नैहर छूटो ही जाए..

भावदर्शनातून ठुमरीला सभ्य आणि सालंकृत करण्याचे श्रेय गिरिजा देवींचे.. 

भावदर्शनातून ठुमरीला सभ्य आणि सालंकृत करण्याचे श्रेय गिरिजा देवींचे.. 

उस्ताद बिस्मिल्ला खान यांना एकदा विचारले गेले की, बनारसमध्ये असे काय आहे की तुम्हाला येथे राहावेसे वाटते. त्यांनी उत्तर दिले : बाबा विश्वनाथ, माँ गंगा और गिरिजा. म्हणजे गिरिजा देवी. वयाच्या ८८व्या वर्षी त्या निवर्तल्या. गिरिजा देवी ज्या बनारस शहरात जन्मल्या आणि तेथेच कार्यरत राहिल्या, त्या बनारस या नावाने संगीताच्या क्षेत्रात खूपच उलथापालथ घडवून आणली होती. ग्वाल्हेरच्या तोडीने बनारसमध्ये कलांचा विकास होत गेला आणि गायनात आणि तालवादनातही बनारस या नावाचे एक अपूर्व असे घराणेच जन्माला आले. सात-आठ वर्षांच्या असताना बनारसच्या विश्वेश्वर मंदिरात त्या काळातील दिग्गज असलेल्या फैयाज खाँ यांचे गायन ऐकण्यासाठी वडिलांबरोबर गेलेल्या गिरिजा देवींना खाँसाहेबांच्या आवाजाचा लगाव आणि त्यातील भावदर्शनाने इतके भारावून टाकले की त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. खाँसाहेबांनी त्यांच्या वडिलांना सांगितले, ‘इस लडकी में स्वर की चोट है, बहुत बडी कलाकार बनेगी’. स्वरांना भिडण्यासाठी आवश्यक असलेली रसिकता गिरिजा देवींकडे लहानपणापासूनच होती. अवघ्या सहा वर्षांच्या असताना त्यांनी या बनारसेत गाण्याची तालीम सुरू केली आणि वयाच्या विशीत गायनकलेला प्रारंभ केला, तेव्हा भारतीय अभिजात संगीतात ठुमरी या गायनशैलीला प्रस्थापित होऊन शतक उलटले होते. वाजिद अली शाह या सम्राटाने १८५०च्या सुमारास ठुमरी लोकप्रिय होण्यासाठी खूप प्रयत्न केले. ख्याल, धृपद गायकीच्या तुलनेत ठुमरी ही शारीर. ख्याल वा धृपद सादरकर्ता रागस्वरांची चौकट पाळत श्रोत्यांस आध्यात्मिक आनंदाच्या अवकाशात घेऊन जातो. ठुमरीस असे करून चालत नाही. तिला जमिनीवरच राहावे लागते. आणि जमिनीवरच राहाणे आले की त्यासाठी आवश्यक ते सर्व करावे लागते.

गिरिजा देवी यांचे मोठेपण हे की जमिनीवर राहण्यासाठी आवश्यक ते हलकेसलके काहीही न करता त्यांनी ठुमरीस अलगद वर उचलून घेतले. त्यांच्याआधी सिद्धेश्वरी देवी वा बेगम अख्तर यांनी ठुमरीस ही उंची देऊ केली होतीच. पण या दोघींपेक्षा गिरिजा देवींचा बाज पूर्णपणे वेगळा. बेगम अख्तर यांची ठुमरी नंतर छळते. अस्वस्थ करते. श्रोत्याला पछाडते. सैंया गए परदेस.. असे जेव्हा अख्तरीबाई गातात तेव्हा तो बहुधा परत येणार नाही, अशी एक कातरता मनात जागी होते. पण गिरिजा देवींची ठुमरी तसे काही करीत नाही. ती आनंद देते. बरसन लागी बदरिया.. असे जेव्हा गिरिजा देवी गातात तेव्हा पाऊस पडणार आणि त्यात चिंब भिजायला मिळणार याची शाश्वती असते. अख्तरीबाईंच्या ठुमरीत पावसाचे वातावरण तयार होते, पण तो बरसत नाही आणि बरसला तरी त्या विरहिणीला काही तो भिजवत नाही. गिरिजा देवींचा पाऊस आपल्याला भिजवतो. याचे कारण त्यांच्या समृद्ध बालपण आणि पुढील आयुष्यात असावे. एका जमीनदाराच्या पोटी जन्माला आलेली ही तिसरी लेक. आई देवदासी. पण वडील त्या काळच्या मानाने पुढारलेले म्हणायचे. लेकीला त्यांनी गाणे तर शिकवलेच पण घोडेस्वारी, पोहणे आदींतही तरबेज केले. लहानपणी मी मुलासारखीच वाढले, असे गिरिजा देवी म्हणत. पुढे एका धनदांडग्या शेठजींच्या त्या मनात बसल्या आणि त्यांच्या पत्नीही झाल्या. फक्त त्यांची अट त्या वेळी एकच होती. लोकांसमोर गायचे नाही. गिरिजा देवींनी त्या काळी ती अट पाळली. त्या आकाशवाणीसाठी गाऊ लागल्या. साक्षात महात्मा गांधी यांनी त्यांच्या आवाजाचे कवतिक त्याकाळी केले होते. पूरब अंगाने गायल्या जाणाऱ्या बनारस घराण्याच्या गिरिजा देवी या आघाडीच्या कलावंत. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत स्वर हाच त्यांचा ध्यास आणि त्यातून व्यक्त होणाऱ्या भावांची पूजा हेच त्यांचे ध्येय. ठुमरीसारख्या ललित संगीतात त्यांनी अपूर्व भावदर्शन घडवून रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. ख्याल गायकीतील अभिजातता ठुमरीमध्ये वेगळ्या अंगाने येते. ठुमरीला भावनांची बैठक असते. त्यातील शब्द आणि त्यांना जोडून येणारे स्वर सतत काही सांगत असतात. शास्त्रकाटय़ाची कलात्मक तटस्थता तिथे उपयोगाची नसते. गिरिजा देवींनी ठुमरीला स्वरांनी असे काही सजवले की ती स्वत:ची राहिली नाही. ठुमरीला असे सभ्य, सालंकृत करण्याचे श्रेय गिरिजा देवींचे. अनावश्यक, हीन अशा स्वरूपाचे शब्द वा भाव उगाचच व्यक्त करणे हा प्रकार ठुमरीत काही काळ झाला. गिरिजा देवींनी हे असे कधीही होऊ दिले नाही. त्यांच्या ठुमरीचा पदर कधीही ढळला नाही आणि तरीही ती रसिकांना पुन:पुन्हा मागे वळून पाहण्यास भाग पाडत राहिली. शब्दांच्या अक्षरातील काना, मात्रा, वेलांटय़ांमध्ये लपून राहिलेले सगळे भाव स्वरात चिंब भिजवून काढण्याचे कसब गिरिजा देवींच्या गायनात होते.

त्यांना गाताना पाहणे हादेखील एक अनुभव असे. पांढरेशुभ्र केस, त्या पांढऱ्या रंगास जवळचा वाटेल अशाच रंगाची साडी, खास बनारसी विडय़ाने रंगलेले ओठ, नाकातली हिऱ्याची चमकी आणि कानातल्या हिरकुडय़ा त्यांच्या गायनातील स्वरदर्शनाला जी झळाळी देत, त्याने त्यांचे गायन अधिकच देखणे होत असे. बऱ्याचदा त्यांच्या गळ्यातील स्वरकिरण आणि अंगावरच्या हिऱ्यांतून परावर्त होणारा प्रकाशकिरण एकाच वेळी रसिकांचे कान आणि डोळे दिपवत. बनारस घराण्यातील चौमुखी गायन त्यांच्या गळ्यातून असे काही अवतरत असे, की दादरा, चैती, होरी, कजरी आणि ठुमरी यांसारखे संगीत प्रकार हे केवळ त्यांच्यासाठीच निर्माण झाले असावेत की काय, असे वाटावे. ठुमरीतली नजाकत, त्यातील भावदर्शन आणि त्याच्या जोडीला मुरकी, खटके यांसारखे अलंकार यामुळे त्यांची ठुमरी जगभर लोकप्रिय झाली. तिला मानाचे स्थान मिळाले. ठुमकत चालताना, पायातील पैंजणे ज्या नृत्यमय रीतीने वाजतात, तो ठुमरीचा खरा भाव. ती कथक या उत्तर हिंदुस्थानातील नृत्यकलेबरोबर विकसित झाली. नृत्याला ठुमरीने नवी झळाळी दिली. पण गिरिजा देवींचे मोठेपण असे, की त्यांनी ठुमरीला स्वायत्तता मिळवून दिली. नृत्याशिवाय तिचा स्वतंत्र आविष्कार तेवढाच कलात्मक होऊ  शकतो, याची जाणीव करून दिली. तिला मैफलीत स्थान मिळवून दिले. मोठा कलाप्रेमी काळ होता तो. गिरिजा देवींनी तो पुरेपूर उपभोगला आणि आपल्या रसिकांनाही तो उपभोगू दिला. पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी अशांसारख्या कलाजाणिवा विकसित झालेल्या राजकारण्यांना पदावर असताना देखील गिरिजा देवींच्या ठुमरी बैठकींचा मोह आवरत नसे आणि ते आले म्हणून गिरिजा देवीही आपला बाज सोडत नसत. त्यांना ठाऊक होते ठुमरी साम्राज्याच्या आपणच सम्राज्ञी आहोत.

अलीकडेच दिल्लीत त्यांची बैठक झाली. गिरिजा देवी घनघोर गायल्या. त्या बैठकीस दु:खाची झालर होती. किशोरीताईंचे नुकतेच निधन झालेले. तेव्हा त्यांचा विषय निघणे अपरिहार्यच होते. गिरिजा देवी इतकेच म्हणाल्या : मुझसे छोटी थी, फिर भी पहले चली गई. नंतर गायल्या. वयाचे वजन फेकून देऊन गायल्या. भैरवी घेतली ठुमरीचा दंश झालेल्या नबाब वाजिद अली शहा यांचीच, अजरामर अशी : बाबुल मोरा.. थांबल्या आणि म्हणाल्या :  मालूम नहीं फिर कभी यहाँ आ पाऊंगी या नहीं. बरोबरच होते त्यांचे. त्यांना परत दिल्लीत काय, कुठेच जायला जमणार नव्हते. कारण त्या गेल्याच. किशोरीताई, एम बालमुरलीकृष्ण, सईदुद्दिन डागर असे बरेच आणि आता गिरिजा देवी. नैहर छूटो ही जाए.. हे सत्य तेवढे उरले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian classical singer girija devi