श्रेयडल्ला ही आपल्याकडे जणू राष्ट्रीय महामारी ठरू लागली आहे.. प्रक्रिया, खेळाडूंचे कष्ट समजून न घेता टाळ्या वाजवायला किंवा सांत्वन करायला सगळे पुढे!

नव्या नायकांसाठी आसुसलेले नागरिक आणि त्या नायकांचे जनकत्व घेण्यास टपलेले सत्ताधीश या दोघांनाही समान अंतरावर ठेवून भारताच्या टोक्यो ऑलिम्पिकमधील कामगिरीचा जमाखर्च मांडायला हवा. तसे करण्याची कारणे दोन. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०१३ चे भाषण; हे एक. भारत सरकार केवळ ‘सोच’ बदलून ‘पाच-दस’ पदके कशी सहज मिळवू शकेल यावर मोदी यांनी त्यात गहन मार्गदर्शन केले होते. त्या सोच बदलास सात वर्षे झाल्यानंतर किती पदकवाढ झाली हे पाहणे. आणि दुसरे म्हणजे संभाव्य पदकविजेत्याच्या घरी नागरिकांचा जल्लोष होत असताना त्याच ऑलिम्पिकमधील पदक हुकले म्हणून दलित खेळाडूच्या कुटुंबाची निर्भर्त्सना करणारे आपण देश म्हणून काय दर्जाचे ‘खेळाडू’ आहोत याचीही जाणीव आपणास या जमाखर्चाने करून द्यायला हवी. सध्याच्या उन्मनी वातावरणात हे काम तसे जोखमीचे. वाहून जाण्यास सदैव तत्पर समाजात पाय रोवून तार्किक विचार करण्याची सवय आणि गरज लोकांस असणे तसे अवघड. पण ती लावायला आणि निर्माण करायला हवी. ऑलिम्पिक पदक तालिकेतील आपले स्थान त्याची जाणीव करून देते.

Vinesh, Anshu and Reetika earn three Olympic quota places
विनेश, अंशु, रितिकाला ऑलिम्पिक कोटा
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद

क्रीडा संस्कृती पुरेशी न रुजलेल्या भारतासारख्या देशात खेळाडूंसाठी एक फसवा कालखंड असतो. अलीकडेच एका खेळाडूवर आधारित चरित्रपटात याविषयी मनोज्ञ उल्लेख आहे – मोठी स्वप्ने न पाहणे हा दोष नाही. छोटीच स्वप्ने पाहणे आणि ती पूर्ण होण्यात अल्पसंतुष्ट राहणे हा खरा दोष आहे! टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी वेटलिफ्टिंगसारख्या ताकदीच्या खेळात रौप्यपदक जिंकणारी इवलीशी मीराबाई चानू ते परवा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भालाफेकीमध्ये असामान्य कामगिरीने सुवर्णपदक जिंकणारा उमदा नीरज चोप्रा हे त्या फसव्या वाटेच्या वाटेला गेले नाहीत. त्या वाटेला जाण्याचे टाळले पी. व्ही. सिंधूने, रवी दाहियाने, लवलिना बोगरेहाइनने, बजरंग पुनियाने आणि पुरुष व महिलांच्या हॉकी संघांनीही. चानूच्या सुरुवातीच्या यशानंतर ऑलिम्पिकमधील भारताची कामगिरी नंतर काहीशी निस्तेजच बनली होती. ईन मीन तीन पदकांच्या पलीकडे मजल जात नव्हती. पण शेवटच्या काही दिवसांमध्ये थोडीफार पदके आणखी मिळाली आणि नीरजच्या सुवर्णपदकाने त्यावर कळस चढवला. अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकण्याची कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय. शिवाय अ‍ॅथलेटिक्समध्ये स्वतंत्र भारताच्या खेळाडूने एखादे पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ. निव्वळ अभूतपूर्व असेच या कामगिरीचे वर्णन करावे लागेल. ऑलिम्पिक सुवर्णपदकाची नाळ भारताच्या बाबतीत केवळ हॉकीशीच जोडली गेली होती. नवीन सहस्रकात २१ वर्षांमध्ये दोन सुवर्णपदके वैयक्तिक प्रकारात मिळणे ही नवलाई खरीच. पण छोटी उद्दिष्टे ठेवून त्यांत समाधान मानणारी ही फसवी, निसरडी वाट. तिला बगल देणेच गरजेचे. अल्पसंतुष्ट आनंदोत्सवात त्याचा विसर पडण्याचा धोका अधिक.

याचे कारण आजवर कधीही कोणत्याही ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला दोन आकडी पदके मिळवता आलेली नाहीत. २०१२ मधील लंडन ऑलिम्पिक आणि नुकतेच संपलेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे सहा आणि सात पदके ही ‘आपली’ सर्वोत्तम कामगिरी. ती सर्वोत्कृष्ट तर नाहीच नाही, उत्कृष्टही नाही तर निव्वळ सुमार. आता यावर ही पदके मिळवणाऱ्यांना फोन करकरून, समाजमाध्यमी ढोल वाजवून वा नंदीबैल समर्थकांना माना डोलावायला लावून ती महान असल्याचा देखावा कोणी कितीही केला गेला तरी हे वास्तव लपत नाही. त्याआधी १९९६, २०००, २००४ या स्पर्धामध्येच एकेकच पदक, २००८ मध्ये तीन आणि गेल्या खेपेला रिओ ऑलिम्पिकमध्ये अवघी दोन! गतशतकाचे संदर्भ वेगळे, तो ताळेबंद आता मांडणे समयोचित नाही. पण अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि प्रशिक्षण सुविधा अधिक सहजपणे उपलब्ध होऊ लागल्यानंतरही परिस्थिती पाच पदकांच्या पुढे कशीबशीच सरकते हे कोणासाठीही फार भूषणास्पद लक्षण नाही. नेमबाजीमध्ये पहिलेवहिले सुवर्णपदक मिळाले, पण २०१६ आणि २०२० स्पर्धेत नेमबाजांची पाटी कोरीच. कारण काय, तर नेमबाजी संघटना, नेमबाज आणि प्रशिक्षकांमध्ये विसंवाद. टोक्योतही नेमबाजांच्या फसलेल्या प्रयत्नांनंतर ते खेळाडू आणि संघटना यांच्यातील जो काही बेबनाव समोर आला तो देशास लाजिरवाणाच होता. आताही बॅडमिंटनमध्ये सायना-सिंधूनंतर कोण, याचे उत्तर शोधण्याची गरज आपणास नाही. कारण आपण सगळेच सात पदके साजरी करण्यात मश्गूल! महाराष्ट्र, गुजरातसारख्या उद्योगप्रधान राज्यांतून अधिक संख्येने क्रीडापटू का घडू शकत नाहीत, याची उत्तरे शोधली जात नाहीत.

आपल्याकडे खेळाडू व्यवस्थेमुळे नव्हे, तर व्यवस्थेबाहेर राहूनच प्रामुख्याने घडावेत हे आपले जुने दुखणे. त्यात फरक पडत आहे. हरियाणा, पंजाब, ओडिशा या मोजक्या राज्यांनी संस्थात्मक, संघटनात्मक सुविधांची उभारणी केलेली दिसते. पदकविजेत्या एक सोडून सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक परदेशी होते ही बाबही लक्षात घ्यावी अशी. देशांतर्गत आवर्जून कौतुक करायला हवे ते ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे. त्यांनी हॉकीत केलेल्या गुंतवणुकीची फळे आता दिसू लागली आहेत. पण त्यातही ते अधिक कौतुकास पात्र ठरतात कारण हे सारे मिरवण्याचा ओंगळ प्रयत्न करणाऱ्या राजकारण्यांपासून ते स्वत:स दूर ठेवू शकतात म्हणून. त्यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे केलेले कौतुक हे अत्यंत सभ्य आणि संयत होते. पण इतरत्र आनंदच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, श्रेयडल्ला ही आपल्याकडे जणू राष्ट्रीय महामारी ठरू लागली आहे! प्रक्रियेचा, खेळाडूंच्या कष्टाचा किंवा कुवतीचा कोणाला पत्ता नाही, तो समजून घेण्याची गरज नाही. पण जिंकल्यानंतर टाळ्या वाजवायला किंवा हरल्यावर सांत्वन करायला सगळे पुढे! आताची ‘विक्रमी’ कामगिरीही सध्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा परिपाक असल्याचा डंका पिटायला आता स्तुतिभाटांमध्ये स्पर्धा लागेल. या ‘देदीप्यमान’ कामगिरीमागे सरकारी प्रयत्न होते, तर पदकसंख्या फिरून फिरून सहावरून फक्त एकाने वाढून सात होती ना! ही परिस्थिती १९९६ मध्ये, २००८ मध्ये आणि २०२१ मध्ये तिथल्या तिथेच आहे. यातील ‘वाढ’(?) तशी नैसर्गिकच. ‘सोच’बदल वगैरे नुसत्या वल्गना.

अर्थात काही सकारात्मक, आनंददायी असे टोक्योतून निश्चितच गवसले. मीराबाई चानू, लवलिना बोगरेहाइनने ईशान्य भारतातील प्रगत आणि चिवट महिला संस्कृती मेरी कोमपुरती सीमित नसल्याचे सिद्ध केले. सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्येही कुस्तीगीर पदकविजेते ठरले. बॅडमिंटन, बॉक्सिंग हे हमखास पदक जिंकून देणारे खेळ ठरू लागले आहेत. नेमबाजी, तिरंदाजीमधील खेळाडूंमध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे की फाजील आत्मविश्वासाचा शिरकाव झाला आहे याचा शोध घ्यावा लागेल. अ‍ॅथलेटिक्समध्ये कधी मिल्खा, कधी उषा असे खेळाडू अधूनमधून चमकायचे. पण नीरज चोप्राने देशातील छुप्या गुणवत्तेचा दर्जा दाखवून दिला. असे काही मोजके खेळ हेरून त्यांच्यात गुंतवणूक करावी लागेल. चीन, अमेरिका, रशिया, जपान, इंग्लंड आदी विविध खेळांमध्ये ढीगभर पदके जिंकतात, ते अशा गुंतवणुकीनंतरच! तेथील सत्ताधीश ऑलिम्पिकला जाणाऱ्या खेळाडूंना ‘मार्गदर्शन’ करत नाहीत, आणि शुभेच्छा देण्याच्या मिषाने संभाव्य श्रेयात मिरवण्याची नोंदणी करत नाहीत. कारण ते जाणतात –  अंतिमत: हे खेळ आहेत. ते खेळासारखे असायला हवेत आणि खेळाच्या मैदानापुरतेच त्याचे महत्त्व हवे. या समंजसपणामुळे भाराभर पदकविजेत्या देशांतील खेळाडूंना सरकारचे सतत आभार मानावे लागत नाहीत. आपल्याकडे ती संस्कृती निष्कारण बोकाळते आहे. हा विकार वेळीच थोपवला नाही, तर पदकांच्या एखाद-दुसऱ्या बेरजेवरसुद्धा आपले मिरवणे तेवढे होत राहील. ऑलिम्पिक खेळ संपले.

आता आभारप्रदर्शनाच्या ऑलिम्पिकचा उच्छाद सुरू होईल. तो टाळण्यात सुसंस्कृतता आणि अधिक पदकांची हमी आहे.