scorecardresearch

अग्रलेख : ‘महाशक्ती’चा मुखवटा

‘शक्ती’ला भारतीय संदर्भात एक खास अर्थ आहे. उगम आणि संहार यांच्या दैवताला ‘शक्ती’ म्हटले जाते.

eknath shinde editorial
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार

सर्वशक्तिमान असल्याचा देखावा उभारणे तुलनेने सोपे; पण अशा देखाव्यांचा तकलादूपणा आणीबाणीच्या प्रसंगी उघड होतो..

विरोधकांना शत्रू मानून आपल्या हातातील सत्तेचा, अधिकारांचा वापर या ‘शत्रूं’वर कारवाईसाठी करणे हेच पाऊल जगभरचे बहुतेक सारे ‘महाशक्ती’वादी नेते उचलत असतात..

‘शक्ती’ला भारतीय संदर्भात एक खास अर्थ आहे. उगम आणि संहार यांच्या दैवताला ‘शक्ती’ म्हटले जाते. भारतात शक्तिपीठे चार, पण ‘महाशक्ती’ म्हणवली जाणारी पीठे १८ आहेत. चार मोजावीत वा १८, त्यांमध्ये आसामच्या कामाख्यादेवीचा समावेश आहेच. या कामाख्या पीठाचे दर्शन गेले दोन दिवस आसाममध्ये असलेले महाराष्ट्रीय आमदार वा त्यांचे नेते एकनाथ शिंदे यांनी घेतले किंवा कसे हे कळायला मार्ग नाही. परंतु आपल्यामागे जी महाशक्ती असल्याचा साक्षात्कार शिंदे यांना झाला ती काही कामाख्यादेवी किंवा अन्य शक्तिपीठांपैकी नव्हे. शिंदे यांच्याच पुढील वक्तव्यातून स्पष्ट होते की, ते केंद्रात राजकीय सत्तास्थानी असलेल्यांनाच महाशक्ती म्हणत आहेत. जिभेचा तोल ढळत नाही तोवर कोणास काय म्हणावे हा ज्याचा त्याचा प्रश्न. शिंदे हे तर त्यांना अभिप्रेत असलेल्या ‘महाशक्ती’बद्दल कौतुकाने आणि आदरानेच बोलत होते. त्यांच्या या कौतुकात अतिशयोक्ती होती, हा आक्षेप काही समीक्षापंथी लोक घेऊ शकतात. पण ज्यांचे कौतुक केले त्यांनाही ‘महा’रूपाचे आणि शक्तिवर्धनाचेच आकर्षण असेल, तर अतिशयोक्तीचे तरी काय एवढे? तेव्हा राजकारणातील या ‘महाशक्ती’कडे बारकाईने पाहायला हवे.

एरवीही ‘विश्वगुरू’ वगैरे शब्दप्रयोगांतून हल्ली हे ‘महाशक्ती’ ठरण्याचे आकर्षण झिरपतच असते. तो झिरपा आता शिंदे यांनी रुंदावला इतकेच. बरे शिंदे हे अगदी हक्काने भाजपनेत्यांना ‘महाशक्ती’ म्हणू शकतात, कारण या नेत्यांची शक्ती वाढण्यामागे शिंदे यांची मेहनत आहेच. राजस्थानचा एक अपवाद वगळता मध्य प्रदेश, कर्नाटक, अरुणाचल प्रदेश या राज्यांतील मुख्यमंत्रीपद भाजपकडे आणण्याच्या मोहिमा यशस्वी झाल्या, त्याही त्या-त्या राज्यांमधील अन्यपक्षीयांच्या मेहनतीमुळेच. मेहनत इतरांची आणि पत वाढणार आपली, हेसुद्धा शक्तीचेच लक्षण. राजकारणातील डावेच तेवढे असल्या शक्तिलक्षणास त्याज्य मानतात, कारण मार्क्‍सने मांडलेल्या ‘वरकड मूल्याच्या सिद्धान्ता’शी हे सारे डाव्यांना विसंगत वाटते. त्यामुळे डाव्यांना दोनतीन कोपऱ्यांतली राज्ये वगळता सत्ताकारणही जमले नाही आणि शक्तिवर्धन कसे करावे याचे इंदिरा गांधींसारखे उदाहरण समोर असूनही राजकीय ताकद वाढवण्याच्या फंदात डावे कधी पडले नाहीत. भाजपनेत्यांपैकी अटलबिहारी वाजपेयींनी मात्र इंदिरा गांधींना ‘दुर्गा’ म्हणत त्यांच्या राजकीय प्रवासावर क्ष-किरण टाकला, तो पुढे त्यांच्या पक्षालाही लाभदायीच ठरला. स्वत:च्या चुकांमुळे होत असलेल्या जनआंदोलनांचे खापर ‘परकीय हाता’वर फोडणे, ‘मला हटवणे हा विरोधकांचा एकमेव कार्यक्रम’ अशा बिनतोड भासणाऱ्या टीकेने विरोधकांना घेरून स्वत:चे महत्त्व वाढवणे ही इंदिरा गांधी यांच्या राजकीय शक्तिसंवर्धनाची गुपिते. ती कधी भर संसदेत, तर कधी प्रचारसभांमध्ये वाजपेयी नेमकेपणाने उघड करत. ‘महाशक्ती’ ठरू पाहाणाऱ्या- किंबहुना त्या वेळी बहुसंख्यांना शक्तिमानच भासणाऱ्या- नेतृत्वाचे मूर्तिभंजन कसे करावे, याचा वस्तुपाठ मिश्कील शैलीच्या अमोघ वाणीचे वाजपेयी देत. कालौघात वाजपेयींनाच ‘भाजपचा मुखवटा’ ठरवले गेले आणि तत्कालीन संघपरिवारातील लालकृष्ण अडवाणी, गिरिराज किशोर, अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया हे या मुखवटय़ामागील सत्तेचा खरा चेहरा आहेत, अशी टीका झाली. ती तेव्हा कुणालाच झोंबली नाही. आज तर त्या टीकेची आठवणही कुणाला नाही. कारण मुखवटाही न वापरता सत्ताकारण करता येते, इतपत आपण सारेच निर्ढावलो आहोत. अगदी सकारात्मकच विधान करायचे तर, मुखवटय़ांचा काळ आता सरला आहे. पण ‘महाशक्ती’चे आकर्षण पुन्हा जागे झाले आहे.

फार नव्हे.. तीन-चार वर्षांपूर्वी जगभरच्या अनेकांचा असा समज होता की, हे असे ‘महाशक्ती’वादी नेते हीच नव्या जगाची नवी रीत असणार. तुर्कस्तानात रेसेप तयिप एर्दोगन, ब्राझीलमध्ये याइर बोल्सोनारो, व्यवस्थात्मक हुकूमशाही नवी नसणाऱ्या रशिया आणि चीनमध्ये आपलाच कार्यकाळ वारंवार वाढवून घेणारे पुतिन आणि क्षी जिनिपग आणि लोकशाही व्यवस्था भक्कम राखणाऱ्या अमेरिकेतही डोनाल्ड ट्रम्प हे सारे नेते सत्ताधारी असण्याचा तो काळ. त्यामुळे आता जगच बदलणार, महाशक्ती किंवा सर्वशक्तिमान होण्याचे आकर्षण असणाऱ्या नेत्यांचाच काळ येणार अशा अटकळी बांधल्या गेल्या. ट्रम्प निवडणूक हरले, तेव्हा या अटकळींनाही अटकाव झाला. मात्र आजही ट्रम्प काही पराभव मान्य करत नाहीत. एर्दोगन यांच्या धोरणांविरुद्ध आवाज उठवणारे ओस्मान कवाला, बोल्सोनारोंचे राजकीय विरोधक लुला ऊर्फ लुइझ डिसिल्व्हा, रशियात अलेक्सी नावाल्नी आणि चीनमध्ये दिवंगत नोबेल-मानकरी लिउ झियाबाओ या साऱ्यांवर त्या-त्या देशातील ‘महाशक्ती’कांक्षी सत्ताधाऱ्यांनी पोलिसी कारवाई केली, तुरुंगाची हवा खाणे भाग पाडले. यापैकी ब्राझीलचे लुला यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते आणि त्यांतून ते सुटले. त्यामुळे उलट, ही कारवाई बोल्सोनारो यांनीच आणि स्वत:च्या सत्तेला आव्हान नको म्हणूनच घडवली होती, हेच दिसून आले. अमेरिकेत व्यवस्था शाबूत असल्याने ट्रम्प असले काही करू शकले नाहीत इतकेच, पण महाशक्ती ठरू पाहणाऱ्या नेत्यांबद्दलचे वास्तव इथून तिथून सारखेच.

सर्वशक्तिमान असल्याचा देखावा उभारणे तुलनेने सोपे; पण अशा देखाव्यांचा तकलादूपणा आणीबाणीच्या प्रसंगी उघड होतो. विरोधकांना शत्रू मानून आपल्या हातातील सत्तेचा, अधिकारांचा वापर या ‘शत्रूं’वर कारवाईसाठी करणे हेच पाऊल जगभरचे बहुतेक सारे ‘महाशक्ती’वादी नेते उचलतात, हे ते वास्तव. स्टालिन वा मुसोलिनी आदी तथाकथित ‘लोकप्रिय’ नेत्यांचा इतिहासदेखील अशीच साक्ष देतो. विरोधकांचा असा बंदोबस्त करावा लागतो कारण स्वत:चे निर्णय चुकतात आणि देशाची प्रगती खुंटू लागते. निर्णय चुकतात, कारण योग्य व्यक्तींना -प्रसंगी विरोधकांनाही- विश्वासात घेऊन धोरणे राबवायची असतात याचा विसरच या ‘महाशक्ती’च्या कार्यपद्धतीस पडलेला असतो. त्यामुळे मग अशा महाशक्तीचा तथाकथित करारी वगैरे चेहरा हा अखेर मुखवटाच ठरतो.  

हेच सारे इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीतही होऊ लागले, तेव्हा आणीबाणी घोषित झाली. तशी आणीबाणी वगैरे, वर उदाहरण दिलेल्या कोणत्याही नेत्याने आपापल्या देशात लादलेली नाही. भारतातही नंतर कधी आणीबाणी घोषित झालेली नाही. आजच्या साऱ्याच ‘महाशक्ती’ नेत्यांकडे प्रचारासाठी इंटरनेटसारखे अमोघ अस्त्र आहे. मात्र सत्ता सतत वाढती ठेवावी लागते. विरोधकांचे प्रतिमाहनन सतत करावे लागते आणि विरोधी सूर दाबण्यासाठी यंत्रणांचा वापर सतत करतच राहावा लागतो. आजच्या ‘महाशक्ती’चा हा मुखवटा जागतिक आणि इतिहासदत्त आहे.  हा मुखवटा धारण करणाऱ्यांत इंदिरा गांधी असोत वा आणखी कोणी.. सत्ताक्षेत्रातील ‘महाशक्ती’चा भारतीय आध्यात्मिक अर्थाच्या ‘शक्ती’-स्त्रीरूपाशी काहीही संबंध असूच शकत नाही, इतका या मुखवटय़ामागील चेहरा आतून भेदरलेला असतो.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-06-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या