राजकारण, समाजकारण वा अर्थकारण यातील सर्व दुखण्यांचे मूळ आपल्या या नायक / खलनायक प्रवृत्तीत दडलेले आहे, हे अजूनही आपणास लक्षात येत नाही.

चंदा कोचर यांची बडतर्फी, दिवाण हाऊसिंगचा कथित घोटाळा, पंजाब नॅशनल बँकेतील घरफोडी, किंगफिशरचा कपाळमोक्ष या व अशा सगळ्यांमागील कारण एकच. कॉर्पोरेट गव्हर्नन्स नामक नियामक यंत्रणेतील खिंडारे. म्हणजे खासगी/सरकारी क्षेत्रातील उच्चपदस्थांच्या कृत्यांवर देखरेखीचा अभाव. तो असतो कारण उच्चपदस्थांनाही प्रश्न विचारण्यात काहीही गर नाही या संस्कृतीचाच एकंदर अभाव. अशा प्रश्नशून्य अवस्थेत फोफावते ती फक्त कुडमुडी व्यवस्था. मग ती सरकारी असो वा खासगी. त्यात नागरिकांची बेतासबात अर्थसाक्षरता आणि नायक वा खलनायक यांच्या पराक्रमी कहाण्यांतच मश्गूल होण्याची वृत्ती यामुळे कुडमुडी व्यवस्था बाळसे धरते आणि सुस्त होऊन पडून राहते. एखादा विजय मल्या वा एखादी चंदा कोचर घडली की या व्यवस्थेस जाग येते. मग चोर चोर अशी बोंब ठोकायची, त्या कथित चोरास पकडायचे आणि मग व्यवस्था पुन्हा सुस्त पडून राहायला रिकामी.

चंदा कोचर प्रकरणात पुन्हा एकदा हेच घडले आहे. भारतीय बँकिंग क्षेत्राची ही एकेकाळची जणू सम्राज्ञीच. त्यांच्या बुद्धिमत्तेच्या, कार्यक्षमतेच्या उदात्तीकरणाने एकेकाळी वित्तविषयक नियतकालिकांचे रकानेच्या रकाने सजत. फॅशन शो ते महिलांतील उद्यमशीलता अशा अनेक बाबींवर बाईंचे मार्गदर्शन जिवाचा कान करून ऐकले जात असे. तीच बाब विजय मल्या यांची. त्यांच्या एका कृपाकटाक्षासाठी स्त्री-पुरुष तहानलेले असत. या मंडळींचे इतके नायकीकरण हे तेव्हादेखील समाजाचे भान हरपल्याचे लक्षण होते आणि आता त्यांचे खलनायकीकरणदेखील समाजाच्या अक्कलशून्यतेचेच निदर्शक आहे. ते कसे आणि का होते हे समजून घ्यायचे असेल तर त्याआधी किमान गुणांस विशेष मानण्याच्या आपल्या सामाजिक प्रवृत्तीस हात घालायला हवा.

चंदा कोचर वा विजय मल्या यांचे कर्तृत्व काय? तर कोचरबाईंनी आयसीआयसीआयचा प्रचंड व्यवसाय विस्तार केला आणि मल्या यांनी युनायटेड ब्रुअरीज या एका तुलनेने अपरिचित कंपनीतून आपले औद्योगिक साम्राज्य उभारले. यात विशेष ते नक्की काय? व्यवसाय वाढवणे हे कोणत्याही बँकप्रमुख वा उद्योगपतीचे कर्तव्यच. हल्ली विनाअपघात सेवा केल्याबद्दल परिवहन मंडळाच्या, म्हणजे एसटीच्या, चालकांचा सत्कार वगरे केला जातो. कोचर, मल्या यांचे नायकीकरण आणि या एसटी बसचालकांचा सत्कार या दोहोंमागील मानसिकता एकच. अपघात न करता बसगाडय़ा चालवणे हे चालकाचे किमान कर्तव्यच नव्हे काय? ते त्याने पार पाडले यात विशेष ते काय? म्हणजे शिक्षकाने जसे शिकवायला हवे तसेच चालकाने सुरक्षितपणे वाहन चालवायला हवे, बँकरने योग्य ती काळजी घेत कर्जे द्यायला हवीत आणि उद्योगपतीने नियमांच्या अधीन राहून व्यवसाय विस्तार करायला हवा. तेच त्यांनी करणे अपेक्षित आहे. तेव्हा जे अपेक्षित तेच केले तर त्यात एवढा गवगवा करण्यासारखे काय? परंतु हा प्रश्नच अलीकडे आपल्याला पडत नसल्याने हे असे होत राहते आणि त्यातून हे असे नायक शोधण्याची सामूहिक गरज निर्माण होते. हे आपल्या सामुदायिक न्यूनगंडाचे निदर्शक. आíथक घोटाळे आदी प्रकार घडतात ते यामुळे.

याचे कारण एकदा का एखाद्यास नायकत्व दिले गेले की आपण करतो ते योग्यच असा त्याचा समज दृढ होत जातो आणि तो नियम आणि नियमन याविषयी बेफिकिरी दाखवू लागतो. चंदा कोचर वा विजय मल्या यांच्या हातून नेमके हेच झाले. आपल्या पतीशी संबंधित कंपनीस कर्ज देण्याच्या निर्णयात आपण सहभागी होता नये, इतकी साधी दक्षता चंदा कोचर यांनी घेतली नाही. श्रीयुत कोचर यांनी ज्या कंपनीत गुंतवणूक केली त्या कंपनीच्या मुख्य प्रवर्तकाने पुन्हा आयसीआयसीआय बँकेशी व्यवहार केला. परत चंदाबाईंच्या दिराचे आíथक व्यवहार आणि आयसीआयसीआय यांचाही संबंध आहेच. या सगळ्या व्यवहारांना कोचर यांनी एकटय़ाने मंजुरी दिली का? तर नाही. आयसीआयसीआय संचालकांसमोर हे सगळे प्रस्ताव आले आणि त्यांनी ते मंजूर केले. यातील एकालाही त्या वेळी वाटले नाही की कंपनीच्या प्रमुख आणि त्यांच्या पतीशीच संबंधित हे कर्ज प्रस्ताव आहेत, तेव्हा त्यावर अधिक प्रश्न विचारायला हवेत. कसे वाटणार? कारण तोपर्यंत चंदा कोचर यांची प्रतिमा प्रत्यक्षाहून किती तरी अधिक मोठी झालेली होती आणि त्या म्हणजे देशातील खासगी बँकिंगच्या कोणी उद्धारकर्त्यांच आहेत, असे मानले जायला लागले होते. त्यामुळे त्या वेळी कोणीही कसलेही प्रश्न विचारले नाहीत. पुढे ज्या व्हिडीओकॉन कंपनीस आयसीआयसीआय बँकेने भले थोरले कर्ज दिले ते बुडल्याने ही बाब चव्हाटय़ावर आली. अन्यथा तो सगळा व्यवहार चंदा कोचर यांच्या थोरपणाखाली झाकला गेला असता. बरे यात काही गरव्यवहार घडला काय? चंदा कोचर यांना या व्यवहाराचा काही आíथक फायदा झाला काय?

तर काहीही नाही. जो काही झाला तो संकेतभंग. म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्याने आपल्याच मुलाच्या उत्तरपत्रिका तपासायच्या नसतात, तसेच हे. पण असे झाले हेदेखील मान्य करण्यास ही मंडळी तयार नव्हती. इतकेच काय, पण आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष शर्मा यांनी तर चंदा कोचर यांना चारित्र्य प्रमाणपत्रच दिले होते. तेदेखील काही महिन्यांपूर्वी. पुढे जाऊन बँकेच्या संचालक मंडळाने कोचर यांच्यावर विश्वास व्यक्त करणारा ठराव मंजूर केला आणि या कर्ज व्यवहारांत काहीही चुकीचे घडलेले नाही असे छातीठोकपणे सांगितले. पण आज हेच संचालक मंडळ चंदा कोचर यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने गुन्हेगार ठरवत असून त्यांना गेल्या नऊ वर्षांत दिले गेलेले भत्ते, समभाग पर्याय हेदेखील वसूल करण्याचा निर्णय घेते, याचा अर्थ काय? भत्ते, बोनस आदी रक्कम आहे सुमारे १० कोटी रुपये आणि समभागांचे मूल्य आहे सुमारे २२० कोटी.

हा शुद्ध बिनडोकपणा झाला. कोचर यांच्यावर पूर्वलक्ष्यी प्रभावानेच जर कारवाई करावयाची असेल तर त्या वेळच्या संचालकांनाही पूर्वलक्ष्यी प्रभावाने जाब विचारायला हवा आणि जबाबदारही धरायला हवे. कोचर यांचे सर्व काही योग्य आहे असा ठराव करणाऱ्या संचालकांचे काय?

हे चंदा कोचर यांचा प्रवास खलनायकीकडे सुरू झाल्याचे लक्षण. तशा त्या एकदा ठरल्या की त्यांच्या नावाने आंघोळ करून नव्या नायकाचा शोध सुरू करण्यास संबंधित पुन्हा नव्या जोमाने तयार. या आणि अशा व्यवहारांत चंदा कोचर वा विजय मल्या यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करण्याचे कारण नाही, हे मान्य. पण ते मान्य करताना मल्या वा कोचर यांच्याकडून नतिकताभंग (नियमभंग नव्हे) होत असताना त्यांच्या नायकत्वाच्या झोतात स्वत:लाही उजळून घेण्यात धन्यता मानणाऱ्यांचे काय? यातील अधिकच शरमेची बाब म्हणजे एका साध्या गुंतवणूकदाराने थेट पंतप्रधान कार्यालय ते रिझव्‍‌र्ह बँक यांच्यापर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करूनही कोणीही त्याची दखल घेतली नाही. आमचे भावंड इंडियन एक्स्प्रेस या वर्तमानपत्राने लावून धरल्यामुळे या प्रकरणी संबंधितांना, तीही नाइलाजाने, दखल घ्यावी लागली आणि जी बाब उघड होती तिच्यावरच लाजेकाजेस्तव न्या. श्रीकृष्ण यांच्याकडून शिक्कामोर्तब करून घ्यावे लागले. म्हणजे यातही पुन्हा व्यवस्थेची निष्क्रियताच दिसून येते आणि या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या आमच्यासारख्यांचे महत्त्व अधोरेखित होते.

आता बाकीचे सर्व ‘कोचर कित्ती लब्बाड’ आणि ‘वाटले नाही हो त्या अशा असतील’ छापाच्या निर्बुद्ध प्रतिक्रिया देण्यात धन्यता मानतील आणि व्यवस्थेची खिंडारे तशीच राहतील. मग पुन्हा नवा कोणी नायक आणि नवीन खलनायक. राजकारण, समाजकारण वा अर्थकारण यातील सर्व दुखण्यांचे मूळ आपल्या या नायक / खलनायक प्रवृत्तीत दडलेले आहे, हे अजूनही आपणास लक्षात येत नाही. हा नायकी कानडा आळवणे लवकरात लवकर बंद करायला हवे.