गेले दहा दिवस अतिशय शांततेत पार पडलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशीची मिरवणूक सर्व नियम आणि कायदे धाब्यावर बसवून साजरा केलेला उन्माद होता. मुंबई पुण्यासारख्या शहरात या मिरवणुकांमुळे झालेली वाहतूक कोंडी आणि नोकरदार वर्गाला झालेला मनस्ताप याचे उत्तर मिरवणुकीत सहभागी झालेल्यांपैकी कोणीही देत नाही. अतिशय हिडीस नृत्य, त्यासाठी कर्णकर्कश डॉल्बीवरील अश्लील गाणी, मद्यधुंद अवस्थेतील कार्यकर्ते यांना पाहण्यासाठीच लोक येतात, असा एक सार्वत्रिक समज असतो. त्यामुळे ना काही सुंदर आणि देखणे पाहायला मिळत, ना उत्सवाच्या उत्साहाला उधाण येत. रस्तोरस्ती वाहतूक अडवणाऱया मंडपांविरुद्ध पोलीस यंत्रणा आणि संबंधित महानगरपालिका कधीही कडक कारवाई करीत नाही. उलट परंपरेच्या नावाखाली या दुराग्रहाला आडून मान्यताच देण्यात येते.
हा सारा उत्सव या राज्यातील नागरिकांच्या आनंदाचा असतो की काही मूठभरांच्या प्रतिष्ठेचा, असा प्रश्ऱना पडण्यासारखी ही स्थिती येण्यास राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणाही कारणीभूत असतो. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल, दर्शकांचे चित्त प्रफुल्लित होईल, असे काही घडण्यात कुणालाच फारसा रस नाही. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हौदात विसर्जन करण्यास पुण्यातील मानाच्या गणपतींनी पुढाकार घेतला खरा, पण त्याचे अनुकरण मात्र झाले नाही. एरवी सतत चाकांवर चालणाऱया मुंबईतही यंदा पुण्यासारखी मिरवणूक लांबली आणि लालबागच्या राजाचे विसर्जन सकाळी म्हणजे अनंतचतुर्दशी संपल्यानंतर काही तासांनी झाले. पुण्यातील मिरवणूक दुसऱया दिवशी सायंकाळपर्यंत चालली नाही, तर त्याला विसर्जनच म्हटले जात नाही. कोल्हापुरातही हेच लोण आले आहे. उत्सवातील किळसवाणा उन्माद डोक्यात तिडिक आणणारा असतो, त्यामुळे अशा विसर्जन मिरवणुकीचेच विसर्जन करण्याची वेळ आता आली आहे.