आजचा अग्रलेख : घरचा आहेर..

माको तिचे नाव- पेशाने वकील असलेल्या आणि अमेरिकेतील एका वकिली कंपनीत नोकरी करणाऱ्या केइ कोमुरो या तरुणाशी विवाहबद्ध झाली

इंग्लंडचा प्रिन्स हॅरी किंवा जपानची (माजी) राजकन्या माको.. या दोघांनी आपापले जोडीदार निवडताना प्रेम- विश्वास यांना महत्त्व देऊन राजघराणे गौण मानले..

दिवाळसणाच्या निमित्ताने नव्या जावयाचे कौतुक करण्याची रीत घरोघरी असतेच, ऐपत पाहून पहिल्या दिवाळसणाला देणेघेणेही होत असते. हुंडा देणे, वरदक्षिणा घेणे हा गुन्हा मानणारा कायदा १९६१ पासून आपल्या देशात अस्तित्वात असला, तरी आपखुशीने तसेच आपुलकीने सोन्याचांदीच्या भेटवस्तू देणे हा रीतिरिवाजाचा भाग म्हणून कुणाला त्यात काही गैर वाटत नाही. पण ‘प्रगत आशियाई देश’ म्हणवणाऱ्या जपानमध्ये हुंडय़ाची प्रथा आजही अस्तित्वात असल्याची चर्चा तेथील राजकन्येच्या विवाहानिमित्ताने गेल्या आठवडय़ात अगदी जगभर झाली! ही राजकन्या – माको तिचे नाव- पेशाने वकील असलेल्या आणि अमेरिकेतील एका वकिली कंपनीत नोकरी करणाऱ्या केइ कोमुरो या तरुणाशी विवाहबद्ध झाली, त्यांच्या विवाहास राजघराण्याने परवाच्या मंगळवारीच अधिकृत मान्यता दिली. त्यानिमित्ताने ज्या अनेक गोष्टी उघड झाल्या त्यापैकी महत्त्वाची अशी की, माको हिने जर जपानी उमराव घराण्यांपैकीच एखादे तोलामोलाचे स्थळ निवडले असते, तर तिला १४ कोटी जपानी येन (किमान नऊ कोटी बावीस लाख ८३ हजार रुपये) इतका हुंडा मिळाला असता. त्यावर पाणी सोडून तिने लग्न केले. आजवर जपानी राजघराण्यातील अनेक कन्यांचे विवाह झाले, तेव्हा त्यांनाही काहीएक हुंडा दिला गेला असणारच. पण त्याची वाच्यता कधी झाली नव्हती आणि माको हिचे लग्नच निराळे असल्याने ही चर्चा होऊ लागली.

केवळ हुंडा नाही एवढेच या लग्नाचे वेगळेपण नव्हते. माकोचा पती केइ कोमुरो हा उमराव घराण्यातला नाही, साध्या- मध्यमवर्गीय जपानी कुटुंबातला हा तरुण; त्यामुळे माकोला तिचे राजकन्या हे बिरुद सोडावे लागले. अर्थात, एरवीदेखील ब्रिटनच्या राणीप्रमाणे माको काही राणी झाली नसतीच, कारण जपानमध्ये २५० वर्षांपूर्वीपर्यंत जरी महिलांना राज्यकारभाराची मुभा होती, तरी पुढे १८८९ सालच्या राज्यघटनेने ती काढून घेतली. जपानी सम्राटपदावर केवळ पुरुष वारसच नेमले जाऊ शकतात, असे १८८९ पासून ठरले. म्हणजे एवीतेवी माको राजघराण्यात असती काय नि नसती काय, काय फरक पडणार होता? या माकोचे काका-आजोबा, भूतपूर्व सम्राट हिरोहितो यांना पाच बहिणी होत्या. त्या साऱ्याजणी उमरावपत्नी झाल्या. माकोची चुलतबहीण आणि विद्यमान सम्राट अकिहितो यांची मुलगी आइको ही एकुलती एक; म्हणून अकिहितोंनी आपल्या भावाला- अकिशिनो यांना राजगादीचा वारसदार घोषित केलेले आहे. या अकिशिनोंच्या तिघा अपत्यांपैकी माको मोठी. तिच्या पाठीवर पुन्हा बहीणच. मग, माको १५ वर्षांची असताना अखेर तिला भाऊ झाला.. जपानी राजघराण्याला वारस मिळाला. हा माकोचा भाऊ आता (तो जपानी असल्यामुळे लाक्षणिकच अर्थाने) मिसरूड फुटण्याच्या वयात आला आहे आणि तो यथास्थित जगणार, हे स्पष्ट झाल्याने जपानी परंपरा टिकण्याची हमीच मिळालेली आहे. माको मात्र या पुरुषप्रधान परंपरेला कायमचा सायोनारा करून अमेरिकेला निघाली आहे. अठरापगड हा शब्दसुद्धा थिटाच पडेल, अशा न्यू यॉर्क शहरात पतीसह राहणार आहे. प्रसारमाध्यमांनी या नवपरिणित दाम्पत्याला ‘आमच्याशी बोला’ अशी गळ घातलीच, तेव्हा ‘सध्या आम्ही भाडेतत्त्वावर तीनखणी घरातच राहू. स्वखर्चानेच संसार करू’ असे तिचा नवरा केइ म्हणतो आहे आणि लग्नावेळी आकाशी रंगाचा साधासाच स्कर्टवजा पोशाख, गळ्यात-कानांत फक्त मोतीच ल्यालेली माको या साधेपणाचे मूर्तिमंत दर्शन घडवते आहे, हेही जगाने पाहिले. माको आणि केइ यांची पहिली भेट टोक्योच्या इंटरनॅशनल ख्रिश्चन युनिव्हर्सिटीत झाली, तिथे एकत्र शिकताना त्यांचे प्रेम जुळले आणि २०१७ मध्येच दोघांनी लग्नाचा इरादा जाहीर केला, हे तर आधीपासूनच माहीत होते. पण मग लग्नाला तीन वर्षे का लागली? प्रेमासाठी साधेपणाने लग्न करणारी, साधेच आयुष्य स्वीकारणारी ही राजकन्या इतकी वर्षे थांबली; याचे कारण हुंडय़ाशीच संबंधित, पण तो हुंडा केइ कोमुरो याच्या आईने तिच्या होणाऱ्या दुसऱ्या नवऱ्याकडून, २०१० पासून घेऊन ठेवलेला! ती रक्कम तिने परत करावी, असा तगादा माकोच्या त्या भावी सासूकडे, या सासूचा पती न झालेल्या कुणा पुरुषाने लावला होता. हा वाद मिटेपर्यंत माकोला थांबावे लागले. आजही कुजबुजखोर प्रसारमाध्यमे म्हणताहेत की तो वाद मिटलेलाच नाही.

त्यापुढली कुजबुज ही एकंदर कोमुरो कुटुंबीय पैशाच्या बाबतीत बरे दिसत नाहीत, ही माको जाते आहे खरी, पण तिचे लग्न किती काळ टिकणार.. इथपर्यंत गेलेली असणे हेसुद्धा साहजिकच म्हणावे लागेल. ब्रिटनच्या राजघराण्यात वारसा हक्कावरील दावा सोडून, मेगन मर्केलच्या प्रेमाखातर अमेरिकेत संसार करू लागलेला प्रिन्स हॅरी याच्याहीबद्दल अशीच कुजबुज होत असते. मेगन मर्केल ही अखेर अभिनेत्री. तिच्याशी प्रिन्स हॅरीचा संसार तो किती काळ टिकणार, वगैरे कुजबुज होतच असते. त्याकडे दुर्लक्ष करणे, हाच उपाय आता प्रिन्स हॅरीप्रमाणे, जपानची माजी राजकन्या माको हिलाही करावा लागेल असे दिसते.

हॅरी आणि माको यांची तुलना करणे योग्य नाही, पण दोघांमधील साम्यस्थळे पाहिल्यास प्रेमाची महती कुणालाही पटावी! हॅरीने वारसाहक्क सोडून दिला आणि ‘डय़ूक ऑफ ससेक्स’ म्हणजे इंग्लंडच्या एका तालुकावजा परगण्याचा नामधारी प्रमुख म्हणून राहणे स्वीकारले. मेगन मिश्रवंशीय असल्याने, ‘यांचे मूल काळे होणार’ अशा कुजबुजीला हॅरीही सामोरा गेला. अशाही स्थितीत, २०१७ पासून हॅरीशी मेगनचा संसार सुरू राहिलेला आहे. माको २०१७ पासून केइसाठी थांबली, तिने तर लग्न होण्यापूर्वीच राजघराण्याशी आर्थिक संबंधही नाकारले आणि दुसऱ्या देशात, साधेपणाने जगण्याचे केइचे निमंत्रण विश्वासाने स्वीकारले. अखेर परस्परविश्वास हाच प्रेमाचा खरा आधार, हे या दोन्ही बहुचर्चित जोडप्यांनी दाखवून दिले.

पण हे साम्य इथवरच. माको त्याहीपुढे एक पाऊल गेली. ते पाऊल तसे अदृश्यच, किंबहुना तिच्याकडूनही अभावितपणेच टाकले गेलेले ठरते. जपानची परंपराप्रियता हा फार मिरवण्याचा विषय असतो. प्रामाणिकपणा हीसुद्धा जपानी परंपराच आणि राजेपद, त्या एवढय़ाशा देशाच्या राजाला सम्राट म्हणणे, सम्राटपद पुरुषप्रधानतेच्या दावणीलाच बांधणे, मुलींना हक्क नाकारणे आणि सालंकृत कन्यादान वा हुंडय़ासारखी प्रथा पाळून मुलगी सुखात आणि तोलामोलाच्या घराण्यात राहील एवढेच पाहणे.. हे सारे अत्यंत नकोशा स्वरूपात चर्चिले गेले, ते माकोच्या विवाहामुळे. त्यातच तिच्या सासूचा तो कथित आर्थिक जहांबाजपणा. थोर जपानी संस्कृतीची ही सारी ठिगळे उघडपणे दिसली, त्याला माको निमित्तमात्र ठरली. पण काही गोष्टी मात्र तिने तिच्या सहचरासह निर्णयपूर्वक केलेल्या आहेत. जपान सोडून अमेरिकेत जाण्याचा निर्णय तर त्या थोर जपानी संस्कृतीशी सामाजिक संबंधही तोडणारा आहे. ती कदाचित अमेरिकेतल्या जपानी लोकांमध्ये रुळेल, पण केइ-माकोची पुढली पिढी अमेरिकन असेल!

.. संस्कृती आत्मपरीक्षण करीत नाही, आतून बदल घडवत नाही, तेव्हा शहाणीसुरती मुले ‘ही संस्कृती दुरून बरी’ असे ठरवून देशाबाहेर लौकिकार्थाने जगायला जातात. सांस्कृतिक दंभाला मिळालेला हा घरचा आहेरच. तो माकोने जपानी संस्कृतीला दिलेला आहे, हे सुशिक्षित- सुखवस्तू भारतीयांना जपान्यांपेक्षा चटकन उमगेल! माकोचे पुढे काय होईल ते होवो, आपण जपान्यांविषयी सहवेदना व्यक्त करायला हवी. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Japan s princess mako wedding princess mako of japan marries kei komuro zws

Next Story
अर्थभयाचे आव्हान
ताज्या बातम्या