scorecardresearch

अग्रलेख : आभासी चक्रव्यूहातले अभिमन्यू

समाजमाध्यमे, त्यांचे परिणाम व दुष्परिणाम, सायबर कायदे या सगळय़ाचे शिक्षण शालेय स्तरापासून सुरू करण्याचा विचार करायची वेळ आता आली आहे..

समाजमाध्यमे, त्यांचे परिणाम व दुष्परिणाम, सायबर कायदे या सगळय़ाचे शिक्षण शालेय स्तरापासून सुरू करण्याचा विचार करायची वेळ आता आली आहे..

आभासी विश्वात लोकप्रियतेचे झेंडे लावणाऱ्या कुणा ‘हिंदूस्तानी भाऊ’वर आणि ‘थेरगावची क्वीन’वर वास्तवामधल्या पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यावर आभासी विश्वात पोपटासारखी बोलणारी ही मंडळी एकदम सुतासारखी सरळ येऊन माफीबिफी मागती झाली असली तरी त्यानिमित्ताने गेली काही वर्षे सतत चर्चेत असलेल्या तरुणांच्या ऑनलाइन जगाचे वास्तव पुन्हा एकदा ऑफलाइन जगावर येऊन धडकले आहे. ‘हिंदूस्तानी भाऊ’ असो किंवा त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘ऑनलाइन परीक्षा घ्या’ या मुद्दय़ासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी हजारो मुले असोत; ‘थेरगावची क्वीन’ असो की तिची मित्रमंडळी आणि तिचे लाखो समाजमाध्यमी अनुयायी असोत, या सगळय़ांनीच सुरेश भटांच्या गझलेमधल्या ‘जरी वर्तमानाला कळेना आमुची भाषा..’ या अर्ध्याच ओळी त्यांच्याबाबत वास्तव असल्याचे दाखवून दिले आहे. आभासी जगातच अधिक रमणाऱ्या आपल्या आसपासच्या या नव्या पिढीचे वर्तमान आपल्याला समजते आहे का, असा प्रश्न पडावा अशी खरोखरच सध्याची परिस्थिती आहे.

जगभर सगळय़ांची मने झपाटणारी समाजमाध्यमे, त्यांचा बेसुमार वापर, त्यातून लहानमोठय़ा सगळय़ांचाच वाढत चाललेला ‘स्क्रीन टाइम’ याला आळा कसा घालायचा यावर गेली साताठ वर्षे जगभर चर्चा सुरू आहे. पण हा ‘स्क्रीन टाइम’ कमी होण्याऐवजी वाढण्याला खऱ्या अर्थाने वेग आला दोन वर्षांपूर्वी. हातातल्या मोबाइलच्या यंत्रामध्ये सामावल्या जाणाऱ्या अवघ्या जगापासून आपल्या मुलांना दूर ठेवू पाहणाऱ्या पालकांचा दोन वर्षांपूर्वी कोविडच्या विषाणूने घात केला आणि मुलांची शाळा-महाविद्यालयेच मोबाइलमध्ये येऊन विसावली. कोविड महासाथीमुळे झालेल्या टाळेबंदीमुळे शाळा-महाविद्यालयांचे तास, लेखी-तोंडी परीक्षाच नाही तर अगदी पीटीदेखील घरबसल्या ऑनलाइन होऊ लागली. त्यासाठी सततच्या हाताळणी करून अगदी छोटी छोटी मुलेदेखील ऑनलाइन विश्वाची जणू एकदम जाणकार होऊन गेली. ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या शिक्षकांपेक्षा, पालकांपेक्षा या मुलांनाच आभासी जगाची जास्त माहिती आहे, असा अलीकडच्या काळातील अनेकांचा अनुभव आहे. शहरांमधल्या अगदी उच्चभ्रू शाळांमधल्या मुलांपासून ते गावखेडय़ातल्या मुलांपर्यंत या सगळय़ामध्ये शाळेचा अभ्यास दुय्यम ठरून ऑनलाइन गेम्स, समाजमाध्यमे, त्यावरचे विश्वरूपदर्शन, तिथले (यूटय़ूबर, टिकटॉकर इत्यादींचे) लोकप्रिय चेहरे, त्यांचे सादरीकरण, ओटीटी प्लॅटफॉम्र्स, तिथला सहज उपलब्ध होणारा आशय, व्हिडीओ कॉिलगमुळे कुणाशीही तत्काळ आणि थेट होऊ शकणारा सचित्र संवाद यांचेच गारूड अधिक मोठे ठरले. आपल्या मुलांचे काय चालले आहे हे पालकांना समजेपर्यंत; खरे तर अनेकांना ते अजूनही समजलेले नाही; ही मुले ‘ग्लोबल व्हिलेज’ची नागरिक होऊन गेली होती. त्यांनी आपापल्या वकुबानुसार, आवडीनिवडींनुसार आपापले नायक, आपापले कट्टे निवडले होते. त्यामुळे कुणी ‘के पॉप’च्या तालावर थिरकायला लागले तर कुणी ‘हिंदूस्तानी भाई’च्या, तर कुणी आणखी काही निवडले.

अभ्यासू, वाचणाऱ्या मुलांचे विश्व वेगळे आणि या गोष्टी न आवडणाऱ्या मुलांचे विश्व वेगळे अशी स्पष्ट विभागणी एके काळी होती. अभ्यासू मुलांकडून दंगामस्ती अपेक्षित नव्हती आणि दंगेखोर मुलांना एका जागी बसवले जात नव्हते. आता आतले तपशील वेगळे असले तरी गेल्या दोन वर्षांच्या काळात या सगळय़ा मुलांचे विश्व एकच झाले आहे; ते म्हणजे आभासी ऑनलाइन जग. अभ्यासू मुले तिथेही अभ्यासच करत असतील, पण प्रत्यक्षात शाळा सुरू व्हावी का या प्रश्नावर त्यांचेही उत्तर नकारात्मकच असते, असे अनेक पालक सांगतात. शाळा ऑनलाइन हवी असे वाटणाऱ्यांचा शाळेत होणाऱ्या ‘सोशलायझेशन’ला नकार असेल आणि परीक्षा ऑनलाइन हवी असे म्हणणाऱ्यांना अभ्यासासाठीच्या मेहनतीला नकार असेल तर नजीकच्या भविष्यात आपण कुठल्या प्रकारच्या समाजाची निर्मिती करत आहोत, हा प्रश्न गंभीर आहे. करोनाच्या महासाथीमुळे परीक्षा ऑफलाइन हवी असे म्हणणारे किती जण करोनाकाळातले बाकीचे सगळे नियम पाळतात, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. सगळे सण, उत्सव सामूहिक पातळीवर साजरे करायचे, कौटुंबिक सहली करायच्या, निवडणुका करायच्या, हजारोंनी रस्त्यावर उतरून आंदोलने करायची, पण करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑफलाइन परीक्षा नकोत, या दुटप्पीपणाला कुठेच थारा मिळता कामा नये. खरे तर सगळय़ा प्रश्नांवर सोप्पी उत्तरे शोधू पाहणाऱ्यांना आणि अवघड प्रश्न ‘ऑप्शन’लाच टाकून बौद्धिक कसरत टाळणाऱ्यांना इतिहास माफ करत नाही आणि भविष्यही थारा देत नाही, हे या मुलांना समजावून सांगणे आवश्यक आहे. पण ते सांगणार कोण आणि कसे? सगळय़ाच पातळय़ांवरचा संवाद दिवसेंदिवस अधिकाधिक कर्कश आणि कटू होत चाललेला असताना सगळय़ा समाजाला शहाणपणाचे चार परखड बोल सुनावण्याची वैचारिक, खरीखुरी आध्यात्मिक ताकद असलेल्या व्यक्तीही आज कुठेही दिसत नाहीत. संवादच कर्कश असेल तर विसंवाद काय पातळीवरचा असेल ते रोजच्या रोज सर्व माध्यमांमधून दिसते आहे. मुळात अशा वातावरणात वाढणाऱ्या पिढीकडून शहाणिवेची अपेक्षा करणे हेसुद्धा आत्मवंचना करण्यासारखेच आहे. कारण शेवटी पेरले जाते, तेच उगवते. 

या देशाने तत्कालीन महासत्तेला हादरा देणारी नि:शस्त्र आंदोलने केली आहेत आणि त्यांचा हेतू भरकटतो आहे हे बघितल्यावर एका शब्दावर ती मागे घेतली गेल्याचेही अनुभवले आहे. अशा वेळी ऑनलाइन भडक भाषणे करणाऱ्या कुणा ‘भाऊ’च्या हाकेला ओ देत हजारो विद्यार्थी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरत असतील तर आपण पुन्हा एकदा किती खोलवर रुजण्याची गरज आहे याचे विद्यार्थी संघटनांनीच नाही तर राजकीय संघटनांनीही आत्मपरीक्षण करावे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाइन जग हेच यापुढच्या पिढय़ांचे वास्तव असणार आहे, तर ती भविष्याची हाक शिक्षण विभागानेही ऐकायला हवी. ती यासाठी की समाजमाध्यमांचा वापर, तो करताना बाळगायचा संयम, तो सोडला तर होणारे परिणाम आणि त्यामुळे ज्याच्या आधारे कारवाई होऊ शकते असे सायबर कायदे या सगळय़ाचे शिक्षण शालेय स्तरापासून सुरू करण्याचा विचार करायची वेळ आता आली आहे, हेच या दोन घटनांनी अधोरेखित केले आहे. या दोन घटनांमधील मुलांचा सामाजिक स्तर कदाचित वेगळा असेलही; ती कदाचित समाजातील सगळय़ा स्तरांतील मुलांचे प्रतिनिधित्व करत नसतीलही; पण त्यांच्या पिढीतील सगळी मुले या ना त्या प्रकाराने आभासी जगाचे रहिवासी आहेत. कुणी ऑनलाइन वावरणाऱ्या एखाद्या ‘भाऊ’च्या बहकाव्यात येतो आहे, कुणी ऑनलाइन वावरताना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या एखाद्या ‘क्वीन’ला लाइक्स देतो आहे, कुणी सायबर गुन्हेगारीला बळी पडताना दिसतो आहे तर कुणी समाजमाध्यमावर फुललेल्या प्रेमापोटी मराठवाडय़ातून उठून थेट पाकिस्तानची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. कुणी ‘पबजी’ किंवा ‘ब्ल्यू व्हेल’सारख्या ऑनलाइन गेम्सना बळी पडताना दिसतो आहे. सुलीडील्स, बुलीबाई, क्लब हाऊससारख्या अपप्रवृत्तींना बळी पडताना दिसतो आहे. नजीकच्या काळातली अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. कधी निव्वळ भाबडेपणातून, कधी स्वत:च्या चुकांमुळे, कधी आपल्याला सगळे कळते या अज्ञानातून तर कधी उत्सुकतेपोटी, तर कधी कुणी फसवल्यामुळे अनेक मुले या आभासी वास्तवाला फशी पडताना दिसत आहेत. कुटुंबाचे पाठबळ, उपजत शहाणपण यामुळे त्यातून काही जण नीट तरून जातात खरे, पण त्यांची वाटही सोपी अर्थातच नाही. यापुढच्या काळात तर हा सगळा पसारा आणखी वाढण्याची, आणखी गुंतागुंतीचा होण्याची शक्यताच अधिक आहे. त्याचे मानसिक परिणाम तर आणखी गंभीर असणार आहेत. म्हणूनच आभासी चक्रव्यूहामधल्या या सगळय़ाच अभिमन्यूंना तो भेदण्याची कला शिकवणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व अग्रलेख ( Agralekh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hindustani bhau arrested students protest over offline exam zws