो’ या वेबमालिकेला मागे टाकत ‘द क्राऊन’ या नेटफ्लिक्सवरच्या वेबमालिकेने यंदा सात सात एमी पुरस्कार पटकावून छोट्या पडद्यावरच्या मनोरंजन विश्वात आजच्या घडीला तरी ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाणेच खणखणीत वाजत असल्याची ग्वाही दिली आहे. अमेरिकेतील एका स्थानिक महाविद्यालयातील टेड लासो या फुटबॉल प्रशिक्षकाला एका ब्रिटिश फुटबॉल टीमला प्रशिक्षण देण्याचे काम मिळते या कथानकावर आधारित असलेल्या ‘टेड लासो’ या मालिकेला बरेच अमेरिकी पुरस्कार मिळाले असले तरी टेलिव्हिजन क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणाऱ्या एमी पुरस्कारांमध्ये मात्र ‘द क्राऊन’ने बाजी मारल्यामुळे अभिजाततेने लोकप्रियतेवर मात केली, असे म्हणायला वाव आहे. इडियट बॉक्स म्हणून एके काळी हिणवल्या जाणाऱ्या टीव्हीच्या खोक्याने आसपासच्या गल्ल्यांपासून जगभराचे विश्व किती प्रचंड प्रमाणात व्यापले आहे, हे नीट समजून घ्यायचे असेल तर एमी पुरस्कार हे चांगलेच निमित्त ठरू शकते. एमी, ग्रॅमी, अ‍ॅकॅडमी आणि टोनी हे अमेरिकेत दिले जाणारे मनोरंजन विश्वासाठीचे चार प्रमुख पुरस्कार प्रामुख्याने टीव्ही, संगीत, सिनेमा आणि नाटकासाठी दिले जातात. त्यापैकी टीव्हीवरील कार्यक्रमांसाठी एमी पुरस्कार द्यायला लॉस एंजलिसमधल्या अ‍ॅकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस म्हणजेच ‘आटास’ने जानेवारी १९४९ रोजी सुरुवात केली. आपल्याकडे तेव्हा अजून टीव्ही आलेलाही नव्हता. १९७० मध्ये एमीने आंतरराष्ट्रीय टीव्ही कार्यक्रमांसाठी पुरस्कार द्यायला सुरुवात केली. साधारण १९८० मध्ये केबल टीव्हीची सुरुवात झाली तेव्हा एमीने केबलवरील कार्यक्रमांचीही दखल घेतली. अँटेना आणि केबल जाऊन इंटरनेटच्या माध्यमातून टीव्ही अधिक स्मार्ट होत गेला, मोबाइलद्वारे तळहातावरही आला, हा बदलही एमीने स्वीकारला आणि वाखाणला. त्याचे दृश्यरूप म्हणजे २०१३ मध्ये नेटफ्लिक्सवरच्या ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ला मिळालेले एमी पुरस्कार. या मालिकेचे आत्तापर्यंत सहा सीझन आणि ७३ भाग प्रदर्शित झाले आहेत. तिला एकूण २७ एमी पुरस्कार मिळाले आहेत. तेव्हापासून आजपर्यंत नेटफ्लिक्स या ऑनलाइन ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या कार्यक्रमांना मिळून एकूण ४४  एमी पुरस्कार मिळाले असून ‘द क्राऊन’ त्यात रगेली चार वर्षे भर घालत आहे. अर्थात नेटफ्लिक्सव्यतिरिक्त अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, अ‍ॅपल टीव्ही प्लस, डिस्ने प्लस, एचबीओ, हुलु, एनबीसी या इतरही टीव्ही आणि अ‍ॅनलाइन प्लॅटफॉर्म एमी पुरस्कार खिशात घालत असतात. गेल्याच वर्षी आपल्याकडच्या ‘दिल्ली क्राइम’ या वेबमालिकेलादेखील एमी पुरस्कार मिळाला होताच. पण द क्राऊनला सात एमी पुरस्कार मिळणे ही एक वेगळीच गोष्ट! एलिझाबेथ दुसरी ही ब्रिटिश राजघराण्यातील सध्याची राणी आणि तिची कारकीर्द यांची मांडणी करणाऱ्या या वेबमालिकेचा पहिला सीझन ४ नोव्हेंबर २०१६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. तिचे आजवर एकूण चार सीझन आणि त्यात प्रत्येकी दहा असे ४० भाग प्रदर्शित झाले आहेत. द क्राऊनचे आणखी दोन सीझन येऊन मग ती मालिका संपेल असे सांगितले जाते. या मालिकेचे वर्णन अभिजात या शब्दाच्या अलीकडेही करता येणार नाही आणि पलीकडेही नाही, या मुद्द्याशी ही मालिका पाहिलेला प्रत्येक जण सहमत होईल, यात शंका नाही.

ज्या सत्तेवरचा सूर्य कधीच मावळत नाही, असे मानले जात असे त्या विंडसरच्या राजघराण्यात जन्माला आलेली दुसरी एलिझाबेथ खरे तर नशिबानेच १९५३ मध्ये राणी होते. दुसरे महायुद्ध, अण्वस्त्रांचा वापर, शीतयुद्ध, ब्रिटिशांच्या जगभरामधल्या सत्तेचा अस्त, अमेरिका आणि नंतर चीन या नव्या जागतिक शक्तीचा उदय, प्रत्यक्ष ब्रिटनमधले ऱ्हासपर्व या आणि अशा प्रकारच्या विलक्षण जागतिक घटना सर्वोच्च पदावरून बघते. बदलते जग, तिच्याभोवतीचा बदलता राजकीय परिप्रेक्ष्य, वैयक्तिक आयुष्यामधले चढउतार या सगळ्यांना सामोरे जाताना ब्रिटनमधील चर्चची प्रमुख तसेच ब्रिटिश राजघराण्यातील सर्वसत्ताधीश ही आपली भूमिका कमालीच्या धीरोदात्तपणे पार पाडते. साम्राज्याची जबाबदारी स्वीकारल्यापासून आलेल्या वादळांना समर्थपणे तोंड देणारी ब्रिटनच्या राजघराण्याची राणी हा नाट्यमय विषय होता यात वादच नाही. पण कुणाही व्यक्तीवर एखाद्या कलाकृतीची निर्मिती करणे ही तारेवरची कसरत किती अवघड असते हे भारतीय लोकांपेक्षा जगात इतर कुणालाही जास्त चांगले माहीत असू शकत नाही. उगाचच रस्त्यावरून छाती पुढे करत हिंडणाऱ्या एखाद्या नगरसेवकाच्या बगलबच्च्याच्या भावना दुखावण्याचेही धाडस जिथे आपल्याकडे भलेभले करू शकत नाहीत, तिथे इंग्लंडमध्ये राजघराण्यातील (अर्थात सगळ्यात जुनी लोकशाही असलेल्या या देशात राजघराण्याबद्दल असलेले आकर्षण हा विरोधाभास आपणही नजरेआड करायचा) सर्वोच्चपदी असलेली व्यक्ती हयात असताना तिच्यावर ४० भागांची वेबमालिका निघते आणि त्यात राजघराण्याचे, राणीसकट त्यातल्या व्यक्तींचे यथोचित वाभाडे काढले जातात, त्यांच्यावर टीका केली जाते, ती मालिका जगभर दाखवली जाते आणि राजघराणे त्यावर र्किंचतही मतप्रदर्शन करत नाही! अर्थात, राजघराण्याचे वास्तव मांडण्याचे स्वातंत्र्य आणि त्या राजघराण्यानेही त्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याची राखलेली बूज एवढेच ‘द क्राऊन’चे वैशिष्ट्य नाही. संशोधन, दिग्दर्शन, नेपथ्य, मांडणी, अभिनय या सगळ्याच पातळ्यांवर नाणे खणखणीत वाजणे म्हणजे काय असते ते ही मालिका पाहून समजते. हेच वैशिष्ट्य असणाऱ्या इतरही वेबमालिका आहेत, त्यांनीही गेल्या काही वर्षांत पुरस्कार मिळवले आहेत. पण हयात असलेल्या व्यक्तींचे कल्पिताइतकेच (फिक्शन) विलक्षण जगणे तसेच पडद्यावर मांडणे किती कठीण असू शकते, हे अगदी गांधींवरचा सिनेमा बाहेरील देशातील व्यक्तीने येऊन करणे जिथे घडते तिथे वेगळे सांगायला नको.

ओटीटी प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचे टीव्हीपेक्षा निराळे माध्यम. या मनोरंजन माध्यमाची व्याप्ती किती वाढलेली आहे, याची झलक एमी पुरस्कारांमध्ये तर दिसलेलीच आहे. पण अगदी आपल्याकडेही मनोरंजनाकडून चौकटीबाहेरची अपेक्षा करणाऱ्यांच्या मनांचा, बुद्धीचा ताबाच जणू काही ओटीटी प्लॅटफॉर्मने घेतला आहे. सरकारनियंत्रित एकच एक वाहिनी, मग केबल आणि आता हव्या त्या वेळेला, हवी तितकी माध्यमे या टप्प्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो आहोत. आपल्या देशातील एकूण लोकसंख्या, तिचा आर्थिक स्तर पाहता स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या पारंपरिक टीव्ही माध्यमांवरील कार्यक्रमांना कायमच मागणी असणार आहे. पण लग्न, लग्नबाह्य संबंध, सासू-सून या पारंपरिक टीव्हीवरच्या कौटुंबिक सोहळ्याबाहेरचे मनोरंजनाचे जग किती वेगळे, अद्भुत, भोवंडून टाकणारे, वास्तववादी, खळखळून हसवणारे, कल्पक, बुद्धिमान, प्रयोगशील, रसरशीत, बहुरंगी, बहुढंगी आहे हे दाखवणारा ओटीटी प्लॅटफॉर्म हा तरुणांसाठी, नव्याच्या- वेगळेपणाच्या शोधात असणाऱ्यांसाठी सध्या जणू कोलंबसाने लावलेल्या अमेरिकेच्या शोधासारखाच आहे. हा प्रेक्षक मिळवण्यासाठी आज देशी तसेच परदेशी ओटीटी प्लॅटफॉम्र्समध्ये प्रचंड स्पर्धा सुरू आहे. त्यासाठीचे आर्थिक गणितही (रेव्हेन्यू मॉडेल) भारतात अजून चाचपडते आहे. प्रेक्षकाच्या मनाचा आणि खिशाचा ताबा घेण्यासाठी वाटेल त्या पातळीवर जाण्याची तयारी ही नवमाध्यमे ठेवतात, भाषा, शिव्या, हिंसाचार, लैंगिक दृश्ये यांचा विनाकारण भडिमार करतात, हा त्यांच्यावरचा आक्षेप खरा असला तरी अखेर ‘रिमोट कंट्रोल’ बघणाऱ्याच्याच हातामध्ये असतो, आणि पुरस्कार अशा भडक वेबमालिकांना नाही, तर सर्वोत्तम मालिकांनाच मिळतात. असे चोखंदळ पुरस्कार आहेत, तोवर अभिजाततेची ओटी रिती राहणार नाही… मग माध्यम चित्रपटाचे असो की ओटीटी!