ऑगस्टमध्ये महाराष्ट्रातील १५ जिल्हे कोरडेच राहिले, श्रावणधारा बरसल्याच नाहीत. धरणांतल्या पाणीसाठ्याचे आकडेही आश्वासक नाहीत…

शेतकऱ्यांनी आणि शहरवासीयांनी चिंता करावी अशीच ही स्थिती सप्टेंबरात तरी पालटेल का? की, बदलत्या पर्जन्यमानाचा फटका राज्याला सोसावाच लागेल?

वर्षभराहून अधिक काळ पावसाविना एकही महिना सुना गेला नाही, अशी शेखी मिरवणाऱ्या महाराष्ट्राला ऑगस्ट महिन्याने चांगलाच धडा शिकवला आहे! मागील वर्षाच्या तुलनेत या वेळी पडलेल्या पावसाने काही प्रमाणात तरी सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गेल्या काही वर्षांत पृथ्वीच्या तापमानाबद्दल सुरू असलेल्या चर्चेशी आपला काय संबंध, असा सवाल विचारणाऱ्यांना त्याचा थेट परिणाम पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीने जीव हळवा होत आहे. कोकणसारख्या पावसाचा वरदहस्त असलेल्या भागाला गेल्या काही वर्षांत वादळांनी जो तडाखा दिला आहे, त्याने तापमानवाढीचा परिणाम आपल्या घराचा उंबरा ओलांडून आत आल्याची जणू खात्रीच पटते आहे. भारतीय हवामान खाते पावसाळ्यापूर्वी जाहीर करत असलेल्या पावसाच्या अंदाजावर साऱ्या देशाची नजर असते. बहुतेक वेळा पुरेशा पावसाचा अंदाज त्या क्षणी सुखावणारा ठरतो; मात्र जसजसा पावसाळा सरायला लागतो, तसतसे त्या अंदाजाचे हिशेब मांडायला सुरुवात होते. दरवर्षी १ जूनला केरळच्या किनारपट्टीवर येणारा पाऊस बरोबर ७ जूनला महाराष्ट्राच्या दरवाजावर हलक्या हाताने टिकटिक करायचा, हा गेल्या काही दशकांचा अनुभव. या टिकटिकीवरच शाळांचे वेळापत्रकही अवलंबून असे. आता पाऊस ७ जूनला येत नाही. पाऊस बेभरवशीच होत राहणार, असा इशारा पर्यावरणतज्ज्ञ देत राहातात. तरीही पावसाचा अंदाज आणि भाकीत हा सामान्यांसाठी कायम उत्सुकतेचा विषय असतो. विज्ञानाच्या निकषांवर, आजवरच्या नोंदीच्या विश्लेषणावर आधारित होणारा हवामान खात्याचा अंदाज, सांगली-मिरज भागांत वेगवेगळ्या रीतीने केले जाणारे भाकीत, पंचांगामध्ये सांगितले जाणारे पावसाचे संकेत, नक्षत्रांचा पावसाशी असलेला संबंध अशा सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाला रस.

गेल्या शतकभरात हवामानाचा अंदाज घेणारी विज्ञानाची शाखा जगभरात मोठ्या प्रमाणात वाढली. त्या क्षेत्रातील संशोधनही वाढले आणि स्कायमेटसारख्या खासगी वेधशाळेच्या अंदाजांनाही महत्त्व येऊ लागले. पाऊस नेमका कधी येणार आणि कसा येणार ही शेतकऱ्यासाठीची चिंता, तर या काळात अचानक येणारे पूर आणि वादळे यामुळे अन्यांना भीती. जून आणि जुलैमध्ये यंदा तेही अनुभवून झाले. ऑगस्ट महिना असाच ओलाचिंब जाईल, या भरवशावर अवलंबून असलेले शेतकरी आणि शहरी भागातले नागरिक यांना मात्र पावसाने हुलकावणी दिली. भारतातील ६० टक्के शेती तर केवळ पावसावरच अवलंबून असणारी, कोरडवाहू. त्यामुळे अशा भागात भूजलावरच विसंबून राहिल्याने त्याचीही पातळी खालावत चाललेली. मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात राज्यातल्या धरणसाठ्यात जो पाणीसाठा होता, त्याहून कितीतरी कमी पाणीसाठा या वेळी आहे. गेल्या काही काळात अमेरिकेतील काही भागांत आलेल्या उष्णतेच्या लाटेने हैराण झालेल्या नागरिकांची ससेहोलपट पाहणाऱ्यांना गेल्या काही दशकांत भारतीय हवामानात होत असलेले बदल थेट लक्षात येत नाहीत. गेल्या ७० वर्षांत देशातील पाऊसमान कमी कमी होत आहे. त्याचा शेतीवर गंभीर परिणाम होत आहे आणि वादळांमुळे प्रचंड हानी होते आहे. हाताशी आलेले पीक गारपिटीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे डोळ्यादेखत झोपलेले पाहणे कितीतरी वेदनादायी असते! मोठ्या संख्येने धरणे असलेल्या महाराष्ट्राची ही स्थिती. तरीही या राज्यातील मोठा भाग पाण्याविना कायमच पावसाच्या दयेची भीक मागत राहतो. जागतिक हवामान बदलाचे हे परिणाम येत्या काही काळात आणखी भयावह होण्याची शक्यता झोप उडवून टाकणारी आहे.

पाऊस आणि नवसर्जन हा संबंध साहित्य आणि संगीतासाठी कायमच आकर्षणाचा. येणाऱ्या पावसाची पृथ्वीने चातकासारखी वाट पाहावी आणि दरवर्षी नटून सजून त्याच्या स्वागतासाठी सज्ज व्हावे, त्याच्या येण्याने निर्माण होणाऱ्या आनंदलहरींवर स्वार व्हावे या कल्पना जागतिक हवामानात कणाकणाने होत असलेल्या वाढीमुळे आता केवळ पुस्तकांपुरत्याच राहण्याची शक्यता आणि अभिजात संगीतातील मल्हार रागाने पावसाशी जोडलेले नातेही केवळ स्वरांपुरतेच शिल्लक राहण्याचा संशय. ‘बादरवा बरसन आयो’ यासारख्या बंदिशींनी काळ्या ढगांना पाऊस देण्याची याचना करण्याची वेळ येता येता, ‘काले मेघा, काले मेघा, पानी तो बरसाओ’ असे म्हणण्याची पाळी यावी, असे हे चित्र. ‘रिमझिम झरती श्रावणधारा’ हे भावगीत नभोवाणीवर ऐकत असतानाच यशवंत मनोहर यांच्या, ‘कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे’ या निराळ्या संदर्भातील ओळींचीही आठवण यावी, पावसाच्या आळवणीतून आपली प्रेमभावना व्यक्त करण्याच्या आतुरतेचा आनंद होता होताच, वादळाने भग्न झालेल्या गावांतील आक्रोश कानी पडावा असे कठोर वास्तव स्वीकारण्याची तयारी आता कलावंतांनाही करायला हवी. शहरातल्या गटारांची पावसाचे पाणी सामावून घेण्याची क्षमताही क्षीण व्हावी आणि त्यात पाय अडकून कुणाचा जीव जावा, दुष्काळी स्थितीतील लातूरला रेल्वेच्या वाघिणींमधून पिण्याचे पाणी पुरवण्याची वेळ यावी, अतिवृष्टीने उघड्यावर ठेवलेली धान्याची पोती भिजून जावी, गळणाऱ्या घरांमध्ये वरून पडणारे पाणी साठवण्यासाठी घरातली भांडीकुंडीही अपुरी पडावीत आणि पुरामुळे नदीच्या विशाल प्रवाहात विहार करणाऱ्या सुसरबाईंना घराच्या अंगणात येऊन पडण्याची परिस्थिती यावी… पावसाळ्यातले हे प्रसंग आता सवयीचे होऊ लागले आहेत. जगण्याच्या नाना परी व्यापून टाकणाऱ्या पावसाने बदललेल्या ऋतुचर्येची चुणूक दाखवल्यावरही, येणाऱ्या काळात पाऊस आपली कसर भरून काढेल अशी आशा सामान्यांना वाटते, हा मनुष्यस्वभाव.

महाराष्ट्रातल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. एरवी कमी पावसाचा प्रदेश असलेल्या विदर्भातील पाणीसाठा गेल्या वर्षी तुलनेत १० ते २० टक्क्यांनी कमी राहिला आहे. नाशिक विभागाची हीच स्थिती. नाही म्हणायला पश्चिम महाराष्ट्र तुलनेने बऱ्या अवस्थेत. तर कोकणसारख्या पाऊसक्षेत्रातील पाणीसाठाही यंदा कमी राहिला आहे. नाशिक आणि औरंगाबाद या विभागामधील जलसाठ्यातील तफावत येत्या महिनाभरात भरून निघाली नाही, तर पुढचे वर्ष आणखी अडचणीचे जाईल. पावसाने दिलेली ओढ सुटली नाही, तर या पाणीसाठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. निसर्ग आपली ताकद वेळोवेळी दाखवत असतो, आपण त्यापासून काही शिकत नाही, हे पुन:पुन्हा सिद्ध होत आहे. काही निवडक शहरांमध्ये बोटभर पाण्याची २४ तास उपलब्ध असणारी धार तर सोलापूरसारख्या शहरात आठवडाभराने, क्वचित पंधरवड्यानेही नळ किंचित ओला होण्याची शक्यता. ३२६७ धरण प्रकल्पांपैकी १४१ मोठी धरणे, २५८ मध्यम तर २८६८ लघु प्रकल्प यामध्ये गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ७५.०६ टक्के पाणीसाठा होता. आज तेथील पाणीसाठा ६०.५१ टक्के एवढा आहे. या सगळ्या धरणांमध्ये असलेली पाण्याची साठवणूकक्षमता ४८ हजार ५८६ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. आजमितीस हा साठा ३१ हजार ८७८ दशलक्ष घनमीटर एवढाच आहे. ही स्थिती पुढील वर्षभराची चिंता वाढवणारी आहे. पावसाचे येणे जेवढे हुरहुर लावणारे तेवढेच त्याचे पळून जाणे डोळ्यात आसवे आणणारे. सप्टेंबर महिन्यात पाऊस येईल आणि मनात वसलेले भीतीचे सावट दूर होईल, अशी भिस्त ठेवणे एवढेच आपल्या हाती आहे.