बोलबाला संघाचा आणि काम एकाच व्यक्तीचे, ही विजयाकडे नेणारी वृत्ती ठरू शकत नाही..

महानायक ठरवला गेलेला खेळाडूच मोठा होत राहातो. संघाचा खेळ कसा होता, याऐवजी बाकीच्या बाबींनाच महत्त्व मिळत राहाते. संघातील या सांघिक भावनेच्या अभावाचीच प्रचीती भारताच्या ताज्या कामगिरीतून आली..

क्रिकेट हा मनोरंजनाचा प्राणवायू मानल्या जाणाऱ्या भारतात, तेही मुंबईसारख्या आर्थिक राजधानीत वानखेडे स्टेडियमसारख्या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघ उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडण्यात अपयशी ठरणे, म्हणजे घोर शोकांतिकाच. तिचा दुखवटा आठवडाभराने सुरू होणाऱ्या आयपीएलपर्यंत तरी नक्कीच पाळला जाईल. ३१ मार्चला सर्व कंपन्या आपला वार्षिक आर्थिक ताळेबंद मांडतात. आपल्याकडे क्रिकेटचेही कंपनीकरण झाले असले, तरी याच दिवशी भारताच्या विश्वचषकाच्या वाटचालीचा ताळेबंद मांडून हिशेबही पूर्ण होईल, असे कोणासही वाटले नव्हते. एकदिवसीय प्रकारात १९८३ आणि २०११ तर ट्वेन्टी-२० मध्ये पहिलेवहिले म्हणजे २००७ चे विश्वविजेतेपद भारताने जिंकले होते. या वेळीही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी सर्वानाच अपेक्षा होती. परंतु क्रिकेटसारख्या खेळात अपेक्षा आणि सदिच्छांपेक्षा सांघिक वृत्ती आणि कृतीही महत्त्वाची असते. या कृती व वृत्तीमुळेच इंग्लंड आणि वेस्ट इंडिजचे संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले. सांघिक क्षमता आणि एकोपा नसेल, तर तुमच्या संघाची उत्तराखंडासारखी अवस्था होऊ शकते, हे यंदाच्या ट्वेंटी-२० विश्वचषकातील पाकिस्तानच्या कामगिरीकडे पाहून कुणीही सांगू शकते. पण भारताच्या वृत्तीचा पट काढू गेल्यास तो म्हणजे विराट कोहलीची मुख्य भूमिका आणि महेंद्रसिंग धोनीचे दिग्दर्शन यांचा चित्रपट असे म्हणता येईल. बाकीच्या बहुतेक खेळाडूंची या विश्वचषकातील भूमिका ही साहाय्यक कलावंतांपेक्षा वेगळी नव्हती. शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांचे अपयश उपांत्य फेरीत पोहोचेपर्यंत सहन केले गेले. सुरेश रैना, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, आशीष नेहरा हे धोनीच्या (सध्या बरखास्त अवस्थेतील) चेन्नई सुपर किंग्जमधील हुकमी मोहरे. ते असतील तरच मी स्पर्धा जिंकून देऊ शकेन, अशा अटींसह संघबांधणी झाली होती. अजिंक्य रहाणेवर विश्वासच ठेवायला धोनी तयार नव्हता. त्याचा परिणाम म्हणून भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासही झगडावे लागले. अखेर उपांत्य सामन्यात त्याने तो ठेवला. रहाणेने त्याचे सोनेही केले. नागपूरला फिरकीचे चक्रव्यूह उलटले. मग कोलकात्यात पाकिस्तानविरुद्ध प्रारंभीच्या पडझडीनंतर विराटनेच तारले. बंगळुरूत अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला थरार धोनीच्या कुशल नेतृत्वामुळे जिंकला. पुन्हा मोहालीत विराटच्या फलंदाजीमुळे भारताला जेमतेम उपांत्य फेरी गाठता आली. इथे पुन्हा विराटचीच बॅट भारताला धावसंख्या उभारून देऊ शकली.

सचिन तेंडुलकर यांच्या निवृत्तीनंतर क्रिकेटप्रेमाची लाट ओसरून अन्य काही खेळांना बरे दिवस येऊ लागले होते. कारण क्रिकेटरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा नवा नायक मिळत नव्हता. त्यानंतर आता सव्वादोन वर्षांनी क्रिकेटमधील नवनायकाचा शोध जणू लागला, आणि भारताकडे क्रिकेटचा संघ नसून खेळाडू आहेत, हेच पुन्हा दिसण्याचा मार्गही मोकळा झाला. एरवी एकेकटय़ा खेळाडूचे कौतुक ठीकच. सचिनची खेळी तर चाहत्यांना मंत्रमुग्ध करी. मात्र आकडेवारी पाहिली की जाणवते सचिनच्या फलंदाजीने भारताला जिंकून दिल्याची उदाहरणे मोजकीच आहेत. याउलट विराटच्या आकडेवारीत विजयाचे प्रमाण हे मोठे आहे. सचिनचे जागतिक क्रिकेटमधील विश्वविक्रम एखादा भारतीयच मोडेल आणि तो विराटच असेल, असे भाकीत भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केले होते. दहा वर्षांपूर्वी सामन्याच्या दिवशी पहाटे वडील गेल्याची वार्ता कळल्यावरही निधडय़ा छातीने तो सामन्यात खेळला आणि त्याच्या खेळामुळे दिल्लीचा त्याचा संघ कर्नाटकविरुद्धची लढत अनिर्णीत राखू शकला होता. आता पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजसारख्या आव्हानात्मक प्रतिस्पध्र्याविरुद्धच्या त्याच्या खेळींनीच त्याला नायकत्व मिळवून दिले. विराटचा या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पराक्रम हा सहजगत्या अधोरेखित होतो तो असा. २०११ च्या विश्वचषकात युवराज सिंगसुद्धा असाच तेजाने तळपला होता. त्यामुळेच भारताला विश्वविजेतेपद पटकावता आले होते. आता विराट तळपतो आहे, हे पाहून विंडीजविरुद्ध विराटलाच अखेरचे षटक देण्यात आले होते. पण त्याला महानायक होता आले नाही आणि तेच सध्या बरे. पण यातूनही भारतीय संघ पुन्हा एक-फटकेबाजानुवर्ती होतो की काय अशी शंका निर्माण झाली आहे. विश्वचषकाचा गोवर्धन जिंकण्यासाठी एखाद-दुसऱ्या विजयीवीराची करंगळी नव्हे, तर सांघिक हात लागावे लागतात. फुटबॉलमध्ये मॅराडोना, पेले यांच्यासारख्या महानायकांनी सांघिक खेळातसुद्धा आपल्या एकटय़ाच्या बळावर संघाला जग जिंकून दिले होते. तसे क्रिकेटमध्ये होत नाही आणि महानायक ठरवला गेलेला खेळाडूच मोठा होत राहातो. संघाचा खेळ कसा होता, याऐवजी बाकीच्या बाबींनाच महत्त्व मिळत राहाते. संघातील या सांघिक भावनेच्या अभावाचीच प्रचीती भारताच्या कामगिरीतून आली. विश्वचषक आपणच जिंकू असा दृढविश्वास जोपासणाऱ्या भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध उपांत्य फेरीत ठेच लागली ती त्यामुळेच.

याचे आत्मपरीक्षण न करता, बोल लावला जाईल तो मुंबईतील एका क्रीडा प्रेक्षागाराला. वानखेडे स्टेडियमच्याच साक्षीने भारताने विश्वचषक जिंकला, इथेच सचिन तेंडुलकरसारख्या क्रिकेटच्या नभांगणातील ध्रुवताऱ्याने निरोप घेतला, म्हणून याच वानखेडेवर भारतासाठी सकारात्मक इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी भावोत्कट भ्रमावस्था भारतीय क्रिकेटरसिकांमध्ये निर्माण झाली होती. पण वानखेडेच्या इतिहासातील हा आणखी एक पराभव ठरला. १९८७ मध्ये कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना खेळला होता. ग्रॅहम गूचच्या शतकी खेळीनंतर भारताची फलंदाजी कोसळली होती. मग १९८९ मध्ये नेहरू चषक क्रिकेट स्पध्रेत विंडीजविरुद्धचीच उपांत्य लढत भारताने गमावली होती. अगदी सहा महिन्यांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक सामना वानखेडेवर झाला. पण आफ्रिकेच्या धावांच्या डोंगरापुढे भारताने शरणागती पत्करली.

भारतात, येथील मातीवर म्हणजे खेळपट्टय़ांवर विश्वचषक होत असल्याने भारतीय क्रिकेटने खेळपट्टी हा मुद्दा नको तितका महत्त्वाचा केला. तसे भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्टीच हवी, असे एक प्रकारे संकेतच सर्व खेळपट्टी-संधारकांना, म्हणजे क्युरेटरना देण्यात आले आहेत. त्यामुळेच गेल्या ऑक्टोबरात आफ्रिकेची लढत गमावल्यानंतर शास्त्रीबुवांनी सुधीर नाईक यांच्या नावाने शंखनाद केला होता. धोनी असो किंवा शास्त्री, खेळपट्टी आम्हाला फिरकीला पोषक हवी, हा एकच होरा त्यांनी जोपासला. आयसीसीचे खेळपट्टी सल्लागार अँडी अ‍ॅटकिन्सनचे आजारपण हेसुद्धा भारताच्या पथ्यावर पडले. त्यामुळे दरम्यानच्या काळात आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांना वाटाण्याच्या अक्षता लावत भारतीय क्युरेटर्सना खास आदेशच देण्यात आले होते. भारताचे खेळपट्टी प्रमुख दलजीत सिंग स्वत: उपांत्य फेरीसाठी चंदिगढहून मुंबईला आले. पण शेवटी मुद्दा येतो तो सांघिक कामगिरीचा. वातावरण, खेळपट्टी हे अनुकूल घटकसुद्धा काय किमया साधणार?

वेस्ट इंडिजचे ट्वेन्टी-२० क्रिकेट प्रामुख्याने आयपीएलच्या मुशीत वाढले. मायदेशात मानधनासाठी झगडणाऱ्या येथील गुणवान खेळाडूंना आयपीएलनेच आर्थिकदृष्टय़ा समृद्ध केले आहे. मुंबईतील वातावरणाला सरावलेल्या मुंबई इंडियन्सच्या लेंडल सिमन्सला वेस्ट इंडिजच्या उपांत्य विजयाचे श्रेय मिळेलही, पण इंग्लिश संघाला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात जेसन रॉय, जोस बटलर आणि जो रूट या तिघांचा वाटा आहे. रविवारी ईडन गार्डन्सच्या साक्षीने जगज्जेता ठरणार आहे. तूर्तास, इंग्लिश आणि कॅरेबियन यापैकी कोणाच्या वृत्तीमुळे जगज्जेतेपदाची पुनरावृत्ती होणार, याचे औत्सुक्य कायम आहे.