‘जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष’ ठरणारा चीनमधील साम्यवादी पक्ष १०० वर्षांचा झाला आणि याच पक्षाची सत्ता ७२ वर्षे निरंकुशपणे टिकली; याची कारणे अनेक…
…पण बदलत राहणे, पूर्वसुरींचे दोष न उगाळता आर्थिक प्रगती साधत राहणे, ही वैशिष्ट्ये महत्त्वाची ठरतात…




मूळ वृक्षापेक्षा त्याच्या कलमाने पूर्णपणे वेगळे व्हावे, मूळ वृक्षाचे कोणतेही गुणधर्म कलमात असू नयेत आणि तरीही त्या बहरलेल्या कलमाने नाव मात्र मूळ वृक्षाचेच कायम ठेवावे असे निसर्गात घडते की नाही, हे माहीत नाही. पण समाजजीवनात मात्र ते घडते. अशा वेळी या कलमाचा अभ्यास मूळ वृक्षाच्या नजरेतून करावा की मूळ वृक्षाचे निरीक्षण कलमाने दाखवून दिलेल्या गुणांच्या आधारे करावे, असा प्रश्न पडणे साहजिक. सध्या जगातील अनेक अभ्यासक या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मग्न आहेत. हा प्रश्न म्हणजे चीनमधील सत्ताधारी साम्यवादी पक्ष. यंदाच्या १ जुलै रोजी या पक्षाची शताब्दी. या मुहूर्तावर या पक्षाचा जन्मेतिहास, मूळ रंगरूप, कलमाचा विस्तार आणि या साऱ्या बदलाचे जागतिक राजकीय पर्यावरणावर होणारे परिणाम यांचा आढावा घेणे बरेच काही शिकवून जाणारे ठरते. हे शिकवणे जसे या कलमी गुणांचे अनुकरण करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी असेल तसेच ते बिनचेहऱ्याच्या प्रजेसाठीही आहे. म्हणून या इतिहासाकडे आजच्या नजरेने पाहायचे.
शतकभरापूर्वी चीनमध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हा संस्थापकांच्या डोळ्यासमोर अर्थातच होते ते रशियाचे प्रारूप. पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीने जग विदग्ध झालेले आणि लयास गेलेल्या ऑटोमन साम्राज्याने रशियासारख्या देशाची अडचण केलेली. परिणामी रशियाच्या झार रोमानोव्ह कुटुंबीयाविरोधात देशात कमालीची नाराजी दाटून आलेली. यातूनच व्लादिमीर इलिच ‘लेनिन’च्या नेतृत्वाखाली त्या देशाने क्रांती अनुभवली आणि त्यातून जन्मास आलेल्या सोव्हिएत रशियामुळे साम्यवादाचा झेंडा अनेकांना आकर्षून घेऊ लागला. चीन हा त्यांपैकी एक. साम्यवाद ही फक्त एका देशापुरती राबवावी अशी सरकार-पद्धती नाही, तिचा जगात प्रसार व्हायला हवा असाच लेनिन आणि मंडळींचा प्रयत्न होता. त्यातून आशिया खंडातील अनेक देशांत साम्यवादी दूत पाठवले गेले. चीन देशात ही फांदी रुजली. कारण परिस्थिती त्यास पोषक होती. चीन कमालीचा दुभंग अनुभवत होता. ग्रामीण चीन अत्यंत दारिद्र्य आणि हलाखी अनुभवत असताना शांघायसारख्या शहरी, परदेशीय नियंत्रित वसाहतीत मात्र सुबत्ता ओसंडून वाहात होती. या पोषक वातावरणात चिनी साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. त्यांच्या समोर आव्हान होते ते तत्कालीन प्रस्थापितांचे. म्हणजे सत्ताधारी सन येत् सेन यांच्या सरकारचे. चिनी साम्यवादी पक्षाच्या उदयानंतर सेन यांचा ‘केएमटी’ पक्ष आणि हे डावे यांच्यात मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू झाला. त्यास नंतर दुसरे महायुद्ध, जपानचा पाडाव, जपान आणि चीन संघर्ष अशी अनेक अंगे आहेत. त्या सर्वांचा परामर्श येथे घेता येणे अशक्य. पण या संघर्षातून चीनमधे असे एक नेतृत्व उदयास आले ज्याने जग बदलले. माओ झेडाँग हे या संघर्षाचे विजयी फलित. त्यांच्या सांस्कृतिक क्रांतीने चीनमधील अन्य सर्वांवर मात केली आणि १९४९ साली त्यातून साम्यवादी पक्ष चीनचा निर्विवाद सत्ताधारी बनला.
तो आजतागायत आहे आणि नजीकच्या भविष्यकाळातही हे वास्तव बदलले जाण्याची शक्यता नाही. याचा अर्थ असा की, गेली सुमारे ७२ वर्षे चीनवर या पक्षाची एकहाती सत्ता आहे. दरम्यानच्या काळात या पक्षाचे मूळ खोड असलेल्या रशियाच्या साम्यवादी वृक्षाची शकले झाली. १९८९ साली कोसळत्या बर्लिन भिंतीने सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी मुळावर घाव घातला. त्या वेळीही आता चीनच्या साम्यवादाचे काही खरे नाही, अशी भाकिते वर्तवली गेली. पण ती खोटी ठरली. उलट चिनी भूमीतील हे साम्यवादी कलम मूळ वृक्षापेक्षा अधिक जोमदारपणे वाढले. चिनी साम्यवादी पक्षाचे यश कोणते असेल तर ते हे की तो प्रत्येक टप्प्यावर बदलत गेला. वास्तविक माओ यांचे कर्तृत्व आणि प्रतिमा सर्वांना झाकोळून टाकणारी. पण त्यांच्यासारख्या संस्थापकाची पक्षावरील सावली नंतरच्या नेतृत्वाने झटकून टाकली. इतकी की, मूळ साम्यवादी पक्षाशी संपूर्ण फारकत घेणारी विचारसरणी आणि कृती त्या पक्षाने अंगीकारली आणि तरीही आपण साम्यवादीच आहोत असा दावा हा पक्ष करू शकला. अजूनही करतो.
या प्रागतिकतेचे श्रेय माओ यांच्या निधनानंतर गादी बळकावणारे डेंग झियाओ पिंग यांना. ‘‘स्वत: भांडवलशाहीचा अंगीकार न करता साम्यवादी, समाजवादी विचारांच्या आधारे बाजारपेठीय तत्त्वज्ञान अंगीकारता येते’’ ही अजब आणि विरोधाभासी विचारसरणी त्यांची. त्यातून त्या देशात साम्यवादी कालखंडात उभारली गेलेली सरकारी आस्थापने मोडून खासगी उद्योगांस मुक्त द्वार दिले गेले. चीनमध्ये जनक्षोभ उसळला. १९८९ सालचेच तिआनानमेन प्रकरण घडले ते त्यातून. डेंग यांनी ही निदर्शने क्रूरपणे मोडून काढली आणि आर्थिक उदारमतवादास विरोध करणाऱ्या स्वपक्षीयांना तुरुंगात डांबले. त्यानंतर मात्र चिनी अर्थविचाराचा वारू शब्दश: चौखूर उधळला आणि त्याने जगास आव्हान द्यायला सुरुवात केली. वास्तविक या टप्प्यापर्यंत भारत आणि चीन यांचा प्रवास समांतर होता. उलट काही बाबतींत आपण चीनपेक्षा आघाडीवर होतो. पण १९९१ नंतर चीनच्या साम्यवादी पक्षाने जे केले ते अभूतपूर्व ठरते. ‘समाजवादी भांडवलशाही’ असा धड मानवी आणि शिर सिंहाचे असा नवाच नरसिंहावतार त्या देशाने घेतला. या झेपेचा पुढचा टप्पा २०१२ पासून सुरू होतो.
त्या वर्षी विद्यमान अध्यक्ष क्षी जिनपिंग सत्तेवर आले. १९४९ सालच्या सांस्कृतिक क्रांतीचे उद्गाते आणि चिनी प्रजासत्ताकाचे संस्थापक माओ झेडाँग यांनी ‘पक्ष म्हणजेच सत्ता आणि पक्षप्रमुख म्हणजेच देशप्रमुख’ हे तत्त्व घालून दिलेच होते. जिनपिंग यांनी ते आणखी उंच नेले. राजकीय पातळीवर त्यांचा सर्वात धूर्त निर्णय म्हणजे रशियात जे झाले ते अजिबात आपल्याकडे होणार नाही, याची खबरदारी घेण्याचा. सोव्हिएत रशियाच्या साम्यवादी पोलादी पडद्यास तडे जाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या देशातील सत्ताधारी साम्यवादी पक्षात झालेले ‘डी-स्टालिनायझेशन’. रशियात स्टालिन यांच्यानंतर सत्ताग्रहण करणाऱ्या ख्रुश्चेव्ह यांनी आपल्या पूर्वसुरींची सर्व पापे पुसून टाकण्याच्या मिषाने चव्हाट्यावर आणली. हे रशियन साम्यवादाच्या पराजयाचे पहिले पाऊल होते, असे जिनपिंग मानतात. त्यामुळे त्यांनी माओ यांच्या सांस्कृतिक क्रांतीच्या यशाची झाकली मूठ झाकलेलीच राहील यासाठी सर्व ती खबरदारी घेतली. चीनचा साम्यवाद हा सोव्हिएत रशियापासून पूर्णपणे वेगळा ठरतो त्यामागील अत्यंत महत्त्वाच्या दोन कारणांपैकी हे पहिले कारण.
दुसरा मुद्दा आर्थिक प्रगतीचा. जगात उदारीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर मिखाईल गोर्बाचोव यांचा रशिया हळूहळू अशक्त होत गेला. त्याआधी लिओनिद ब्रेझनेव्ह यांच्या बेबंद राजवटीने अर्थव्यवस्थेस खिंडार पाडले होतेच. ते गोर्बाचोव यांना भरता आले नाही आणि त्यानंतरच्या बोरीस येल्तसिन यांनी तर ते अधिकच रुंद केले. जिनपिंग यांनी चीनचे असे होऊ दिले नाही. सुदृढ अर्थव्यवस्थेची फळे नागरिकांत सर्वदूर मिळत राहिली तर सत्ताविचार भांडवलशाहीवादी आहे की साम्यवादी यांची फिकीर नागरिक करीत नाहीत. म्हणून आर्थिक प्रगती आणि तिचा वेग हा सत्ता राखण्याचा यशस्वी मार्ग हे तत्त्व त्यांनी पाळले. रशियात व्लादिमीर पुतिन यांना उमगलेले हे सत्य चीनमधे जिनपिंग यांनीही अंगीकारलेले आहे, ही बाब लक्षणीय. म्हणून साम्यवादी असल्याचा दावा करीत हे दोन्हीही नेते प्रत्यक्षात भांडवलशाहीचेच घोडे दामटताना दिसतात. या दोघांतील फरक हा की, रशियन साम्यवादी अंगणात डवरलेल्या भांडवलशाहीची फळे काही निवडकांच्याच अंगणात पडली. चीनचे वेगळेपण हे या अंगणाच्या विस्तारात आहे. याचा अर्थ त्या देशातील सत्ताधाऱ्यांत सर्व काही मधुर आहे, असे नाही. उच्चपदस्थ सत्ताधीशांचा भ्रष्टाचार वगैरे मुद्दे आहेतच. पण त्याची झळ सामान्यांना बसणार नाही, याची खबरदारी घेतली जाते.
याच्या जोडीला पक्ष म्हणजेच देश ही मांडणी. सत्ताधारी पक्षाचाच इतका विस्तार करायचा की जास्तीत जास्त नागरिक हे व्यवस्थेचाच भाग व्हावेत, हा यामागचा विचार. आज सुमारे ९.५ कोटी चिनी नागरिक सत्ताधारी पक्षाचे सदस्य आहेत. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष. पहिल्या क्रमांकाचा मान आपल्या सत्ताधारी भाजपचा. चीनमधे हे साम्यवादी पक्षसदस्य जनतेत साधे नागरिक नसतात. तर ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून वावरतात. हे केले जाते ते काही केवळ पक्षसदस्य संख्येवरून ताकद दिसून यावी यासाठी नाही. तर सर्व प्रयत्न असतात ते कथ्य (नॅरेटिव्ह) नियंत्रणाचे. एकदा का समाजातील कथ्य-कथन आणि प्रचार-प्रसार यांवर नियंत्रण मिळवले की आपला ‘विचार’ रुजवता येतो आणि सत्ता अबाधित राहण्याची हमी मिळते. यास जोड लागते ती एकाच गोष्टीची.
अर्थप्रगती ही ती एकमेव बाब. ती राखता येत असेल तर अन्य सर्व मुद्दे सांभाळता येतात. चिनी साम्यवादी पक्षाने, त्यातही माओत्तर नेत्यांनी ही खबरदारी घेतली. तिकडे रशियातही पुतिन हे पथ्य पाळताना दिसतात. ते एकदा जमले की पक्ष म्हणजेच देश असे म्हणून अनंत काळ सत्ता गाजवता येते. चिनी पक्षसत्ताकाच्या प्रवासाचा हा धडा आहे. सामान्य नागरिकांनीही त्यापासून काही बोध घ्यायला हवा. अन्यथा देशोदेशी याचीच प्रतिरूपे वाढणार हे निश्चित.